निराधार वृद्धांना सांभाळण्यासाठी सासरचं घर सोडलं, आता 3500 आई-बाबांची मुलगी

- Author, राहुल रणसुभे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
“एक वेळ अशी होती की, मी स्वतः अनाथ होते. माझ्याजवळ आई-बाबा नव्हते आणि आज माझ्याकडे 128 आई-बाबा आहेत आणि मी त्यांची एकुलती एक मुलगी आहे.”
हे शब्द आहेत योजना घरत यांचे. हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि अभिमान स्पष्ट जाणवत होता.
योजना घरत या ठाण्यातील काल्हेर गावात 'स्मित ओल्डएज होम अँड केअर फाऊंडेशन' नावाचं वृद्धाश्रम चालवतात.
त्यांच्या वृद्धाश्रमात सध्या 128 वृद्ध राहत आहेत. यात 66 महिला तर 62 पुरूष आहेत. यामध्येही 30 वृद्ध हे पूर्णपणे बेडरिडन आहेत. काही पॅरेलेटीक, तर काही ब्रेन हॅमरेजमध्ये असलेले आहेत. या सर्वांच्या सुश्रुषेची जबाबदारी योजना यांनी उचलली आहे.
योजना त्यांच्याकडे असलेल्या वृद्धांचा उल्लेख आई-बाबा असाच करतात. यातूनच त्यांची वृद्धांविषयीची आस्था स्पष्टपणे दिसून येते. त्या मागील 30 वर्षांपासून वृद्धांसाठी काम करत आहेत.
समाजसेवेची आवड अनाथ आश्रमातूनच
योजना यांच बालपण हे मदर टेरेसांच्या अनाथ आश्रमातच गेलं. त्यामुळे लोकांची सेवा करण्याचं बीज कुठेतरी तिथूनच आलं असावं असं त्या सांगतात.
योजना सांगतात की, “मदर टेरेसाच्या आश्रमातले संस्कार माझ्यावर झाले. तिथे असलेल्या मदर्स आणि सिस्टर्सना काम करताना पाहून मला आपणही असंच काही तरी केलं पाहिजे असं वाटायचं. पण नेमकं काय करायचं हे माहित नव्हतं. 1988 ला जेव्हा मी 18 वर्षांची झाले तेव्हा अनाथ आश्रमामधूनच माझं लग्न लावून दिलं आणि मी मुंबईत आले. 1989 मला मुलगीही झाली तर दुसरी मुलगी 1995 ला झाली.”
वृद्धाश्रमाची कल्पना कशी सूचली?
लग्नानंतर सुरुवातीचे दिवस खूपच छान गेल्याचं त्या सांगतात.
सुरुवातीला त्यांनी लेप्रसी केअरसाठी काम केलं. त्यानंतर त्यांनी पाळणाघरही चालवायला सुरुवात केली. मात्र, पाळणाघर चालवत असतानाच त्यांना वृद्धाश्रमासाठीची कल्पना सुचल्याचं त्या सांगतात. याबाबतचा एक किस्सा त्या सांगतात.
“पाळणाघर चालवत असताना तिथे येणाऱ्या लहान मुलाला सोडायला आलेले आजोबा पाळणाघरातच थांबून राहायचे. मी त्यांना सांगायचे की, आता तुम्ही घरी जा. नंतर संध्याकाळी मुलांना घ्यायला परत या. तेव्हा ते आजोबा म्हणाले, योजना बघं ना शरीर साथ देत नसल्यामुळे घरातही आम्हाला काहीच किंमत नाही. डॉक्टरांकडेही यावर काही उपचार नाहीत आणि देवही आम्हाला नेत नाही. आम्ही कुठे जावं, काय करावं हेच आम्हाला कळत नाही, त्या आजोबांचं ऐकून मला वाटायला लागलं की आपण यांच्यासाठी काही तरी करायला हवं आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला.”

1993 साली सुरू केलं पहिलं वृद्धाश्रम
योजना यांनी त्यांचं पहिलं वृद्धाश्रम हे 1993 ला बोईसर येथे सुरु केलं. इथे त्या एका मंदिराच्या पडीक जागेवर वृद्धाश्रम चालवायच्या.
सुरुवातीच्या दिवसांबद्दल त्या सागंतात, “तिथे मंदिर-मशिदीच्या बाहेर जे निराधार असलेले वृद्धा होते, त्यांना त्या वृद्धाश्रमात घेऊन आल्या आणि त्यांची सेवा करू लागल्या. लोकांकडून दारोदार जाऊन दान मागून त्यांनी हे वृद्धाश्रम चालवल्याची सुरुवात केली. मात्र, नंतर जेव्हा त्या ठिकाणी मंदिर बांधण्याचे काम सुरू झालं, त्यावेळी त्यांना ही जागा सोडावी लागली."
अळ्यांनी भरलेल्या अवस्थेत सापडले वृद्ध
त्यानंतर 1997 मध्ये त्यांनी पालघर जिल्ह्यातील वाडा येथेही काही काळासाठी आदिवासी लोकांसाठी वृद्धाश्रम चालवलं होतं. मात्र, हे वृद्धाश्रम जास्त दिवस चाललं नाही. त्यानंतर त्यांनी 2000 मध्ये पनवेलमध्ये कामाला सुरुवात केली. पनवेलमध्ये त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे वृद्ध यायला लागले.
योजना सांगतात, “पनवेलमध्ये जेव्हा काम सुरू झालं, तेव्हा तिथे कोमा, हायपर टेन्शन आणि बरेचसे पॅरालॅटीक वृद्ध यायला लागले. यामुळे माझी वेटिंग लिस्ट ही वाढतच राहिली. आता एवढ्या लोकांना ठेवायचं कुठं म्हणून मी जागेचा शोध घेत घेत ठाण्यात आले. ठाण्यात जेव्हा काम सुरू केलं, तेव्हा लक्षात आलं की, ब्रिज खाली खूप आई-बाबा आहेत. काही रेल्वे मिसिंगमधले आई-बाबा आहेत.
"काही मोठ्या हॉस्पिटलमध्येही अनेक आई-बाबा आहेत. तसंच, ठाणे मेंटल हॉस्पिटलमधून बरे झालेत. परंतु, त्यांचे कुटुंब त्यांना स्वीकारत नाहीये, असेही अनेक आई-बाबा होते. काही आई-बाबा तर बंद घरात अळ्यांनी भरलेल्या अवस्थेतही आम्हाला सापडले आहेत."

समाजसेवेसाठी कुटुंबाचा केला त्याग
वृद्धांसोबत काम करत असताना त्यांचे मेडिकेशन, त्यांचे आजार अशा सर्वच गोष्टींवर योजना काम करत होत्या. अशाच काही वृद्धांचे निधनही व्हायचे. योजना त्यांच्यावर अंत्यसंस्कारही करायच्या. त्यामुळे त्यांचे घरच्यांसोबत खूप वाद होऊ लागले.
योजना सांगतात, "जेव्हा एखाद्या वृद्धाची तब्येत खराब झाली, अथवा काही इमर्जन्सी आली, तेव्हा मला रात्री-अपरात्री घराबाहेर पडावं लागायचं. काही वेळेस एखाद्या वृद्धाचे निधन झाले, तेव्हा त्यांचे जवळचे कोणीच नसायचे. त्यांच्या कुटुंबीयांचाही काही संपर्क नसायचा, अशा वेळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार मलाच करावे लागायचे. त्यामुळे घरच्यांचा माझ्या कामाला विरोध वाढायला लागला. तू रात्री-बेरात्री घराबाहेर पडतेस, स्मशानात जातेस, महिलांनी अंत्यसंस्कार करायचे नसतात. तू ते करतेस, अशा अनेक गोष्टींवरून माझे आणि सासरच्यांचे वाद होत होते. त्यावेळी ते मला काय सागतायेत, हे मला कळत नव्हतं आणि मी त्यांना काय सांगतेय, ते त्यांना कळत नव्हतं. हे वाद खूप वाढल्यावर मी 2012 ला माझ्या दोन्ही मुलींना घेऊन घराबाहेर पडले."

'वृद्धाश्रम हेच शेवटचं घर'
योजना घरत यांनी आतापर्यंत 2000 हून जास्त वृद्धांवर अंत्यसंस्कार केल्याचं त्या सांगतात, तर इथे असलेले वृद्ध आता त्यांच्यासाठी हेच त्यांचं शेवटचं घर असल्याचं बोलून दाखवतात.
आम्ही इथे असलेल्या काही आजी-आजोबांशी बोललो. तेव्हा ते या वृद्धाश्रमात कसे पोहोचले, त्याबद्दल त्यांनी सांगितलं. या प्रत्येकाची गोष्ट मन हेलावून टाकणारी होती.
स्मिता सांभारे आणि त्यांचे पती दोघे पाच वर्षांपूर्वी या वृद्धाश्रमात आले होते. त्यानंतर दोनच वर्षात त्यांचे पती वारले. आता त्या त्यांचं उरलेलं आयुष्य इथेच काढणार असं त्या सांगत होत्या.

स्मिता सांगतात, "मी डान्सर होते. डान्स डायरेक्टर होते आणि आशा पारेख यांच्यासोबत मी स्टेज शो करायचे. जवळपास 40 वर्षे मी काम केलंय. वयाच्या चौथ्या वर्षापासून मी कमवायला लागले. माझे वडील लहानपणीच वारले. त्यामुळे माझ्या भावांची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. त्यांना मोठं केलं. त्यांची लग्न लावून दिली. त्यानंतर मी लग्न केलं.
"पण परिस्थिती इतकी वाईट आली की, माझ्याभावाने माझा सर्व बिझनेस बुडवून टाकला. माझा फ्लॅटही विकायला लावला. आम्ही रस्त्यावर आलो होतो. शेवटी मी आणि माझे पती आत्महत्या करायला निघालो होतो, तेव्हा आम्हाला एक समाजसेविका भेटल्या, त्यांनी मला विचारलं की, तुम्ही अशा अशा वृद्धाश्रमात जाल का?
"तेव्हा आम्ही होकार दिला आणि इथे आलो. पाच वर्षांपूर्वी आम्ही दोघे इथे आलो होतो. मात्र तीन वर्षांआधी माझ्या पतीचे निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार योजना मॅडमनेच केले. आता माझं ही उरलेलं आयुष्य मी इथेच काढणार आहे."
हे सांगत असताना स्मिता यांचे डोळे पाणावले होते.
कुसुम लाड यांच्या पतीच्या निधनानंतर निराधार झाल्या. त्यांनी तीन महिने कल्याणच्या रेल्वेस्टेशनवर काढले. तिथे त्यांच्या पायाला दुखापत झाली आणि त्यांनी त्यांचा पाय गमावला. एका रिक्षावाल्याने त्यांना या वृद्धाश्रमात आणून सोडले. त्यानंतर आता ते यालाच आपलं शेवटचं घर समजतात.

"मला आता इथे येऊन सहा वर्षे होतील. माझं कुणी नाही. लेकरू नाही, बाळ नाही. गण नाही नि गोत नाही. मी एकली ती एकलीच हाय. मी बेवारस म्हणून या माईजवळइतके दिवस राहिले. काही काळजी नाही म. मला खाऊ घालती, पिऊ घालती. कपड़ालत्ता सर्व मिळतंय काय चिंता नाही कशाची. आता फक्त मेलं तर तेवढी माती द्यावी माझ्या जीवाला दुसरं काही नाही वाटंत," हे सांगत असताना कुसुम यांना अश्रू अनावर झाले.
अशा शेकडो कहाण्या या वृद्धांकडे आहेत. अपार दुःख मनात ठेवत आज या वृद्धाश्रमात ते आनंद शोधत आहेत. कोणी आलं तर त्यांच्याशी बोलत राहावं, असं त्यांना वाटतं. माझ्याशी त्या बोलताना हे स्पष्टपणे जाणवत होतं.

'मदत अपुरी पडते'
योजना यांना वृद्धाश्रम चालवण्यासाठी दर महिन्याला जवळपास 15-20 लाख रुपयांचा खर्च येतो. हा सर्व खर्च त्या विविध संस्थांच्या CSR फंडातून भागवतात. मात्र, ही मदत अपुरी पडत असल्याचं त्या सांगतात.
"या वृद्धाश्रमाची क्षमता फक्त 80 लोकांचीच आहे. तरी आम्ही इथे 127 आईबाबांना ठेवलंय. ही जागा आम्हाला अपुरी पडत आहे. अजून 5000 आई-बाबा वेटिंगमध्ये आहेत. त्या सर्वांसाठी आपल्याला एक पर्मनंट शेल्टर बनायचं आहे. त्यासाठी आम्ही जागेच्या शोधात आहोत," असं योजना सांगतात.

आईबाबांना कसं संभाळावं याचं ट्रेनिंग
या कार्यासोबतच योजना तरुणांनी पालकांची काळजी कशी घ्यायची याचं ट्रेनिंगही योजना देतात. त्यासाठी त्या अनेक ठिकाणी वर्कशॉपही घेतात.
आपल्या आईबाबांना आपण लहानमुलांसारखं जपलं पाहिजे, असं त्या सांगतात.
"सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या आई-बाबांना आपल्या पाल्यासारखं जपलं पाहिजे. मुलांनी कसं कुठेही शी-सु केलं अथवा ते कुठेही काहीही बडबडलं तर आपण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे म्हणून स्वीकारतो ना. अगदी तसंच आपण आपल्या आईबाबांकडे पाहायला पाहिजे. सर्वांनी या गोष्टी स्वीकारायला हव्यात. तरच आपण सहजरित्या आई-बाबांची सेवा करू शकू," असा सल्लाही योजना देतात.
सरकारी माहितीनुसार भारतात 2050 पर्यंत वृद्ध व्यक्तींचं प्रमाण लोकसंख्येच्या 20.8 टक्के होईल असा अंदाज आहे.
या पार्श्वभूमीवर भारतातली केअर इकॉनॉमी म्हणजेच देखभाल अर्थव्यवस्थेसाठी चांगली धोरणं राबवणं सरकारसमोरचं मोठं आव्हान असणार आहे. योजना घरत यांची संस्था याच अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा वाटा उचलत आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











