व्हेनेझुएलानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांची कोणत्या देशांवर नजर असू शकते?

डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, टॉम बेनेट
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दुसरा कार्यकाळ त्यांच्या परराष्ट्र धोरणाच्या महत्त्वाकांक्षेनुसार आकार घेत आहे.

त्यांनी व्हेनेझुएलाला दिलेल्या धमक्या अंत्यत नाट्यमयरित्या अंमलात आणल्या. रात्रीच्या वेळी झालेल्या कारवाईत व्हेनेझुएलाचे अध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीला राजधानी काराकासमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था असताना पकडण्यात आले.

या मोहिमेचा संदर्भ देत ट्रम्प यांनी 1823 चा 'मोनरो डॉक्ट्रिन' पुन्हा सादर केला आणि त्याचे नाव "डोनरो डॉक्ट्रिन" असे ठेवले.

जेम्स मोनरो हे अमेरिकेचे पाचवे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात मोनरो डॉक्ट्रिन हा अमेरिकन परराष्ट्र धोरणाचा एक महत्त्वाचा भाग होता, ज्यामध्ये असे म्हटले होते की पश्चिम गोलार्ध म्हणजेच अमेरिकन खंड युरोपीय शक्तींच्या प्रभावापासून मुक्त राहिला पाहिजे.

अलीकडच्या काळात अमेरिकेने लक्ष्य केलेल्या इतर काही देशांविरूद्ध ट्रम्प यांनी जे इशारे दिले होते, त्यापैकी काहींचा इथे उल्लेख करूया.

1) ग्रीनलँड

अमेरिकेचा ग्रीनलँडमध्ये आधीच एक 'पिटुफिक स्पेस बेस' हा लष्करी तळ आहे. पण ट्रम्प यांना संपूर्ण बेटावर अमेरिकेचे नियंत्रण हवे आहे.

त्यांनी पत्रकारांना सांगितले की, "राष्ट्रीय सुरक्षेसाठी आम्हाला ग्रीनलँडची गरज आहे."

ट्रम्प म्हणाले की, "हा प्रदेश सर्वत्र रशियन आणि चिनी जहाजांनी भरलेला आहे."

हे विशाल आर्क्टिक बेट डेन्मार्क राज्याचा भाग आहे आणि अमेरिकेच्या ईशान्येस सुमारे 2000 मैल (3,200 किमी) अंतरावर आहे.

हे रेअर अर्थ मिनरल्स म्हणजे दुर्मिळ पृथ्वी खनिजांनी समृद्ध असा प्रदेश आहे, जी स्मार्टफोन, इलेक्ट्रिक वाहने आणि लष्करी उपकरणे तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. सध्या, रेअर अर्थ मिनरल्सच्या उत्पादनात चीन अमेरिकेच्या खुप पुढे आहे.

ग्रीनलँडचे पंतप्रधान जीन-फ्रेडरिक निल्सन , ट्रम्प

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ग्रीनलँडचे पंतप्रधान जीन-फ्रेडरिक निल्सन यांनी ट्रम्प यांच्या वक्तव्याला 'काल्पनिक' म्हटले आहे.

ग्रीनलँडला उत्तर अटलांटिकमध्ये एक महत्त्वाचे धोरणात्मक स्थान आहे. इथून आर्क्टिक सर्कलमध्ये प्रवेश करता येतो, ज्याचे महत्त्व वेगाने वाढत आहे, कारण ध्रुवीय बर्फ वितळल्याने येत्या काही वर्षांत नवीन समुद्री मार्ग उघडण्याची शक्यता आहे.

ग्रीनलँडचे पंतप्रधान जेन्स-फ्रेडरिक निल्सन यांनी ट्रम्प यांना उत्तर देताना बेटावरील अमेरिकेच्या नियंत्रणाच्या कल्पनेला "काल्पनिक" म्हटले आहे.

ते म्हणाले, "आता कोणताही दबाव नाही, कोणतेही इशारे नाही. यापुढे विलिनीकरणाची कल्पना नाही. आम्ही संवादासाठी तयार आहोत. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, परंतु ती योग्य पद्धतीने आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करून व्हायला पाहिजे."

ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याचा अमेरिकेचा कोणताही प्रयत्न त्यांना नाटोचा सदस्य असलेल्या दुसऱ्या देशासोबत संघर्षाच्या परिस्थितीत टाकेल, ज्यामुळे युती धोक्यात येण्याची शक्यता आहे.

2) कोलंबिया

व्हेनेझुएलातील कारवाईनंतर अवघ्या काही तासांतच ट्रम्प यांनी कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांना "स्वतःचा जीव वाचवण्याचा" इशारा दिला.

व्हेनेझुएलाचा पश्चिमेकडील शेजारी, कोलंबियामध्ये प्रचंड तेलाचे साठे आहेत आणि तो सोने, चांदी, पन्ना, प्लॅटिनम आणि कोळशाचा एक प्रमुख उत्पादक आहे.

हा प्रदेश ड्रग्ज तस्करीसाठी, विशेषतः कोकेनच्या व्यापारासाठी देखील कुप्रसिद्ध आहे.

सप्टेंबरमध्ये अमेरिकेने कॅरिबियन आणि पूर्व पॅसिफिक महासागरातील बोटींवर हल्ले करण्यास सुरुवात केली, कोणत्याही पुराव्यांशिवाय बोटींमध्ये ड्रग्ज वाहून नेल्याचा आरोप केला. यामुळे ट्रम्प आणि कोलंबियाच्या डाव्या विचारसरणीच्या अध्यक्षांमध्ये वाद निर्माण झाला आहे, जो वाढत चालला आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील कोलंबियाचे स्थायी प्रतिनिधी सोमवारी व्हेनेझुएलाच्या मुद्द्यावर बोलत होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील कोलंबियाचे स्थायी प्रतिनिधी सोमवारी व्हेनेझुएलाच्या मुद्द्यावर बोलत होते.

अमेरिकेने ऑक्टोबरमध्ये पेट्रोवर निर्बंध लादले आहेत आणि म्हटले की 'ते कार्टेलला "भरभराटीसाठी" परवानगी देत आहेत.'

रविवारी(4 जानेवारी) एअर फोर्स वनमध्ये बोलताना ट्रम्प म्हणाले की, कोलंबियाला "एक आजारी माणूस चालवत आहे ज्याला कोकेन बनवणे आणि ते अमेरिकेत विकणे आवडते."

त्यांनी म्हटले आहे की त्यांना जास्त काळ असे करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

जेव्हा ट्रम्प यांना विचारले गेले की, अमेरिका कोलंबियाला लक्ष्य करून कोणती कारवाई करेल का, त्यावर ते म्हणाले की, "मला असं ऐकायला आवडतं."

कोलंबिया हा ऐतिहासिकदृष्ट्या अमेरिकेच्या ड्रग्जविरुद्धच्या युद्धात त्याचा जवळचा मित्र राहिला आहे, आणि ड्रग्ज कार्टेल्सशी लढण्यासाठी दरवर्षी लाखो डॉलर्सची लष्करी मदत मिळत आला आहे.

3) इराण

इराणमध्ये सध्या सरकारविरोधी मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत आणि जर आणखी निदर्शक मारले गेले तर तेथील अधिकाऱ्यांना "खूप कठोर शिक्षा" भोगावी लागेल असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

"आम्ही याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहोत. जर त्यांनी पूर्वीसारखे लोकांना मारायला सुरुवात केली तर मला वाटते की अमेरिका कठोर प्रत्युत्तर देईल," असे त्यांनी एअर फोर्स वनमध्ये पत्रकारांना सांगितले.

इराण सैद्धांतिकदृष्ट्या "डोनरो सिद्धांत" मध्ये परिभाषित केलेल्या व्याप्तीच्या बाहेर आहे, परंतु गेल्या वर्षी इराणच्या अणु सुविधांवर हल्ला केल्यानंतर ट्रम्प यांनी इराणच्या राजवटीला पुढील कारवाईची धमकी दिली आहे.

इराणमध्ये सध्या सरकारविरोधी मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इराणमध्ये सध्या सरकारविरोधी मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत.

हे हल्ले त्यावेळी झाले होते जेव्हा इराणची अण्वस्त्रे विकसित करण्याची क्षमता नष्ट करण्याच्या उद्देशाने इस्रायलने मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली होती, आणि त्यामुळे नंतर इराण आणि इस्रायलमध्ये 12 दिवसांचा संघर्ष सुरू झाला होता.

गेल्या आठवड्यात ट्रम्प आणि इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यात मार-ए-लागो इथे झालेल्या बैठकीत इराण हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. अमेरिकन मीडिया रिपोर्टनुसार, नेतान्याहू यांनी 2026 मध्ये इराणवर नवीन हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

4) मेक्सिको

2 016 मध्ये ट्रम्प यांच्या पहिल्या निवडणुकीची सुरुवात मेक्सिकोच्या दक्षिण सीमेवर "भिंत बांधण्याच्या" त्यांच्या विधानाने झाली होती.

2025 मध्ये त्यांचा कार्यकाळ सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी 'गल्फ ऑफ मेक्सिको' (मेक्सिकोचे आखात) चे नाव बदलून अमेरिकेचे आखात असे करण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली.

राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शीनबॉम

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शीनबॉम यांनी मेक्सिकोच्या भूमीवर कोणत्याही अमेरिकन लष्करी कारवाईला जाहीरपणे नकार दिला आहे.

त्यांनी वारंवार दावा केला आहे की मेक्सिकन अधिकारी अमेरिकेत ड्रग्ज किंवा बेकायदेशीर स्थलांतरितांचा प्रवाह रोखण्यासाठी पुरेसे प्रयत्न करत नाहीत.

रविवारी (4 जानेवारी) ट्रम्प म्हणाले की मेक्सिकोमधून ड्रग्जची "खूप तस्करी" होते आणि "आपल्याला काहीतरी करावे लागेल", तसेच त्यांनी असेही म्हटले होते की तेथील ड्रग्ज कार्टेल "खूप शक्तिशाली" आहेत.

ट्रम्प म्हणाले की त्यांनी ड्रग्ज कार्टेलशी लढण्यासाठी मेक्सिकोमध्ये अमेरिकन सैन्य पाठवण्याची ऑफर दिली आहे, परंतु राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शीनबॉम यांनी मेक्सिकोच्या भूमीवर कोणत्याही अमेरिकन लष्करी कारवाईला जाहीरपणे नकार दिला आहे.

5) क्युबा

फ्लोरिडाच्या दक्षिणेस फक्त 90 मैल (145 किमी) अंतरावर असलेले हे बेट (राष्ट्र) 1960 च्या दशकाच्या सुरुवातीपासूनच अमेरिकेच्या निर्बंधांना तोंड देत आले आहे.

क्युबाचे व्हेनेझुएलाशी जवळचे संबंध होते, ज्याने क्युबाच्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यात क्युबाला सुमारे 30% तेल पुरवले होते.

व्हेनेझुएलातील निकोलस मादुरो यांना सत्तेवरून काढून टाकल्यानंतर तेल पुरवठा विस्कळीत झाल्यास क्युबाला अडचणी येऊ शकतात.

ट्रम्प यांनी रविवारी (4 जानेवारी) असे सुचवले आहे की तिथे अमेरिकेच्या लष्करी हस्तक्षेपाची आवश्यकता नाही, कारण क्युबा "झुकण्यास तयार आहे".

क्युबाचे अध्यक्ष मिगुएल डिआझ-कॅनेल यांनी निकोलस मादुरो यांच्या समर्थनार्थ व्हेनेझुएलाचा झेंडा हातात घेतला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, क्युबाचे अध्यक्ष मिगुएल डिआझ-कॅनेल यांनी निकोलस मादुरो यांच्या समर्थनार्थ व्हेनेझुएलाचा झेंडा हातात घेतला.

ते म्हणाले, "मला वाटत नाही की आपल्याला कोणत्याही कारवाईची आवश्यकता आहे. परिस्थिती सुधारत आहे असं दिसतंय."

ते पुढे म्हणाले, "ते टिकू शकतील की नाही हे मला माहित नाही, परंतु क्युबाकडे आता कोणतेही उत्पन्न नाही. त्यांचे सर्व उत्पन्न व्हेनेझुएलातून, व्हेनेझुएलाच्या तेलातून येत होते."

क्यूबन स्थलांतरितांचे पुत्र असलेले अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी क्युबातील राजवट बदलण्याची मागणी बऱ्याच काळापासून केली आहे.

"जर मी हवानामध्ये राहिलो असतो आणि सरकारमध्ये असतो तर मला किमान थोडीशी काळजी वाटली असती," असे त्यांनी शनिवारी (3 जानेवारी) पत्रकारांना सांगितले.

ते म्हणाले, "जेव्हा राष्ट्राध्यक्ष (ट्रम्प) बोलतात तेव्हा तुम्ही त्यांना गांभीर्याने घेतले पाहिजे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)