दिवाळी फटाके बंदी : दिल्लीतल्या प्रदूषणाला दिवाळीचे फटाके खरंच किती कारणीभूत?

दिवाळीच्या काळातलं दिल्लीतलं प्रदूषण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दिवाळीच्या काळातलं दिल्लीतलं प्रदूषण
    • Author, रिएलिटी चेक टीम
    • Role, बीबीसी न्यूज

दिल्ली राज्य सरकारने यंदाच्या वर्षी दिवाळीत फटाके उडवण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. यामुळे कोणत्याही प्रकारचे फटाके दिल्लीत उडवता येणार नाहीत. शिवाय फटाक्यांची खरेदी, विक्री आणि साठा यांच्यावरही दिल्ली सरकारने बंदी घातली.

दिल्ली सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

पण हवेतील प्रदूषणाचं प्रमाण वाढण्यास फटाके खरंच किती प्रमाणात जबाबदार आहेत?

काही घातक घटकांमुळं दिवाळीच्या काळात प्रदूषणाचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढत असल्याचं काही अभ्यासांवरून समोर आलं आहे. मात्र, प्रदूषणाची पातळी वाढण्यासाठी इतरही काही घटक जबाबदार ठरतात.

दिल्लीतील प्रदूषणाची स्थिती काय?

केल्या काही वर्षांत वायू प्रदूषण ही देशातील विविध शहरांमध्ये सर्वात गंभीर आणि वाढत जाणारी समस्या ठरली आहे.

दिल्लीमध्ये कोव्हिड लॉकडाऊन असूनही जवळपास 57,000 नागरिकांचा प्रदूषणामुळं अकाली मृत्यू झाला असल्याचं ग्रीनपीसनं म्हटलं आहे.

2020 च्या जागतिक वायू गुणवत्ता अहवालाचा विचार करता जगातील 30 सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी 20 शहरं ही भारतात आहेत. त्यात PM 2.5 चं वार्षिक प्रमाण सर्वाधिक आहे. मानवी आरोग्यासाठी सर्वात घातक असे हे कण असतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या दिशानिर्देशांच्या तुलनेत हवेतील PM 2.5 ची पातळी ही खूप जास्त आहे.

PM 2.5 कण म्हणजे काय?

- पर्टिक्युलेट मॅटर किंवा PM2.5 हे प्रदूषणासाठी कारणीभूत असलेले अतिसूक्षम कण असतात. त्यांचा आकार 2.5 मायक्रॉन (0.0025मिमी) पेक्षाही कमी असतो.

- त्यातील दुसरा प्रकार म्हणजे PM10 हे काहीसे खडबडीत असे कण असतात आणि त्याचा व्यास 10 मायक्रॉनपर्यंत असतो.

- यापैकी काही नैसर्गिकरित्या निर्माण होतात. उदाहरणार्थ धूळ, जंगलांतील आगी यातून तर इतर हे मानवी औद्योगिक प्रक्रियांतून हवेत पसरतात.

- त्यांचा आकार अतिसूक्ष्म असा असतो, त्यामुळं ते सहज फुफ्फुसांपर्यंत पोहोचतात आणि त्याहीपेक्षा सूक्ष्म कण हे रक्त वाहन्यांमध्येही परसतात.

सणासुदीच्या किंवा दिवाळीच्या या काळात उत्तर भारतातील दिल्ली आणि इतर शहरांमध्ये अनेक हानिकारक घटकांच्या संयोगामुळं हवेतील प्रदूषण प्रचंड वाढतं. त्याला केवळ दिवाळीचे फटाकेच कारणीभूत नसतात.

दिवाळीच्या काळातलं दिल्लीतलं प्रदूषण

फोटो स्रोत, Getty Images

या खालील बाबींची समावेश असतो :

- पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांकडून जाळले जाणारे पिकांचे खुंट

- वाहनांद्वारे होणारं प्रचंड प्रदूषण

- दिल्ली आणि आसपाच्या परिसरातील बांधकामे आणि औद्योगिक प्रदूषण

- या भागातील हवामानामुळं प्रदूषणाचे कण वातावरणात अडकून राहतात

दिवाळीचा परिणाम कसा होतो?

काही राज्यांमध्ये दिवाळी दरम्यान फटाक्यांची विक्री आणि वापर यावर बंदी घालण्यात आली आहे. पण त्याची योग्य अंमलबजावणी अनेक ठिकाणी होत नाही.

दिवाळीच्या फटाक्यांमुळं हवेतील प्रदूषणाचा विचार करता तुलनेनं कमी मात्र उल्लेखणीय असा परिणाम होत असल्याचं 2018 मधील एका अभ्यासावरून समोर आलं आहे.

हा अभ्यास दिल्लीमधील पाच ठिकाणी 2013 ते 2016 या दरम्याच्या कालावधीत जमा केलेल्या माहितीच्या आधारे करण्यात आला.

हिंदु कॅलेंडरनुसार दिवाळी ही साधारणपणे ऑक्टोबरच्या अखेरीस किंवा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला साजरी केली जाते.

यासाठीच्या वेगवेगळ्या तारखा महत्त्वाच्या ठरतात. कारण त्यामुळं अभ्यासकांना पिकांचे खुंट जाळ्याच्या मुद्द्याचा त्यात समावेश करता येतो. कारण त्याच कालावधीत त्याचीही सुरुवात होत असते.

उत्तर भारतात अशाप्रकारे पिकांचे खुंट कधी जाळले जातात याची माहिती मिळवण्यासाठी नासाच्या उपग्रहाद्वारे मिळणाऱ्या माहितीची मदत घेतल्याचं, हा अहवाल तयार करणाऱ्यांपैकी एक असलेले धनंजय घेई यांनी बीबीसी बरोबर बोलताना सांगितलं.

या चारपैकी दोन वर्षांमध्ये पिकांचे खुंट जाळणं आणि दिवाळी हे एकाच वेळी घडलं नाही.

त्याशिवाय एका ठिकाणी सुटीमुळं औद्योगिक कामकाजही बंद होतं, हेही त्यांनी लक्षात आणून दिलं. तसंच हवामानाच्या स्थितीचा एकूण आकडेवारीत समावेश केला.

त्यात त्यांना उत्सवाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत PM 2.5 च्या प्रमाणात जवळपास 40% वाढ झाल्याचं आढळून आलं.

त्यानंतर दिवाळी संपल्यानंतर ते प्रमाण पुन्हा पूर्ववत झाल्याचं पाहायला मिळालं.

तासांनुसार विभागणी करून याचा अभ्यास केला असता यात सायंकाळी सहा वाजेनंतर पाच तासांपर्यंत 100 टक्क्यांची वाढ पाहायला मिळते. कारण या काळातच प्रामुख्यानं सगळे फटाके फोडून उत्सव साजरा करत असतात.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हायरमेंट या दिल्लीतील संस्थेच्या अहवालानुसार 2018, 2019 आणि 2020 मध्ये दिल्लीत PM 2.5 च्या प्रमाणात वाढ झाल्याचं आढळून आलं.

इतर घटक कोणते?

सर्वच फटाक्यांमधून मोठ्या प्रमाणावर PM2.5 चे कण बाहेर पडतात असं नाही, हेही इथं नमूद करायला हवं. मोठ्या फटाक्यांमधून ते मोठ्या प्रमाणआत बाहेर पडतात.

दुसरा धोका वाहनांमुळंही वाढतो. दिवाळीच्या काळात खरेदीसाठी, मित्र आप्तेष्ठांना भेटण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांमुळं वाहनांचा अधिक वापर होतो आणि त्यामुळं प्रदूषणात वाढ होते.

फटाक्यांच्या तुलनेत रस्त्यावरील वाहनांच्या गर्दीचं प्रमाण अधिक असतं, त्यामुळं त्यातून सर्वाधिक PM2.5 हवेत परसतं असं म्हणता येऊ शकतं?

भविष्यातील संशोधनात यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं अभ्यासकांचं मत आहे.

याशिवाय फटाक्यांमध्ये जड धातूंसह इतरही विषारी घटक असतात.

जमशेदपूरमध्ये याबाबत एक स्वतंत्र अभ्यास करण्यात आला. त्यात दिवाळीच्या काळात हवेमध्ये खालील घटकांत उल्लेखनीय वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. :

- PM10 कण

- सल्फर डायऑक्साईड

- नायट्रोजन डायऑक्साईड

- ओझोन

- आयर्न

- लेड

- मँगनीज

- कॉपर

- बेरिलियम

- निकेल

सरकारच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानंही फटाक्यातील 15 घटक धोकादायक आणि विषारी असल्याचं स्पष्ट केलं आहे.

यापैकी अनेक घटक हे वाहनांमुळं होणाऱ्या प्रदूषणातूनही हवेत मिसळतात, हेही याठिकाणी पुन्हा नमूद करणं गरजेचं आहे.

त्यामुळं फटाक्यांच्या वापरावर काही प्रमाणात निर्बंध आणणं हा निर्णय काही प्रमाणात योग्य आहे. कारण पृथ्वीवरील काही भाग जे प्रदूषणाच्या विळख्यात अडकले आहेत, त्याठिकाणच्या समस्यांमध्ये फटाक्यांमुळं आणखी वाढ होते.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)