इंदरजीत कौर: फाळणीनंतर भारतात आलेल्या शेकडो जणांचे पुनर्वसन करणारी महिला

इंदरजीत कौर

फोटो स्रोत, BBC/gopalshunya

    • Author, सुशिला सिंह
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

बीबीसी घेऊन आलंय एक खास सीरिज 'सावित्रीच्या सोबतिणी'त्या महिलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकायला ज्यांनी लोकशाही, मानवी हक्क आणि महिला सबलीकरण यासाठी मोठं काम केलं, पण ज्यांच्याविषयी आजही फारशी माहिती नाही.

'सावित्रीच्या सोबतिणी'हे खास नाव यासाठी कारण जसं सावित्रीबाई फुलेंनी महिलांना शिक्षणाची दारं उघडी करून दिली तसंच या सगळ्या स्त्रियांनी भारतातल्या महिलांच्या हक्कांसाठी प्रयत्न केले,लढा दिला. म्हणूनच या महिला, काही सावित्रीबाईंच्या काळाच्या आधीच्या तर काही नंतरच्या पण सर्वार्थाने 'सावित्रीच्या सोबतिणी'.

लाईन

प्रश्न - तुम्ही फेमिनिस्ट आहात का?

उत्तर - हो, आहे. पण ब्रा जाळणाऱ्यांपैकी मी नाही.

एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला इंदरजीत कौर यांनी हे उत्तर दिलं होतं.

इंदरजीत कौर. या महिलेनेच मोठ्या धाडसाने आणि समजुतदारपणे महिलांसाठी नव्या संधीचे दरवाजे उघडले.

व्हीडिओ कॅप्शन, इंद्रजीत कौर : भारत-पाकिस्तान फाळणीनंतर निर्वासितांसाठी काम करणारी महिला

इंदरजीत कौर यांनीच मुलींना निडरपणे घरातून बाहेर पडून जगाला डोळे भिडवण्याचं धाडस दिलं होतं.

इंदरजीत कौर यांच्या नावासमोर 'पहिल्या' किंवा 'प्रथम' हे विशेषण अनेकवेळा आलं.

इंदरजीत कौर स्टाफ सिलेक्शन समितीच्या (SSC) पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. पंजाबी युनिव्हर्सिटीच्या पहिल्या महिला कुलगुरु त्या राहिल्या.

कौर यांची कहाणी कोणत्याही व्यक्तीसाठी प्रेरणादायक अशीच आहे. 1 सप्टेंबर 1923 ला पंजाबच्या पटियालामध्ये कर्नल शेर सिंह संधू यांच्या घरी मुलगी जन्माला आली.

इंदरजीत कौर

फोटो स्रोत, BBC/gopalshunya

शेर सिंह संधू आणि त्यांची पत्नी करतार कौर यांचं हे 'पहिलं'च अपत्य.

या मुलीचं नाव इंद्रजीत कौर असं ठेवण्यात आलं. त्यावेळी घरात मुलगा जन्मल्यावर ज्याप्रकारे आनंद साजरा केला जायचा, तसाच आनंद कर्नल शेर सिंह संधू यांनी इंदरजीत कौर यांच्या जन्माचा दिवस धुमधडाक्यात साजरा केला.

या मालिकेतील इतर महिलांविषयी तुम्ही या ठिकाणी वाचू शकता

लाईन
लाईन

कर्नर शेरसिंह एक पुरोगामी आणि उदारमतवादी व्यक्ती म्हणून ओळखले जात.

त्यांनी कधीच जुन्या प्रथा, पुराणमतवादी विचार तसंच त्यावेळी सुरू असलेल्या पडदा पद्धतीला आपल्या मुलांच्या विकासाच्या आड येऊ दिलं नाही. याच विचारसरणीमुळे इंदरजीत संधू यांना पुढे जाण्यासाठी पाठबळ मिळालं.

इंदरजीत कौर

फोटो स्रोत, BBC/gopalshunya

इंदरजीत यांनी आपलं प्राथमिक शिक्षण पटियालाच्या व्हिक्टोरिया गर्ल्स स्कूलमधून पूर्ण केलं.

दहावीनंतर कुटुंबात त्यांच्या पुढील शिक्षणाबाबत चर्चा होऊ लागली.

व्यवसायाने पत्रकार असलेले आणि इंदरजीत कौर यांचे चिरंजीव रुपींदर सिंह सांगतात, "तरूण आणि आकर्षक मुलींचे तातडीने लग्न करून द्यावं, असं माझ्या आईच्या आजोबांचं मत होतं. पण आईच्या दृढनिःश्चय आणि त्यांच्या वडिलांच्या सहकार्याने त्यांना शिक्षणाचा मार्ग खुला होण्यासाठी मदत झाली."

इंदरजीत कौर

फोटो स्रोत, BBC/gopalshunya

यादरम्यान कर्नल शेर सिंह यांची बदली पेशावरला करण्यात आली. इंदरजीत पुढील शिक्षण घेण्यासाठी लाहोरला गेल्या.

तिथं त्यांनी आर. बी. सोहनलाल ट्रेनिंग कॉलेजमध्ये बेसिक ट्रेनिंग कोर्स केला. लाहोरच्याच शासकीय महाविद्यालयातून त्यांनी दर्शनशास्त्र विषयात एम. ए. पर्यंतचं शिक्षण घेतलं.

यानंतर त्या व्हिक्टोरिया गर्ल्स इंटरमीजिएट कॉलेजमध्ये कंत्राटी पद्धतीने शिकवू लागल्या.

1946 मध्ये पटियालाच्या महिला शासकीय महाविद्यालयात त्यांनी तत्त्वज्ञान शिकवणं सुरू केलं.

यानंतर काही दिवसांनी भारत-पाकिस्तानची फाळणी झाली. दरम्यान शेकडोंच्या संख्येने शरणार्थी पाकिस्तानातून भारतात येऊ लागले.

इंदरजीत कौर

फोटो स्रोत, BBC/gopalshunya

रुपींदर सिंह सांगतात, "त्यावेळी इंदरजीत कौर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. एक कार्यकर्त्याच्या स्वरूपात त्या काम करू लागल्या. त्यांनी माता साहिब कौर संघटना स्थापन करण्यासाठी मदत केली. या संघटनेच्या त्या सचिव बनल्या."

या संघटनेच्या अध्यक्ष सरदारनी मनमोहन कौर यांच्या मदतीने पटियालात सुमारे 400 कुटुंबाचं पुनर्वसन करण्यात आलं. या कामात इंदरजीत यांनी मदत केली.

इंदरजीत कौर

फोटो स्रोत, BBC/gopalshunya

या लोकांना आर्थिक मदत करणं, कपडे, धान्य यांचा पुरवठा अशा कामांसाठी त्यांनी कुटुंबीय, मित्रमंडळी आणि नातेवाईकांकडून मदत मिळवली.

त्यांच्या मदतीसाठी अनेक मुली पुढे आल्या. त्या काळी हे चित्र दुर्मिळ होतं.

किंबहुना सुरुवातीला इंदरजीत कौर यांना आपल्याच घरातून विरोध झाला. पण त्या परिस्थितीवर मात करून त्यांनी काम सुरू ठेवलं.

इंदरजीत कौर

फोटो स्रोत, BBC/gopalshunya

रुपींदर सिंह सांगतात, "या संघटनेने अशाच प्रकारे सामानाने भरलेले चार ट्रक बारामुल्ला आणि काश्मीर परिसरात पाठवले होते. याठिकाणी लष्कराचं पथक स्थानिक लोकांना वाचवण्यासाठी गेलं होतं."

पुढे शरणार्थी मुलांसाठी माता साहिब कौर दल स्कूल स्थापन करण्यातही इंदरजीत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

त्यांनी शरणार्थी मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे दिले. 1955 साली त्या पटियाला स्टेट कॉलेज ऑफ एज्यूकेशनमध्ये प्राध्यापक म्हणून रूजू झाल्या. इथं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची पत्नी गुरुशरण कौर यासुद्धा त्यांच्या विद्यार्थिनी होत्या.

इंदरजीत कौर

फोटो स्रोत, BBC/gopalshunya

पुढे 1958 मध्ये इंदरजीत कौर यांची नियुक्ती चंदीगढच्या बेसिक ट्रेनिंग कॉलेजात प्रोफेसर ऑफ एज्युकेशन पदावर करण्यात आली. याच कॉलेजमध्ये इंदरजीत उपमुख्याध्यापक बनल्या.

पुढे इंदरजीत यांचं लग्न प्रसिद्ध लेखक ज्ञानी गुरदीत सिंग यांच्याशी झालं. ते पंजाबचे विधान परिषद सदस्यसुद्धा होते.

मी माझ्या पतिची मैत्रीण, सोबती आणि मार्गदर्शक आहे, असं इंदरजीत म्हणत. पुढे त्यांना दोन मुले झाली.

इंदरजीत कौर यांनी एक माणूस, शिक्षिका तसंच प्रशासक म्हणून अतिशय चांगलं काम केलं. त्यांनी इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले.

त्या समाजात होत असलेल्या प्रत्येक नव्या बदलाच्या साक्षीदार ठरल्या. हे बदल त्यांनी स्वतःच्या आयुष्यात सुद्धा आत्मसात केले.

इंदरजीत कौर

फोटो स्रोत, BBC/gopalshunya

पडदा पद्धतीला अवाजवी महत्त्व देणाऱ्या समाजात त्या राहत होत्या. त्यांनी या प्रथेपासून स्वतःला दूर ठेवलं. इतकंच नव्हे तर महिलांचं शिक्षण आणि अधिकारांवर त्यांनी काम केलं.

पुढे, काही काळानंतर इंदरजीत कौर यांना पटियालाच्या गव्हर्नमेंट कॉलेज मध्ये प्राध्यापकपदी काम करण्याची संधी मिळाली. याच कॉलेजातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती, हे विशेष.

इंदरजीत कौर

फोटो स्रोत, BBC/gopalshunya

तीन वर्षांच्या आत त्यांनी या कॉलेजमध्ये शास्त्र शाखा सुरू केली. यामुळे विद्यार्थ्यांची संख्या इथं प्रचंड वाढली. मुख्याध्यापक म्हणून त्यांनी इथं अतुलनीय काम केलं.

फक्त शिक्षणच नव्हे तर इतर गोष्टींवरही भर दिला. याअंतर्गत गिद्दा हे लोकनृत्य पुनरुज्जिवित करण्यासाठी मदत केली.

मुलींना स्वातंत्र्य दिनाच्या परेडमध्ये सहभागी करून घेण्यातसुद्धा इंदरजीत कौर यांची भूमिका महत्त्वाची ठरली.

परेडमध्ये गिद्दा नृत्याचा समावेश करून त्यांनी पंजाबच्या या पारंपरिक लोकनृत्याला राष्ट्रीय ओळख मिळवून दिली.

पुढे त्यांची बदली अमृतसरला झाली. तिथल्या गव्हर्नमेंट कॉलेज फॉर वूमनच्या त्या प्राचार्य बनल्या.

तिथल्या शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठीही त्यांनी मदत केली. यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ पंजाबच्या कुलगुरू बनूनच त्या पटियालामध्ये पुन्हा दाखल झाल्या.

इंदरजीत कौर

फोटो स्रोत, BBC/gopalshunya

उत्तर भारतात या पदापर्यंत पोहोचणाऱ्या पहिल्या महिला म्हणून त्यांना ओळखलं जातं.

इंदरजीत कौर यांचा एक किस्सा अत्यंत लोकप्रिय आहे.

इंदरजीत कौर कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारण्याच्या एक दिवस आधी काही मुलांमध्ये भांडण झालं. मुलांचा एक समूह तक्रार करण्यासाठी त्यांच्याकडे आला. त्यातला एक मुलगा जखमी झाला होता. तो म्हणाला, "ती मुलं किंग्स पार्टीची आहेत, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कोणतीच कारवाई होणार नाही, हे मला माहीत आहे."

यावर इंदरजीत म्हणाल्या, "इथं कुणीच किंग नाही. त्यामुळे किंग्स पार्टीसुद्धा राहणार नाही.

हे ऐकून विद्यार्थ्यांमध्ये हशा पिकला आणि ते निघून गेले.

इंदरजीत कौर यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग नोंदवला. त्यांनी अनेक विद्यापीठांमध्ये व्याख्यानंही दिली. त्यांनी पंजाबी युनिव्हर्सिटीमध्ये कुलगुरू म्हणून आपला कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा दिला.

पुढे त्यांनी दोन वर्षांची विश्रांती घेतली. 1980 मध्ये केंद्रीय सरकारी नोकऱ्यांसाठी परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करणाऱ्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून इंदरजीत कौर यांची नियुक्ती करण्यात आली होती.

या मालिकेतले इतर लेख वाचलेत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)