निरुपमा भावे : वयाच्या 75 व्या वर्षी सायकलवर भारत फिरणाऱ्या पुण्यातील आजी

- Author, नितीन नगरकर आणि राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी
"अजून 25 वर्षे आपली तब्येत उत्तम ठेवायची असेल, तर सायकल चालविण्याशिवाय पर्याय नाही," असं ठरवत पुण्याच्या निरुपमा भावे यांनी सायकलिंगला सुरुवात केली. निरुपमा भावे या सध्या 75 वर्षांच्या आहेत.
गेल्या 18 वर्षांपासून त्या नियमित सायकलिंग करतात. सायकलिंग हेच आपल्या फिटनेसचे रहस्य असल्याचं त्या सांगतात.
सायकलिंगबाबत माहिती देणारा निरुमपा भावे यांचा व्हीडिओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे. 75 व्या वर्षी देखील त्या सायकलिंग करत असल्याने सोशल मीडियावर त्यांचं कौतुकही झालं.
भावे या पुण्यातील प्रभात रोड भागात राहतात. वयाच्या 55 व्या वर्षी त्यांनी सायकल चालवायला सुरुवात केली.
सुरुवातीला त्यांनी 'पुणे सायकल प्रतिष्ठान' या संस्थेबरोबर सायकलिंग केलं. पुढे त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत एक ग्रुप तयार करुन सायकलिंग करण्यास सुरुवात केली. देशभर त्यांनी सायकलवरून भटकंती केली आहे. सायकलिंग, ट्रेकिंग आणि व्यायाम हा त्यांचा ध्यास आहे.

वाघा बार्डर ते आग्रा, भुवनेश्वर ते कोलकाता, गोवा ते कोचीन, तसंच मनाली-लेह-खार्दुगला असे अनेक ट्रेक त्यांनी सायकलवर केले आहेत. सायकल चालवणे पॅशन असल्याची त्या सांगतात.
पुणे ते कन्याकुमारी असा प्रवास करत त्यांनी आपला 70 वा वाढदिवस देखील साजरा केला होता. या प्रवासात त्यांनी रोज 100 ते 150 किलोमीटर सायकल चालवली. कोरोनाच्या काळात व्यायामासाठी सायकलचा खूप उपयोग होत असल्याचेही त्या आवर्जून सांगतात.
भावे म्हणाल्या, ''आपली तब्येत अजून 25 वर्ष चांगली ठेवायची असेल तर सायकलिंग करायला हवे, असा विचार मी केला. म्हणून पुतनीची सायकल दुरुस्त करुन पुण्यात सायकल चालवायला सुरुवात केली. पहिल्या वर्षीच वाघा बार्डर ते आग्रा अशी सायकलिंग केली. त्यानंतर विविध ठिकाणी सायकलिंग करत राहिले. ज्या दिवशी मी मनाली- लेह- खार्दुगला अशी सायकल ट्रेक केली, तो माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदी क्षण होता.''

सहा वर्षापूर्वी भावे अचानक आजारी पडल्या होत्या, शरीराचा काही भाग लुळा पडूनही त्यांनी हार मानली नाही. ज्या आजारातून बाहेर पडण्यासाठी वर्ष लागले असते, त्या आजारातून त्या अवघ्या दोन महिन्यात बऱ्या होऊन पुन्हा सायकलिंग करु लागल्या. सायकलिंग केल्याने जो फिटनेस आला होता, तो या आजारातून बाहेर पडण्यासाठी कामी आल्याचे त्या सांगतात.
त्यांच्या फिटनेसबाबत त्या म्हणतात, ''सकाळी उठलं की मध, लिंबू, हळद पाणी पित असते. ते झाले की सायकल घेऊन टेकडीवर फिरायला जाते. कधी सायकलिंग सोबतच पोहायला देखील जाते. रोज सकाळी 6.30 वाजता निघून 8.30 वाजेपर्यंत हा व्यायाम करते.''

सायकलचे महत्त्व समजावून सांगताना त्या म्हणतात, ''जर तुमच्या कामाची जागा घरापासून 7-8 किलोमीटरच्या दरम्यान असेल तर जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा सायकलने प्रवास करायला हवा. त्याच्यामुळे तुम्ही फिट राहायला मदत होईल आणि तुम्हाला आनंदही मिळेल."
"शाळेत मुलं सायकलने जातात. पण पुढे कॉलेजला गेलं की त्यांची सायकल सुटते. त्यामुळे तरुणांनी फिटनेससाठी आठवड्यातून दोन-तीन वेळातरी 5-6 किलोमीटर सायकल चालवली पाहीजे. यातून पेट्रोल देखील वाचेल आणि प्रदूषणातही घट होण्यास मदत होईल," असं सांगतानाच निरुपमा भावे म्हणतात, वृद्धपकाळात सायकलने खूप आनंद आणि समाधान दिलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








