रखमाबाई राऊत: 'मर्जीविरूद्ध झालेलं लग्न मला मान्य नाही, वाटल्यास जेलमध्ये जाईन'

डॉ. रखमाबाई राऊत
    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी

बीबीसी घेऊन आलंय एक खास सीरिज 'सावित्रीच्या सोबतिणी'त्या महिलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकायला ज्यांनी लोकशाही, मानवी हक्क आणि महिला सबलीकरण यासाठी मोठं काम केलं, पण ज्यांच्याविषयी आजही फारशी माहिती नाही.

'सावित्रीच्या सोबतिणी'हे खास नाव यासाठी कारण जसं सावित्रीबाई फुलेंनी महिलांना शिक्षणाची दारं उघडी करून दिली तसंच या सगळ्या स्त्रियांनी भारतातल्या महिलांच्या हक्कांसाठी प्रयत्न केले,लढा दिला. म्हणूनच या महिला, काही सावित्रीबाईंच्या काळाच्या आधीच्या तर काही नंतरच्या पण सर्वार्थाने 'सावित्रीच्या सोबतिणी'.

लाईन

रखमाबाई राऊत ओळखल्या जातात त्या 1884-90 या काळात गाजलेल्या एका खटल्यासाठी आणि त्याहूनही त्यांच्या 'माझ्या संमतीशिवाय झालेल्या लग्नात मी नांदणार नाही, मला तुरुंगवासाची शिक्षा झाली तरी चालेल' या ठाम भूमिकेसाठी.

त्या काळी नवऱ्याने आपल्या बायकोला सोडणं फारच सामान्य बाब होती, पण रखमाबाई कदाचित भारतातल्या पहिल्या महिला होत्या ज्यांनी आपल्या नवऱ्याकडे कायदेशीर घटस्फोट मागितला.

रखमाबाईंमुळेच भारतात, खासकरून महाराष्ट्रात संमतीवयाबद्दल चर्चा, वाद सुरू झाले. पुढे त्यांच्याच खटल्यामुळे ब्रिटिशकालीन भारतात 'संमतीवयाचा कायदा 1891' लागू झाला.

त्याकाळच्या परंपरांप्रमाणे वयाच्या अकराव्या वर्षीच रखमाबाईंचं लग्न त्यांच्या विधवा आईनं लावून दिलं

रखमाबाईंचा जन्म 1864 साली मुंबईमध्ये त्यांचा जन्म झाला. त्याकाळच्या परंपरांप्रमाणे वयाच्या अकराव्या वर्षीच रखमाबाईंचं लग्न त्यांच्या विधवा आईनं लावून दिलं. मात्र सासरी न जाता त्या आईसोबतच राहिल्या.

या मालिकेतील इतर महिलांविषयी तुम्ही या ठिकाणी वाचू शकता

लाईन
लाईन
त्याकाळच्या परंपरांप्रमाणे वयाच्या अकराव्या वर्षीच रखमाबाईंचं लग्न त्यांच्या विधवा आईनं लावून दिलं

त्यानंतर रखमाबाईंच्या आईंनी पुन्हा लग्न केलं. सावत्र वडिलांचा, सखाराम अर्जुन यांचा रखमाबाईंवर खूप प्रभाव होता. वयाची विशी गाठेपर्यंत रखमाबाई सासरी नांदायला गेल्याच नाहीत. त्याकाळी नवऱ्याच्या घरी जायला नाही म्हणणं ही फार मोठी गोष्ट होती.

शेवटी रखमाबाईंचे पती, दादाजी भिकाजी, यांनी रखमाबाईंनी नांदायला यावं म्हणून कोर्टात केस दाखल केली.

शेवटी रखमाबाईंचे पती, दादाजी भिकाजी, यांनी रखमाबाईंनी नांदायला यावं म्हणून कोर्टात केस दाखल केली. आपली बाजू मांडताना रखमाबाईंनी 'मला हे लग्न मान्य नाही कारण हे लग्न झालं तेव्हा मी अतिशय लहान होते, आणि माझी संमती या लग्नाला नव्हती,' असा युक्तिवाद केला.

कोर्टाने लग्न टिकवावं अशा अर्थाचा निकाल दिला, तो साहजिकच रखमाबाईंना मान्य होण्यासारखा नव्हता.

कोर्टाने लग्न टिकवावं अशा अर्थाचा निकाल दिला, तो साहजिकच रखमाबाईंना मान्य होण्यासारखा नव्हता. कोर्टाने रखमाबाईंपुढे दोन पर्याय ठेवले, एकतर नवऱ्याकडे नांदायला जाणं किंवा सहा महिन्यांची कैद. रखमाबाईंना तुरुंगवास मंजूर होता पण संमतीशिवाय झालेलं लग्न नाही.

व्हीडिओ कॅप्शन, रखमाबाई राऊत: मर्जीविरूद्ध झालेलं लग्न धुडकावून लावणारी महिला

एका बाजूला खटला चालू होता, तर दुसऱ्या बाजूला समाजातून रखमाबाईंवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. ही टीका करणाऱ्यांमध्ये अग्रणी होते स्वातंत्र्यसैनिक बाळ गंगाधर टिळक.

टिळकांचा रखमाबाईंना आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या संमतीवयाच्या कायद्याला प्रखर विरोध होता.

टिळकांचा रखमाबाईंना आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या संमतीवयाच्या कायद्याला प्रखर विरोध होता. टिळकांनी आपल्या वर्तमानपत्रांमधून रखमाबाईंवर कडाडून टीका केली.

एका ठिकाणी ते लिहातात, "रखमाबाई, (पंडिता) रमाबाई यांच्यासारख्या स्त्रियांना चोर, व्याभिचारी आणि खुनी अशा लोकांना दिल्या जाणाऱ्या शिक्षा दिल्या पाहिजेत." (द मराठा 12 जून 1887)

तरीही रखमाबाईंनी हार मानली नाही. कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध त्यांनी ब्रिटनच्या महाराणी व्हिक्टोरिया यांना पत्र लिहिलं. महाराणींनी कोर्टाचा निर्णय रद्दबातल ठरवला. अखेरीस रखमाबाईंच्या पतीने पैशांच्या बदल्यात खटला मागे घेतला. याच खटल्यानंतर बहुचर्चित 'एज ऑफ कन्सेंट अॅक्ट 1891' हा कायदा पास झाला. या कायद्यामुळे मुलींच्या सेक्स करण्याचं, पर्यायाने लग्नाचं वय 10 वरून 12 करण्यात आलं. या कायद्याचं उल्लघंन झालं तर याला बलात्कारासारख्याच शिक्षेची तरतूद होती.

पहिल्या महिला प्रॅक्टिसिंग डॉक्टर

कायदेशीर घटस्फोट घेणारी पहिली महिला इतकीच रखमाबाईंची ओळख नाही. त्या भारतातल्या पहिल्या महिला प्रॅक्टिसिंग डॉक्टर आणि पहिल्या महिला MD होत्या.

रखमाबाईंचे सावत्र वडील सखाराम अर्जुन पेशाने सर्जन होते,

रखमाबाईंचे सावत्र वडील सखाराम अर्जुन पेशाने सर्जन होते, म्हणून कदाचित रखमाबाईंनाही वैद्यकीय शिक्षणाविषयी आस्था वाटली असावी. या गाजलेल्या खटल्यानंतर रखमाबाईंनी वैद्यकीय शिक्षण घ्यायचं ठरवलं. यासाठीही त्यांना लढा द्यावा लागला.

लंडन स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये त्याकाळी महिलांना MD करण्याची परवानगी नव्हती.

लंडन स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये त्याकाळी महिलांना MD करण्याची परवानगी नव्हती. रखमाबाईंनी याविरोधातही आवाज उठवला. शेवटी त्यांनी ब्रसेल्समधून आपलं शिक्षण पूर्ण केलं.

डॉ. रखमाबाईंनी 35 वर्ष प्रॅक्टीस केली

रखमाबाईंनी दुसरं लग्न केलं नाही. त्यांनी 35 वर्ष प्रॅक्टीस केली आणि आपलं संपूर्ण आयुष्य महिलांच्या आरोग्यासाठी समर्पित केलं.

या मालिकेतले इतर लेख वाचलेत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)