कोर्ट : जात- न्याय व्यवस्थेवर भाष्य करणारा, दलित चळवळीशी जोडलेला सिनेमा जगभरातील प्रेक्षकांना कसा आपला वाटला?

कोर्ट

फोटो स्रोत, ZEE Entertainment

    • Author, तुषार कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"The court was probably best film, made in India. इतनी सच्ची. And I couldn't believe. जिस तरह का अभिनय था उसमे," एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी काढलेले हे उद्गार आहेत.

9 वर्षांपूर्वी झालेल्या या मुलाखतीमध्ये विषय होता मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीचा.

मराठी चित्रपटसृष्टी सर्वांत प्रगल्भ आहे असं सांगताना नसीरुद्दीन शाह यांनी मराठीतील अलीकडच्या काळातील चांगल्या चित्रपटांची नावे घेतली. सैराट, फँड्री, हायवे (दिग्दर्शक - उमेश कुलकर्णी) या चित्रपटांची नावे त्यांनी घेतली आणि ते 'कोर्ट'बद्दल बोलले आणि केवळ मराठीतीलच नाही तर बहुधा देशात बनलेला सर्वोत्तम चित्रपट अशा शब्दांत त्यांनी 'कोर्ट'चं कौतुक केलं.

2015 मध्ये आलेल्या कोर्ट या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीच नाही तर पूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीला हादरा दिला.

भारतातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सुवर्णकमळ पुरस्कार कोर्टने पटकावला. त्याच बरोबर जगभरातील विविध फिल्म फेस्टिवल आणि पुरस्कार सोहळ्यात 'कोर्ट'ने आपली छाप सोडली.कोर्ट' हा चित्रपट मराठी भाषेत आहे पण तो फक्त मराठीच नाही तर संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वाचा चित्रपट आहे.

'कोर्ट' चित्रपट आला तेव्हा याबद्दल भरभरून बोललं गेलं. द न्यू यॉर्कर, व्हरायटी, रॉजर एबर्ट (वेबसाईट), द न्यू यॉर्क टाइम्स, द गार्डियन, लॉस एंजिलिस टाइम्स अशा नामांकित माध्यमांनी चित्रपटाची दखल तर घेतलीच सोबतच 'न्यायव्यवस्थेचं चित्रण' म्हणून गौरवलं देखील.

ही कथा मुंबईत घडत असली तरी जगभरातल्या प्रेक्षकांना ती त्यांचीच गोष्ट वाटली हे या चित्रपटाचं यश आहे. कोर्टच्या यशाबद्दल विचारलं किंवा याच्या आशयाबद्दल विचारलं तर या चित्रपटाचा दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेनी एका इंटरव्यूमध्ये म्हटलं होतं की 'मला यातलं गूढ असंच कायम राहावं असं वाटतं.'

कोर्ट म्हटलं की प्रेक्षकांना 'क्लायमॅक्स' आणि 'अँटिक्लायमॅक्स' आठवतो. कोर्ट पाहिल्यांदा पाहिल्यावर असं वाटलं होतं ही चित्रं अनेक वर्षं डोळ्यांसमोरुन आणि डोक्यातून बाजूला होणार नाहीत.

'कोर्ट'ने बॉक्स ऑफिसवर किती रुपयांचा गल्ला जमवला हे मला ठाऊक नाही पण प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्याच्या दृष्टीने तर हा चित्रपट पूर्ण यशस्वी ठरला याची खात्री आहे.

'कोर्ट'चं यश नेमकं कशात आहे याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न.

चैतन्य ताम्हाणे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चैतन्य ताम्हाणे
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

If it is simple reading then it is very hard writing असं म्हटलं जात. हे कोर्टच्या बाबतीत तंतोतंत लागू होतं. अगदी रोजची दिसणारी दृश्यं पण तुमच्या मनावर परिणाम करुन जातात.

कोणताही चांगला पिक्चर घ्या. त्यात पाच ते सहा सीन असतात की ते एकदम चांगले वाटतात, जे तुमच्या हृदयात किंवा डोक्यात घर करुन राहतात. जेव्हा पिक्चर सुरू नसतो तेव्हादेखील ते आठवतात. पण 'कोर्ट' असा पिक्चर आहे की त्याचा कोणताही सीन केव्हाही तुमच्या डोक्यात सुरू होऊ शकतो.

लोकलमध्ये महिलांच्या फर्स्ट क्लास डब्यातलं संभाषण असो, किंवा सफाई कामगार वासुदेव पवारच्या पत्नीला कोर्टात विचारलं जातं, 'त्यांची मानसिक स्थिती कशी होती,' तेव्हा त्या विचारतात 'मानसिक स्थिती म्हणजे काय' हे दृश्य असो. किंवा 'मॅडमला जज बनवा, तेच तेच चेहरे पाहायचा कंटाळा आलाय,' हे वकिलांच्या स्टाफ रूममधलं वाक्य असो.

जेव्हा आपण ही वाक्यं ऐकतो तेव्हा वाटतं ही चित्रपटातली वाक्यं नाही तर इथेच आजूबाजूला आपल्या कानावर पडणारे बोल आहेत. त्यातूनच कोर्टचा योग्य तो परिणाम साधत जातो. त्याची तीव्रता वाढत जाते आणि शेवटीला ती काळीज चिरून जाते.

विवेक गोंबर, चैतन्य ताम्हाणे आणि गीतांजली कुलकर्णी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विवेक गोंबर, चैतन्य ताम्हाणे आणि गीतांजली कुलकर्णी

चैतन्य ताम्हाणेला जेव्हा एबीपी माझा वाहिनीवरील माझा कट्टा मध्ये विचारण्यात आलं की कोर्टची कथा कशी सुचली? तेव्हा त्याने सांगितलं होतं की जिज्ञासेतून ही कथा आली आहे. चैतन्य सांगतो की 'मी फॉरेनमध्ये निर्मिती झालेला एक कोर्ट रूम ड्रामा पाहात होता. मला सहजच वाटलं की आपण आपले कनिष्ट स्तरावरचे कोर्ट कसे चालतात हे जाऊन पाहावं.'

त्यानुसार चैतन्यने कोर्ट व्हिजिट सुरू केल्या आणि अनेक गोष्टी त्याला दिसल्या. जसं की चित्रपटात आपण पाहतो तसे वकील लोक खऱ्या कोर्टमध्ये बोलत नाहीत. काही जणांचं वक्तृत्व इतकं चांगलं नसतं. कधी नीट ड्रेस नाही म्हणून सुनावणी होत नाही तर कधी चुकून अपंगांच्या डब्यात शिरल्याबद्दल न्यायालयात हजर केलं जातं अशा अनेक गोष्टी चैतन्यने टिपल्या आणि त्या चित्रपटात आणल्या.

'या प्रसंगांमध्ये एक विनोद आहे असं जाणवलं. त्यातून कोर्टची कथा मनात येऊ लागली,' असं चैतन्य त्या मुलाखतीत सांगतो.

चित्रपट आणि वास्तव

'कोर्ट'वर आनंद पटवर्धन यांच्या 'जय भीम कॉम्रेड' या डॉक्युमेंट्रीचा प्रभाव आहे. जय भीम कॉम्रेडमध्ये सफाई कामगारांना रोज कोणत्या गोष्टीतून जावं लागतं याचं चित्रण आहे.

त्यात एक कामगार सांगतो की सफाईचे काम करताना डोळ्यात काटा गेला आणि त्यानंतर माझा डोळा गेला. तसंच सफाई कामगारांना मास्क, गमबूट द्यावेत असं न्यायालयाने सांगितलं पण त्याविरोधात अपील करुन वकिलांवर पैसा खर्च करण्यात आला पण आम्हाला सेफ्टी गिअर्स मिळाले नाहीत, असं तो सफाई कामगार डॉक्युमेंट्रीत बोलतो.

'कोर्ट'मध्ये देखील मृत वासुदेव पवार यावर याचा डोळा निकामी झाला होता असा संदर्भ आहे.

चैतन्य ताम्हाणेनी या चित्रपटाच्या मेकिंगबद्दल सांगितलं होतं की तहलका या नियतकालिकात 2007 साली एस. आनंद यांचा 'Life Inside A Black Hole' हा मैला कामगारांवर एक रिपोर्ट आला होता. हा लेख या कथेसाठी महत्त्वाचा रेफ्ररन्स बनल्याचे त्याने सांगितले.

कोर्ट

फोटो स्रोत, ZooEntertainmentIndia

फोटो कॅप्शन, बचाव पक्षाच्या वकिलाच्या भूमिकेत विवेक गोंबर आणि फिर्यादी पक्षाच्या वकिलाच्या भूमिकेत गीतांजली कुलकर्णी

या रिपोर्टमध्ये देशात दरवर्षी किती सफाई कामगारांचा मृत्यू होतो याची आकडेवारी आहे.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी व्यक्ती न्यायालयात उभी केली जाते ती एक लोकशाहीर आहे. आपला निषेध नोंदवण्यासाठी, विद्रोह करण्यासाठी संगीताचा वापर करणे याने देखील आपलं लक्ष वेधून घेतल्याचं चैतन्य ताम्हाणे म्हणतो. यातूनच नारायण कांबळे यांचे पात्र उभे राहिले आहे.

कोर्टसाठी कलाकारांची निवड

कोर्टचं एक वैशिष्ट्य म्हणजे यात ज्या कलाकारांनी काम केलं आहे ते त्या-त्या भूमिकेत चपखल बसतात. चित्रपटासाठी निवडण्यात आलेले कलाकार हे विविध क्षेत्रातून आले होते. त्यांच्या निवडीसाठी आठ-ते नऊ महिने लागल्याचे चैतन्य ताम्हाणेनी मेकिंगमध्ये सांगितले होते.

प्रमुख भूमिकेत असलेले वीरा साथीदार हे स्वतः एक शाहीर होते आणि आंबेडकरी चळवळीत काम करत होते. ते विद्रोही या नियतकालिकाचे ते संपादक होते. त्यांचे 2021 मध्ये निधन झाले.

कोर्ट

फोटो स्रोत, Zoo Entertainment

फोटो कॅप्शन, वीरा साथीदार, कोर्ट चित्रपटातील एक दृश्य

वीरा साथीदार हे आंबेडकरी चळवळीशी जोडले गेलेले होते त्यामुळे त्यांना भूमिकेतील बारकावे ठाऊक होते. वीरा साथीदार यांची निवड करण्यासाठी देखील भरपूर कालावधी लागला.

जेव्हा चैतन्य ताम्हाणेनी त्यांचे दोन वेगवेगळे फोटो पाहिले तर त्याला विश्वासच बसला नाही की ही एकच व्यक्ती आहे. एक लुक होता फक्त मिशी आणि दाढी केलेले साथीदार. दुसरा लुक होता पांढरी शुभ्र भरगच्च दाढी. त्या लुकमध्ये ते वयस्कर वाटत होते, हाच लुक सिनेमात ठेवण्यात आला.

सरकारी वकील गीतांजली कुलकर्णी, नारायण कांबळे यांच्या वकिलांची भूमिका ज्यांनी साकारली ते विवेक गोंबर, न्यायाधीशाची भूमिका साकारणारे प्रदीप जोशी हे सर्व जण त्या-त्या भूमिकेत इतके फिट बसले आहेत की त्यांच्याशिवाय त्या भूमिकेत दुसरं कुणी असू शकलं असतं याचा विचार देखील आता आपण करू शकत नाही.

न्यायाधीश सदावर्तेंची भूमिका साकारणाऱ्या प्रदीप जोशींना तर असा प्रश्न कित्येक वेळा विचारण्यात आला की 'तुम्ही खरंच न्यायाधीश आहात का?'

 न्या. सदावर्ते यांच्या भूमिकेत प्रदीप जोशी

फोटो स्रोत, ZooEntertainmentIndia

फोटो कॅप्शन, न्या. सदावर्ते यांच्या भूमिकेत प्रदीप जोशी

चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेते निवडताना ते प्रेक्षकांच्या परिचयाचे वाटू नयेत तर त्या पात्राला न्याय देतील असे लोक हवेत असं चैतन्य ताम्हाणेला वाटत होतं. त्यानुसार त्यांची निवड करण्यात आली. दुसरी गोष्ट म्हणजे, चित्रपटाला वास्तव बनवण्यासाठी पात्र अशीच भाषा बोलताना दिसतात जशी आपण रोज बोलतो.

त्यात चित्रपटात दिसतात तसे चटपटीत संवाद नाही की संवादफेक नाही. पण असे संवाद बोलायचे असतील तर त्यासाठी खूप वेळा रिटेक घ्यावे लागतील याची चैतन्य ताम्हाणेला कल्पना होती. त्यामुळे जर खूप प्रसिद्ध कलाकार घेतले तर तितका वेळ आपल्याला त्यांच्यासोबत मिळणार नाही असा विचार करुन चैतन्य ताम्हाणेनी कलाकारांची निवड केली.

एका एका दृश्यासाठी तर कधी कधी साठ-साठ रिटेक घेतले गेले आहेत. तसेच सर्व शूटही खऱ्या लोकेशनवर झाले आहे. त्यामुळे फेमस कलाकारांना घेऊन असं शूट करणं अवघड झालं असतं याचा विचार देखील चैतन्य ताम्हाणेनी केला होता.

कोर्टचं संगीत

महाराष्ट्रात विद्रोही आणि समाज प्रबोधनाच्या गायन परंपरेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर कृष्णराव साबळे, शाहीर विठ्ठल उमाप, महाकवी वामनदादा कर्डक, शाहीर आत्माराम पाटील, शाहीर अमर शेख यांची नावे घेतली जातात.

आंध्रप्रदेशातील गदर हे देखील विद्रोही गीतांसाठी ओळखले जात. त्यांचे 2023 मध्ये निधन झाले.

विद्रोही चळवळीतील गीतांनी आपलं लक्ष वेधून घेतलं आणि त्यातून हे कथानक उभं राहिल्याचं चैतन्य सांगतो.

कोर्ट आणि कोर्टचं संगीत या एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणता येतील. कोर्टमध्ये दोन गीतं आहेत. ही दोन्ही गीतं संभाजी भगत यांनी लिहिली, संगीतबद्ध केली आणि गायली आहेत. त्यातले पहिले आहे जाण, जाण, जाण..दुश्मनाला जाण रे आणि दुसरा पोवाडा आहे, धन्य धन्य तुम्ही सरकार

शाहीर संभाजी भगत

फोटो स्रोत, Facebook/SambhajiBhagat

फोटो कॅप्शन, शाहीर संभाजी भगत

प्रमुख व्यक्तिरेखा एक लोकशाहीर आणि सामाजिक कार्यकर्ता आहे. तेव्हा त्या व्यक्तिरेखेला साजेसं गाणं, त्यातील जोश, आक्रमकता सारं काही त्या गाण्यात उतरणं अपेक्षित होतं. हे आव्हान संभाजी भगत यांनी समर्थपणे पेललं.

कोर्टच्या गाण्यांच्या निर्मितीबद्दल संभाजी भगत यांनी मेकिंगमध्ये सांगितलं की 'जी गाणी आहेत ती शोषितांचा आवाज आहेत. जे आपण सरकारला थेट सांगू शकत नाहीत ते गाण्यातून सांगितलं जातं आणि हे गाणं आमचं आयुष्य आहे. त्यातूनच कोर्टची गाणी लिहिण्यात आणि रचण्यात आली.'

निर्मितीच्या वेळी चैतन्य ताम्हाणेनी संभाजी भगत यांना सांगितलं होतं की गाणं असं हवं आहे की ज्यात आवाज 'डॉमिनेट' करेल. जशी जलसांमध्ये गाणी गायली जातात तसंच गाण्याचं अस्सल स्वरूप चित्रपटात दिसावं असा चैतन्यचा आग्रह होता. आणि संभाजी भगत यांनी त्याप्रमाणे ते गाणं बनवलं.

हे गाणं ज्यांच्यावर चित्रीत झालं ते वीरा साथीदार त्यांनी एक महिन्याहून अधिक काळ या गाण्यावर रिहर्सल केली होती. जेव्हा ही त्यांना वेळ मिळत असे तेव्हा ही गाणी ते हेडफोन लावून ऐकत असत आणि रिहर्सल करत असत. या गाण्यातील शब्द, भाव अचूक पकडण्यासाठी शेकडो तासांची रिहर्सल वीरा साथीदार यांनी केली.

स्टुडिओत रेकॉर्डिंग न करता लाइव्ह रेकॉर्डिंग

बीबीसी मराठीने संभाजी भगत यांच्याशी फोनवर बातचीत करुन संगीत निर्मितीची प्रक्रिया आणि आव्हानं समजून घेतली.

भगत यांनी सांगितले की "या चित्रपटाचा नायक आहे तो क्रांतिकारी शाहीर आहे. त्यासाठी जी विद्रोही शाहिरी आहे ती या चित्रपटांसाठी लागणार असल्याचे मला आधी सांगण्यात आले होते, त्या अनुषंगाने मी विचार केला. त्यानुसार शब्द आणि संगीत दिले. या गाण्यासाठी मी असा विचार केला की हा चित्रपट फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित नाही."

शाहीर संभाजी भगत

फोटो स्रोत, Facebook/Sambhaji Bhagat

फोटो कॅप्शन, शाहीर संभाजी भगत

भगत पुढे सांगतात, "तेव्हा गाण्याला एक ऑल इंडिया अपील असावं हे डोळ्यासमोर ठेवून मी ते बसवलं. हे गाणं इतर चित्रपटातील गाण्यांप्रमाणे ज्या दिवशी हे गाणं रेकॉर्ड करायचं होतं त्या दिवशी या गाण्याचे अनेक टेक घ्यावे लागले. कारण जेव्हा आम्ही हे गाणं गायचो, शूट करायचो तेव्हा जर मध्येच डोक्यावरुन विमान गेलं की पुन्हा ते गाणं नव्याने गावं लागायचं आणि शूट करावं लागायचं."

या गाण्यांच्या बोलांबद्दल सांगताना संभाजी भगत सांगतात की "ही गाणी लिहिताना मी भरपूर अभ्यास केला होता. त्याचा परिणाम असा झाला की आजही जेव्हा मी देश-विदेशात कार्यक्रमासाठी जातो तेव्हा कोर्टच्या लिरिक्सबद्दल मला जरुर विचारलं जातं. या सर्वांचा एकत्रित परिणाम या गाण्यांमध्ये आहे असं मला वाटतं."

कोर्टचा आशय आणि परिणाम

कोर्ट चित्रपटाची कथा मुंबईत घडते. पण या कथेचा परिणाम मात्र सर्व जगभरात सारखा पाहायला मिळाला आहे. कोर्टने जगभरातल्या प्रेक्षकांच्या मनला कशी साद घातली असेल?

याबाबत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक आणि चित्रपट अभ्यासक डॉ. हरीश वानखेडे यांनी बीबीसी मराठीला सांगितले की 'कथेचा आशय, मांडणी आणि तंत्रज्ञान याबाबतीत करण्यात आलेला आहे एक सुंदर प्रयोग आहे. असा प्रयोग मराठीत अनेक वर्षं झाला नव्हता. कोर्टमध्ये जादुई वास्तववाद आहे. याचं वर्णन आपण काफ्काज इफेक्ट म्हणून करू शकतो.'

कोर्ट

फोटो स्रोत, ZooEntertainmentIndia

डॉ. वानखेडे पुढे सांगतात, "ज्याप्रमाणे फ्रॅंझ काफ्काच्या साहित्यात ज्या प्रमाणे अभूतपूर्व गोष्टी असतात तशा या कोर्टमध्ये पाहायला मिळतात. काफ्काने 'द ट्रायल' देखील लिहिले आहे. ज्यात काफकाने न्यायव्यवस्थेतील असंगतीवर बोट ठेवलंय, त्याप्रमाणेच कोर्टची कथा आहे. केवळ कथाच नाही तर या चित्रपटात काफ्काच्या साहित्यातील चिरंतन मूल्यं आपल्याला दिसतात. जसं की निरर्थकतेची संकल्पना, निरसतेची संकल्पना या गोष्टी गेल्या कित्येक वर्षात मराठीमध्ये दिसल्याच नाहीत. कोर्ट हा टिपिकल मराठी चित्रपट नाहीये तर तो आंतरराष्ट्रीय चित्रपट आहे असं मला वाटतं. कोर्टमध्ये असलेली पात्रं ही आनुषंगिक आहेत, महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे व्यवस्थेतील निरसपणा, निरर्थकतेवरील त्याचं भाष्य."

कोर्ट चित्रपटात पाहताना कुठेही जाती व्यवस्थेचा थेट उल्लेख नाही किंवा भाष्य नाहीये परंतु प्रेक्षकांला ते कळतं. ही किमया कोर्टने कशी साधली असावी याबाबत विचारले असता डॉ. वानखेडे सांगतात की, "हा चित्रपट महाराष्ट्राच्या परंपरेत रुजलेला आहे. महाराष्ट्रातील सामाजिक अवकाशात दलित चळवळीचं मोठं स्थान व्यापलेलं आहे. आणि सुरुवातीलाच मुख्य पात्राची ओळख ही विद्रोही शाहीर अशीच करुन देण्यात आली आहे. त्यातूनच या गोष्टीचा उलगडा होत जातो."

कोर्ट पाहताना एक गोष्ट लक्षात येते की कोणत्याही भाषेतील व्यक्ती हा चित्रपट पाहू शकतो आणि समजू शकतो. या चित्रपटाला भाषेचं बंधन नाहीये. चैतन्य ताम्हाणेच्या भाषेत सांगायचं झालं तर 'हा मराठी भाषेत बनलेला पण आंतराष्ट्रीय स्टँडर्ड असलेला एक चित्रपट आहे.'

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)