डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 'जनता' पत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल इशारा देण्यात आला होता?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रविण सिंधू
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भवानी शाखेच्या मैदानावर 2 जानेवारी 1940 रोजी परमपुज्यनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली होती. त्यावेळी आंबेडकर म्हणाले होते की, काही बाबतीत मतभेद असले, तरी मी या संघाकडे आपुलकीने पाहतो, आपलेपणाने पाहतो," असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोल्हापूर विभाग कार्यवाह आणि कराडच्या बंधुता परिषदेचे आयोजक विजय जोशी यांनी केला. हा दावा करताना त्यांनी आंबेडकरांच्या 'जनता' साप्ताहिकाचा संदर्भ दिला आहे.
मागील वर्षीपासून (2 जानेवारी 2025) आंबेडकरांनी संघाच्या शाखेला भेट दिल्याचा दावा करत कराडमध्ये बंधुता परिषदेचं आयोजन होत आहे. यावर्षीही ही परिषद झाली.
या परिषदेला उपस्थित असलेले महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संघविरोधी भूमिका घेतली नव्हती, असा दावा केला.
दुसरीकडे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि अभ्यासकांनी हे दावे फेटाळले आहेत. तसेच संघ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं अपहरण करत असल्याचा आरोप केला आहे.
या पार्श्वभूमीवर बंधुता परिषदेत नेमके काय दावे करण्यात आले? काय संदर्भ देण्यात आले? यावर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि अभ्यासकांचं काय म्हणणं आहे? प्रत्यक्षात आंबेडकरांनी संघ आणि संघाच्या विचारसरणीवर काय म्हटलंय? आंबेडकरांच्या 'जनता' या साप्ताहिकात काय म्हटलं आहे? समजून घेऊयात.
बंधुता परिषदेत नेमका दावा काय करण्यात आला?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोल्हापूर विभाग कार्यवाह विजय जोशी भाषणात म्हणाले, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भवानी शाखेच्या मैदानावर 2 जानेवारी 1940 रोजी परमपुज्यनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली होती. कराड नगरपालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्कार झाल्यानंतर ते येथे आले होते."
"बाबासाहेब आंबेडकरांना नगरपालिकेतून इथं यायला उशीर झाला होता. म्हणून त्या दिवशी शाखा उशिरा सुरू झाली, असं आपल्यातील एका स्वयंसेवकानं नोंदवून ठेवलं आहे. त्यावेळी शाखा उशिरा सुरू होणं हा खूप मोठा गंभीर अपराध होता," असंही विजय जोशी यांनी नमूद केलं.
ते पुढे म्हणाले, "दत्तोपंत टंकसाळे नावाचे कार्यकर्ते त्यावेळी इथे संघाचे कार्यवाह होते. ते शाखा घ्यायचे. त्यांनी असं लिहून ठेवलं आहे की, बाबासाहेब येणार होते म्हणून आम्ही शाखा 6 ऐवजी 6.30 वाजता उशिरा सुरू केली. बाबासाहेब आल्यावर ते बरंच काही बोलले. त्यातील एक महत्त्वाचं वाक्य म्हणजे काही बाबतीत मतभेद असले, तरी मी या संघाकडे आपुलकीने पाहतो, आपलेपणाने पाहतो."
"2 वर्षापूर्वी केदार गाडगीळ आणि डॉ. श्रीरंग गोडबोले या दोन कार्यकर्त्यांच्या सहकार्याने केसरीतील एक बातमी सापडली. 2 जानेवारीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर या शाखेवर आले होते. त्यावेळी केसरी सप्ताहातून एकदा निघायचा. 9 जानेवारी 1940 च्या केसरीत डाव्या कोपऱ्यात चार ओळीत ती बातमी आली होती. ती बातमी सापडल्यानंतर आम्ही गेल्यावर्षीची बंधुता परिषद आयोजित केली."

फोटो स्रोत, Facebook/ChhShivendraRajeBhonsale
"आमच्यातील एका कार्यकर्त्यानं जनता साप्ताहिक बघितलं. त्यात 20 जानेवारी 1940 च्या साप्ताहिकात ही बातमी आहे. त्यात डॉ. आंबेडकर साताऱ्यातून निघाले, म्युनिसिपालिटीत गेले, त्यांचा मानपत्र देऊन सन्मान झाला, शाखेवर आले आणि नंतर तत्कालीन महारवाड्यात ते गेले असा उल्लेख आहे. यातला म्युनिसिपालटीतला सत्कार आणि महारवाड्यात गेले हे दोन संदर्भ जसेच्यातसे समग्र बाबासाहेब साहित्यात ठेवण्यात आले. मधला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला त्यांनी भेट दिली, हे मात्र गाळलेलं आहे," असा आरोप विजय जोशी यांनी केला.
"महाराष्ट्राचे मंत्री (शिवेंद्रराजे भोसले) मंचावर आहेत. मी त्यांना नम्र विनंती करेन की, समग्र बाबासाहेब लिहिलं गेलं तेव्हा ही चूक अनावधानाने, नजरचुकीनं झाली असेल, पण आता तरी ती चूक सुधारावी. तसेच याच्या पुढचे जे खंड प्रकाशित होतील त्यात या घटनेचा उल्लेख आवर्जून करावा," अशी मागणीही जोशी यांनी यावेळी केली.

फोटो स्रोत, Facebook/ChhShivendraRajeBhonsale
संघाचे स्वयंसेवक आणि दादरच्या किर्ती महाविद्यालयातील इतिहासाचे सहाय्यक प्राध्यापक सागर शिंदे म्हणाले, "आश्चर्यकारक बाब म्हणजे शासनाने प्रकाशित केलेल्या 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषणे, खंड 18 भाग 02' मध्ये 'जनता'च्या 20 जानेवारी 1940 च्या अंकातील वृत्त जशास तसे घेतलेले आहे. मात्र, यात संघ भेटीचा उल्लेख तेवढा गाळलेला आहे. ही लबाडी कोणी आणि का केली याची चौकशी झाली पाहिजे."
20 जानेवारी 1940 च्या 'जनता' अंकात नेमकं काय?
20 जानेवारी 1940 च्या 'जनता'च्या अंकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कराड दौऱ्याचे सविस्तर वृत्तांकन आहे. त्यात कराडच्या म्युनिसिपालटीने मानपत्र दिल्यानंतर आंबेडकर भाषणात काय म्हणाले हे नमूद करण्यात आले.
तसेच म्हटले, "कराड म्युनिसिपालटीचा मानपत्र देण्याचा समारंभ झाल्यानंतर डॉ. साहेबांनी कराड येथील 'राष्ट्रीय स्वयंसेवक मंडळा'स भेट दिली व त्यांना जरूर लागेल त्याप्रसंगी मदत करण्याचे आश्वासन दिले."
या वृत्तांकनात आंबेडकरांनी कराडमधील मंडळाला भेट दिल्याचा उल्लेख आहे, संघाला भेट दिल्याचा उल्लेख नाही. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी आपलेपणा असल्याचं आंबेडकर म्हणाल्याचाही कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे जनतातील वृत्तांकनावरून संघाचा दावा सिद्ध होत नाही. हाच मुद्दा आंबेडकरांच्या साहित्याचे अभ्यासक उपस्थित करत आहेत.

ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते आणि आंबेडकर साहित्याचे अभ्यासक ज. वि. पवार म्हणाले, "त्यांचं सुरुवातीपासून नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं आहे, त्यांचं नाव राष्ट्रीय स्वयंसेवक मंडळ नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मंडळाला भेट दिलेली, संघाच्या शाखेला भेट दिलेली नाही. त्या काळात अशी 100 स्थानिक मंडळं होती. त्यापैकी एखाद्या मंडळाला भेट दिलेली असेल. संघाला भेट दिलेली नाही."
"संघाला भेट दिली असती, तर जनतात आंबेडकरांचं स्वागत कुणी केलं, तिथं बाकीचे कोण हजर होते अशी काही माहिती दिली असती. मात्र, तसं घडलेलं नाही. त्यामुळे संघाचा दावा चुकीचा आहे, असं माझं म्हणणं आहे. गांधी हत्येच्यावेळी संघाच्या लोकांनी आंबेडकरांची भेट घेतलेली. मात्र, आंबेडकरांनी त्यांना आम्ही मदत करू शकत नाही, असं स्पष्ट सांगितलेलं," असंही पवार यांनी सांगितलं.

आंबेडकरांच्या साहित्याचे अभ्यासक केशव वाघमारे म्हणाले, "20 जानेवारी 1940 च्या जनताच्या अंकात कराड येथील "राष्ट्रीय स्वयंसेवक मंडळास' भेट दिली त्यांना जरूर लागेल त्या प्रसंगी मदत करण्याचे आश्वासन दिले." एवढ्या दोनच ओळीची बातमी आहे. त्यामधे संघाबद्दल आपुलकी किंवा आपलेपणा असल्याचा कुठेही उल्लेख नाही."
"शिवाय या बातमीमध्ये राष्ट्रीय स्वंयसेवक मंडळाचा उल्लेख आहे, 'राष्ट्रीय स्वंयसेवक संघ' असा नाही. परंतु केसरीने मंडळास भेट दिली की, संघास याची खात्री न करता घाईघाईने बातमी दिली आणि त्या बातमीच्या सुतावरून राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आता स्वर्ग गाठू पाहत आहे," असं मत त्यांनी व्यक्त केलं.

"त्या काळात अशी हजारो राष्ट्रीय मंडळं होती. आता जसे गणेश मंडळं असतात, तसेच ते एखादं मंडळ असण्याची शक्यता आहे. कारण जनतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आधी नाव चुकलेलं नाही. याआधी जनतात एकदा 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' असा स्पष्ट उल्लेख आहे. तसेच संघाच्या भूमिकेवर सडकून टीका करत संघापासून सावध रहा असं सांगितलं आहे," असंही वाघमारे सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
"संघ सावरकरांना पूज्य मानतो त्या सावरकरांबद्दल डॉ. आंबेडकरांनी जनतात 'सावरकर नरक ओकले' अशा शिर्षकाखाली लेख लिहिला आहे हेही राष्ट्रीय स्वयंसेवकाने समजून घ्यावे," असाही मुद्दा वाघमारे यांनी नमूद केला. तसेच आंबेडकर आणि संघ यांच्यातील आपुलकीचे संबंध असल्याचे दावे फेटाळले.
13 जानेवारी 1934 च्या 'जनता' अंकात काय म्हटलं होतं?
संघाकडून 1940 च्या जनतातील मंडळ हे संघच असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, त्या उल्लेखाच्या जवळपास 6 वर्षे आधी म्हणजेच 13 जानेवारी 1934 च्या अंकात स्पष्टपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख मंडळ न करता संघच केल्याचं दिसतं.
'जनता'मध्ये 'पत्रव्यवहाराचा परामर्ष' या सदराखाली एक पत्र छापलं असून त्यात 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' असा स्पष्ट उल्लेख आहे. त्या पत्रात म्हटलं आहे, "23 डिसेंबरला स्वयंसेवक संघाची छावणी हिंगणारोडवर आंबाझरी जवळ पडली होती. संघाचे मूळ ध्येय 'हिंदु तितुका मिळवावा' या श्रीसमर्थांच्या उक्तीप्रमाणे आहे. परंतु यंदा लष्करी छावणीत अस्पृश्य स्वयंसेवकास जेवणाच्या वेळी स्पृश्य स्वयंसेवकापासून दूर बसविण्यात आले."
"आम्ही याबद्दलचे कारण संघचालक डॉ. हेडगेवार यांना विचारले. त्यांनी उत्तर दिले की, संघाला अजून समाजावर अवलंबून रहावयाचे आहे. हिंदू समाज अजून अस्पृश्यांस एका पंक्तीस घेऊन बसण्यास तयार नाही. स्पृश्य स्वयंसेवक हे सर्वस्वी आपल्या पालकांवर अवलंबून असल्यामुळे त्यांना अस्पृश्यांच्या पंक्तीस बसून आपल्या वडिलांची मनोवृत्ती दुखविता येत नाही."

फोटो स्रोत, Pravin Sindhu
"बिचारे अस्पृश्य स्वयंसेवक 'राष्ट्रीय' या नावाला भाळून अपमान करून घेण्यासाठी स्वतःच्या स्वाभिमानाला विसरले, असे खेदाने म्हणावे लागते. वरील प्रसंगावरून दिसून येईल की, अस्पृश्यास स्वतंत्र मतदार संघ मिळाल्यास हिंदू समाजाचे तुकडे होतात यासाठी प्राणपणाला लावणाऱ्या गांधीजींच्या अस्पृश्य निवारणाच्या कार्याला स्पृश्य नुसते स्पृश्य नव्हे, तर राष्ट्रीय हिंदू कशा रीतीने पाठिंबा देतात. यासाठी स्पृश्य हिंदूच्या मायावी भाषेला व आमिषाला भाळून आपल्या स्वाभिमानाला हरताळ पाडण्यास तयार झालेल्या अस्पृश्यांनी यापासून अवश्य बोध घ्यावा", असं या पत्रात म्हटलं आहे.
संघाच्या दाव्यावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

फोटो स्रोत, Facebook/PrakashAmbedkar.Official
दरम्यान, मागील वर्षी (2025) पहिल्यांदा या दाव्यांवरून जेव्हा वाद झाला होता तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले होते, "बाबासाहेब आंबेडकर कधीही संघाच्या शाखेवर भेटायला गेले नाहीत. तसेच त्यांनी संघाला कधीही गोंजारलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या वारशाप्रमाणे त्यांचे संघाशी मतभेद होते आणि ते कायम आहेत."
डॉ. आंबेडकर हिंदू राजवर काय म्हणाले होते?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ लेखनात देशातील हिंदू राजला प्रखर विरोध केलेला स्पष्टपणे दिसतो. आंबेडकरांचं लेखन आणि भाषणे खंड 8 मध्ये पान क्रमांक 358 वर आंबेडकर 'हिंदू राज'वर बोलताना म्हणतात, "जर देशात हिंदू राज आलं, तर ते या देशासाठी सर्वात मोठी आपत्ती ठरेल यात शंका नाही."
"हिंदूंनी काहीही म्हटले तरी हिंदू धर्म हा स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाला धोका आहे. हिंदू राज लोकशाहीशी सुसंगत नाही. हिंदू राज कोणत्याही परिस्थितीत रोखलं पाहिजे," असंही बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद केलं आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघावर नेमकं काय म्हणाले होते?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लेखन आणि भाषणे खंड 15 च्या पान क्रमांक 560 वर सरदार हुकम सिंग यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना डॉ. आंबेडकरांनी त्यावेळी असलेल्या स्वयंसेवकांच्या संघटनांचा संदर्भ घेतला आहे. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख केला आहे. पुढे ते म्हणतात, त्यापैकी काही अतिशय धोकादायक संघटना आहेत. काही सरकार त्या संघटनांना मान्यता देऊ शकतील तर काही देणार नाहीत असे देखील डॉ. आंबेडकरांनी म्हटले आहे.
'बंधुता परिषदे'ला 'समता परिषदे'नं प्रत्युत्तर
दरम्यान, मागील 2 वर्षांपासून सुरू झालेल्या बंंधुता परिषदेला प्रत्युत्तर म्हणून साताऱ्यातील समता सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून समता परिषदेचं आयोजन केलं जात आहे.
याबाबत माहिती देताना महाराष्ट्र विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे प्रवक्ते विजय मांडके म्हणाले, "ज्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक मंडळ यातला फरक कळणार नाही असे अजिबात नाही. उगाचच त्यांच्या तोंडी काही खोटे वक्तव्य देण्याचा उद्योग फक्त संघपरिवारच करू शकतो."
"संघ परिवारातील काही मंडळींनी 85 वर्षानंतर आता बंधुता परिषदेच्या नावाने बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याला समता परिषदेच्या मांडणीतून तर्कशुद्ध उत्तर दिले जात आहे," असं मत मांडके यांनी व्यक्त केलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











