डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी आपुलकी होती का?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मोहन भागवत

फोटो स्रोत, BBC/ANI

    • Author, प्रविण सिंधू
    • Role, बीबीसी मराठी

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कराड शाखेला भेट दिली. त्यावेळी आंबेडकरांनी केलेल्या भाषणात म्हटलं की, संघाशी मतभेद असले, तरी त्यांच्याकडं आपलेपणानं पाहतो", असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोल्हापूर विभाग कार्यवाह विजय जोशी यांनी 2 जानेवारीला कराडमधील बंधुता परिषदेत केला. यानंतर या दाव्याविषयी वादविवाद होत आहे.

या परिषदेला उपस्थित असलेले महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही संघविरोधी भूमिका घेतली नव्हती, असा दावा केला.

लोककल्याण मंडळ ट्रस्टकडून 2 जानेवारी 2025 पासून बंधुता परिषदेचे आयोजन केले जात आहे. तेव्हापासून हे दावे होत आहे. हे या परिषदेचं दुसरं वर्ष आहे. यावेळी परिषदेला राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे (डिक्की) संस्थापक अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे, आमदार अतुल भोसले हेही उपस्थित होते.

2025 च्या परिषदेबाबत संघाची माध्यम शाखा असलेल्या विश्व संवाद केंद्राने एक वृत्तही प्रसारित केलं होतं.

दुसरीकडे सद्यस्थितीत डॉ. आंबेडकरांशिवाय राजकारण करणं शक्य नसल्याने संघ ओढून ताणून आंबेडकरांशी नातं जोडू पाहत आहे, असा आरोप आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही संघाचे हे दावे फेटाळले आहेत.

या पार्श्वभूमीवर संघाने जसा दावा केला आहे, त्याप्रमाणे डॉ. आंबेडकरांना खरंच संघाविषयी आपुलकी होती का? संघ कोणते पुरावे देत आहे? त्यावर डॉ. आंबेडकरांच्या साहित्याच्या अभ्यासकांचं म्हणणं काय?

आंबेडकरांच्या कुटुंबातील सदस्य असलेल्या प्रकाश आंबेडकरांनी यावर काय भूमिका मांडली आहे आणि स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संघाविषयी व त्यांच्या मांडणीचा केंद्र असलेल्या हिंदू राष्ट्राविषयी काय म्हटलं आहे हे जाणून घेऊयात.

अशाच प्रकारचा वाद यापूर्वीही झाला होता. त्यावेळेस म्हणजे, जानेवारी 2025 मध्ये यासंबंधी बीबीसी मराठीनं सविस्तर बातमी प्रकाशित केली होती. ती वाचकांसाठी पुन्हा इथे देत आहोत.

नेमका दावा काय?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोल्हापूर विभाग कार्यवाह विजय जोशी यांनी कराडमध्ये बंधुता परिषदेचे आयोजन केले. या परिषदेच्या पत्रकात दावा करण्यात आला, "2 जानेवारी 1940 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कराड (जिल्हा सातारा) येथे गेले होते. तेव्हा त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेस भेट दिली व तेथे उपस्थित संघ स्वयंसेवकांसमोर भाषण सुद्धा केले."

2 जानेवारी 2026 रोजी बंधुता परिषदेला उपस्थित सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे (डिक्की) संस्थापक अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे, आमदार अतुल भोसले

फोटो स्रोत, Facebook/ChhShivendraRajeBhonsale

फोटो कॅप्शन, 2 जानेवारी 2026 रोजी बंधुता परिषदेला उपस्थित सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे (डिक्की) संस्थापक अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे, आमदार अतुल भोसले

"या भाषणात आंबेडकर म्हणाले होते की, काही बाबतीत मतभेद असले तरी मी या संघाकडे आपलेपणाने पहातो. या भेटी बाबतची बातमी पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या केसरी वृत्तपत्रात 9 जानेवारी 1940 रोजी प्रसिद्ध झाली होती," असा दावा या पत्रकात करण्यात आला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं म्हणणं काय?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोल्हापूर विभाग कार्यवाह आणि कराडमधील बंधुता परिषदेचे संयोजक विजय जोशी म्हणाले, "2 जानेवारी 1940 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संघाच्या शाखेला भेट दिली होती. तेव्हा केसरी साप्ताहिक निघत असावे. त्यामुळे भेटीबाबत 9 जानेवारी 1940 रोजी बातमी छापून आली होती. अशी बातमी आहे हे आमच्यापासून अनेक दिवस लपून राहिलं होतं, ते आम्हाला माहिती नव्हतं."

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

फोटो स्रोत, ANI

"संशोधन करताना पुण्यातील एका गृहस्थांच्या लक्षात आलं की, याबाबत केसरीत बातमी आली आहे. त्यामुळे माहितीच्या अधिकाराखाली आम्ही केसरीच्या कार्यालयात जाऊन तो मूळ अंक मिळवला. त्यात या भेटीविषयीची त्रोटक माहिती छापण्यात आलेली आम्हाला आढळली," असा दावा विजय जोशी यांनी केला.

डॉ. आंबेडकरांनी संघाच्या शाखेला भेट दिल्याच्या दाव्यावर आंबेडकरांच्या साहित्याचे अभ्यासक सुरेश सावंत म्हणाले, "या भेटीला कुणीही साक्षी नाही. केसरीच्या बातमीला पुष्टी देणारं दुसरं कुठलंही संशोधन उपलब्ध नाही. याविषयी बोलायला बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारीही आज हयात नाहीत."

आंबेडकरांचे जवळचे सहकारी आणि चरित्रकार काय सांगतात?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जवळचे सहकारी आणि त्यांचे चरित्रकार चांगदेव भवानराव खैरमोडे यांनी लिहिलेल्या चरित्र ग्रंथ खंड 8 मध्ये 1938 ते 1945 काळातील आंबेडकरांच्या आयुष्यातील घडामोडींची सविस्तर नोंद केली आहे. यात पान क्रमांक 27 वर डॉ. आंबेडकर 3 जानेवारी 1940 रोजी कराडला जाण्यासाठी निघाल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. तसेच या दिवशी कराड म्युनिसिपालिटीचे मानपत्र मिळणार असल्याचंही नमूद केलं आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रसिद्ध केलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्रग्रंथ

फोटो स्रोत, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई

फोटो कॅप्शन, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रसिद्ध केलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्रग्रंथ

विशेष म्हणजे कराडला जाताना आंबेडकरांचा अपघात झाला आणि त्यांच्या डोक्याला खूप इजा झाल्याचाही उल्लेख या चरित्र ग्रंथात आहे. मात्र, बाबासाहेब आंबेडकरांनी कराडमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला भेट दिल्याची किंवा भाषण करून संघाबद्दल आपलेपणा वाटत असल्याचं वक्तव्य केल्याची कोणतीही नोंद येथे नाही. त्यामुळे संघाच्या दाव्याला येथे दुजोरा मिळत नाही.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

संघाच्या दाव्यावर बीबीसी मराठीशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, "बाबासाहेब आंबेडकर कधीही संघाच्या शाखेवर भेटायला गेले नाहीत. तसेच त्यांनी संघाला कधीही गोंजारलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या वारशाप्रमाणे त्यांचे संघाशी मतभेद होते आणि ते कायम आहेत."

प्रकाश आंबेडकर

फोटो स्रोत, Facebook/PrakashAmbedkar.Official

फोटो कॅप्शन, प्रकाश आंबेडकर

बीबीसी मराठीशी बोलताना रावसाहेब कसबे म्हणाले, "राष्ट्रीय स्वयंसेवकाकडून जे संदर्भ दिले जातात ते संदर्भ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखाणात कुठेही दिसत नाही. आंबेडकर हिंदुत्वाच्या विरोधात होते. त्यांनी हिंदू राष्ट्राचे काय दुष्परिणाम होतील हे सांगून ठेवलं आहे."

"ही सगळी बनवाबनवी, चलाखी आहे. हे प्रयत्न आजचे नाही. हे प्रयत्न जुन्या काळापासून सुरू आहेत. 1980 च्या दशकात असे अनेक लेखक होऊन गेले ज्यांनी सावरकर आणि आंबेडकरांमध्ये सावरकरांमध्ये साम्य दाखवण्याचा प्रयत्न केला. आंबेडकर आणि हेडगेवार यांचा एकत्रित उल्लेख करून हे दोन डॉक्टर कसे मोठे होते असं लिहिलं गेलं," असा आरोप रावसाहेब कसबे यांनी केला.

आंबेडकरांनी संघावर टीका केलेली नाही या संघाच्या दाव्यावर कसबे म्हणाले, "आंबेडकर जोपर्यंत जीवंत होते तोपर्यंत संघाचं कार्यच नव्हतं. आंबेडकरांनी संघावर टीका केली नाही, म्हणजे टीका करावी, ही योग्यताही संघाची नव्हती."

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

आंबेडकरांचं हिंदू राष्ट्राला समर्थन की विरोध?

बीबीसी मराठीशी बोलताना अखिल भारतीय समरसता विभागाच्या राष्ट्रीय कार्यमंडळाचे सदस्य असलेले प्रा. डॉ. रमेश पांडव यांनी डॉ. आंबेडकर आणि हिंदू राष्ट्र या मुद्द्यावर भाष्य केलं. ते म्हणाले, "बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू राष्ट्राला विरोध केलेला नाही."

मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ लेखनात देशातील हिंदू राजला प्रखर विरोध केलेला स्पष्टपणे दिसतो. आंबेडकरांचं लेखन आणि भाषणे खंड 8 मध्ये पान क्रमांक 358 वर आंबेडकर 'हिंदू राज'वर बोलताना म्हणतात, "जर देशात हिंदू राज आलं, तर ते या देशासाठी सर्वात मोठी आपत्ती ठरेल यात शंका नाही."

"हिंदूंनी काहीही म्हटले तरी हिंदू धर्म हा स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाला धोका आहे. हिंदू राज लोकशाहीशी सुसंगत नाही. हिंदू राज कोणत्याही परिस्थितीत रोखलं पाहिजे," असंही बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद केलं आहे.

Card

रमेश पांडव यांनी हिंदू कोड बिलाचा मुद्दा उपस्थित करत काही प्रश्नही उपस्थित केले. ते म्हणाले, "बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदुत्व, हिंदू संघटन, हिंदू राष्ट्र याला विरोध असता, तर त्यांनी हिंदू कोड बिल का लिहिलं असतं? त्यांनी मुसलमान कोड बिल का लिहिलं नाही? हिंदू कोड बिल लिहून त्यात बौद्धांचा समावेश का केला? बौद्ध कोड बिल लिहून त्यात हिंदूंचा समावेश का केला नाही?"

रमेश पांडव यांच्या प्रश्नांवर बोलताना मनिपाल युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक आणि आंबेडकर साहित्याचे अभ्यासक प्रबोधन पोळ म्हणाले, "बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला असला, तरी इथला समूह हिंदूबहुल आहे. त्यामुळे कोणतीही सामाजिक सुधारणा करायची असेल, तर हिंदू समाजात सुधारणा करणं गरजेचं आहे, या मताचे आंबेडकर होते. म्हणून त्यांनी त्या कायद्याला हिंदू कोड बिल म्हटलं होतं."

'आंबेडकरांनी काँग्रेस, गांधी आणि डाव्यांवर टीका केली, संघावर का नाही?'

"बाबासाहेब आंबेडकरांचे मार्क्सवादी किंवा डाव्यांच्या विरोधात काही लेख किंवा भाषणं सापडतात. गांधी आणि काँग्रेसविरोधातही आंबेडकरांचं पुस्तकच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात असं एखादं भाषण, एखादं पुस्तक कुणी दाखवू शकतं का?" असाही प्रश्न रमेश पांडव यांनी विचारला.

यावर बोलताना प्रबोधन पोळ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना फार नंतर झाल्याचा आणि त्यावेळी त्यांची दखल घेण्याइतकं अस्तित्व नव्हतं असा मुद्दा उपस्थित केला.

प्रबोधन पोळ म्हणाले, "संघाची स्थापना 1925 मध्ये झाली. सुरुवातीला 1960 पर्यंत संघ महाराष्ट्रात फार व्यापक स्तरावर वाढला नव्हता. पुणे, नागपूर आणि विदर्भातील ब्राह्मण समाजातच संघाचं अस्तित्व मर्यादित होतं. त्यावेळी सार्वजनिक वर्तुळात संघाला फार स्थान नव्हतं. त्यामुळे आंबेडकरांनी संघावर फार लिहिलेलं नाही."

'शेड्युल कास्ट फेडरेशन आरएसएस आणि हिंदू महासभेशी कधीही युती करणार नाही'

प्रबोधन पोळ पुढे म्हणाले, "बाबासाहेब आंबेडकरांनी नंतरच्या काळात त्यांची भूमिका अगदी स्पष्ट केली आहे. 1952 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्युल कास्ट फेडरेशनचा जाहिरनामा काढला होता. तो जाहीरनामा सर्व प्रश्नांचं उत्तर देतो. त्यात आंबेडकरांनी म्हटलं होतं की, शेड्युल कास्ट फेडरेशन आरएसएस आणि हिंदू महासभेसारख्या प्रतिक्रियावादी संघटनांशी कधीही युती करणार नाही."

बाबासाहेब आंबेडकर
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"बाबासाहेब आंबेडकरांसारखा मोठा व्यक्ती वेगवेगळ्या विचारांच्या लोकांना भेटत असतील. मात्र, त्याचा अर्थ बाबासाहेबांची त्या लोकांशी वैचारिक जवळीक आहे असा होत नाही," असंही प्रबोधन पोळ यांनी नमूद केलं.

सुरेश सावंत यांनी आंबेडकर आणि हिंदू राष्ट्र यावर भाष्य केलं. ते म्हणाले, "चर्चेसाठी काही वेळ बाबासाहेब आंबेडकरांनी संघाच्या शाखेला भेट दिली असं मानलं, तरी आंबेडकरांची आणि संघाची विचारसरणी एकमेकांच्या विरुद्ध आहे. थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये डॉ. आंबेडकरांनी म्हटलं होतं की, कुठल्याही परिस्थितीत हिंदू राष्ट्र होऊ नये. हिंदू राष्ट्र स्वातंत्र्य आणि समतेच्या विरोधातील आहे. ते लोकशाहीशी कुठल्याही प्रकारे सुसंगत नाही."

"एका विशिष्ट समुहातून आलेल्या हिंदू राष्ट्राला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कधीही कोणताही पाठिंबा नव्हता. 1920 ते 1956 या संपूर्ण काळात हे स्पष्टपणे दिसतं की, बाबासाहेबांनी हिंदू राष्ट्रवादाबरोबर किंवा त्या राजकीय शक्तींबरोबर कधीही युती केली नाही. कुणाशी राजकीय व्यवहार करायचे, याबाबत आंबेडकरांना फार स्पष्टता होती," असंही पोळ यांनी नमूद केलं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघावर नेमकं काय म्हणाले होते?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लेखन आणि भाषणे खंड 15 च्या पान क्रमांक 560 वर सरदार हुकम सिंग यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना आंबेडकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अकाली दलासारख्या संघटनांचा उल्लेख करत त्यापैकी काही अतिशय धोकादायक संघटना असल्याचं मत व्यक्त करतात.

राजकारणाची गरज म्हणून संघ आंबेडकरांशी नातं जोडत आहे का?

संघ राजकारणाची गरज म्हणून आंबेडकरांबाबत असे वेगवेगळे दावे करत आहे, असा आरोप प्रबोधन पोळ आणि सुरेश सावंत यांनी केला आहे.

प्रबोधन पोळ म्हणाले, "1920-30 च्या काळात आंबेडकरांचं काम वाढत होतं. त्याला सरळ मार्गाने प्रत्युत्तर देता येणार नाही. म्हणून त्याला संघ वेगवेगळ्या मार्गाने हाताळतो. सद्यस्थितीत आंबेडकरांना टाळणं शक्यच नाही. त्यामुळे पुढील राजकारण करण्यासाठी बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाला, त्यांच्या इतिहासाला टाळता येणार नाही. त्यामुळे हे प्रयत्न होत आहेत."

"दुसरीकडे या मांडणीतून आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी संभ्रम निर्माण करण्याचाही हा प्रयत्न आहे. त्यातून आंबेडकर हे कसे विरोधाभासी होते, ते विरोधाभासातच जीवन जगले आहेत हेही दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे," असाही आरोप पोळ यांनी केला.

बाबासाहेब आंबेडकर

सुरेश सावंत म्हणाले, "आंबेडकर आणि संघ यांचा कधीही मेळ नव्हता. संघ चलाखीने आंबेडकरांशी नातं जोडत आहे. संशोधनाचा नियम आहे की, एक पुरावा असून चालत नाही. त्यासाठी वेगवेगळे पुरावे असावे लागतात. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेकदा हिंदू राष्ट्राच्या विरोधात स्पष्ट भूमिका मांडली आहे. असं असताना आंबेडकरांना संघाविषयी आपुलकी वाटत होती हे सिद्धच होऊ शकत नाही."

"एखादा संदर्भ घेऊन ओढून ताणून त्याचा अर्थ काढणं म्हणजे फसवणूक करणं आहे. ही आंबेडकरांना मानणाऱ्या लोकांना आपल्या बाजूने करण्याची खेळी, डावपेच आहे. हे महामानव बाबासाहेब आंबेडकरांचं अपहरण आहे. संघाने आधी सरदार वल्लभभाई पटेल यांचं जसं अपहरण केलं, तसंच ते बाबासाहेब आंबेडकरांचं करत आहेत," असा आरोप सुरेश सावंत यांनी केला.

आंबेडकरांशिवाय राजकारण करणं शक्य नाही म्हणून संघ आंबेडकरांशी नातं जोडू पाहतो आहे, या आरोपावर पांडव यांनी संघ डॉ. आंबेडकरांचा आधार घेऊन संघटन करत नाही हे अगदी स्पष्ट आहे, असं प्रत्युत्तर दिलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)