LGBTQ Rights: समलैंगिकांना मोबाईल अॅप्सद्वारे 'असं' केलं जातंय ब्लॅकमेल

फोटो स्रोत, SAJJAD HUSSAIN
- Author, भार्गव पारिख
- Role, बीबीसी गुजराती प्रतिनिधी
"मी दहा वर्षांचा असतांना माझ्या शिक्षकानं माझ्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर कॉलेजमधील माझ्या सीनियर विद्यार्थ्यांनी हॉस्टेलमध्ये माझ्यावर लैंगिक अत्याचार केले. तो अनुभव मी कधीच विसरू शकत नाही."
"मी खूप मेहनतीनं अभ्यास केला आणि प्रोफेसर झालो. माझं लग्न झालं आणि मला मुले झाली, मी माझ्या जीवनात आनंदी सुद्धा आहे, परंतु मी महिलांपेक्षा पुरुषांकडं जास्त आकर्षित होतो. याचं कारण म्हणजे समलिंगी संबंधांमध्ये माझ्या जोडीदारांनी माझी काळजी जास्त घेतली. मी इंटरनेटवर नवीन जोडीदार शोधू लागलो आणि मी दोन तरुणांच्या संपर्कात आलो. आमच्यात समलैंगिक संबंध निर्माण झाले. पण त्यानंतर त्यांनी मला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि माझ्याकडून लाखो रुपये उकळले."
हे शब्द आहेत 53 वर्षीय प्रोफेसर सुबोध (नाव बदलले आहे) यांचे, ज्यांचे समलैंगिक संबंध होते, त्यांनी ब्लॅकमेलिंगची तक्रार त्यांनी पोलिसांत दिलीय.
अहमदाबादमधील एका प्रतिष्ठित महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या सुबोध यांनी बीबीसीशी बोलतांना सांगितलं की, "लग्नापूर्वीही माझे समलैंगिक संबंध होते, पण माझ्या कुटुंबाच्या दबावामुळं मी लग्न केलं."
समलिंगी जोडीदाराचा शोध सुरू झाला
प्रोफेसर सुबोध आणि त्यांच्या पत्नीला एक मुलगा झाला. पण काही काळानंतरच त्याचं पत्नीबद्दलचं आकर्षण कमी झालं आणि ते पुरुष जोडीदाराचा शोध घेऊ लागले.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणतात की ते एक निष्क्रिय समलिंगी आहे, याचा अर्थ असा की त्यांनी आपल्या तीन समलिंगी भागीदारांना आपले पती मानले. ते मानतात की त्यांना त्यांच्या तिन्ही साथीदारांसोबत एक भावनिक संबंध वाटला जो ते त्यांच्या पत्नीसोबत कधीही करू शकत नाही.
सुबोध यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे तिघेही साथीदार एक एक करून अहमदाबादच्या बाहेर गेले आणि ते एकटेच राहिले. त्यांना नवीन जोडीदार मिळण्याआधीच कोरोनानं थैमान घातलं. दरम्यान, त्यांच्या एका जुन्या साथीदारानं त्यांना समलैंगिकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडले.
त्याच कालावधीत एका अॅपच्या मदतीनं ते अहमदाबादमधील इतर काही समलैंगिकांच्या संपर्कात आले.
सुबोध म्हणतात, "मी ग्राइंडर आणि प्लॅटिनम रोमियो नावाच्या अॅप्समध्ये सामील झालो, जिथे तुम्हाला समलिंगी लोकांची छायाचित्रे आणि व्हिडिओ पाहता येतील. या अॅपमध्ये अनेक तरुणही होते आणि मी या मुलांना पैसे देऊन त्यांच्या संपर्कात राहायचो कारण मला माझ्या आयुष्यातला एकटेपणा भरून काढायचा होता."
"मला या तरुणांसोबत बॉन्डिंग करायला आवडलं, परंतु त्यांना माझ्या पैशात रस होता, त्यांना माझ्या भावनांची पर्वा नव्हती."
"त्यांनी आमच्या समलैंगिक संबंधांची छायाचित्रे काढले, व्हिडिओ बनवले आणि नंतर मला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यांनी माझ्याकडून पाच लाख रुपये घेतले कारण माझ्या पत्नीला या संबधाबाबत कळावं असं मला वाटत नव्हतं. नंतर त्यांची मागणी वाढू लागली परंतु माझी परिस्थिती नव्हती की मी त्यांना जास्त पैसे देऊ शकेल, याच दरम्यान त्यांनी मला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.
आणि जेव्हा हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं
हे टाळण्यासाठी त्यांनी पोलिसांत तक्रार केल्याचं सुबोध यांचं म्हणणं आहे, त्यानंतर पोलिसांनी त्या ब्लॅकमेल करणाऱ्यांना अटक केली.
सुबोध यांना असा विश्वास आहे की "या लोकांनी माझ्यासारख्या इतरही अनेकांना ब्लॅकमेल केलं असावं."

फोटो स्रोत, Getty Images
बोपल पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर दिलीप पटेल यांनी बीबीसीला सांगितले की, "प्राध्यापक सुबोध ग्राइंडर नावाच्या अॅपद्वारे दीपन पटेल आणि हर्षित पटेल नावाच्या दोन तरुणांच्या संपर्कात आले. दीपन पटेलने फक्त 12 वीपर्यंतच शिक्षण घेतलं आहे आणि आता तो खासगी फोटोग्राफर म्हणून काम करत आहे. त्याच वेळी, त्याचा 20 वर्षीय मित्र हर्षित पटेल शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या शोधात आहे. हे दोघंही ग्राइंडर अॅपद्वारे लोकांना ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचे सदस्य आहेत."
ते सांगतात, "10 फेब्रुवारीला त्यांनी प्रोफेसरला नारायणनगर भागातील एका फ्लॅटवर बोलावलं, तिथे आणखी तीन लोक आधीच हजर होते. या लोकांनी प्रोफेसरकडे पैसे मागितले आणि त्यांना मारहाण केली. त्यांनी प्रोफेसरच्या गाडीची चावी घेतली आणि त्यांचा फोन हिसकावून घेतला. त्यांनी त्यांच्या बँक खात्यातूनही पाच लाख रुपये काढून घेतले."
पोलिस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून इतर चौघांचा शोध सुरू आहे. यासोबतच या टोळीने आणखी किती जणांना गंडा घातला आहे, याचाही तपास सुरू आहे.
समलैंगिक संबंधांसाठी पैसे न दिल्याचे प्रकरण
51 वर्षीय नयन शाह (नाव बदलले आहे) हे देखील अशाच एका अॅपला बळी पडले आहेत.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "मी नेहमीच समलैंगिक संबंधांना प्राधान्य दिलंय. मी सरकारी नोकरीत आहे आणि क्लास टू ऑफिसर म्हणून काम करतो."

फोटो स्रोत, Getty Images
"आमच्या वयातील लोकांना तरुण मुलं आवडतात. मी पॅसिव्ह गे आहे, पण माझ्याकडं पाहून कोणीही सांगू शकत नाही. कोरोना महामारीच्या काळात अनेक लोक अशाप्रकारच्या गे अॅप्समध्ये सामील झाले. त्या कोरोना काळात गे रिलेशनशिपमधून पैसे कमावणं सोपं नव्हतं, त्यामुळं अनेकांनी अगदी कमी पैशात आपली सेवा दिलीये. या प्रकरणांमध्ये ब्लॅकमेल होऊनही लोक अपमानाच्या भीतीनं तक्रार करत नाहीत. त्यामुळेच ब्लॅकमेलींगच्या घटना वाढत आहेत.
लुटमारीची प्रकरणं
नयन शहा सांगतात, "दोन तरुणांनी माझ्याकडून पैसे, सोनसाखळी, अंगठी आणि मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मला लुटण्याचा त्यांचा इरादा होता हे मला समजल्यावर मी त्यांच्यावर दगडफेक केली आणी ते पळून गेले. याप्रमाणे अनेकांना लुटण्यात आलं आहे."
गेल्या 32 वर्षांपासून चालवल्या जाणाऱ्या समलिंगी आणि ट्रान्सजेंडर लोकांसाठी असलेल्या चुनवल या संस्थेचे अध्यक्ष चंदूभाई पटेल म्हणतात, "समलिंगी लोक सक्रिय आणि निष्क्रिय दोन्ही असतात. बहुतेक लोक असे आहेत ज्यांना बालपणात लैंगिक शोषणाचा सामना करावा लागलाय."

फोटो स्रोत, Getty Images
"असे काही लोक असतात ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नसते, अशा परिस्थितीत ते श्रीमंत लोकांच्या अशा इच्छा पूर्ण करून पैसे कमावतात. पण हे देखील खरं आहे की अशा संबंधांमध्ये काही लोकांना शोषणाला सामोरं जावं लागतं."
चंदू पटेल यांच्या म्हणण्यानुसार, "असं दिसून आलं आहे की जे लोक गरीब आहेत, ज्यांच्याकडे नोकऱ्या नाहीत, ते समलैंगिकांना सेवा देण्याच्या कामात उतरतात आणि शोषणाला बळी पडतात. त्यांना पुरेसे पैसे मिळत नाहीत आणि त्यांना मारहाण केली जाते आणी नोकरीवरून काढून सुद्धा टाकण्यात येते."
"समाजात नाव खराब होऊ नये या भीतीनं ते तक्रार करत नाहीत. सहसा समलैंगिक लोक एकमेकांना ब्लॅकमेल करत नाहीत, पण कोरोनाच्या साथीमुळे अशी प्रकरणे वाढत आहेत."
'अॅप्समध्ये गोपनीयता असते, पण धोकाही असतो'
चुनवल यांच्यासोबत काम करणारे राकेश राठौर म्हणतात, "समलैंगिक संबंध असलेले लोक त्यांच्या समस्या घेऊन आमच्याकडे येतात. आम्ही त्यांना अनेक प्रकारे मदत करतो. आम्ही त्यांना सुरक्षित लैंगिक आणि सामाजिक आणि मानसिक समस्यांबद्दल सांगतो. आमच्याकडे असे अनेक लोक आहेत जे सक्रिय आणि निष्क्रिय श्रीमंत समलिंगी लोकांसाठी सेवा देऊन पैसे कमावतात."
"समलैंगिकांचे अनेक व्हॉट्सअॅप ग्रुप्स आहेत. पूर्वी ते व्हॉट्सअॅप ग्रुपचा आधार घेत असंत. पण कोरोना महामारीच्या काळात समलैंगिकांनी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी प्लॅटिनम रोमिओ आणि ग्राइंडर सारख्या अॅप्सचा वापर सुरू केला."
"सर्व प्रकारचे अनोळखी लोक या अॅप्समध्ये भेटतात. अॅपशी कनेक्ट केलेले लोक एकमेकांशी संपर्क साधतात आणि यामाध्यमातून भेटण्याची जागा आणि वेळ ठरवतात."
विशेष स्वभावासाठी कोड-वर्ड
राकेश राठौर यांच्या म्हणण्यानुसार, "या अॅप्समध्ये यूजरची प्रायव्हसी राखण्यासाठी कोड-वर्ड वापरण्यात आला आहे. व्हॉट्सअॅपमध्ये अडकण्याची भीती असल्याने बरेच लोक अॅप्सना प्राधान्य देतात."
ते म्हणतात, "अॅपमध्ये एखादी व्यक्ती विश्वासार्ह असल्याचं मानलं जातं, तो ब्लॅकमेल करत नाही किंवा लुटत नाही तर त्याला चिस्सो म्हणतात, आणी जो ब्लॅकमेल करतो, समलैंगिक संबध ठेवून पैसे देत नाही त्याला गेटिनो म्हणतात."
"जर तुमचे एखाद्या व्यक्तीसोबत समलैंगिक संबंध असतील आणि त्यानंतर कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर त्यासाठी 'बिलोधर' हा कोड-वर्ड आहे. ब्लॅकमेल होण्याची शक्यता कमी करण्यासाठी असे शब्द व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जास्त वापरले जातात."
"परंतु कोरोनाच्या काळात या अॅप्सचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला, ज्यामुळे कोण कोणाच्या सोबत जात आहे हे कळणं कठीण झालं होतं. अशा परिस्थितीत या वापरकर्त्यांना ब्लॅकमेल करण्याच्या घटना वाढल्या आहेत. काही आर्थिक दुर्बल लोक जे समलैंगिक संबंध ठेवून पैसे कमावतात, त्यांच्या शोषणाच्या घटनेत वाढ झाल्या आहेत. हे लोक कमी पैसे मिळवतात आणि बदनामी होण्याच्या भीतीनं पोलिसात तक्रार करत नाहीत.
गुजरात पोलिसांचे निवृत्त एसीपी दीपक व्यास यांनी बीबीसीला सांगितलं की, "समलैंगिक संबंधांचा हा धंदा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे."
त्यांचे म्हणणं आहे की शहरांमध्ये समलैंगिक संबंध वाढत आहेत, विशेषत: सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका निर्णयात समलैंगिक संबंधांना बेकायदेशीर कक्षेतून वगळलं आहे. दुसरीकडं, सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठित आणि श्रीमंत व्यक्तींना समलैंगिक ठरवून ब्लॅकमेल करणं नवीन नाही.
ते म्हणतात, "सामाजिक प्रतिष्ठा गमावण्याच्या भीतीनं लोक अशा प्रकरणांमध्ये तक्रार नोंदवत नाहीत. परंतु जेव्हा अशी प्रकरणं पोलिसांपर्यंत पोहोचतात तेव्हा त्यांची ओळख गुप्त राहते याची खात्री केली जाते. पोलिस या लोकांसाठी समुपदेशनाची व्यवस्थाही करतात. "कारण हे लोक लवकरच मानसिक नैराश्याचे बळी होतात.
"पूर्वी, समलैंगिक व्हॉट्सअॅप ग्रुप्स खूप प्रचलित होते. व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारे आम्ही लोकांना अटक करायचो पण लोक तक्रारी नोंदवायला टाळायचे. आता अॅप्समुळं खाजगी संभाषण उपलब्ध नाही होत. आधी व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये दोन व्यक्ती असतील तर त्यांच्यात भांडणे व्हायची, मग कोणीतरी गुप्त पद्धतीने पोलिसांना कळवायचं आणि तक्रार दाखल झाली नाही तरी पोलिस प्रकरण मिटवायचे, पण आता तसं करणं अवघड होऊ लागलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








