मोबाईलः आई-वडिलांना स्मार्टफोन शिकवताय? मग हे नक्की वाचा

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रोहन नामजोशी
- Role, बीबीसी मराठी
"अगं मला ते गुगल पे का काय ते शिकव ना."
"फेसबुक म्हणजे काय असतं रे? तिथे लोक काय करतात.?"
"अरे काल सुनंदा मामी इन्स्टाग्रामवर आली. मलाही शिकव ना ते."
"अरे माझी तीन बिलं भरायची आहेत. मोबाईल वरून कशी भरायची?"
"पेटीएम सुरक्षित असतं का गं? हल्ली काय काय ऐकू येतं. नकोच ते."
असे अनेक संवाद रोजच्या रोज आपल्या घरी ऐकू येतात. इंटरनेट आणि स्मार्टफोन ही फक्त आता तरुण पिढीची मक्तेदारी राहिलेली नाही. जग विस्तारलं आहे. मुलं कामानिमित्त वेगवेगळ्या शहरात राहतात.
आई वडिलांना विरंगुळा आणि उपयुक्ततेचं साधन म्हणून स्मार्टफोन वरदान ठरला आहे. तो वापरायचा कसा यावरून आई वडील मंडळी चाचपडतात.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांना अनेकदा या प्रकाराशी जुळवून घेणं बरेचदा जड जातं. त्यामुळे ते आपल्या मुलांवर अवलंबून असतात.
मात्र आई वडिलांचं हे डिजिटल साक्षरता अभियान वाटतं तितकं सोपं नाही. मुलांसाठी आणि आईवडिलांसाठीही नाही. मात्र ती गरज आहे हे नक्की. मग काय करता येईल?
स्मार्टफोनची निवड
वापरायला सोपा असा स्मार्टफोन निवडा.
आई वडिलांच्या प्रेमापोटी खूप महागडा आणि वापरावयास कठीण असा किंवा त्यांना काय एवढी गरज म्हणून अगदीच साधारण फोन घेऊ नका.
आपल्या आईवडिलांच्या गरजा समजून घ्या आणि त्याप्रमाणे निर्णय घ्या, आईवडिलांशी नीट चर्चा करा, त्यांना आपला स्मार्टफोन हाताळून बघू द्या. त्यांना जो आवडेल तो फोन घेऊन द्या. फोन कसा सुरू करायचा इथपासून सगळं नीट व्यवस्थित सांगा.
- स्मार्टफोनशिवाय, इंटरनेट लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर कसं वापरायचं याचंही प्राथमिक प्रशिक्षण दिलं तर स्मार्टफोन हाताळताना त्यांना सोपं जाईल. त्यातल्या बेसिक गोष्टी नीट सांगा.
- स्मार्टफोन निवडताना Dual Sim वगैरे निवडू नका. एकाच नंबरवर व्हॉट्स अप आणि कॉलिंग ठेवा. असं केल्याने गोंधळ कमी होईल.
- फोन चांगल्या कंपनीचा घ्या. म्हणजे कधी काही बिघाड झाला तर त्यांना सहज सर्व्हिस सेंटर शोधून योग्य ती कारवाई करता येईल.
- फोन बरोबर हेडफोन किंवा इअरफोन घेत असाल तरी तीच काळजी घ्या, इयरपॉड्स नावाची कर्णफुलं घ्यायची की साधी घ्यायची हे त्यांच्याशी बोलून ठरवा.
आईवडील म्हातारे होत आहेत. त्यांची श्रवणक्षमता, कानाचे काही विकार असतील तर त्यानुसार इयरफोन्सची निवड करावी.
मुक्ता चैतन्य समाजमाध्यमातून इंटरनेट आणि स्मार्टफोन कसा वापरावा याविषयी शिबिरं घेत असतात. त्यांच्या मते ज्येष्ठ नागरिकांकडे फोन आला की वाट्टेल त्या अप डाऊनलोड करायचा ट्रेंड दिसतो. असं अजिबात करू नये.
चिडू नका, रागावू नका
स्मार्टफोन शिकवताना सगळ्यात आधी पाळा तो संयम. आपले आईवडील आता म्हातारपणाकडे झुकताहेत. त्यांच्यासाठी हे विश्व फार नवीन आहे. ते आपल्यासारखे एकाच वेळी चार अॅप्स हाताळू शकत नाहीत. त्यामुळे मुलांनी संयम पाळावा. तुम्ही लहान असताना त्यांनीही पाटी पेन्सिल धरून तुम्हाला शिकवलं होतं हे सर्वप्रथम लक्षात घ्या. त्यांच्यावर ओरडू नका कदाचित ते दहादा चुकतील तरीही जीभेवर साखर, डोक्यावर बर्फ ठेवा.
'तुला कसं समजत नाही', 'अगं हे साधंच आहे', 'किती वेळा तेच तेच सांगू' असले शब्दप्रयोग करू नका. तुम्ही हे बोलण्याच्या स्थितीत येईपर्यंत आपल्या आईबापाने बराच संयम बाळगला आहे हे लक्षात असू द्या. एखादी गोष्टी दहा वेळा विचारली तरी ती नीट सांगा. अनेकदा वैतागून आईवडीलच स्मार्टफोन वापरायला कंटाळतात. तेव्हा त्यांना प्रोत्साहन द्या, त्यांच्या अडचणी सोडवा.
रुचेल एवढं पचेल तितकंच
आईवडिलांनाच सगळंच शिकवायला जाऊ नका. याचा अर्थ असा की तुम्ही स्मार्टफोन वापरून तुम्हाला कितीही येत असलं तरी आई वडील या मैदानातील नवीन खेळाडू आहेत हे लक्षात घ्या. त्यांच्या स्मार्टफोनकडून काय अपेक्षा आहेत तितकंच आणि तेवढंच सुरुवातीला शिकवा. आधी पोळी आणि मग फोडणीची पोळी हे तत्त्व कायम लक्षात असू द्या. त्यानुसार आधी बेसिक व्हॉट्सअप, व्हीडिओ कॉल या गोष्टी शिकवा. तुम्ही आईवडिलांपासून दूर राहत असाल तर व्हीडिओ कॉल सारखा सुंदर पर्याय नाही हे एव्हाना आपल्या सगळ्यांच्याच लक्षात आलं आहे. त्यामुळे आधी ते शिकवा.
अनेक आईवडिलांचा फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर या अप वापरण्याचा आग्रह असतो. हरकत नाही वापरू द्या. पण अकाऊंट तुम्ही स्वत:सुरू करून द्या. या फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे बऱ्यापैकी विस्तारित माध्यम आहे. त्यामुळे तिथे तुम्हाला बरीच शिकवणी घ्यावी लागेल. ती घ्या. कोणते फोटो टाकायचे, कोणाला काय कमेंट्स करायच्या, करू नये हेही सांगा. पुढे त्यांना निर्णय घेऊ देत. शेवटी ते तुमचे आई बाप आहेत. जगातल्या चार गोष्टी तुमच्यापेक्षा त्यांना जास्त समजतात. त्यामुळे तिथे अतिशहाणपणा करायला जाऊ नका.

फोटो स्रोत, Getty Images
फेसबुक इत्यादीच्या अकाऊंट डिटेल्स तुमच्याकडेही असू द्या. जेणेकरून कधी गरज लागली तर जगाच्या पाठीवरून कुठेही तुम्ही त्या सोडवू शकता.
मुक्ता चैतन्य सांगतात, "एकदा एक साठीचे काका फेसबुकवर आले. एका बाईची पोस्ट त्यांना आवडली. काहीही ओळख नसताना त्यांनी पोस्टवर बदाम दिला. त्या बाई चिडल्या आणि त्या काकांची बदनामी करायला सुरुवात केली. हे जेव्हा त्या काकांना कळलं त्यांना प्रचंड धक्का बसला. त्यांनी पोस्ट मनापासून आवडली म्हणून बदाम दिला होता. असेही धोके फेसबुक वापरताना होऊ शकतात त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी सावध रहावे."
सुरक्षिततेचा पासवर्ड
हल्ली अनेक पासवर्ड लक्षात ठेवावे लागतात. आई वडिलांच्या फोनमध्ये तयार केले पासवर्ड एका ठिकाणी लिहून द्या. पासवर्ड अजिबात कठीण ठेवू नका. समजण्यास आणि लक्षात ठेवण्यास सोपा असा पासवर्ड ठेवा. स्वत:कडेही तो असू द्या. कधी काही अडलंच तर बरा पडतो. फोनला पासवर्ड ठेवू नये. कारण अडीअडचणीच्या वेळी पटकन समजत नाही आणि गोंधळ उडतो.
तुम्ही बाहेरगावी रहात असाल तर तो पासवर्ड अगदी विश्वासातल्या लोकांना सांगायला हरकत नाही. पण इंटरनेट बँकिंग, फोन बँकिग, चे पासवर्ड कुणालाही सांगू नका. आईवडील डेबिट कार्ड वापरत असतील तर त्याचा पिन सहज आठवेल असाच ठेवा.
धोक्याची घंटा..
स्मार्टफोन आणि बँकिग यांचं आता एक अतुट नातं आहे. गुगलपे, पेटीएम, फोन पे यामुळे एका क्लिकवर आपण कितीही खर्च करू शकतो. पैशाचे व्यवहार अतिशय सुलभ झाले आहेत. त्याबरोबरच धोकेही तितकेच वाढले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
नेट बँकिंग, गुगल पे, या गोष्टी आईवडिलांना शिकवताना अधिक काळजी घ्या.
आईवडील जोपर्यंत पूर्णपणे या सगळ्या गोष्टी वापरायला शिकत नाही तोपर्यंत पैशाचे व्यवहार करायला त्यांना उद्युक्त करू नका.
सुरुवातीला सराव म्हणून आपल्या कुटुंबातच काही व्यवहार करून बघा. त्याचा सराव झाला की छोटे छोटे व्यवहार करायला सांगा.
अगदी शक्य असेल तर एखादं बँकेचे अकाऊंट ज्यात कमी पैसे असतील ते पेमेंट अप्सशी जोडा. म्हणजे कधी काळी काही झालंच तर जास्त फटका पडणार नाही.
बाहेर हे व्यवहार करताना आधी त्यांच्या सोबत रहा. उदा. बाहेर आहात. भाजी घेतली. तर पैसे पेटीएम किंवा तत्सम अप ने देत असाल तर सुरुवातीचा काही काळ त्यांच्याबरोबर राहा.
अनेकदा बाहेर गोंधळ होतो. आजूबाजूचे लोक फोन मध्ये झाकून पाहतात आणि अघटित प्रसंग होऊ शकतो. पैशाचे व्यवहार शिकवताना अत्यंत सावधगिरी बाळगावी.
हल्ली ज्येष्ठ नागरिकांना फोनवर लुबाडण्याचे प्रकार वाढीला लागले आहेत. मुक्ता चैतन्य सांगतात, "फोनवर किंवा व्हॉट्सअपवर कोणतीही लिंक आली तरी उघडू नये, हे सगळ्यांना कळतं पण अजिबात वळत नाही. त्यातून फोनवर लुबाडण्याचे प्रकार होतात, फोनवर व्हायरस येण्याचे प्रकार होतात. त्यामुळे कितीही मोह झाला तरी कोणत्याही लिंक उघडू नये."
इतके धोके आहेत तर मग ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्टफोन वापरूच नये का? तर असं अजिबात नाही. बदलत्या जगाबरोबर जाणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण वर उल्लेख केलेले धोके कोणालाच चुकलेले नाहीत. फक्त ती हाताळण्याची पद्धत पिढीगणिक आणि तंत्रज्ञानागणिक बदलते. त्यामुळे काळजी घ्यावी एवढंच.
एखाद्या वेळी एकटं वाटत असताना, एखादी चांगली बातमी सांगताना घरच्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी घरी फोन करायचं समाधान तरी कधी मिळणार?

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









