'जगात देखणी, भीमाची लेखणी' या अजरामर ओळी लिहिणारे महाकवी वामनदादा कर्डक

फोटो स्रोत, Swapnil Kedare
- Author, यश वाडेकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
(एप्रिल महिना हा दलित हिस्ट्री मंथ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने बीबीसी मराठी आंबेडकरी विचार आणि दलित इतिहासांचा मागोवा घेत आहे. या लेखामध्ये आपण लोकगीताच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवणारे महाकवी वामनदादा कर्डक यांच्या विषयी जाणून घेणार आहोत.)
वामनदादा कर्डक यांचं गाणं ऐकलं नसेल अशी व्यक्ती महाराष्ट्रात शोधूनही सापडणार नाही. कदाचित तुम्हाला माहीतही नसेल पण वामनदादांच्या लेखणीतून अवतरलेलं गीत कुठे ना कुठे तरी आपल्या कानावर पडलेलं असतं. त्यांची भीमगीते राज्याच्या कानाकोपऱ्यात लोक गातात आणि त्यातूनच आपली आणि वामनदादांची पहिली भेट घडलेली असते.
उद्धरली कोटी कुळे
भीमा तुझ्या जन्मामुळे
असो की,
कोण राखील आता भीमाचा मळा |
करपूनी चालला हा उभा जोंधळा |
ही गाणी महाराष्ट्रातील वस्त्यावस्त्यात आजही बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ धगधगत ठेवत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची मशाल पेटती ठेवण्यात भीमगीतांचे, आंबेडकरी भजनांचे मोठे योगदान आहे. अत्यंत सहज सोप्या भाषेत डॉ. आंबेडकरांचे तत्त्वज्ञान या गाण्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचले. आंबेडकरी गीते गावोगाव पोहचवणाऱ्या अनेक गीतकार-गायकांमध्ये महाकवी वामनदादा कर्डक यांचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं.
नाशिकच्या देशवंडीमध्ये जन्मलेल्या वामनदादा कर्डकांचं, अवघं महाराष्ट्र हेच घर झालं आणि वाड्या-वस्त्यांवर बोलवून प्रेमाने गाणे ऐकणारे लोकच त्यांचे कुटुंब बनले.
15 ऑगस्ट 1922 रोजी जन्मलेले वामनदादा तरुणपणी आंबेडकरी चळवळीत आले आणि आंबेडकरमयच बनले आणि त्यातूनच त्यांच्या ओठातून उद्गार निघाले, 'भीमाची वाणी हीच माझी गाणी.'
वामनदादांनी तबला-पेटी आणि मोजक्या साथीदारांसह पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. कधी बस, कधी बैलगाडी तर कधी पायी असे ते गावोगाव फिरले आणि आंबेडकरी विचारांच्या पिढ्या त्यांनी घडवल्या.

फोटो स्रोत, Getty Images
कार्यक्रम असेल तेव्हा गाण्यांमधून आंबेडकरी विचार मांडणे आणि कार्यक्रम नसेल तेव्हा आपल्या सहज बोलण्यातून तोच विचार मांडत असत.
त्यामुळे ते जिथे कुठे जातील तिथलेच बनून जात आणि म्हणत, 'ना कुटुंब ना मुलं बाळं ज्या नव्या गावात जाऊ तिथे चळवळीत काम करणारेच माझं मुलं.'
मुंबईमध्ये दगडातून कोळसा वेगळा करणारा हा मुलगा शब्दांची माळ रचत एका क्रांतीचा गीताच्या रूपाने इतिहास मांडेल, असा विचार कोणाच्या मनाला देखील शिवला नसेल.
वामनदादा डॉ. आंबेडकरांच्या कार्याने अत्यंत प्रभावित झाले की त्या विचारांशिवाय त्यांना काही सुचतच नसे. तो काळच सामाजिकदृष्ट्या आंबेडकरी विचारांनी झपाटलेला होता त्यातूनच ते चळवळीत आले.
पण, वामनदादा कर्डकांच्या लेखनाची सुरुवात ही थेट भीम गीतांनी झाली नाही. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, की वामनदादांनी चित्रपटासाठी पण गाणी लिहिली आहेत.

फोटो स्रोत, Sagar Jadhav
मराठी चित्रपटसृष्टीत अजरामर झालेली अनेक गाणी वामनदादांच्या लेखणीतून आली आहेत.
अगदी आजही नव्या पिढीच्या ओळखीचं असणारं 'सांगा या वेडीला, माझ्या गुलछडीला... तुझ्यासाठी आलो मी सासरवाडीला,' हे गीत ही वामनदादा कर्डकांनी लिहिलेलं आहे.
जर वामनदादांनी चित्रपटसृष्टीत राहूनच गीतकार व्हायचे ठरवले असते तर त्यांना अमाप पैसा आणि प्रसिद्धी मिळाली असती हे निश्चित होतं.
पण आंबेडकरी विचार गावागावांत आणि घराघरात पोहोचवण्याचा त्यांनी जो निर्णय घेतला होता त्यापुढे हे काहीच नव्हतं.
आंबेडकरी चळवळीतील मोठे नेते कर्मवीर दादासाहेब गायकवाड वामनदादांना म्हणाले की डॉ. आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचणं हीच आपली खरी गरज आहे आणि या कार्याला तुझ्या शब्दांची गरज आहे. त्यांचा शब्द प्रमाण मानून वामनदादांनी भीम गीतांनाच आपले आयुष्य समर्पित केले.
प्रतिकूल परिस्थितीत बालपण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झंझावाती विचारांनी आयुष्य व्यापलेल्या वामन कर्डक यांचा जन्म 15 ऑगस्ट 1922 साली नाशिकच्या सिन्नर मधल्या देशवंडी या खेड्यात झाला.
वडिलांचे नाव तबाजी कर्डक आणि आई सईबाई. मोठा भाऊ आणि धाकटी बहीण असा वामनदादांचा परिवार. घरी शेती गुरंढोरं होती त्यामुळे वामनदादांचं बालपण गुरंढोरं राखण्यात गेलं.
घरी थोडीफार जमीन होती पण धान्य घरात यायचं तर ते पुरायचं नाही. त्यामुळे त्यांची आई डोंगरावर जाऊन लाकडं गोळा करायची आणि त्याची मोळी बांधून सिन्नरच्या बाजारात विकायची, अशा या प्रतिकूल वातावरणात वामनदादांचं बालपण गेलं आणि नंतर ते मुंबईत आले.
पहिलं लग्न आणि मुलीचा मृत्यू
'महान लोककवी वामनदादा कर्डक' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत कवी सूर्यकांत भगत यांनी वामनदादांच्या नाशिक मधून मुंबईला येणाच्या प्रवासाविषयी लिहलं आहे.
वामनदादा कर्डक यांचं वयाच्या 19-20 व्या वर्षी लग्न अनसूया नावाच्या मुलीशी झालं. त्या लग्नातून त्यांना मुलगी झाली तिचं नाव मीरा. पण वामनदादांचा हा संसार काही टिकला नाही.
बायको त्यांना सोडून गेली. पुढे मीराचाही आजारपणामुळे मृत्यू झाला. या दुःखातून ते कधीही सावरले नाहीत. आई सोबत पोटापाण्यासाठी त्यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला, असं या पुस्तकात लिहिलं आहे.

फोटो स्रोत, Swapnil Kadre
मुंबईच्या सुरुवातीच्या दिवसात त्यांनी गिरणी कामगार म्हणून काम केलं. अगदी कोळशाच्या वखारीत कोळसाही उचलला, मुंबईच्या रस्तांवर चिक्की विकली असं करत सुरुवातीला मिळेल ते काम केलं.
नंतर ते टाटा कंपनीत नोकरीला लागले. पण या सगळ्या धावपळीतही वामनदादा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जात निर्मूलन चळवळीत काम करायचे. याच काळात शिवडीच्या बीडीडी चाळीत राहात असतांना ते समता सैनिक दलात सामील झाले.
...आणि वामनचे लोककवी वामनदादा कर्डक झाले
वामनदादांनी हजारो गाणी लिहिली पण अनेक गाणी उपलब्ध नाहीत. तरीदेखील सध्या प्रकाशित असलेल्या गाण्यांची संख्या ही 5000 इतकी आहे.
एवढं लिखाण करणाऱ्या वामनदादांना मुंबईत येईपर्यंत अक्षरांची ओळख देखील नव्हती. शिवडीच्या बीडीडी चाळीत राहताना त्यांना एकदा चाळीतील माणसाने पत्र वाचायला सांगितलं पण वामनदादांना वाचता येत नव्हतं, या घटनेचा त्यांच्यावर खूप परिणाम झाला.
त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आपलं शिक्षण नाही, आपल्याला लिहिता, वाचता येत नाही याची त्यांना खंत वाटू लागली.
आपल्याला ही लिहायला वाचायला यायला हवं हा निश्चय त्यांनी केला या साक्षर होण्याच्या प्रवासात त्यांनी देहलवी नावाच्या मास्तराकडून बाराखडी मुळाक्षरे शिकली. जोडाक्षरे ते दुकानाच्या पाट्या, बोर्ड वाचून शिकले. हळूहळू त्यांचं लेखन वाचन वाढू लागलं.

फोटो स्रोत, Getty and Archival videos screen grab
अक्षर ओळख झाल्यानंतर वामनदादांनी मराठीसह हिंदी साहित्याचं भरपूर वाचन केलं. यातूनच चित्रपट कथाकार, अभिनेता होण्याची इच्छा निर्माण झाली. त्याकाळात त्यांनी अनेक चित्रपट कंपन्यात येरझाऱ्या घातल्या. ते मिनर्व्हा फिल्म, करदार स्टुडिओ आणि रणजीत स्टुडिओत एक्ट्रा कलाकार म्हणून जात असत.
1943 च्या काळात त्यांनी राणी बागेत बसून एक विडंबन गीत केलं व रात्री चाळीतील लोकांपुढे गाऊन दाखविले. लोकांनाही ते आवडलं आणि वामनदादांच्या आयुष्यात गाण्यांचा शिरकाव झाला.
त्यानंतर त्यांनी अनेक गाणी लिहिली आणि मराठी चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून आपली ओळख निर्माण केली. 'सांगत्ये ऐका' सारख्या सुपरहिट चित्रपटासाठी वामनदादांनी गाणी लिहिली आहेत.
'आंबेडकरी चळवळीला तुझ्या शाहिरीची गरज आहे'
चाळीसच्या दशकात वामनदादा नोकरी सांभाळून गाणी लिहायचे आणि सोबतच ते आंबेडकरी चळवळीतही सहभाग घ्यायचे.
1943 साली नायगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्यांदा पाहण्याची संधी वामनदादांना मिळाली.
चळवळीत काम करतानाच त्यांची ओळख कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्याशी झाली होती. दादासाहेबांनी वामनराव यांच्या प्रतिभेची कल्पना होती.
त्यातूनच त्यांनी त्यांना चळवळीसाठी गाणी लिहायचे सुचवले. आंबेडकरी चळवळीला तुझ्या शायरीची गरज आहे हा त्यांचा शब्द वामनदादांनी खाली पडू दिला नाही आणि ते चळवळीसाठी गाणी लिहायला आणि गायला लागले.
वामनादादांनी पहिली गायन पार्टी शिवडी येथे स्थापन केली. यानंतरच्या आयुष्यात त्यांनी अनेक गायन पार्ट्या स्थापन केल्या.
आपल्या शाहिरी गाण्याने आणि आवाजातल्या विद्रोही तसंच पोटातून येणाऱ्या सुरांच्या साथीने वामनदादांनी महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात केली.
या समूहांमधूनच अनेक कलाकार पुढे आले आणि त्यांनी देखील वामनदादांकडून प्रेरणा घेऊन आपले आयुष्य चळवळीसाठी समर्पित केले.

फोटो स्रोत, Somnath Waghmare
गायनपार्टीसोबत शांताबाई या पण वामनदादांसोबत फिरायच्या. शांताबाई या वामनदादांच्या दुसऱ्या पत्नी. त्यांच्यावर वामनदादांचे जीवापाड प्रेम होते.
महाराष्ट्र भ्रमण करतांना कधी पायी, कधी उपाशीपोटी, मिळेल तेथे मिळेल तसे वामनदादा नावाच्या वादळी वाऱ्यासोबत सोबत होत्या. नंतर दम्याच्या आजारामुळे शांताबाई या नाशिक येथे राहू लागल्या आणि वामनदादांनी आपला प्रवास सुरू ठेवला.
'सांगा आम्हाला बिर्ला, बाटा, टाटा, कुठं हाय हो, सांगा धनाचा साठा न् आमचा वाटा कुठं हाय हो'
विद्रोहाचं बाळकडू आणि वेदनेची हकीकत सांगणारी वामनदादांनी शेकडो गाणी लिहिली आहेत.
तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे |
तुफान वारा, पाऊस धारा मुळी न आम्हा शिवे ||
असं गाणं लिहित वामनदादांनी अस्पृश्यता आणि जातीवादाने कोलमडून पडलेल्या समाजात आत्मविश्वासाचा दिवा पेटवण्याचा प्रयत्न केला.
हजारो वर्षांची जात उतरंड मोडून काढणाऱ्या आंबेडकरांच्या लेखनीचं कौतुक करताना वामनदादा लिहतात,
साऱ्या जगात देखणी
बाय मी भीमाची लेखणी.
वामनदादांच्या कविता आणि गाणी फक्त आंबेडकरांच्या स्फूर्तीगीतांनीच नाही तर अगदी समाजाला नवा दृष्टीकोन देत अनिष्ट प्रकारांवर देखील प्रहार करते. सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना त्यांची कविता आपल्या उद्विग्न आणि अस्वस्थ देखील करते.
'प्राणहानीसाठी धर्माची काठी धरू नका रे'
जगु द्या जगाला तुम्ही ही जगा
सुख सागराचे तुम्हीही बघा
प्राणहानीसाठी धर्माची काठी
हाती नकारे धरू
दंगल नकारे करू...
असं लिहिणारे वामनदादा,
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या समतेच्या विचाराची कास धरत, मार्क्स वादाकडे झुकणारं
सांगा आम्हाला बिर्ला, बाटा, टाटा, कुठं हाय हो
सांगा धनाचा साठा न् आमचा वाटा कुठं हाय हो
असं गीत देखील लिहितात.
आंबेडकरी चळवळीचा सर्वांत महत्त्वाचा क्षण म्हणजे बौद्ध धम्माचा स्वीकार.
14 ऑक्टोबर 1956 ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला. यानंतर वामनदादांच्या गीतरचनेत ही हा बदल दिसून येतो.
आंबेडकरी विचारांसह आता वामनदादांनी गौतम बुद्धांचाही मार्गही आपल्या कवितेतून मांडण्यास सुरुवात केली, यातूनच
सारे मानव प्राणी ना उच्च नीच कोणी
कुणीही यावे शुद्ध बनावे बुद्धाच्या चरणी ||
अशा ओळी देखील वामनदादांनी लिहिल्या आहेत.
'भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते | तलवारीचे तयाच्या न्यारेच टोक असते'
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाणानंतर दलित चळवळीत मतभेद वाढत गेले.
दादासाहेब गायकवाडांसोबत काम केल्यामुळे वामनादादांनी संघटना अगदी जवळून पाहिलेली. पण नंतर गवई आणि वानखेडे गट पडले. यानंतर रामदास आठवले असतील की राजा ढाले यांच्यातील मतभेद.
दलित पँथरचा उदय आणि ऱ्हास यामुळे चळवळीची दिशा आणि दशा यावर आपल्या गाण्यांमधून वामनदादांनी भाष्य केलं आहे. यातूनच कदाचित,
भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते |
तलवारीचे तयाच्या न्यारेच टोक असते.
अशी खंत ही वामनदादांनी आपल्या गाण्यातून व्यक्त केली आहे.
'वामनदादांनी बाबासाहेब घराघरात पोहोचवले'
ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजीत भालेरांवाना काही काळासाठी वामनदादांचा सहवास लाभला. वामनदादांच्या आठवणी सांगताना त्यांनी वामनदादांनी महाराष्ट्रभर कसे शाहीर तयार केले याबाबत सांगितले.
इंद्रजीत भालेराव सांगतात, "वामनदादा कार्यक्रम करत संपूर्ण महाराष्ट्रभर फिरायचे. रोजच कार्यक्रम असतील असं नाही. त्यामुळे शेवटचा कार्यक्रम ज्या गावात झाला तिथेच वामनदादा पुढच्या कार्यक्रमापर्यंत थांबायचे. यामुळे असं झालं की, त्या गावात आंबेडकरी विचारांचे शाहीर आणि गायन पार्ट्या सुरू होऊ लागल्या."

"बहुतांश गायनपार्ट्या या वामनदादांनी लिहिलेली गाणीच गात असे. यामार्गाने आंबेडकरी चळवळीचा प्रसार करण्यात वामनदादांनी मोठं योगदान दिलं आहे," असं भालेराव सांगतात.
"ज्या प्रमाणे संत तुकारामांनी विठ्ठलाला घरोघरी पोहचवलं त्याचप्रमाणे वामनदादांनी बाबासाहेबांना घरोघरी पोहचवलं, हेच त्यांचं सर्वांत मोठं योगदान आहे," असं भालेराव यांना वाटतं.
मराठी साहित्यासाठी वामनदादांचे अलौलिक योगदान
यवतमाळमध्ये राहणारे प्राध्यापक सागर जाधव यांनी वामनदादा कर्डक यांच्या लिखाणाचा संग्रह करुन ते प्रकाशित करण्याचे कार्य हाती घेतले आहे. 2008 पासून आतापर्यंत 5 खंड प्रकाशित झाले असून, असे 16 खंड संपादित करण्याचं हा कार्यक्रम आहे.
औरंगाबादच्या मिलिंद कॉलेज शिक्षण घेत असताना, सागर जाधव यांनी वामनदादांना पहिल्यांदा प्रत्यक्ष ऐकलं. यावेळी वामनदादांनी गाण्यातून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना एक सवाल केला, तो म्हणजे सांगा कुणी कुणी इथे ईमान राखले? हा प्रश्न सागर जाधव यांच्या मनात घर करुन राहिला आणि हाच प्रश्न वामनदादांच्या कवितांचे 16 खंड करण्यामागे प्रेरणाही बनला.
आजघडीला यापैकी 5 खंड प्रकाशित झाले आहेत. बीबीसी मराठीशी बोलताना सागर जाधव म्हणतात, "वामनदादा यांना फक्त बाबासाहेबांची गाणी लिहणारा कवी म्हणूनच ओळख मिळाली आहे पण ते महाकवी असून त्यांनी अनेक विषयांवर लिखाण केलं आहे. राष्ट्राविषयीच्या त्यांच्या गाण्यांचा संपूर्ण एक खंड प्रकाशित केला आहे. त्यामध्ये जवळपास 400 राष्ट्राच्या संबंधित गाणी आहेत. चीन आणि पाकिस्तानच्या युद्धानंतर चळवळीतील नेत्यांनी वामनदादांना आग्रह धरल्यानंतर त्यांनी ही गाणी लिहिली."
माधवराव गायकवाड यांनी नोकरी सोडून त्यांच्या पत्नी सुमित्रा यांच्यासोबत वामनदादांचे लेखन आणि इतर साहित्य संकलित केलं आहे. या दोघांनी मिळून आजवर वामनदादांची 2200 गाणी लिपीबद्ध केली. यानंतर प्राध्यापक सागर जाधव यांना ती प्रकाशित करण्यासाठी विनामूल्य देऊ केली.

फोटो स्रोत, Sagar Jadhav
वामनदादांच्या लेखनशैली विषयी बोलताना सागर जाधव म्हणतात, "बाबासाहेबांचे पुस्तक मराठीत वाचून त्या विचारांची तोडमोड न करता वाड्या-वस्त्यांतील माणसांना समजेल अशा शब्दांत वामनदादा गाणी लिहित. प्रॉब्लेम ऑफ रुपी असेल की बुध्द आणि धम्म हे बाबासाहेबांचं लिखाण वामनदादांनी गाण्याच्या रुपात महाराष्ट्रासमोर आणलं."
वामनदादांना एका टप्प्यानंतर ही बाब लक्षात आली की, आपण हे काम महाराष्ट्राच्या बाहेर ही घेऊन जाणं गरजेचं आहे. यातूनच वामनदादांनी हिंदीमध्ये कविता करण्यास सुरुवात केली. प्रकाशित पाच खंडापैकी 2 खंड हे हिंदी कविताचा संग्रह आहे.
या खंडामुळे वामनदादांच्या कविता आता देशभरातील विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात घेतल्या जात आहेत. बिहारचं गांधी सेंट्रल विद्यापीठ, यशवंतराव मुक्त विद्यापीठ यांच्या अभ्यासक्रमात वामनदादांच्या कविता असल्याचं जाधव सांगतात.

फोटो स्रोत, Sagar Jadhav
वामनदादांच्या गाण्याचं संपादन करणं ही अवघड बाब असल्याचं सागर यांनी सांगितलं, "वामनदादांनी कधीच आपल्या लिखाण जतन करुन ठेवलं नाही. त्यामुळे त्यांचं साहित्य हे विखुरलेलं आहे. महाराष्ट्रभर फिरत असताना एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी गाणी लिहणं आणि रात्रीच्या कार्यक्रमात ते गाणं असं सगळं असल्यामुळे ही गाणी मिळवणं आणि संपादित करणं म्हणजे कसरत आहे."
सागर जाधव हे सध्या पुढच्या दोन खंडावरती काम करत आहेत. त्यामध्ये एका खंडात चळवळीतल्या महिलांवर वामनदादांनी लिहिलेल्या गाण्याचा समावेश असेल.
भीमगीते आणि चळवळीचे काय नाते आहे?
भीमगीते आणि चळवळींचा अतूट संबंध आहे. कुठलीही अमाप साधनसंपत्ती नसताना डॉ. आंबेडकरांचा विचार पोहोचवण्याचे कार्य भीमगीतांनी केले आहे.
याबाबत बीबीसी मराठीने एक लेख लिहिला होता. त्यावेळी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. हरिश वानखेडे म्हणाले होते, "महाराष्ट्रातील भीमगीतांना भक्तीचळवळीतील अभंग, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडे आणि सत्यशोधक चळवळीतील जलसाची पार्श्वभूमी आहे."

फोटो स्रोत, Sagar Jadhav
लोकगीते, अभंग, जलसा, जात्यावरच्या ओवी आणि पोवाड्यातून महाराष्ट्रात समाज प्रबोधन होत गेलं. सामान्य लोकांपर्यंत समता, बंधुता, सर्वधर्म समभाव, तर्कशुद्ध विचार करणं हे लोकगीतांद्वारे पोहोचवण्यात आलं.
पण भीमगीतांनी लोकगीतांपेक्षा आपलं वेगळं स्थान निर्माण केल्याचं प्रा. वानखेडे सांगतात.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
वामनदादांचे अखेरचे दिवस...
उतार वयातही वामनदादा गाण्याचे कार्यक्रम करायचे. मूलबाळ नसल्याने त्याच्या शिष्यांनीच त्याचा अखेरच्या काळात संभाळ केला. असेच गंगाखेडचे ज्येष्ठ आंबेडकरी नेते विलास जंगले यांच्याकडे वामनदादा 1997 ते 2004 या काळात वास्तव्यास होते.
वामनदादांविषयी बोलताना विलास जंगले म्हणतात, " शेवटच्या दिवसात वामनदादांची दृष्टी कमी झाली त्यामुळे रात्रीचं बाहेर पडायचे नाहीत. पण अशा परिस्थितीत ही वामनदादांचं लिखाण आणि कार्यक्रम सुरुच होते. पण त्यां गीतांचा संग्रह करण्याची त्यांची सवय नव्हती. लिहून सादर करणं एवढंच."

फोटो स्रोत, Vikas Jangale
विलास जंगले यांनी वामनदादांच्या मृत्यूनंतर आपल्या शेतात वामनदादांचे स्मृतिस्थळ बांधलं आहे. त्याविषयी ते सांगतात.
"त्यांना इथे राहायला आवडायचं, त्यांची इच्छा होती की माझ्या मांडीवर प्राण सोडावे पण त्यांचा मृत्यू नाशिक येथे झाला. त्यांची एक आठवण म्हणून आम्ही गंगाखेड येथे त्यांच स्मृतिस्थळ उभं केलं," असं जंगले सांगतात.
वामनदादांनी त्यांच्या शेवटच्या दिवसात लिहिलं आहे, "राहील विश्व मागे, जाईल मी उद्याला, निर्वाण गौतमाचे, पाहील मी उद्याला" असं गीत वामनदादांनी लिहिलं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा महाराष्ट्रभर पोहचवणारे, महाकवी वामनदादा कर्डक यांचा मृत्यू 15 मे 2004 ला झाला.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











