'...अन्यथा परिणामांना तयार राहा', ट्रम्प यांचा क्युबाला इशारा; 'असा' आहे दोन्ही देशांचा शत्रुत्वाचा इतिहास

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिका आणि क्युबामधील संबंधांमध्ये दीर्घकाळापासून कटुता आहे
    • Author, जॉर्ज राईट
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी क्युबाला इशारा दिला आहे की, "खूप उशीर होण्याआधीच क्युबानं अमेरिकेशी करार करावा, अन्यथा परिणामांसाठी तयार राहावं."

क्युबाला आता व्हेनेझुएलामधून कच्चे तेल आणि पैशांचा पुरवठा बंद होईल, असंही ट्रम्प म्हणाले.

क्युबाचे राष्ट्राध्यक्ष मगेल डियाज कनेल यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर देताना म्हटलं की, "आम्ही काय करायचं हे कोणी आम्हाला सांगू नये."

तर क्युबाचे परराष्ट्र मंत्री म्हणाले आहेत की, आमच्या देशाला 'कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय' इंधनाची आयात करण्याचा अधिकार आहे.

व्हेनेझुएलाची राजधानी असलेल्या काराकासमध्ये 3 जानेवारीला अमेरिकेनं केलेल्या कारवाईमध्ये व्हेनेझुएलाचे नेते निकोलस मादुरो यांना अटक करण्यात आल्यानंतर ट्रम्प यांचं लक्ष ज्या देशांवर आहे, त्यात क्युबाचाही समावेश आहे.

असं मानलं जातं की, क्युबाचा जुना मित्र देश असलेला व्हेनेझुएला क्युबाला दररोज जवळपास 35 हजार बॅरल कच्चे तेल पाठवतो.

अमेरिका आणि क्युबामध्ये शाब्दिक युद्ध

ट्रम्प सरकारच्या परवानगीनं व्हेनेझुएलाच्या तेलवाहू जहाजांना जप्त करण्याच्या व्यूहरचनेमुळे क्युबामधील इंधन आणि विजेची आधीच खराब असलेली परिस्थिती आणखी बिघडू लागली आहे.

अमेरिकेनं शुक्रवारी (9 जानेवारी) त्यांचं पाचवं तेलवाहू जहाज जप्त केलं. याबद्दल क्युबाचं म्हणणं आहे की, ते तेलवाहू जहाज व्हेनेझुएलातून मंजूर झालेलं कच्चे तेल घेऊन जात होतं.

ट्रम्प यांनी रविवारी (11 जानेवारी) ट्रूथ सोशलवर पोस्ट केलं, "क्युबा अनेक वर्षांपासून व्हेनेझुएलामधून मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या कच्चे तेल आणि पैशांवर तग धरून होता. त्याबदल्यात, क्युबानं व्हेनेझुएलाच्या गेल्या दोन हुकुमशहांना 'सुरक्षा' दिली. मात्र आता आणखी नाही."

ट्रम्प यांनी लिहिलं, "आता क्युबाला आणखी कच्चे तेल किंवा पैसे मिळणार नाहीत. मी त्यांना सल्ला देतो की खूप उशीर होण्याआधीच त्यांनी एक करार करावा."

ट्रम्प यांनी मादुरो आणि त्यांची पत्नी सीलिया फ्लोरेस यांना पकडण्यासाठी करण्यात आलेल्या कारवाईचादेखील उल्लेख केला. या दोघांवर आता अमेरिकेत अंमली पदार्थांच्या तस्करीचे आणि इतर आरोप लावण्यात आले आहेत.

ग्राफिक कार्ड

ट्रम्प यांनी कराराच्या अटींबद्दल, तसंच क्युबाला कोणत्या परिणामांना सामोरं जावं लागू शकतं, याबद्दल कोणताही उल्लेख केलेला नाही.

क्युबाचे राष्ट्राध्यक्ष मगेल डियाज कनेल रविवारी (11 जानेवारी) म्हणाले, "जे लोक प्रत्येक गोष्टीला, इतकंच काय मानवी जीवनालादेखील एक व्यापार बनवतात, त्यांना कोणत्याही गोष्टीसाठी क्युबाकडे बोट दाखवण्याचा नैतिक अधिकार नाही."

तर क्युबाचे परराष्ट्र मंत्री ब्रूनो रोड्रिगेज म्हणाले की, क्युबाला निर्यात करण्याची इच्छा असणाऱ्या कोणत्याही देशातून "कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय किंवा अमेरिकेच्या एकतर्फी जबरदस्तीच्या दबावात न येता" इंधन आयात करण्याचा पूर्ण अधिकार आहे.

ते म्हणाले, "अमेरिकेप्रमाणे क्युबा इतर देशांच्या विरोधात ब्लॅकमेल किंवा जबरदस्तीनं लष्करी कारवाई करत नाही."

ग्राफिक कार्ड

व्हेनेझुएला-क्युबा संबंध

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

क्युबा अनेक वर्षांपासून मादुरो यांना त्यांची वैयक्तिक सुरक्षा पुरवत आला आहे.

क्युबाच्या सरकारनं म्हटलं आहे की, काराकासमध्ये अमेरिकेनं केलेल्या कारवाईच्या वेळेस त्यांचे 32 नागरिक मारले गेले.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, "अमेरिकेच्या हल्ल्यात मारले गेलेल्यांपैकी बहुतांश लोक क्युबन होते. व्हेनेझुएलाला ज्या लोकांनी इतकी वर्षे ओलीस ठेवलं होतं, त्या गुंड आणि जबरदस्तीनं वसुली करणाऱ्यांपासून संरक्षणाची आता आवश्यकता नाही."

ते म्हणाले, "व्हेनेझुएलाचं रक्षण करण्यासाठी, त्यांच्याकडे आता अमेरिका आहे, जे जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य आहे. आम्ही त्यांचं रक्षण करू."

तर क्युबाचे परराष्ट्र मंत्री रॉड्रिगेज म्हणाले की, "क्युबाला कोणत्याही देशाला देण्यात आलेल्या सुरक्षा सेवांसाठी कधीही पैसे किंवा कोणताही मोबदला मिळालेला नाही."

अर्थात ट्रम्प सरकारनं क्युबाबाबत कोणतीही स्पष्ट योजना सांगितलेली नाही. मात्र, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आधी म्हटलं होतं की, तिथे लष्करी हस्तक्षेपाची आवश्यकता नाही. कारण क्युबा नमतं घेण्यास तयार होता.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी गेल्या आठवड्यात म्हटलं होतं की, जर ते क्युबाच्या सरकारमध्ये असते, तर 'चिंताग्रस्त' झाले असते, कारण 'ते (क्युबा सरकार) खूप मोठ्या संकटात' आहेत.

त्यांनी संकेत दिला होता की क्युबाच्या नेत्यांना चिंता वाटली पाहिजे.

रविवारी (11 जानेवारी) ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक संदेशदेखील पुन्हा पोस्ट केला. यात सूचना करण्यात आली होती की, क्युबन अमेरिकन वंशाचे फ्लोरिडाचे माजी सिनेटर आणि क्युबातील निर्वासितांचे पुत्र असलेले मार्को रुबिओ क्युबाचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात.

'हे मला चांगलं वाटतं,' या वक्तव्यासह ट्रम्प यांनी ती पोस्ट शेअर केली.

अमेरिकेसोबत शत्रुत्वाचा क्युबाचा इतिहास

ट्रम्प यांनी 1823 चं 'मनरो डॉक्ट्रिन' पुन्हा पुढे आणलं आहे. त्यांनी त्याला 'डोनरो डॉक्ट्रिन' असं नवीन नाव दिलं आहे.

जेम्स मनुरो अमेरिकेचे पाचवे राष्ट्राध्यक्ष होते. या दरम्यान 'मनरो डॉक्ट्रिन' अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा महत्त्वाचा भाग होती. त्याच्यानुसार, पश्चिम गोलार्ध म्हणजे अमेरिका खंडानं युरोपियन शक्तींच्या प्रभावातून मुक्त राहिलं पाहिजे.

गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिकेचं परराष्ट्र धोरण लॅटिन अमेरिका आणि त्यांचे वैचारिक मतभेद असलेल्या डाव्या नेत्यांवर अधिक केंद्रीत झालं आहे.

या प्रदेशातील अमेरिकेच्या कारवाईला, अंमली पदार्थांच्या तस्करीशी लढण्याच्या नावाखाली योग्य ठरवलं जात आहे.

काराकासमध्ये अभूतपूर्व ऑपरेशन केल्यानंतर ट्रम्प म्हणाले की त्यांना कोलंबियात लष्करी मोहिमेसारखी गोष्ट ऐकून त्यांना 'चांगलं वाटतं.'

ट्रम्प यांनी कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांना अनेकदा सांगितलं आहे की त्यांनी 'त्यांचा जीव वाचवावा.'

अमेरिकेनं ऑक्टोबरमध्ये कोलंबियाचे पहिले डावे नेते पेट्रो यांच्यावर ड्रग कार्टेलला मदत केल्याचा आरोप करत निर्बंध लावले.

ट्रम्प असंही म्हणाले आहेत, "मेक्सिकोच्या मार्गे अमेरिकेत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ येत आहेत आणि आम्हाला काहीतरी करावं लागेल."

फिडेल कॅस्ट्रो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फिडेल कॅस्ट्रो यांच्या काळापासूनच अमेरिका आणि क्युबामधील संबंध तणावाचे राहिले आहेत.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी कार्टेलशी लढण्यासाठी मेक्सिकोमध्ये अमेरिकेचे सैनिक पाठवण्याचा प्रस्ताव दिला आहे.

मात्र राष्ट्राध्यक्ष क्लाउडिया शीनबॉम यांनी मेक्सिकोच्या भूमीवरील अमेरिकेच्या कोणत्याही लष्करी कारवाईला उघडपणे नाकारलं आहे.

1959 मध्ये कम्युनिस्ट फिडेल कॅस्ट्रो यांनी क्युबामध्ये अमेरिकेचं समर्थन असलेलं सरकार उलथवून टाकलं होतं. तेव्हापासून अमेरिका आणि क्युबामधील संबंध तणावाचे राहिले आहेत.

अर्थात दोन्ही देशांमधील डिप्लोमॅटिक संबंध सुधारण्यासाठी पावलं उचलण्यात आली होती. विशेषकरून अमेरिकेत बराक ओबामा यांच्या कार्यकाळात उचलण्यात आली होती. मात्र ट्रम्प सरकारनं ओबामा यांची अनेक धोरणांना बाजूला सारलं आहे.

एक वर्षापूर्वी दुसऱ्या कार्यकाळाची शपथ घेतल्यानंतर लगेचच ट्रम्प यांनी क्युबाला 'दहशतवादाला पाठिंबा देणारा देश' म्हटलं होतं.

क्युबाचे राष्ट्राध्यक्ष मगेल डियाज कनेल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली, "जे लोक आमच्या गंभीर आर्थिक संकटासाठी आमच्या क्रांतीला दोष देतात, त्यांनी शरमेनं त्यांचं तोंड बंद केलं पाहिजे. कारण त्यांना हे माहित आहे आणि असं मानतात की हा अमेरिकेनं सहा दशकांपासून आमच्यावर लादलेल्या गुदमरून टाकणाऱ्या कठोर उपायांचा परिणाम आहे. तसंच आता यात आणखी वाढ करण्याची धमकी ते देत आहेत."

ते असंही म्हणाले, "जे लोक आमच्या देशाच्या विरोधात उन्मादात खूप आवाज करत आहेत, ते जनतेनं स्वत:चं राजकीय मॉडेल निवडल्याच्या सार्वभौम निर्णयावरच्या रागामुळे असं करत आहेत."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)