मुथुलक्ष्मी रेड्डी - बालविवाह, देवदासी प्रथेविरोधात लढा देणारी पहिली महिला

मुथुलक्ष्मी रेड्डी

फोटो स्रोत, Google

    • Author, पद्मा मीनाक्षी
    • Role, बीबीसी तेलुगू

बीबीसी घेऊन आलंय एक खास सीरिज 'सावित्रीच्या सोबतिणी'त्या महिलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकायला ज्यांनी लोकशाही, मानवी हक्क आणि महिला सबलीकरण यासाठी मोठं काम केलं पण ज्यांच्याविषयी आजही फारशी माहिती नाही.

'सावित्रीच्या सोबतिणी'हे खास नाव यासाठी कारण जसं सावित्रीबाई फुलेंनी महिलांना शिक्षणाची दारं उघडी करून दिली तसंच या सगळ्या स्त्रियांनी भारतातल्या महिलांच्या हक्कांसाठी प्रयत्न केले,लढा दिला. म्हणूनच या महिला, काही सावित्रीबाईंच्या काळाच्या आधीच्या तर काही नंतरच्या पण सर्वार्थाने 'सावित्रीच्या सोबतिणी'.

लाईन

मुथुलक्ष्मी रेड्डी हे नाव ऐकल्यावर चटकन त्या कोण हे लक्षात येणार नाही, पण ही अशी महिला होती जिची ओळख 'अनेक क्षेत्रातली पहिली' म्हणून करून देता येईल.

त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील पदवी घेतली होती आणि त्या पहिल्या 'हाऊस सर्जन' होत्या. कायदेमंडळाच्या पहिल्या महिल्या सदस्यही होत्या.

मुथुलक्ष्मी रेड्डी यांचा जन्म 30 जुलै 1886 साली तामिळनाडूमधील पुदुकोट्टाई इथं झालं होता. त्यांच्या वडिलांचं नाव नारायण स्वामी अय्यर होतं. ते महाराजा कॉलेजचे प्राचार्य होते. त्यांची आई चंद्राम्मल या देवदासी होत्या.

मुथुलक्ष्मी यांच्या वडिलांनी मॅट्रिकपर्यंत त्यांना स्वतःच घरी शिकवलं. काही शिक्षकही त्यांना घरी शिकवायला यायचे. मॅट्रिकच्या परीक्षेत त्या प्रथम आल्या.

मात्र तरीही मुलगी असल्यामुळे त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश नाकारला गेला. त्यांच्या प्रवेशावरून त्याकाळी सनातन्यांनी रान उठवलं होतं.

व्हीडिओ कॅप्शन, देवदासी प्रथेविरुद्ध लढणाऱ्या मुथुलक्ष्मी

पण मुथुलक्ष्मी यांची अभ्यासातली रुची पाहून पुदुकोट्टाईचे राजे मार्तंड भैरव थोंडामन यांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेशही मिळवून दिला आणि शिष्यवृत्तीही. त्याकाळी शाळेत जाणारी ती एकमेव मुलगी होती.

मद्रास मेडिकल कॉलेजच्या सर्जरी डिपार्टमेंटमध्ये प्रवेश मिळवणारी पहिली भारतीय महिला म्हणजे मुथुलक्ष्मी रेड्डी. त्या केवळ प्रवेश मिळवून थांबल्या नाहीत, तर मद्रास मेडिकल कॉलेजमधून सर्जरी या विषयात अव्वल येत गोल्ड मेडलही मिळवलं.

या मालिकेतील इतर महिलांविषयी तुम्ही या ठिकाणी वाचू शकता

लाईन
लाईन

त्यांची ओळख केवळ वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणारी 'पहिली महिला' एवढ्यापुरतीच मर्यादित नव्हती, तर त्यांनी महिलांच्या मुक्ती आणि सक्षमीकरणासाठीही प्रयत्न केले, असं डॉक्टर व्ही शांता यांनी 'Muthulakshmy Reddy - A Legend unto herself' या पुस्तकात म्हटलं आहे.

मुथुलक्ष्मी यांचा विवाह डॉ. टी सुंदर रेड्डी यांच्याशी एप्रिल 1914 साली झाला. लग्नाआधी त्यांनी आपल्या पतीला एकच अट घातली होती...त्यांनी मुथुलक्ष्मी यांच्या सामाजिक तसंच गरजूंना वैद्यकीय मदत देण्याच्या कामात कोणताही हस्तक्षेप करू नये.

मुथुलक्ष्मी रेड्डी

फोटो स्रोत, INDIA INTERNATIONAL CENTRE

इंग्लंडमध्ये महिला आणि मुलांच्या आरोग्यासंबंधीचा एक कोर्स करण्यासाठी त्यांची निवड झाली होती. मुथुलक्ष्मी यांच्या पालकांनी इंग्लंडला जाण्यासाठी विरोध केला. त्यावेळी तामिळनाडूचे तत्कालिन आरोग्यमंत्री पानगल राजा यांनी एका वर्षासाठी मुथुलक्ष्मी यांना आर्थिक सहाय्य करण्याची सूचना केली.

पण लवकरच त्यांच्या लक्षात आलं, की केवळ वैद्यकीय मदत पुरेशी नाहीये आणि म्हणूनच त्या अॅनी बेझंट यांच्या मार्गदर्शनाखाली महिला चळवळीमध्ये सहभागी झाल्या. विमेन्स इंडियन असोसिएशननं 1926 साली त्यांना मद्रास कायदे मंडळाच्या सभासद म्हणून नामांकित केलं. 1926 ते 1930 या कालखंडात त्या कायदे मंडळाच्या सभासद होत्या.

सुरूवातीला ही जबाबदारी स्वीकारण्याबद्दल त्या साशंक होत्या. त्यामुळे आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील कामावर परिणाम होईल अशी भीती त्यांना वाटत होती. पण महिलांनी घराप्रमाणेच राष्ट्राच्या उभारणीतही आपल्या कौशल्यांचा वापर करावा, असंही त्यांना वाटत होतं.

मुथुलक्ष्मी रेड्डी

फोटो स्रोत, INDIA INTERNATIONAL CENTRE

बालविवाह प्रतिबंधक कायदा, देवदासी प्रथा संपुष्टात आणणारा तसंच महिला आणि लहान मुलांची तस्करी थांबवणारा कायदा संमत करून घेण्यामध्ये मुथुलक्ष्मी यांचा महत्त्वाचा वाटा होता.

मुलींचं विवाहाचं वय 14 वर्षं करणाऱ्या कायद्यावरील चर्चेदरम्यान त्यांनी म्हटलं होतं, "सती प्रथेमध्ये एखाद्या स्त्रीला होणारा त्रास हा काही मिनिटांचाच असतो. पण बालविवाहामुळे मुलीला तिच्या जन्मापासून हा त्रास सुरू होतो. लहान वयातलं बायकोपण, आईपण कधीकधी वैधव्य सोसताना मुलीला आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो." My Experiences as Legislator या पुस्तकात त्यांनी हे नमूद केलं आहे.

जेव्हा त्यांच्या बालविवाह प्रतिबंधक विधेयकाचा मसुदा स्थानिक माध्यमांमधून प्रसिद्ध झाला, तेव्हा सनातनी लोकांनी त्यांच्यावर प्रचंड टीका केली. सभा, प्रसिद्धीपत्रकं आणि अन्य माध्यमातून आपल्यावर कसा हल्ला चढविण्यात आला होता, तेसुद्धा मुथुलक्ष्मी यांनी नमूद केलं आहे.

देवदासी प्रथेचं निर्मूलन करणारा कायदा संमत करून घेण्यामध्ये त्यांची प्रमुख भूमिका होती. हिंदू देवळांमध्ये तरुण मुलींना देवाला अर्पण करण्याची प्रथा म्हणजे देवदासी. यावेळीही मुथुलक्ष्मी यांना विरोध सहन करावा लागला. अर्थात, हे विधेयक मद्रास कायदे मंडळात एकमतानं मंजूर झालं आणि केंद्र सरकारकडेही पाठविण्यात आलं. 1947 मध्ये या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालं.

मद्रास कायदेमंडळामध्ये देवदासी प्रथेविरुद्ध आपली भूमिका मांडताना मुथुलक्ष्मी यांनी म्हटलं होतं की, देवदासी हा सतीप्रथेचंच वाईट स्वरूप आहे आणि धार्मिक गुन्हा आहे.

मुथुलक्ष्मी रेड्डी

त्यांच्यावर अॅनी बेझंट आणि महात्मा गांधींच्या विचारधारेचा प्रभाव होता.

तिरुचिरापल्लामधील इतिहास विभागातील संशोधक एम. एस. स्नेहलता यांनी 'मुथुलक्ष्मी रेड्डी, सामाजिक क्रांतिकारी' या नावानं रिसर्च पेपर प्रसिद्ध केला आहे. 'जेव्हा मीठाच्या सत्याग्रहावेळी महात्मा गांधींना अटक झाली होती, तेव्हा मुथुलक्ष्मी यांनी मद्रास कायदे मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.'

देवदासींसाठी त्यांनी 1931 साली अडयारमधल्या आपल्या घरातच 'अव्वई घर' सुरू केलं होतं.

कॅन्सरमुळे धाकट्या बहिणीचं निधन झाल्यानंतर मुथुलक्ष्मी यांना धक्का बसला. त्यानंतर 1954 साली अडयार कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले. आजही या संस्थेमार्फत देशभरात कॅन्सर रुग्णांवर उपचार केले जातात.

1956 साली त्यांना वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 1986 साली मुथुलक्ष्मी यांच्या जन्म शताब्दीनिमित्त तामिळनाडू सरकारनं खास तिकिट प्रसिद्ध केलं होतं.

1968 साली वयाच्या 81 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. गुगलनं त्यांच्या सन्मानार्थ डुडलही तयार केलं होतं.

या मालिकेतले इतर लेख वाचलेत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)