तैवान हा पुढचा व्हेनेझुएला असेल? ट्रम्प यांनी मादुरो यांच्याबाबतीत जे केलं त्याच्या पुनरावृत्तीची भीती का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, बीबीसी मॉनिटरिंग
व्हेनेझुएलावर अमेरिकेनं हल्ला करुन त्या देशाचे नेते निकोलस मादुरो यांना अटक केलं. मादुरो यांना अमेरिकेत नेण्यात आलं. यानंतर आंतरराष्ट्रीय नियम, कायदे आणि एखाद्या देशाचं सार्वभौमत्व यावर जगभरात चर्चा सुरू आहे.
आता अशा कारवायांचा पायंडाच पडेल की काय हा प्रश्न त्या चर्चेत अग्रक्रमाने येतोय. जसं अमेरिकेनं व्हेनेझुएलाच्या बाबतीत केलं तशी कारवाई रशिया युक्रेनमध्ये आणि चीन तैवानमध्ये करेल आणि तिथं आपलं 'प्रभाव क्षेत्र' तयार करण्याचं त्यांना बळ मिळेल अशी ही चर्चा होत आहे.
तर काही लोकांच्या मते मादुरोंना झालेली अटक चीनसाठी एक भक्कम इशारा असू शकतो आणि त्यामुळे चीनने जगात कुठवर हातपाय पसरले आहेत हा मुद्दाही प्रकाशात आला आहे.
अर्थात चीनच्या सरकारी माध्यमांनी तैवानवर कारवाई करुन त्यांचे राष्ट्रपती विल्यम लाय चिंग-ते यांना चिनी सैन्य पकडून आणेल अशी कोणतीही शक्यता वर्तवलेली नाही. पण अशी कारवाई करण्याची चीनने अनेकवेळा धमकी मात्र दिलेली आहे.
चीनने आपल्या ज्युरिहा लष्करी तळावर तैवानच्या राष्ट्रपती भवनाची आणि सरकारी इमारतींसारखी प्रतिकृती तयार केली आहे, जेणेकरुन तिथं 'डिकॅपिटेशन स्ट्राईक' म्हणजे सर्वोच्च नेत्याला लक्ष्य करण्यासाठी संभाव्य कारवाईचा सराव केला जाईल, अशा बातम्याही येत आहेत.
चीनच्या राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठात प्राध्यापक झांग ची यांनी सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सला माहिती दिली. ते म्हणाले, "2025 मध्ये तैवानजवळ झालेल्या जस्टिस मिशन 2025 या लष्करी सरावात डिकॅपिटेशन स्ट्राईकचाही सराव करण्यात आला होता."
ते म्हणाले, "या सरावांत तैवानी स्वातंत्र्यासाठीचे समर्थक म्हणून कार्यरत असणाऱ्या फुटिरतावादी गटांच्या प्रमुख लोकांशी संबंधित प्रतिकात्मक स्थळांवर खोटेखोटे हल्लेही करण्यात आले. त्यांच्यामते चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए)कडे तैवानच्या स्वातंत्र्यातील मुख्य गुन्हेगारांवर अचूक कारवाई करण्याची जबरदस्त क्षमता आहे."
तैवानमध्ये स्थिती कशी आहे?
चीनच्या या धमक्यांकडे तैवानमध्ये अतिशय गांभिर्यानं घेतलं जातंय. विशेषतः अमेरिकेनं मादुरो यांना इतक्या सहज पकडल्यामुळे त्याकडे अधिक गांभिर्यानं पाहिलं जातंय.
ऑनलाईन न्यूज पोर्टल स्टॉर्म मीडिया आणि युनायटेड डेली न्यूजसह तैवानमधील माध्यमांनी, 'तैवान हा पुढचा व्हेनेझुएला असेल' कारण अमेरिकेनं केलेल्या कारवाईमुळे चीनला तैवानविरोधात 'ब्लॉकेड आणि डिकॅपिटेशन' रणनिती वापरण्याचं बळ मिळेल, अशा विचारप्रवाहांना मुख्य स्थान दिलंय.

फोटो स्रोत, Getty Images
चिनी सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआसंबंधी एका सोशल मीडिया अकाऊंटवर 3 जानेवारीला व्हीचॅटवर प्रसिद्ध झालेल्या एका लेखात, "लोकांनी व्हेनेझुएलाच्या कारवाईची तुलना तैवानशी करू नये", असं म्हटल्याचं, तैवानी माध्यम ताई-साऊंडसने म्हटलंय.
"चीन हा शांतताप्रिय देश आहे, जोपर्यंत युद्धाशिवाय पर्यायच उरत नाही तोपर्यंत चीन हा मार्ग अवलंबत नाही," यावर या लेखात भर दिला आहे. तसेच "चीन अमेरिकेविरोधात न्यायासाठी लढतो," असंही म्हटलं आहे.
चीनच्या क्षमतेवरही प्रश्नचिन्ह
अमेरिकेसारखी मोहीम सुरू करायला चीनकडे अशी ताकद आहे काय, यावरही तैवानी माध्यमांत प्रश्न उपस्थित केला गेला आहे,
चीनकडे कललेल्या तैवानी वर्तमानपत्र चायना टाइम्सने एका बातमीत इन्स्टिट्यूट फॉर नॅशनल डिफेन्स अँड सिक्युरिटी रिसर्चच्या सू त्जू युन यांच्या आधारे माहिती दिली आहे. त्यानुसार तैवानचे मिलिट्री पोलीस आणि राष्ट्रपतींच्या संरक्षणासाठी असलेले कर्मचारी यात घुसखोरी करुन राष्ट्रपतींच्या हालचालींची माहिती गोळा करण्याचा चीनने अनेकदा प्रयत्न केला आहे. अशा हालचालींकडे तैवानने सतर्क राहून लक्ष दिलं पाहिजे.
परंतु या मोहिमेतून अमेरिकेनं त्यांची इलेक्ट्रॉनिक युद्ध करण्याची क्षमता चीनपेक्षा चांगली आहे, हे दाखवलंय असंही सू यांनी म्हटलं आहे. त्यांच्यामते तैवानकडे अमेरिकन बनावटीचे रडार आणि संचार प्रणाली आहे. चिनी प्रणालीसारखी ती सहज निष्क्रिय करता येऊ शकणार नाही असंही ते म्हणाले आहेत.
युनायटेड डेली न्यूजमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात एशिया पॅसिफिक डिफेन्स मॅगेझिनचे मुख्य संपादक वेंग-ची- वेन यांच्याआधारे माहिती प्रसिद्ध झाली आहे. यात तैवानची स्थिती व्हेनेझुएलापेक्षा वेगळी आहे असं म्हटलं आहे. अमेरिका लॅटिन अमेरिकेत जेवढी ढवळाढवळ करते तेवढी तैवानच्या राजकीय आणि सैन्यविश्वात चीनची घुसखोरी नाही असं यात म्हटलं आहे.
'अँटी डिकॅपिटेशन' म्हणजे सर्वोच्च नेतृत्वाचं संरक्षण हे तैवानी लष्कराचं मुख्य केंद्र राहिलं आहे. नजीकच्याच भूतकाळात तैवानचे स्पेशल फोर्स आणि अमेरिकेचं लष्कर यात मोठ्याप्रमाणात आदानप्रदान झालंय असंही चेन म्हणालेत.
युनायटेड डेली न्यूजच्या आणखी एका बातमीत अमेरिकेचे माजी संरक्षण अधिकारी ड्रू थॉम्पसन यांच्या आधारे माहिती दिलीय. त्यात ड्रू म्हणतात की, "अमेरिकेच्या तुलनेत चिनी लष्कराकडे अशा कारवाया करण्याचा अनुभव कमी आहे. त्यांनी हत्या करण्याचा मार्ग अवलंबला तर त्यांची यशस्वी होण्याची जास्त शक्यता आहे."
तैवानचे संरक्षण उपमंत्री शू-स्जू- चिएन यांनी 5 जानेवारीला आपलं सैव्य सर्व प्रकारच्या आणीबाणीच्या स्थितीला हाताळण्यासाठी सज्ज आहे असं म्हटलं आहे.
तैवानी वर्तमानपत्र लिबर्टी टाइम्सनुसार चीनद्वारे संभाव्य डिकॅपिटेशन ऑपरेशनच्या शक्यतेवर प्रश्न विचारल्यावर चिएन यांनी सैन्याकडे सर्व प्रकारच्या परिस्थिती हाताळण्याचं नियोजन तयार आहे आणि त्याचा सरावही केलेला आहे. त्यात अगदी राष्ट्रपतींच्या संरक्षणाशी संबंधित वान चून योजनेचाही समावेश आहे.
सरकारशी संबंधित वृत्तसंस्था सेंट्रल न्यूज एजन्सीने एका बातमीत चिएन यांच्याआधारे बातमी दिली आहे. त्यात 5 जानेवारीला तैवानच्या लेजिस्लेटिव्ह युआनच्या अर्थसमिती सदस्यांसमोर आणीबाणी काळातील तयारीला अधिक भक्कम करण्यावर जोर देण्यात आला. संसदेत वार्षिक अर्थसंकल्पाबरोबर स्पेशल डिफेन्स बजेट लवकरात लवकर मंजू करावे असाही आग्रह करण्यात आल्याचं त्यात म्हटलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











