मोबाईलचं व्यसन कसं सोडायचं, सतत मोबाईल वापरावासा वाटतो का?

मोबाईलचं व्यसनः मोबाईलशिवाय चैनच पडत नाही का? सतत मोबाईल वापरावासा वाटतो का?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र
    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

एखादा व्हीडिओ भरपूर वेळा पाहून झाला असेल तरी तुम्ही तो परत पाहाता का? एकदा फोन हातात घेतला की तुम्ही एकापाठोपाठ व्हीडिओ, मेसेजेस, फेसबूक, इन्स्टाग्राम, ट्विटर, इमेल, युट्यूब वेगवेगळी अॅप्स पाहात बसता का? आपला फोन वापरण्यात भरपूर वेळ जातोय हे लक्षात येऊनही फोन बाजूला ठेवावासा वाटत नसेल तर त्याची कारणं शोधणं आवश्यक आहे.

काही वर्षांपूर्वी आपल्याला ज्या लहानसहान वाटणाऱ्या गोष्टींमधला आनंद दिसायचा, तो आपण मिळवायचोही पण आता ते होत नाहीये असं तुम्हाला जाणवतं का? सगळा आनंद केवळ दोन-चार गोष्टींमध्येच एकवटला आहे असं तुम्हाला वाटतं का?

मोबाईल, टिव्ही, व्हीडिओ गेम्स, पॉर्न, दारू, सिगारेट अशा काहीच गोष्टींपुरती ती आनंदाची भावना मर्यादित झाली आहे का? या गोष्टी केल्याशिवाय दिवस अपूर्णच वाटत असेल तर आपल्या काही सवयींचे निरीक्षण करण्याची वेळ आली आहे असं समजावं.

कॉम्प्युटर गेम्स, मोबाईल गेम्स, सोशल मीडिया, सर्फिंग यांचा अतिवापर व्हायला लागल्यापासून सहज सोपा आनंद मिळवण्याचा मार्ग उपलब्ध झाला. परंतु त्यामध्ये भरपूर वेळ जायला लागल्यावर, रोजच्या जीवनातली कामं करण्यासाठी वेळ अपुरा पडू लागल्यावर त्याचे परिणाम दिसू लागले. मोबाईलमधून मिळणाऱ्या आनंदापुढे इतर गोष्टी फिक्या वाटू लागल्या. घरातल्या लोकांशी बोलणं, नातलगांशी संवाद, वाचन, बागकाम अशा पूर्वी आनंद देणाऱ्या गोष्टी नकोशा वाटू लागतात.

आपल्याला मोबाईल सर्फिंगसारख्या गोष्टीतून आनंद का मिळतो?

अशाप्रकारचा आनंद मेंदूमध्ये डोपामिन नावाचं रसायन स्रवल्यावर आपल्याला मिळत असतो. डोपामिन हे एक न्युरोट्रान्समिटर असून ते दोन पेशींना जोडायचं म्हणजे कम्युनिकेशनचं काम करत. दोन पेशींमधला ते संवादक असतं.

डोपामिन स्रवल्यानंतर त्या क्षणापुरती आनंदाची भावना निर्माण होते. हे डोपामिन स्रवण्याचं काम अगदी क्षणात किंवा त्यापेक्षाही कमी वेळात होत असतं. ही बरं वाटल्याची भावना मग सतत घ्यावीशी वाटते. ज्या कृतीतून (इथं मोबाईल वापरणे) ती भावना मिळतेय तीच कृती वारंवार केली जाते.

सवय कशी लागते?

डोपामिनबद्दल बोलताना मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे म्हणाले, "डोपामिन हे अनेक कृतींमधून तयार होत असतं. ही बरं वाटण्याची भावना सतत मिळवण्यासाठी आपण तीच तीच कृती करू लागतो. कॉम्प्युटर गेम्स, मोबाईलवर सर्फिंग, तीच तीच गाणी ऐकणं यामुळे ते सतत मिळवावेसे वाटत राहातं. तसेच या गेम्सची रचनाही तुम्ही ते सतत खेळत राहिले पाहिजेत अशी केलेली असते. मग त्याच्याशिवाय चैन पडत नाही. सारखी ती कृती करावीशी वाटते. इथे प्रश्न डोपामिन हा नसून या वस्तूंची सहज उपलब्धता हा आहे. मोबाईल, कॉम्प्युटर सहज उपलब्ध असल्यामुळे तिकडे आपण वळतो आणि तो क्षणाचा आनंद मिळवतो."

तुमचं वागणंच तुम्हाला कसं बदलतं?

आयतं, तयार डोपामिन मिळवण्याच्या आपल्याच्या वृत्तीमुळे आपलं भरपूर नुकसान होत असतं. प्रत्येक कृतीमधून मिळणारं डोपामिन घेण्याऐवजी मोबाईल किंवा व्यसनातून ते सहज लगेच मिळवण्याकडे लोक जातात. त्यामुळे ते अधिकाधिक त्या चक्रात गुंतत जातात.

पुण्यात राहाणाऱ्या क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट डॉ. शिरिषा साठे यांनी बीबीसी मराठीला याबाबत माहिती दिली.

मोबाईलचं व्यसनः मोबाईलशिवाय चैनच पडत नाही का? सतत मोबाईल वापरावासा वाटतो का?

फोटो स्रोत, Getty Images

डोपामिन का आणि कसं तयार होतो त्याचा मूळ उद्देश काय आहे? हे सांगताना त्या म्हणाल्या, "डोपामिन हे एक प्रेरक (मोटिवेशनल) न्यरोट्रान्समिटर आहे. आपल्याकडे एखाद्या गोष्टीचा अभाव आहे किंवा एखाद्या वेदनेची जाणीव होतेय ती दूर करण्यासाठी मनात भावनेची निर्मिती होऊन ती गोष्ट मिळेपर्यंतच्या प्रवासातला आनंद किंवा आनंद मिळेपर्यंतची भावना यामध्ये होत असते.

डोपामिन हे आनंदाचं रसायन नसून, आनंद पुढे मिळणार आहे या अपेक्षेची ती भावना आहे. ज्या वस्तूसाठी आपण प्रयत्न केले ती मिळणं किंवा त्या त्रासदायक वेदना बंद होणं हा त्या आनंदाचा परमोच्च क्षण असतो.

डोपामिनच्या अतिरेकाबद्दल त्या म्हणाल्या, एखाद्या कृतीमुळे डोपामिन स्रवतं. मग त्याचा पूर आला की आता डोपामिन थांबवा असा संदेश आपला मेंदू त्याला देतो. मग पुन्हा काहीवेळाने एखाद्या कृतीने ते स्रवून त्याची लाट येते मग परत आता ते स्रवणं थांबवा असा संदेश दिला जातो.

असं वारंवार झालं की मेंदू त्याच्या 'युज इट आँर लूज इट' या नैसर्गिक न्यायाने पातळी पुन्हा समान करण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा खरंच मन खिन्न असतं आणि त्याला डोपामिनद्वारे उभारी घेण्याची गरज असते तेव्हा त्याला मग मोबाईल किंवा व्यसनांसारख्या घटकांची गरज पडते. तेव्हा असे शॉर्टकट्स त्यासाठी वापरले जातात.

अतिरेकी डोपामिन तयार झालं की ते सामावून घेण्यासाठी आपला मेंदू नवी न्युरोनेटवर्क्स तयार करतो. मग त्यांची गरज भागवण्यासाठी आपण तीच कृती वारंवार करतो आणि त्याचं व्यसन लागतं. दरवेळेस आपल्याला गेल्या वेळेपेक्षा जास्त तीव्रतेचे व्यसन करावं लागतं. तरच मेंदूला त्याची गरज भागल्यासारखं वाटतं. म्हणजे आपण डोपामिन एरव्हीच्या सोप्या आनंददायी कृतीमधून मिळवण्याऐवजी थेट मोबाईल, टीव्ही, गेम्स किंवा दारुसारख्या व्यसनातून मिळवू लागतो. तसेच त्याची तीव्रता वाढवत जातो. आपलं आनंदासाठींचं अवलंबित्व या वस्तूंकडे जातं.

सारखा मोबाईल, टीव्ही गेम्स पाहिल्यामुळे काय होतं? त्याची सवय का लागते? Dopamine हे रसायन काय काम करतं? Dopamine Fasting म्हणजे काय?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

त्यामुळे सुरुवातीला दहा पंधरा मिनिटं मोबाईल पाहून झाल्यावर जे मूल मोबाइल परत देत होतं आता त्याला दोन तास मोबाईलशी खेळल्याशिवाय बरंच वाटत नाही. किंवा सगळ्या दिवसभराचं काम झाल्यावर आपण फोन हातात घेत होतो त्याच जागी आता आपल्याला सारखा फोन हातात ठेवावासा वाटतो. दारू पिणारे किंवा सिगारेट ओढणाऱ्यांचंही तेच होतं. त्यांना ठराविक काळानंतर व्यसनाची तीव्रता, वारंवारिता वाढवल्याशिवाय बरं वाटणारच नाही.

काही लोक दारूला स्वातंत्र्याचं लक्षण समजतात किंवा दारू हे मुक्तपणाचं द्योतक मानतात पण खरंतर ते त्यांच्याच मेंदूचे गुलाम होतात. कोणत्याही व्यसनाच्या चक्रात सापडलेल्या माणसानं स्वतःच्या शरीर-मनावरचं स्वातंत्र्य कधीच गमावलेलं असतं हे लक्षात यायला हवं.

डोपामिन उपवास

आपण डोपामिनचा अतिवापर करतोय, त्याची आपल्याला सवय लागल्यावर काही लोकांनी डोपामिन कमी स्रवावं यासाठी डिजिटल डिटॉक्सचा ट्रेंड आणला. यामध्ये व्यक्ती अशा सर्व सवय लावणाऱ्या उपकरणांपासून दूर राहाते. त्यामुळे नव्याने त्या गोष्टी करताना पूर्वीपेक्षा जास्त आनंद मिळतो असा दावा या लोकांनी केला आहे. मात्र काही अभ्यासकांनी त्यात तथ्य नसल्याचंही म्हटलंय.

अमेरिकेत सिलिकॉन व्हॅलीमधील तंत्रज्ञान कंपन्यांत काम करणाऱ्या लोकांनी या संकल्पनेचा पुरस्कार केला आहे. ज्या कृतीतून त्यांच्यामते डोपामिन स्रवतं, ते अधिकाधिक मिळवावसं वाटतं. त्या कृती त्यांनी काही काळापुरत्या बाजूला ठेवल्या. यामध्ये टीव्ही, मोबाईल, ओटीटी प्लॅटफॉर्म्स, बिंज वॉचिंग (सलग 10 ते 12 तास एखाद्या कार्यक्रमाचे भाग पाहात राहाणं, रात्रभर मोबाईल, टीव्हीवर ते कार्यक्रम सलग पाहाणं), चटकदार खाणं अशा क्रिया त्यांनी थोड्या काळासाठी त्यागल्या. थोडक्यात ज्या गोष्टींमुळे त्यांच्या मनात उत्साहाची, एक्साइटमेंटची भावना तयार होत होती त्या गोष्टी त्यांनी तात्पुरत्या बाजूला ठेवल्या. त्याचा त्यांना उपयोग झाला असं त्यांचं निरीक्षण आहे.

मोबाईलचं व्यसनः मोबाईलशिवाय चैनच पडत नाही का? सतत मोबाईल वापरावासा वाटतो का?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

'स्क्रीन टाइम' या पुस्तकाच्या लेखिका मुक्ता चैतन्य याबद्दल काही उपाय सुचवतात. बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, "सुरुवातीला सर्व प्रकारच्या स्क्रीन्स बंद करुन बसायचं आहे अशी कल्पना मनात आली की लोकांना थोडंसं अस्वस्थ वाटायला लागतं, मोबाईल, टीव्ही किंवा कोणत्याही स्क्रीनशिवाय आपण जगू शकतोय हे पहिल्या काही तासांमध्ये लक्षात आलं की त्यांना पुढचा मार्ग सोपा जातो."

त्या म्हणाल्या, "आमच्याकडे ज्या लोकांनी हा स्क्रीनचा उपवास किंवा डोपामिन उपवास केला त्यांचे अनुभव सर्वांनीच लक्षात घेण्यासारखे आहेत. अनेक लोकांना आपल्याकडे भरपूर वेळ असतो याचा साक्षात्कार झाला, मोबाईलमुळे रोजच्या आयुष्यावर किती परिणाम होत होता याचं त्यांना भान आलं. काही लोकांनी आम्हाला मोबाइलपासून दूर गेल्यामुळे थोडं शांत वाटायला लागून नवं काहीतरी सुचायला लागलं असं सांगितलं. अनेक लोकांनी आम्हाला घरात कुटुंबीयांशी जोडीदाराशी संवाद करायला वेळ मिळाला असं सांगितलं."

डॉ. शिरिषा साठे अशाच प्रकारचे उपाय सुचवले आहेत. त्या म्हणतात, "खेळ, निसर्गात फिरायला जाणे, नव्या गोष्टी करुन पाहाणे, बागकाम, व्यक्तीशी समोरासमोर संवाद साधणे (चॅटिंग, फोन नव्हे) अशा कृतींमधून पुन्हा आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या सगळ्या कृतींमध्ये आनंद आहे. तो करण्याऐवजी हातात मोबाईल घेण्याचा शॉर्टकट वापरू नये."

आपण डोपामिनचा अतिवापर करतोय, त्याची आपल्याला सवय लागल्यावर काही लोकांनी डोपामिन कमी स्रवावं यासाठी डिजिटल डिटॉक्सचा ट्रेंड आणला.

फोटो स्रोत, Getty Images

(महत्त्वाची सूचना- कोणत्याही मानसिक, शारीरिक त्रासासाठी स्वतःच औषधोपचार करणं किंवा इंटरनेटवर शोधून औषधे घेऊ नयेत. त्यासाठी तज्ज्ञांचीच मदत घेतली पाहिजे.)

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)