अमृता शेरगिल: काळाच्या अतिशय पुढे असणारी चित्रकार

फोटो स्रोत, PENGUIN VIKING
- Author, रेहान फझल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अमृता शेरगिलचे एक चित्र सॅफ्रोनर्ट येथे नुकत्याच झालेल्या लिलावात 61.8 कोटी रुपयांना विकले गेले. जगभरातील लिलावात विकली गेलेली ही आजवरची सर्वात महागडी भारतीय कलाकृती आहे.
अवघ्या 10 दिवसांपूर्वी, एस. एच. रझा (गर्भभावना नावाच्या आणि त्यांची 'बिंदू' ही स्वाक्षरी असलेले) यांच्या एका चित्राची 51.7 कोटी रुपयांना विक्री झाली होती.
यापूर्वी 2021 मध्ये व्ही. एस. गायतोंडे यांचे एक चित्र 39.9 कोटी रुपयांना विकले गेले होते.
असं सांगितलं जातं की, अमृता जेव्हा एखाद्या खोलीत जात असे तेव्हा तिथे होणारा संवाद थांबायचा. लोकांचा श्वासोच्छ्वास वाढत असे आणि सर्वजण तिच्याकडे पाहू लागायचे.
अमृता अतिशय सुंदर, सडपातळ आणि नाजूक होती. ती अनेकदा खुलून दिसणा-या हिरव्या रंगाच्या साडीवर लाल रंगाचे चमकदार ब्लाऊज घालत असे. दागिने म्हणून तिच्या कानात केवळ एक तिबेटी झुमके घातलेले असत.
तिच्या काळ्या केसांच्या मधूनच एक भांग पाडलेला असे. केसांमुळे तिचे कान नेहमी झाकलेले असतं. तिच्या कपाळावर एक टिकली असे आणि आणि तिचे डोळे कायम चमकत असत. ती अंतर्मुख होती आणि तिला एकटं राहायला आवडत असे.
यशोधरा दालमिया अमृता शेरगिलच्या चरित्रात लिहितात की, "ती जन्मापासूनच विलक्षण होती. लांब रेशमी केस, टपोरे डोळे आणि तिचे कपाळ वरच्या दिशेने अधिक रुंद होत गेलेले होते. लहानपणी तर तिला रडणंही माहित नव्हतं.
त्या पुढे लिहितात, "तिची धाकटी बहीण इंदिराला आंघोळ करताना पाहून अमृताला सर्वात जास्त आनंद होत असे. वयाच्या 5 व्या वर्षी तिने रंगीत पेन्सिलने चित्र काढायला सुरुवात केली. नवीन भाषा शिकण्यामध्ये कुणीही तिची बरोबरी करू शकत नव्हता. फ्रेंच, इटालियन याशिवाय, इंग्रजी, हंगेरियनशिवाय तिचे हिंदी आणि पंजाबी भाषेवरही प्रभुत्व होते."
चित्रकलेनंतर तिचे दुसरे प्रेम संगीत होते. ती पियानो वाजवायची. तिचा नवरा व्हिक्टर इगान याने एका मुलाखतीत सांगितले होते की, "जेव्हाही तिला बरं वाटत नसेल किंवा उदासीन असेल, तेव्हा ती तासनतास एकटीने पियानो वाजवायची. त्यानंतर तिच्या शरीरात एक प्रकारची ऊर्जा येत असे आणि तिला खूप छान वाटत असे."
अमृताच्या 'यंग गर्ल्स' या चित्राला सुवर्णपदक
अमृता ही श्रीमंत शीख उमराव सिंह आणि हंगेरियन आई अँटोइनेट शेरगिल यांची मुलगी होती. तिचा जन्म 30 जानेवारी 1913 रोजी हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे झालेला.
कलेकडील तिचा कल पाहून तिच्या आई-वडिलांनी तिला पॅरिसला नेले जेणेकरून तिने तिथे चित्रकलेचे औपचारिक शिक्षण घ्यावे. अमृता पॅरिसला पोहोचली तेव्हा ती अवघी 16 वर्षांची होती.

फोटो स्रोत, PENGUIN VIKING
पुढील पाच वर्षे त्यांनी पॅरिसमध्ये वास्तव्य केले. त्यावेळी व्हिन्सेंट व्हॅन गॉग आणि पॉल गॉग हे तिचे आवडते चित्रकार होते. पॅरिसमध्येच ठेवलेल्या मोनालिसाच्या चित्राने तिला खूप प्रभावित केले होते.
वयाच्या 17 व्या वर्षी तिने स्वतःचेच एक चित्र काढले.
तिला स्वतःचे चित्र काढण्याची खूप आवड होती. ती अनेकदा तिच्या सौंदर्याबद्दल जागरूक राहत असे.
1932 मध्ये तिच्या ‘यंग गर्ल्स’ या चित्राला ग्रँड सलूनचे सुवर्णपदक मिळाले. या चित्रासाठी तिची बहीण इंदिरा आणि तिचा मित्र डेनिस प्रूटो यांनी मॉडेलिंग केले होते.
अमृता एक किस्सा सांगायची, "श्रीलंकेचा एक ज्युरी सदस्य मला पाहून म्हणाला की तू तर एक लहान मुलगी आहेस. तू हे चित्र काढणं कसं शक्य आहे? आम्हाला वाटलं की हे चित्र किमान 30 वर्षांच्या व्यक्तिने काढलं असेल. तु तर पाळण्यातच चित्रकला शिकली आहेस, असं वाटतंय."
युसूफ अली खानसोबतचा साखरपुडा मोडला
अमृताच्या आईची इच्छा होती की तिने एका श्रीमंत माणसाशी लग्न करावं. त्या दिवसांत उत्तर प्रदेशातील युसुफ अली खान नावाचा एक उच्चभ्रू पॅरिसमध्ये राहत होते. दिसायला देखणे होते. त्यांचे वडील राजा नवाब अली हे सीतापूरचे तालुकदार होते.
लखनौमध्ये त्यांनी मॅरिस कॉलेज ऑफ हिंदुस्तानी म्युझिकची स्थापना केली होती ज्याचे नंतर भातखंडे कॉलेज असे नामकरम झाले. आईच्या प्रोत्साहनामुळे अमृता युसूफच्या संपर्कात आली आणि दोघांचा साखरपुडाही झाला. पण दोघांच्या स्वभावात खूप फरक होता.

फोटो स्रोत, PENGUIN VIKING
आपल्या आईला लिहिलेल्या पत्रात अमृताने लिहिले होते की, "युसूफ माझ्याशी एकनिष्ठ नाही. व्हिक्टरची बहीण वॉयलासोबत त्याचे प्रेमप्रकरण सुरू आहे, एवढंच नाही तर रस्त्यावरून चालणाऱ्या प्रत्येक सुंदर मुलीवर त्याची नजर असते."
अमृताने युसूफसोबतचा साखरपुडा मोडला. अमृताची भीती खरी ठरली. युसूफने नंतर तीन लग्न केली. पहिली, रुथ या इंग्रज मुलीसोबत, जिला त्यांनी घटस्फोट दिला.
त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नवाब मिर्झा यांची मुलगी फखरुन्निसा राणी यांच्याशी विवाह केला. तिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी एल्सा विल्यम्स या अँग्लो-इंडियन मुलीशी लग्न केले.
अमृताचे चरित्रकार एन इक्बाल सिंह तिच्या चरित्रात लिहितात, "युसूफ प्रकरणाचा परिणाम असा झाला की तिने पुरुषांसोबतच्या आपल्या नात्यांना गांभीर्याने घेणे सोडून दिले. ती बेफिकीर झाली आणि अनेक पुरुषांशी संबंध ठेवू लागली."
"कोणत्याही एका व्यक्तीशी तिला जवळीक वाटणं कमी झालं. मेरी लुईस चॅसनी या एकाच महिलेशी तिचं घनिष्ट संबंध जुळले. शेवटपर्यंत तिने तिचं नाव मोठ्या प्रेमानं घेतलं आणि शिमल्यातील स्टुडिओ व लाहोरमधील घरातील भिंतींवर तिचं चित्र लावलेलं."
अनेक महिला आणि पुरुषांसोबत प्रेमसंबंध
अमृता नंतर अनेक लोकांच्या प्रेमात पडली, ज्यात महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश होता. त्यापैकी एक होती एडिथ लँग जी पॅरिसमध्ये पियानोचे वर्ग घेत असे.
ती अमृतापेक्षा वयाने खूप मोठी होती. त्यावेळी ती 27-28 वर्षांची असेल. तिला अमृता प्रचंड आवडायची.

फोटो स्रोत, PENGUIN VIKING
इक्बाल सिंह लिहितात, "नंतर या समलैंगिक संबधांमुळे अमृताला खूप अपमान सहन करावा लागला होता. एकदा ती एडिथसोबत शय्यासोबत करत असताना मेरी लुईस अचानक दार न ठोठावता तिच्या खोलीत शिरली आणि तिला प्रणय करताना रंगेहाथ पकडलं होतं."
"अमृता त्यावेळी 21 वर्षांची होती. यानंतर बोरिस तस्लित्स्की तिच्या संपर्कात आले. त्यांनी सार्वजनिकरित्या जाहीर करून टाकले की ते अमृताच्या प्रेमात आहेत. पण अमृताच्या आईला हे नाते पसंत नव्हते."
बोरिस तस्लित्स्कीने नंतर यशोधरा दामियाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, "मी तिच्या प्रेमात पडलो होतो. काही दिवस तिने प्रतिसाद दिला. मग एके दिवशी तिने मला सांगितलं की ती हंगेरीमधील तिचा मामे भाऊ इगन व्हिक्टरच्या प्रेमात पडली आहे आणि तिला त्याच्याशी लग्न करायचंय."
मामाचा मुलगा व्हिक्टर इगनसोबत लग्न
लग्नापूर्वी अमृताने इगनला अनेक पत्रे लिहिली होती. ही पत्रे अनेकदा आकाशी निळ्या कागदावर काळ्या शाईने छोट्या अक्षरात लिहिली जात असत. ती इतर कुणालाही वाचता येत नसत.
व्हिक्टर आणि अमृताने लग्नापूर्वी काही विचित्र करार केले होते. पहिला करार असा होता की ते मुलांना जन्म देणार नाहीत. ते मामेभाऊ-बहिण होते म्हणून नाही तर त्यांना मुलंच होऊ द्यायची नव्हती.

फोटो स्रोत, PENGUIN VIKING
दुसरा करार असा होता की अमृताला इतर पुरुषांसोबत संबंध ठेवण्याचे स्वातंत्र्य असेल.
व्हिक्टरला हे अजिबात विचित्र वाटले नाही कारण तोपर्यंत त्याला समजले होते की लैंगिक विविधता अमृताच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनली आहे.
16 जुलै 1938 रोजी बुडापेस्ट येथे कोणत्याही धुमधडाक्याशिवाय त्यांचे लग्न झाले.
व्हिक्टरने नंतर कबूल केले की त्यांच्या लग्नाच्या पहिल्या काही वर्षांत अमृताने त्याला सोडून दुसरीकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली नव्हती.
जेव्हा व्हिक्टरने गोरखपूरजवळच्या सरायाच्या साखर कारखान्यात काम सुरू केलं तेव्हा त्याला 160 रूपये पगार मिळायचा.
याशिवाय अमृताला तिच्या कुटुंबाकडून 100 रुपये मिळायचे. महागाई नसतानाही त्यांना एवढा पैसा पुरेसा पडत नसे.
अमृताने तिच्या आईला लिहिलेल्या पत्रात लिहिले होते की, "इतक्या कमी पैशात घर चालवणे कठीण होत आहे. आमच्याकडे भांडी, ताट, चहाचे कप आणि पडदे घेण्यासाठी पैसे नाहीएत."
लैंगिक स्वातंत्र्याची समर्थक
कार्ल खंडालवाला, इक़बाल सिंह, आयसीएस अधिकारी बद्रुद्दीन तैयबजी, ऑल इंडिया रेडिओचे संचालक रशीद अहमद आणि स्टेटसमनचे वार्ताहर माल्कम मगरिज, अशी अमृताच्या प्रेमवीरांची एक लांबलचक होती.
रशीद अहमद नंतर पाकिस्तानात गेले जिथे ते पाकिस्तानचे महासंचालक म्हणून निवृत्त झाले.

फोटो स्रोत, PENGUIN VIKING
रशीद अहमद यांनी तिच्याबद्दल सांगितले होते की, "अमृताने प्रत्येक गोष्टीचे बारकाईने निरीक्षण करत असे. तिला सर्व काही अनुभवण्याची आणि जाणून घेण्याची जिद्द होती. ती सामाजिक बंधने आणि निर्बंधांपासून पूर्णपणे मुक्त होती."
मुख्य प्रवाहापेक्षा थोडे वेगळे असलेल्या पुरुषांकडे ती आकर्षित होत असे.
इक्बाल सिंह लिहितात, "अमृता यांची लैंगिक नैतिकतेची व्याख्या सामान्य लोकांपेक्षा खूपच वेगळी होती. तिने सांगितले होते की, ती एकदा पॅरिसच्या एका कुप्रसिद्ध भागात एकटी उभी होती. लोक तिच्याशी कसे वागतात हे तिला बघायचे होते."
"तिने मला सांगितले की माझा कोणासोबत जाण्याचा कोणताही हेतू नाही. मला पाहायचे होते की लोक माझ्यासोबत वेळ घालवायला किती इच्छुक आहेत. पण थोड्या वेळाने मला माझ्याच हिमतीचं कौतुक वाटलं आणि मी तिथून परत आले."
खुशवंत सिंग यांच्या पत्नीची खिल्ली उडवली
अमृता शेरगिलचे खुशवंत सिंग यांच्याबरोबरही संबंध होते. खुशवंत सिंग त्यांच्या आत्मचरित्रात लिहितात, "ती सुंदर होती, पण सौंदर्याप्रती तिची सजगता अधिक लक्षवेधी होती. तिची ही सतर्कता आणि तारुण्याचा अभिमान तिला परंपरांपासून दूर राहून आयुष्य जगण्यास प्रवृत्त करत असे."
‘वुमन अँड मेन इन माय लाइफ’ या पुस्तकात खुशवंत सिंग यांनी अमृताशी संबंधित एक प्रसंग कथन केला आहे.

फोटो स्रोत, UBS PD
ते लिहितात, "एकदा दुपारी मी जेवायला घरी आलो तेव्हा मला माझ्या डायनिंग टेबलवर बिअरचा एक जग आणि खुर्चीवर एक पिशवी ठेवलेली दिसली. खोलीत फ्रेंच परफ्यूमचा सुगंध पसरला होता. माझ्या स्वयंपाक्याने मला सांगितले की एक मॅडम आल्या आहेत."
"तिने घराची अशी पाहणी केली जणू ती ते तिच्या मालकीचे आहे. ती बाथरुममध्ये गेली होती. ती अमृता शेरगील होती. ती मला जवळचे धोबी आणि स्वयंपाक्यांबद्दल विचारणा करायला आली होती. तिने माझ्या खोलीत लटकवलेली काही चित्रांकडे असं काही बघितलं की तिला म्हणायचं होतं की, हे काय लावलं आहे?"
"मी नम्रपणे म्हणालो की हे माझ्या पत्नीने बनवले आहे. ती अजूनही शिकतेय. अमृताचे उत्तर होते - हे स्पष्टपणे दिसून येतंय."
त्यांची दुसरी बैठक शिमल्यात झाली. खुशवंत यांनी चमनलाल, त्यांची पत्नी हेलन आणि अमृता शेरगिल यांना जेवायला बोलावले होते.
खुशवंत लिहितात, "माझा सात महिन्यांचा मुलगा राहुल नुकताच चालायला शिकत होता. तो खूप गोंडस मुलगा होता. त्याचे केस कुरळे तपकिरी रंगाचे होते. प्रत्येकजण त्याची स्तुती करत होता. तेव्हा अमृताने त्याच्याकडे एक नजर टाकली आणि म्हणाली, किती घाणेरडा मुलगा आहे."
"ती जेव्हा हे बोलली तेव्हा संपूर्ण वातावरणात शांतता पसरली. ते सर्व निघून गेल्यावर माझी पत्नी म्हणाली की मी या महिलेला माझ्या घरी कधीही बोलवणार नाही. नंतर ही बातमी अमृतापर्यंत पोहोचली की माझी पत्नी तिच्याबद्दल काय बोलली होती.
"तिने जाहीर केले की मी त्या बाईला असा धडा शिकवीन की ती कधीच विसरणार नाही. मी तिच्या नवऱ्याकडे वाईट नजरेने पाहीन मी त्या दिवसाची आतुरतेने वाट बघू लागलो पण ही संधी कधीच आली नाही. काही दिवसातच तिचे निधन झाले."
अमृता शेरगिलची जवाहरलाल नेहरूंशी जवळीक
जवाहरलाल नेहरूंसोबतही अमृता शेरगिलच्या अनेक भेटी झालेल्या. पण दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचा कोणताही पुरावा नाही.
1937 मध्ये, जेव्हा अमृताच्या चित्रांचे दिल्लीतील इम्पीरियल हॉटेलमध्ये प्रदर्शन होते, तेव्हा जवाहरलाल नेहरू प्रदर्शनाला भेट दिली होती.

फोटो स्रोत, PENGUIN VIKING
अमृताने कार्लला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, "मला वाटतं की नेहरूंनाही मी तितकीच आवडले होते जितके ते मला आवडले होते."
नेहरू आणि अमृता यांच्यात खूप पत्रव्यवहार व्हायचा. त्या पत्रांचा अभ्यास करून त्यांच्यातील नात्याचा अंदाज बांधता आला असता, पण अमृताच्या आईने अमृताला मिळालेली अनेक पत्रे जाळून टाकली होती, त्यात नेहरुंच्या पत्रांचाही समावेश होता.
एकदा नेहरू गोरखपूरच्या भेटीत अमृता आणि तिचा पती व्हिक्टर यांना भेटायला गेले होते.
त्यावेळचे एका छायाचित्र आहे ज्यात नेहरूंनी काळा शर्ट आणि खाकी चड्डी घातली आहे. त्यांच्या डोक्यावर गांधी टोपी आणि पायात पेशावरी चप्पल आहे.
अमृताच्या मृत्यूवर नेहरूंनी अमृताच्या आईला एक हृदयस्पर्शी पत्र लिहिलं होतं की, "गेल्या पाच वर्षांत मी अमृताला फक्त पाच-सहा वेळा भेटलोय, पण पहिल्याच भेटीत मला तिची प्रतिभा आणि सौंदर्याची खात्री पटली होती."
"मला असे वाटले होते की ती भारतासाठी खूप मौल्यवान प्रतिभा आहे. ती प्रतिभा परिपक्व अशी आशा बाळगून मी होतो. अमृताच्या संपर्कात आलेले अनेक लोक तुमच्या दुःखात सहभागी आहेत. तिच्या आठवणी हा माझा वारसा आहे."
करोडोंना विकली जातात चित्रे
अमृताने आपल्या कारकिर्दीत जवळपास 143 चित्रे काढली. आपले मित्र आणि नातेवाईकांना भेट दिलेल्या चित्रांचा त्यात समावेश नव्हता.
तिची अनेक चित्रे त्यांच्या बहिणीची मुले विवान आणि नवीना सुंदरम यांच्याकडे आहेत. तिचे पती, व्हिक्टर इगन यांनी त्यांचे स्वत:चे चित्र असलेलं एक चित्र वगळता इतर सर्व चित्रे नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्सला दान केली होती.

फोटो स्रोत, PENGUIN VIKING
त्यांची अनेक चित्रे व्यवस्थित न ठेवल्याने खराब झाली. 1998 मध्ये, त्यांची खराब झालेली चित्रे पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यशोधरा दालमिया लिहितात, "अमृताला दिवसा नैसर्गिक प्रकाशात रंगवायला आवडत असे. तिला कृत्रिम प्रकाशात रंगवायला आवडत नसे. चित्र काढताना ती सैल पोशाष घालायची आणि तिचे केस मागच्या बाजूला घट्ट बांधायची."
"चित्र काढताना तिचा हात झपाझप चालत असे. चित्र पूर्ण झाल्यावर ती ते उलटे करून पाहत असे. तिला चित्र आवडले नाही तर ते तिच्या पॅलेटच्या चाकूने फाडून फेकून द्यायची. असे ती एकदा नाही तर अनेकदा करत असे"
"एकदा जेव्हा महात्मा गांधी केप कोमोरिनला गेले होते, तेव्हा तिने एका प्रार्थना सभेला संबोधित करताना त्यांचे चित्र काढले होते. त्यांना भेटण्यासाठी तिने कोणताही प्रयत्न केला नाही कारण त्यांना भेटण्यासाठी अनेक लोक आले होते."
‘यंग गर्ल्स’, ‘जिप्सी गर्ल’, ‘यंग मॅन विथ फोर ऍपल्स’, ग्रुप ऑफ थ्री गर्ल्स, ‘ब्राइड्स टॉयलेट’, ‘सेलिब्रेट्स’ आणि ‘कॅमिल’ ही तिची प्रमुख चित्रे आहेत.
पन्नासच्या दशकात प्रसिद्ध लेखक आणि प्रसारक अशफाक अहमद लाहोरच्या जुन्या बाजारात फिरत होते.
इक्बाल सिंह लिहितात, "एका भंगाराच्या दुकानात त्यांनी अमृता शेरगिलचे एक चित्र पाहिले. त्या फ्रेम केलेल्या चित्रामध्ये एक महिला बसली होती. भंगार विक्रेत्याने अश्फाकला चित्र फेकून देण्यास आणि फ्रेम घरी घेऊन जाण्यास सांगितले."
"अश्फाकने दुकानदाराला फ्रेम दिली आणि अमृता शेरगिलचे पेंटिंग घरी नेले. काही दिवसांनी त्यांची रावळपिंडीत आर्ट गॅलरी चालवणाऱ्या जुबैदा आगासोबत भेट झाली."
"त्यांनी ते चित्र त्याच्या गॅलरीत ठेवायला सांगितले. तिथून ते चित्र इस्लामाबादच्या नॅशनल आर्ट गॅलरीत पोहोचले."
त्यांची चित्रे कलाबाजारात सहसा विकली जात नाहीत पण जेव्हा ती विकली जातात तेव्हा त्यांची किंमत कोटींच्या घरात जाते.
ही शोकांतिका आहे की अमृताला तिच्या हयातीत नेहमी पैशाची कमतरता भासली पण तिच्या मृत्यूनंतर तिची चित्रे करोडो रुपयांना विकली गेली.
जुलाबाची लागण
आपल्या शेवटच्या दिवसांत अमृता शेरगिल लाहोरला गेली होती. तिथे तिचा नवरा व्हिक्टर इगनने क्लिनिक उघडले. अमृताचा मित्र इक्बाल सिंह याला कुठूनतरी तिच्या आजाराची माहिती मिळाली.

फोटो स्रोत, PENGUIN VIKING
इक्बाल सिंह अमृताच्या चरित्रात लिहितात, "जेव्हा मी 3 डिसेंबरला तिला भेटायला गेलो होतो, तेव्हा संपूर्ण घरात एक विचित्र शांतता होती. जेव्हा मी बेडरूमचा दरवाजा ठोठावला तेव्हा एका अतिशय कमकुवत आवाजाने मला आत यायला सांगितले."
"मी जेव्हा अमृताकडे पोहोचलो तेव्हा मला दिसले की तिचा चेहरा पिवळा पडला होता. मी तिला विचारले, अमृता, काय प्रकरण आहे? तिने सांगितले की मी लेडी कादिरच्या पार्टीत भजी खाल्ली होती, त्यामुळे मला एक विचित्र प्रकारचे जुलाब होत आहेत."
"ती दर काही मिनिटांनी शौचालयात जात होती, त्यामुळे तिच्या शरीरातून सर्व पाणी निघून जात होते. त्यादिवशी मला अजिबात असे वाटले नाही की ती इतकी गंभीररित्या आजारी आहे आणि अगदी काही दिवसांची पाहुणी आहे. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मी तिला जिवंत पाहण्याची ही शेवटची होती."
वयाच्या 28 व्या वर्षी डोळे कायमचे मिटले
दोन दिवसांनी, 5 डिसेंबरला इक्बाल पुन्हा अमृताला भेटायला गेला. त्यावेळी संध्याकाळचे साडेपाच-सहा वाजले असतील.
इक्बाल लिहितात, "मी त्यांच्या घरात प्रवेश करताच, मी व्हिक्टरला वेगाने पायऱ्या उतरताना पाहिले. मी त्याला विचारले की अमरी कशी आहे. त्याने उत्तर दिले, मी तिला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मी म्हणालो, तुला काय म्हणायचे आहे? तो म्हणाला, "ती गंभीर आजारी आहे. मला वाटत नाही की ती वाचेल."

फोटो स्रोत, PENGUIN VIKING
"मी त्याला विचारले की मी तिला पाहू शकेन का? त्याने नाही म्हटले कारण ती कोमात गेली होती."
अमृताचा दुसरा मित्र चमनलाल याने ताबडतोब लाहोरचे सर्वोत्कृष्ट डॉक्टर सिकरी आणि जर्मन डॉक्टर कॅलिश्च यांना बोलावले. तिला पाहिल्यानंतर दोघांनीही उशीर झाल्याचे सांगितले.
तिला पेरिटोनिटिसचा आजार झाला असून तिच्या आतड्यांचे नुकसान झाले आहे.
हे सर्वजण रात्री 11 वाजेपर्यंत अमृताच्या घरी थांबले. ते गेल्यानंतर अमृताचा चुलत भाऊ चरणजीत सिंग मान यांनी लाहोरचे आणखी एक प्रसिद्ध डॉक्टर रघुबीर सिंग यांना बोलावलं.
पण त्यांनी अमृताला तपासेपर्यंत अमृताने या जगाचा निरोप घेतला होता.
दुसऱ्या दिवशी अमृताचे वडील उमराव सिंह शिमल्याहून लाहोरला पोहोचले.
तिचे पार्थिव काश्मीरी शालीमध्ये गुंडाळून रावी नदीच्या काठावरील स्मशानभूमीत नेण्यात आले.
वडील उमराव सिंह यांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले. त्यावेळी तिचे वय अवघे 28 वर्षे होते.
मृत्यूचे कारण गर्भपात
अमृताच्या मृत्यूचे कारण जुलाब नव्हते असं नंतर अनेकांनी सांगितलं.
खुशवंत सिंग यांनी नंतर लिहिले, "डॉक्टर रघुबीर सिंग यांनी मला सांगितले की अमृता गर्भवती झाली होती आणि तिचा नवरा तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न करत होता. शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाही आणि अमृताला रक्तस्त्राव सुरू झाला."

फोटो स्रोत, PENGUIN VIKING
"शेवटी व्हिक्टरने डॉ. रघुबीर सिंग यांना अमृताला रक्त चढवायला सांगितले. डॉ. सिंग म्हणाले की, तिचा रक्तगट जाणून घेतल्याशिवाय ते हे करू शकत नाहीत. दोन डॉक्टरांमध्ये हे संभाषण सुरू असतानाच अमृताचा मृत्यू झाला.."
अमृताच्या कुटुंबातील बहुतेक लोकांचे असे म्हणणे होते की व्हिक्टरनेच अमृतावर शस्त्रक्रिया केली होती.
इंदिरा गांधींचे चुलत भाऊ बी के नेहरू यांच्या हंगेरियन पत्नी फौरी नेहरू, ज्या अमृताच्या आईच्या अगदी जवळ होत्या, त्यांचा असा विश्वास होता की व्हिक्टरने केलेले ऑपरेशन यशस्वी झाले नाही कारण ते प्रशिक्षित सर्जन नव्हते.
आपली बदनामी होईल या भीतीने त्यांनी लगेच इतर डॉक्टरांना बोलावले नाही. तसंही त्यावेळी भारतात गर्भपात बेकायदेशीर होता.
31 जुलै 1948 रोजी अमृताची आई मेरी अँटोइनेट यांनी उमराव सिंह यांच्या बंदुकीने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती.
अमृताचे वडील उमराव सिंह यांचे 1954 मध्ये वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले.
अमृताची धाकटी बहीण इंदिरा कसौली येथे राहायला गेली होती जिथे 1974 मध्ये तिचे निधन झाले.
अमृताच्या मृत्यूनंतर 13 वर्षांनी व्हिक्टरने नीना हैदरीसोबत दुसरे लग्न केले.
व्हिक्टर इगन यांचेही 1997 मध्ये वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले.
हेही नक्की वाचा
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








