मानसिक आरोग्य : 'मोबाईल काढून घेतला की माझा मुलगा हिंसक होतो'

डिजिटल, सोशल मीडिया, व्यसन, अॅडिक्शन, मानसिक आरोग्य

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, नामदेव काटकर
    • Role, बीबीसी मराठी

"दोन वर्षांपूर्वीपर्यंत माझा मुलगा मोबाईल पाहतही नसे. शाळा किंवा क्लासमधून घरी परतल्यावर मित्रांसोबत खेळणं आणि सायकल चालवणं यातच रमायचा. आता दिवसभर मोबाईलमध्येच असतो. इतका की, त्याच्या हातातून मोबाईल काढून घ्यायला गेलो की, तो हिंसक होतो."

मुंबईतल्या अपूर्वा (नाव बदललं आहे) त्यांच्या मुलाबद्दल हे सांगत असताना, त्यांच्या आवाजातली काळजी आणि भीती स्पष्टपणे जाणवत होती.

अपूर्वा यांचा मुलगा दहावीत शिकतोय. नववीतून दहावीत जाण्याच्या महत्त्वाच्या सांध्यावरच कोरोनानं भारतात पाय पसरले आणि मागोमाग लॉकडाऊनही लागला. त्यामुळे शाळा, क्लासेस बंद असल्यानं घरातच मोबाईलवरून अभ्यास सुरू झाला.

कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊननंतर डिजिटल गॅजेट्सच्या वापराचं प्रमाण वाढल्याचं किशोरवयीन मुलांच्या पालकांशी बोलल्यानंतर तीव्रतेनं जाणवतं.

द्विधा अवस्थेत अडकले पालक

हातात असलेल्या मोबाईलवर शिकतायेत की निरुद्देश वेळ घालवतायेत, याचा अंदाज लावणं पालकांना कठीण होऊन बसलंय.

याबाबतच अपूर्वा खंत व्यक्त करतात, "पूर्वी मुलांकडून मोबाईल सहज काढून घेता यायचा. आता तसं रोखता येत नाही, कारण केवळ शाळा-क्लासेसच शिक्षणच नव्हे, तर गृहपाठही मोबाईलवरच पाठवला जातो. परिणामी अभ्यास असला काय, नसला काय, मुलांना कारणं मिळाली. त्यामुळे तो खरोखर वाचतायोत की दुसरं काय करतायोत, याबाबत गोंधळ होतो."

अपूर्वा सांगतात, त्यांचा मुलगा चिडचिडा झालाय. मोबाईल बाजूला ठेवायला सांगितल्यावर आक्रमक होतो. या सगळ्याचा परिणाम अभ्यासावर होतोय. 89-90 टक्के मिळवणारा मुलगा आता निम्म्यांवर आलाय.

शेवटी काळजीनं भरलेल्या स्वरात सांगतात, ऑनलाईन शिक्षणामुळे अभ्यास थांबला नाही, याचा आनंद मानायचा की डिजिटल गॅजेट्सच्या आहारी गेल्याचं दु:ख करायचं, अशी द्विधा अवस्थेत आहे.

'वेळ जातो, पण पर्याय काय?'

आम्ही आठवणीत शिकणाऱ्या समीरशी (नाव बदललं आहे) याबाबत बोललो, तर त्याचं म्हणणं होतं की, बाहेर फिरायला, बागडायला मलाही आवडतं. पण आता पर्याय काय? तरी माझ्या आई-बाबांनी सापशिडी, बुद्धिबळासारखे खेळ घरात आणलेत. मी माझ्या चित्रकलेची आवडही फावल्या वेळात जोपासतो. पण गॅजेटवर आणखी गोष्टी असतात.

आम्ही मित्र ऑनलाईन गेम खेळतो. अॅपवरून ऑनलाईन निमंत्रण पाठवून एकाचवेळी खेळता येतं, असं तो सांगतो.

डिजिटल, सोशल मीडिया, व्यसन, अॅडिक्शन, मानसिक आरोग्य

फोटो स्रोत, Getty Images

युट्युबवर वेळ घालवणारेही बरेच जण आहेत. समीर सांगतो की, "युट्युबवरील शॉर्ट व्हीडिओ, फाईव्ह मिनिट्स क्राफ्ट्स किंवा अॅडव्हेंचर अशा गोष्टी पाहतो. वेळ जातो हे मान्य आहे, पण तेवढंच मनोरंजन होतं. लॉकडाऊन नसतं तर बाहेर गेलोच असतो ना खेळायला."

"कधी-कधी एखादा गेम खेळत असताना शाळेची किंवा क्लासची वेळ कधी येऊन ठेपते हे कळत नाही. असा किस्सा माझ्या मित्राबाबत घडलाय," असं समीर सांगतो.

समीर असो किंवा त्याच्या वयाची इतर मुलं, हे आपल्याकडे पर्याय नसल्याचं सांगतात. लॉकडाऊनपूर्वी गॅजेट इतक्या प्रमाणात वापरत नव्हतो, असंही ते मान्य करतात. मात्र, गॅजेटचा अतिवापर होतोय, हे मात्र त्यांच्या लक्षात येत नाही, हे खरं.

पालक आणि मुलांची ही द्विधा अवस्था केवळ अपूर्वा आणि समीर यांच्यापर्यंतच मर्यादित नाहीय. तुमच्या-आमच्या ओळखीतल्या बऱ्याच पालकांची झालीय.

हेच लक्षात घेऊन डिजिटल गॅजेटच्या अतिवापराची लक्षणं, समस्या आणि त्यावरील उपाय यांचा बीबीसी मराठीनं सखोल आढावा घेतला आहे. यासाठी आम्ही मानसोपचार क्षेत्रातील तज्ज्ञांशी बातचीत केली.

विज्ञानयुगाचं साधन 'व्यसन' का बनलंय?

सर्वप्रथम आपण व्यसन म्हणजे काय आणि डिजिटल गॅजेट्सचा त्यात समावेश का केला जातोय, हे पाहू.

बालमानसोपचार तज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ला सांगतात की, "व्यसन (Addiction) म्हणजे एखाद्या गोष्टीतून उत्तेजना मिळणं आणि ती उत्तेजना टिकवून ठेवण्यासाठी पुन्हा पुन्हा ती गोष्ट वापरणं, त्यावर जास्तीत जास्त वेळ घालवणं, कुठल्या ना कुठल्या प्रकारे मिळवणं, जर ती गोष्ट मिळण्यास अडथळा आला तर हिंसक होणं, हा सगळा भाग व्यसनात येतो.

आतापर्यंत पण हा शब्द चरस, हेरॉईन यांबाबत वापर होतो. पण आता डिजिटल गॅजेट्सबाबत आता ही संकल्पना लागू झालीय. लॉकडाऊननंतर तर गंभीर समस्या बनलीय."

मुक्तांगणच्या उपसंचालिका आणि समुपदेशक मुक्ता पुणतांबेकर सांगतात की, खरंतर डिजिटल गॅजेट्सचा वापर होतच होता. घरी मूल एकटं असल्यावर किंवा पालक काम करत असताना मुलांना कुठलंतरी डिजिटल गॅजेट देऊन खेळत ठेवणं, अशा गोष्टी होत होत्या. त्यातून मुलं व्यसनाच्या वाटेला लागलीच होती आणि लॉकडाऊनच्या काळात त्याचं प्रमाण वाढलंय इतकंच.

Mental Health : 'मोबाईल काढून घेतला की माझा मुलगा हिंसक होतो'

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

पण लॉकडाऊनमध्ये असं काय झालं की डिजिटल गॅजेट्सच्या वापराचं रुपांतर अगदी व्यसनात होऊ लागलं. तर याबाबत बालमानसोपचार तज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ला सांगतात की, "आतापर्यंत मुलांच्या हातात थेट मोबाईल किंवा अन्य गॅजेट दिले जात नव्हते. मात्र, लॉकडाऊनच्या काळात शाळाच ऑनलाईन सुरू झाल्याने पालकांकडे पर्याय उरला नाही. इतका की, मुलांना त्यांचा त्यांचा स्वतंत्र मोबाईल घेऊन द्यावा लागला. त्यात शाळांनी गृहपाठही असा देण्यास सुरुवात केलीय की चोवीस तास वायफाय वापरणं अपरिहार्य बनलं."

डॉ. भूषण शुक्ला सांगतात की, "तरीही बरेच पालक मुलांना किमान व्हॉट्सअपसारखे मेसेंजर अॅप आणि फेसबुकसारखे सोशल मीडिया अॅप यांपासून दूर ठेवू पाहत होते. मात्र, आता बाहेर फिरणंही बंद झाल्यानं मुलांना या माध्यमाशिवाय मित्रांशी संपर्कासाठी पर्याय उरला नाही. त्यामुळे ही गोष्टही पालकांच्या हातून निसटली. एकूणच काय, तर मुलांच्या गॅजेट वापरावर निर्बंध आणता येतील, त्याची कारणंच संपली."

"शिक्षणाच्या निमितानं मुलांना स्वतंत्र मोबाईल किंवा तत्सम गॅजेट देण्याच्या प्रकारामुळे गेल्या दीड वर्षात मुलांचा ऑनलाईन वावर वाढला, गॅजेट हाताळण्याचा वेळ वाढला, परिणामी डिजिटल व्यसनाकडे झुकण्याची शक्यताही अधिक वाढली," असं डॉ. भूषण शुक्ला सांगतात.

व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनापासून दूर करण्यासाठी गेली अनेक दशकं काम करणाऱ्या मुक्तांगणसारख्या संस्थेच्या उपसंचालिका मुक्ता पुणतांबेकर आणि बालमानसोपचार क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असणाऱ्या डॉ. भूषण शुक्ला यांनी मांडलेली निरीक्षणं आपल्या आजूबाजूलाही दिसतातच.

लॉकडाऊनमध्ये गॅजेटच्या व्यसनाचं प्रमाण वाढलं, यावर तज्ज्ञांमध्ये एकमत दिसतंच. मात्र, व्यसनाचे नेमके परिणाम काय आहेत, हे जाणून घेऊ.

मेंदू आणि व्यसनाचा संबंध असा आहे

मानसशास्त्रज्ञ डॉ. वृषाली राऊत किशोरवयीन मुलांच्या डिजिटल गॅजेट अतिवापराबाबत सांगताना मानवी मेंदूच्या संरचनेच्या अंगानं गोष्टी स्पष्ट करतात.

डॉ. वृषाली राऊत सांगतात, "आपल्या मेंदूत न्युक्लिअस अकम्बन्स (Nucleus Accumbens) असतो, ज्याला रिवॉर्ड सेंटरही म्हणतात. हे आनंदाचं केंद्र असतं. कुठलीही आनंद देणारी गोष्ट घडल्यानंतर या केंद्रात डोपामाईन हे आनंदाचं रसायन स्त्रवतं. व्यसनी लोकांमध्ये न्युक्लिअस अकम्बन्स हे प्रमाणापेक्षा जास्त उत्तेजित झालेलं असतं. कारण सतत डोपामाईनचा स्त्राव होण्यासाठी व्यसनाची कृती वारंवार केली जाते."

डिजिटल गॅजेट्स किंवा सोशल मीडियाकडे सध्या अशाच दृष्टीने किशोरवयीन मुलं पाहतात आणि त्याच्या आहारी जातात, असं डॉ. राऊत सांगतात.

तसंच, किशोरवयीन मुलं या व्यसनाच्या बळी का पडू शकतात, याबाबत अधिक विस्तारानं डॉ. राऊत सांगतात.

Mental Health : 'मोबाईल काढून घेतला की माझा मुलगा हिंसक होतो'

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

त्या म्हणतात, "गेल्या काही वर्षांत केलेल्या अभ्यासातून असं लक्षात आलं आहे की, व्यसनाला भावनिक वेदनेपासून (Emotional Pain) सुटकेचा मार्ग म्हणून पाहिलं जातं. मात्र, व्यसन हा एक आजार आहे. कारण त्याची कृती ही स्मृतीमध्ये ठसते. परिणामी व्यसनाची कृती वारंवार घडते. व्यसनाच्या प्रत्येकवेळी न्युक्लिअस अकम्बन्स डोपामाईनने भरतं आणि स्मृती पक्की होत जाते. पर्यायानं ती कृती वारंवार घडत राहते."

"तार्किक मेंदूचं हे काम रिस्क आणि रिवॉर्ड जोखण्याचं आहे. म्हणजे, स्वनियंत्रणाचं आहे. अमुक काम केलं, तर त्याचे काय परिणाम होतील, हे हा मेंदू ठरवतो. पण वयाच्या 25 वर्षांपर्यात मेंदूची पूर्ण वाढच झालेली नसते. त्यामुळे जी मुलं वयाच्या 25 वर्षांपूर्वी कुठलंही व्यसन करतात, त्यांच्या मेंदूत आनंदाची मर्यादा ओळखणारी सेल्फ कंट्रोल नीट वाढत नाही आणि परिणामी अशी लोक व्यसनी होण्याचं प्रमाण खूपच जास्त असतं," असं डॉ. वृषाली राऊत सांगतात.

गॅजेट्सच्या अतिवापराचे परिणाम काय?

डिजिटल गॅजेटच्या व्यसनाची लक्षणं आणि परिणामांबाबत तज्ज्ञ मानसिक आणि शारीरिक अशा दोन गटात विभागणी करतात. सुरुवातीला आपण मानसिक परिणामांबाबत चर्चा करूया.

सहनशीलता

"हातातलं काम वेळेत संपवण्याची किंवा ती गोष्ट पूर्ण होईपर्यंत सातत्य ठेवण्याची गोष्टच गॅजेटच्या व्यसनानं घालवली. एखाद्या गोष्टीचा कंटाळा आला, तर दुसऱ्या गोष्टीकडे मुलं वळतात. नेटानं काम करण्याची प्रवृत्ती किशोरवयीन मुलांमधील कमी झालीय," असं डॉ. भूषण शुक्ला सांगतात.

सतत उत्तेजनांचा शोध

"डिजिटल गॅजेटच्या वापरामुळे नवनवीन व्हीडिओ पाहणं, गेम खेळणं इत्यादींमुळे उत्तेजनांची सवय लागते. त्यामुळे जेव्हा इंटरनेट बंद होतं किंवा अन्य कारणांनी हीच मुलं सामान्य आयुष्यात परततात तेव्हा तिथं अशी तातडीनं उत्तेजनं देणाऱ्या गोष्टी नसल्यानं त्यांना सामान्य आयुष्याचा कंटाळा येतो," असं डॉ. भूषण शुक्ला सांगतात.

आभासी प्रतिमेच्या प्रेमात पडणं

डॉ. भूषण शुक्ला सांगतात की, "मुलं ऑनलाईन प्रतिमेच्या प्रेमात पडत आहेत. त्यामुळे त्या अनावश्यक अभासी प्रतिमेसाठी अनावश्यक धडपड सुरू होते. इतरांच्या प्रतिमा पाहून स्वत:ची तुलना करून स्वत:चं खच्चीकरण करणं वाढलंय."

एकाग्रतेवर परिणाम

ऑनलाईन गेम्समधील भडक रंग, आक्रमकता, रक्तपात इत्यादी गोष्टींमुळे मुलांमधील चिडचिड वाढते. परिणामी एकाग्रतेवर परिणाम दिसून येतो, असं मुक्ता पुणतांबेकर सांगतात.

Mental Health : 'मोबाईल काढून घेतला की माझा मुलगा हिंसक होतो'

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

मुलं एका जागेवर बसत नाहीत, सलग काही लिहित-वाचत नाहीत, ही लक्षणं या प्रकारावेळी बऱ्याचदा दिसतात, असंही त्यासांगतात.

नैराश्य

सोशल मीडिया, डिजिटल गॅजेट्स यांच्या वापरासंबंधी मुक्ता चैतन्य यांनी विशेष अभ्यास केला आहे. तसंच त्यांनी 'स्क्रीन टाईम' नावाचं पुस्तकही लिहिलं आहे.

त्या सांगतात, "किशोरवयीन मुलांमध्ये नैराश्य मोठ्या प्रमाणात वाढलंय. मुलं घरात डांबली गेलीत. पालक भाजी किंवा किराणा आणण्यासाठी तरी बाहेर जातात. मुलांना अशी संधीच दीड वर्षात मिळाली नाहीत. त्यातून येणारं नैराश्य आहेच."

तसंच, "इन्स्टाग्राम किंवा स्नॅपचॅटसारख्या सोशल मीडियावर इतरांचे फोटो पाहिल्यावर त्याच्यासी तुलना करणं की, आपण असे घरात आहोत, ते कसे फिरतायेत. या गोष्टीमुळे एकप्रकारचं नैराश्य येतं आणि ही नैराश्याची पातळी गेल्या वर्ष-दीडवर्षात वाढलेली जाणवते."

निद्रानाश

मुक्ता चैतन्य सांगतात, झोपण्याचा वेळ सोडल्यास मुलं ऑफलाईन नसतातच.

Mental Health : 'मोबाईल काढून घेतला की माझा मुलगा हिंसक होतो'

फोटो स्रोत, Getty Images

त्या पुढे सांगतात, "किशोरवयीन असो वा मोठी माणसं झोपतच नाहीत. झोप कमी असल्यानं मग शारीरिक दुष्परिणाम होतात. श्वसनाचे, पोटाचे विकार. नैराश्य येणं. अशा झोपेशी संबंधित गोष्टी होतात."

याच मुद्द्याला धरून मुक्ता चैतन्य सांगतात की, "झोपण्याऐवजी मोबाईल किंवा कुठलंतरी गॅजेट वापरत जागं राहण्याचं प्रमाण जास्त आहे. मुलांना या वयात त्रास जाणवत नाही. कारण वय लहान असल्यानं ते सर्व निभावून नेतात. मात्र, नंतर ते जाणवेल आणि वेळही निघून जाईल."

डोळे आणि पाठीचे आजार

मुक्ता चैतन्य यांना त्यांच्या अभ्यासादरम्यान आढळलं की, "अति स्क्रीन टाईममुळे डोळे थकणं, डोळे कोरडे पडणं, डोळ्यांमधून सारखं पाणी येणं अशा गोष्टी मुलांमध्ये दिसून येतात. किती अंतरावर फोन धरला पाहिजे, हे या वयात कळत नाही."

तसंच, "फोन वापरताना बसताना विचित्र बसतात. बाक आल्यासारखी किंवा खांदे पाडून चालताना दिसतात. सतत स्क्रीनसमोर ताठ बसून नाही काम करू शकत. आपण रेलून किंवा पाठ टेकवून बसतो. सलग दहा दहा तास असं स्क्रीनसमोर बसल्यानं शरीरावर त्रास दिसतात," असं त्या सांगतात.

असंतुलित आहार

मुक्ता पुणतांबेकर सांगतात की, "मुक्तांगणमध्ये अशी मुलं येतात, जी कमी वजनाची असतात किंवा लठ्ठ असतात. कारण गॅजेट्स वापरावेळी एकतर खूप खातात किंवा काहीच खात नाहीत. हा एक नवीनच प्रकार हल्ली आढळून येताना दिसतोय."

घातक रेडिएशन आणि बहिरेपणाचा धोका

मुक्ता पुणतांबेकर सांगतात, "गॅजेट्सची रेडिएशन खूप घातक असतात. वायफाय, फोन किंवा टॉवरचे रेडिएशन तीव्र असतात. किशोरवयीन मुलांची कवटीची वाढ पूर्ण झालेली नसते, त्यामुळे रेडिएशनचा परिणाम घातक ठरू शकतो. मेंदूवर थेट परिणाम करणारी ही गोष्ट आहे."

Mental Health : 'मोबाईल काढून घेतला की माझा मुलगा हिंसक होतो'

फोटो स्रोत, Getty Images

तसंच, "सतत कानात हेडफोन घातलेले असतात. पुढे जाऊन बहिरेपणा येऊ शकतो. आता कदाचित त्यात नवल वाटणार नाही," असंही पुणतांबेकर सांगतात.

मुलांना या व्यसनापासून दूर कसं ठेवता येईल?

हे झाले परिणाम आणि लक्षणं. मात्र, बीबीसी मराठीनं तज्ज्ञांशी बोलून यावर सर्वसाधारणपणे प्राथमिक स्तरावर काय उपाय करता येतील, हेही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

डॉ. भूषण शुक्ला म्हणतात, "भारतात कायद्याने 18 वर्षांवरील व्यक्ती जबाबदार मानली जाते. त्यामुळे किशोरवयीन मुलांच्या या व्यसनांना पालकांनाच पुढे जाबाबदार ठरवलं जाईल. मुलं ऐकत नाहीत, मी काय करणार, ही तक्रार पालकांनी करण्याला अर्थ उरत नाही. मुलं ही पालकांची जबाबदारी असते. त्यामुळे वेळ पडल्यास अप्रिय गोष्टी करून मुलांना अशा व्यसनांपासून दूर ठेवलं पाहिजे."

Mental Health : 'मोबाईल काढून घेतला की माझा मुलगा हिंसक होतो'

फोटो स्रोत, Getty Images

पालकांच्या सहभागाशिवाय मुलं गॅजेट्सच्या व्यसनापासून दूर जाऊ शकत नाहीत, असं डॉ. शुक्ला म्हणतात.

याबाबत अधिक सांगताना ते म्हणतात, "सर्वांत आधी पालकांनी मानसिक आजार असतो हे स्वीकारलं पाहिजे. तसंच स्वीकारल्यावरही बरेच पालक शारीरिक आजारांवरील डॉक्टरकडे मुलांना नेतात. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की, मानसिक आजारातून बाहेर पडण्यासाठी कुटुंबाचा मोठा वाटा असतो आणि कुटुंबच तो सहभाग घेऊ इच्छित नसेल, तर तो रुग्ण त्यातून बाहेर पडू शकत नाही."

"पालकांना पाहुण्याच्या काठीनं साप मारायचा असतो. मानसिक आजारात पाहुण्याच्या काठीनं साप मारता येत नाही," असंही डॉ. शुक्ला सांगतात.

याच मुद्द्याला जोडून मुक्ता पुणतांबेकर पुढे सांगतात की, "पालकांशी बोलताना बऱ्याचदा लक्षात येतं की, त्यांचाच स्क्रीन टाईम जास्त आहे. त्यामुळे सर्वांत आधी पालकांनी आपला स्क्रीन टाईम कमी केला पाहिजे."

Mental Health : 'मोबाईल काढून घेतला की माझा मुलगा हिंसक होतो'

फोटो स्रोत, Getty Images

"तसंच, बरेच पालक मुलांना उपदेश देण्यात धन्यता मानतात किंवा मुलांकडून फोन हिसकावून घेतात, ओरडतात, चिडतात. पालकांनी हे बंद केलं पाहिजे. मुलांना त्यांच्या कलाने घेऊन घरात छोटे छोटे गॅजेटविरहित उपक्रम राबवले पाहिजेत," असं त्या सांगतात.

"रात्री विशिष्ट वेळेनंतर मोबाईल वापरायचं नाहीय, बेडरुममध्ये मोबाईल न्यायचं नाही, बाथरूममध्ये मोबाईल न्यायचं नाही, रोज मोकळ्या हवेत जायचं," असे काही नियम पालक घरात राबवू शकतात असं मुक्ता पुणतांबेकर सांगतात.

गॅजेटच्या अतिवापरात निद्रानाश हा गंभीर परिणाम दिसतो. त्याबाबत मुक्ता चैतन्य उपाय सांगतात.

"निद्रानाशेचा प्रश्न आपण सोडवला नाही तर भविष्यात मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागेल. त्यामुळे रात्री ते सकाळी दरम्यानचा विशिष्ट कालावधी फोन वापरायचा नाही किंवा वायफाय बंद करायचा, असे प्राथमिक उपाय घरातल्या घरात पालकांनी राबवले पाहिजेत," असं मुक्ता चैतन्य सांगतात.

MuktaPuntambe

फोटो स्रोत, MuktaChaitanya

याचसोबत मुक्ता चैतन्य आणखी एक उपाय सांगतात, तो म्हणजे, माध्यम शिक्षणाचा.

त्या सांगतात, "अगदी बालवाडीपासून माध्यम शिक्षणाचा विषय बंधनकारक केला पाहिजे. कारण लहान मुलांना फोनवर गाणी दाखवतात, कार्टून दाखवतात, मूल रडायला गेल्यावर फोन देतात."

"आपण माध्यमं वापरायला शिकलो. माध्यमांच्या बऱ्या-वाईट गोष्टी जाणून घ्यायला शिकलो नाही," अशी खंतही मुक्ता चैतन्य व्यक्त करतात.

डॉ. भूषण शुक्ला हे सार्वजनिक पातळीवर काय करता येईल, याबाबत मत मांडतात. यासाठी चीननं घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगानं ते बोलतात.

डॉ. शुक्ला म्हणतात, "चीननं गेमिंगच्या वापरावर बंधनं आणली, ती आभाळतनं पडलेली गोष्ट नाहीय. आपल्या देशात गाडी कुठल्या वयात चालवावी, लग्न कधी करावं, दारु कधी प्यावी याचे किमान वय ठरवलं आहे. त्यामुळे डिजिटल गॅजेटबाबत आपणही तशी पावलं उचलायला हवीत."

डॉ. शुक्ला यांनी उल्लेख केलेल्या चीनमधील निर्णयाबद्दलही आपण जाणून घेऊ.

चीनमध्ये ऑनलाईन गेमिंगवर निर्बंध

किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्याचा मुद्दा आता काही देशांच्या धोरणांचाही भाग बनू पाहतोय.

चीननं दोनच दिवसांपूर्वी, 31 ऑगस्ट 2021 रोजी, ऑनलाईन गेमिंगसंदर्भात निर्बंध लागू केले आहेत. चीनच्या या पावलाची सध्या जगभरात चर्चा होतेय.

Mental Health : 'मोबाईल काढून घेतला की माझा मुलगा हिंसक होतो'

फोटो स्रोत, Getty Images

चीनच्या नव्या नियमानुसार, 18 वर्षांखालील मुलांना एका आठवड्यात केवळ तीनच तास ऑनलाईन गेम्स खेळता येतील आणि तेही शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी रात्री 8 ते 9 च्या वेळेतच ऑनलाईन गेम खेळू शकतील.

ऑनलाईन गेमिंगवरील निर्बंधांचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना गेमिंग कंपन्याना चिनी सरकारनं दिल्यात. आखून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ मुलं गेमिंग खेळताना आढळल्यास त्याची जबाबदारी गेमिंग कंपन्यांवर असेल.

विशेष म्हणजे, सर्व ऑनलाईन गेम सरकारच्या व्यसनबंदी प्रणालीशी जोडणं, नोंदणीशिवाय सेवा न देणं असे नियमही चिनी सरकारने जाहीर केले आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)