वासुदेव गायतोंडे : भारतीय कला नव्या उंचीवर नेणारा एकांतप्रिय चित्रकार, त्यांच्या चित्रांना कोट्यवधींची बोली का लागते?

वासुदेव गायतोंडे तरुणपणीचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो

फोटो स्रोत, CHINHA/Kishori DAS

फोटो कॅप्शन, वासुदेव गायतोंडेंचा तरुणपणीचा फोटो, बहीण किशोरी दास यांच्या संग्रहातून
    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

काही कलाकार जीवंतपणीच दंतकथा बनतात. मृत्यूनंतरही त्यांच्याभोवतीचं वलय कमी होत नाही आणि पुढच्या कित्येक पिढ्यांना ते प्रेरणा देत राहतात.

चित्रकार वासुदेव गायतोंडे हे असेच एक असामान्य प्रतिभावंत होते. त्यांचा समावेश भारताच्या सर्वोत्तम चित्रकारांमध्ये केला जातो.

त्यांच्या चित्रांमधला प्रकाश आणि छायेचा खेळ, चित्राची घडण, रंग, कॅनव्हासवर रंग थापण्याची नि काढण्याची पद्धत, हे सगळं आजही थक्क करणारं आहे. अमूर्त शैलीतली ही चित्र पाहणाऱ्याला ध्यानमग्न करतात, मनाला शांततेची जाणीव करून देतात.

2 नोव्हेंबर 2024 रोजी गायतोंडेंची जन्मशताब्दी आहे. त्यांच्या मृत्यूलाही आता जवळपास पाव शतक होत आलंय. पण अनेकांच्या मनावरचं गायतोंडेंचं गारूड कमी न होता उलट वाढताना दिसतं.

गायतोंडेंनी स्वतः जीवंतपणी कधी पैसा किंवा प्रसिद्धीचा हव्यास ठेवला नाही. पण आता त्यांची चित्र जेव्हा जेव्हा लिलावात येतात, तेव्हा तेव्हा नवे विक्रम रचतात.

2022 साली गायतोंडेंचं एक चित्र 42 कोटी रुपयांना (जवळपास पाच लाख अमेरिकन डॉलर्स) विकलं गेलं.

ही त्यावेळी कोणत्याही भारतीय चित्रासाठी लागलेली सर्वाधिक बोली ठरली होती. ते तैलचित्र पहिल्यांदाच विक्रीसाठी आलं होतं. त्यातल्या निळसर छटा पाहणाऱ्याला अफाट पसरलेल्या समुद्राची किंवा आकाशाची आठवण करून देतात.

पुढच्याच वर्षी म्हणजे 2023 मध्ये गायतोंडेंचं आणखी एक चित्र 47.5 कोटी रुपयांना विकलं गेलं.

उभ्या आकारातल्या त्या चित्रात कॅनव्हासवर पिवळसर रंगछटा पसरल्या आहेत आणि त्यावर मातकट रंगातल्या आकृती आहेत. एखाद्या अगम्य भाषेतील लेखनासारख्या त्या भासतात.

काही खासगी संग्रहातील त्यांच्या चित्रांची लिलावाच्या बाजारातली किंमत 60 कोटी रुपयांपेक्षाही जास्त ठरेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

गायतोंडेंची चित्रं एवढी खास का ठरतात? याचं उत्तर त्यांच्या कामात आणि त्यांच्या व्यक्तीमत्वात दडलं आहे.

निळ्या रंगाच्या छंटांमधलं हे चित्र मधोमध उभ्या आणि आडव्या रेषांनी विभागलं गेलं आहे. सतत बदलत जाणाऱ्या जलाशयातल्या पाण्यावर पडणाऱ्या उजेड आणि अंधाराचं प्रतिबिंब त्यात दिसतं.

फोटो स्रोत, Saffronart

फोटो कॅप्शन, वासुदेव गायतोंडेंनी 1961 साली काढलेलं हे अनाम चित्र 2021 साली सॅफ्रनआर्टच्या लिलावात 39 कोटी रुपयांना विकलं गेलं

गायतोंडेंनी भारंभार चित्र काढली नाहीत. साधारण 50 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी जेमतेम 400 च्या आसपास चित्रं काढली असावीत. पण ती एवढी दुर्मिळ असल्यानंच आज अतुलनीय ठरली आहेत.

दुसरं म्हणजे अनेकांना गायतोंडे काहीसे गूढ वाटतात. ते आयुष्यातला बराच काळ एकांतात राहिले आणि जपानच्या बौद्ध झेन तत्त्वज्ञानाचा त्यांच्यावर प्रभाव होता.

त्यांच्या चित्रांमध्येही त्या संन्यस्त, ध्यानस्थ वृत्तीचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. प्रितीश नंदी यांनी 1991 साली 'इलस्ट्रेटेड विकली'साठी घेतलेल्या मुलाखतीत गायतोंडेंनी स्वतःच्या चित्रांविषयी सांगितलं होतं.

“सगळं काही शांततेपासून, शून्यातून सुरू होतं. कॅनव्हासची शांतता, पेंटिंग नाईफची शांतता.. चित्रकार ही सगळी शांतता शोषून घेतो आणि चित्राची सुरुवात करतो. तुमचं सगळं शरीर ब्रश, नाईफ, कॅनव्हासशी समरस होऊन ही शांतता शोषून घेतं आणि त्यातून सृजनाची निर्मती होते,” असं ते म्हणाले होते.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

गायतोंडे हे खऱ्या अर्थानं भारतात आधुनिक कला आणि अमूर्तवाद यांचा पाया घालणाऱ्या चित्रकारांच्या पिढीचे प्रणेते होते.

विसाव्या शतकाच्या मध्यावर, या चित्रकारांनी एक प्रकारे कलेच्या क्षेत्रात बंड केलं, भारतीय कलेला नव्या उंचीवर नेलं आणि तिला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली.

मुंबईच्या गिरगावातली सुरुवातीची वर्ष

वासुदेव संतू गायतोंडेंचा जन्म 2 नोव्हेंबर 1924 रोजी नागपूरमध्ये झाला. त्यांचे वडील संतू गायतोंडे तेव्हा नागपुरात काम करायचे.

गायतोंडे कुटुंब मूळचं गोव्यातलं पण पुढे ते मुंबईत येऊन स्थायिक झालं. मुंबईच्या गिरगावात कुडाळदेशकर वाडीतल्या चाळीत अडीच खोल्यांच्या छोट्या घरात ते राहायचे.

घरात वडिलांच्या कडक शिस्तीचा धाक होता आणि वासुदेवला लहानपणापासूनच चित्रांची, रंगांची आवड होती, असं त्यांची बहीण किशोरी दास यांनी ‘गायतोंडे’ या ग्रंथात लिहून ठेवलं आहे.

साहजिकच रंगांची आवड असलेल्या या मुलानं चित्रकार व्हायचं ठरवलं आणि शालेय शिक्षण झाल्यावर मुंबईच्या जेजे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घ्यायचा निर्णय घेतला.

वासुदेव गायतोंडे

फोटो स्रोत, CHINHA

फोटो कॅप्शन, वासुदेव गायतोंडे

जेजे स्कूल ऑफ आर्टस हे तेव्हा मुंबईतलं कलेचं माहेरघर होतं. पण चित्रकला हे काही चांगलं करिअर समजलं जात नसे.

त्यामुळे वडिलांनी विरोध केला. पण वासुदेव ठाम होता आणि त्यानंतर त्यानं आईवडिलांकडून एकही पैसा घेतला नाही, असं किशोरी दास लिहितात.

1948 साली गायतोंडेंनी जेजेमधलं शिक्षण पूर्ण केलं आणि काही काळ तिथेच नोकरीही केली.

हा तो काळ होता, जेव्हा भारताला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं.

भारतीय कलेतलं नवं युग

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

वासुदेव गायतोंडे त्यानंतर ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप’ या कलाकारांच्या समुहात सहभागी झाले. या ग्रुपमध्ये गायतोंडेंसोबतच एम एफ हुसेन, एस एच रझा, एफ एन सूझा यांचा तसंच भानू अथय्यांसारख्या कलाकारांचा समावेश होता. या प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्सनीच भारतात आधुनिक कलेचा पाया घातला.

आधुनिकतावाद म्हणजे साधारण विसाव्या शतकाच्या आसपासच्या काळातली साहित्य, संगीत आणि कलेतली एक चळवळ आहे, ज्यात जुन्या प्रस्थापित संकल्पना झुगारत नव्या विचारांना लेखक, कलाकारांनी खतपाणी घातलं.

तोवर भारतीय चित्रकला म्हटलं की अजिंठ्याची भित्तिचित्रं, पहाडी आणि मुघल मिनिएचर्स, बंगालच्या कलाकारांची किंवा राजा रवी वर्म्याची चित्र नजरेसमोर यायची. ही सगळी वास्तववादी शैलीतली चित्रं होती, म्हणजे जे दिसतंय ते तसंच्या तसं उतरवण्यावर चित्रकारांचा भर होता.

“गायतोंडेंनीही सुरुवातीला त्याच पद्धतीचं काम केलं, पण लवकरच त्यांनी वेगळा मार्ग निवडला,” असं सतीश नाईक सांगतात. ते चित्रकार, लेखक असून ‘गायतोंडे’ या ग्रंथाचे प्रकाशकही आहेत.

साचेबद्धता आणि आकार (Form) झुगारून निराकार (Formless) कडे वळणारे गायतोंडे पहिले भारतीय चित्रकार होते.

नाईक सांगतात, “गायतोंडेंनी पहिलं बंड केलं. मला जर चित्र काढायची असतील, तर ती मी माझ्या पद्धतीनं काढीन, मला कोणी दाखवलंय, सांगितलंय म्हणून किंवा दिसतंय तसं काढणं मला मंजूर नाही, असं ते म्हणायचे.”

प्रभाकर कोलते यांनी वासुदेव गायतोंडे यांच्या चित्र काढण्याच्या पद्धतीवर केलेलं भाष्य

अशाच नव्या विचारांच्या कलाकारांचं मुंबईतलं आणखी एक केंद्र होतं, ते म्हणजे भुलाबाई देसाई इन्स्टिट्यूट. हुसेनसारखे चित्रकार, सितार वादक रवीशंकर, नाट्य दिग्दर्शक इब्राहीम अलकाझी तिथे काम करत.

या संस्थेत स्टुडियोंची रचना अशी होती की, कुणीही कधीही कुणाच्याही स्टुडियोत जाऊ शकत असे, त्यातून विचारांची देवाणघेवाण होत असे. गायतोंडे अनेकदा चित्र काढण्यासाठी इथे यायचे.

ते तिथल्या हिरवळीवरच्या एका बाकावर अनेक तास बसून चिंतन करत. ते अनेकदा समुद्राकडे पाहात राहायचे, भरती-ओहोटीचं रूप, चमकणारं पाणी, आकाश निरखत राहायचे. पुढच्या काळात त्यांच्या काही चित्रांमध्ये याचं प्रतिबिंब पडलेलं दिसलं.

आध्यात्म आणि झेन तत्त्वज्ञानाचा प्रभाव

गायतोंडेंचा आध्यात्माकडे कल होता. निसर्गदत्त महाराज, जे कृष्णमूर्ती, रमण महर्षि अशांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांचं वाचन भरपूर होतं आणि वाचनातूनच त्यांची 1959 साली जपानच्या झेन तत्त्वज्ञानाशी ओळख झाली होती.

त्यानंतर खऱ्या अर्थानं गायतोंडेंची वेगळी वाटचाल सुरू झाली. ते अमूर्त कलेकडं वळले – पण अमूर्त या शब्दाऐवजी ते Non-Objective (वस्तूनिष्ठ नसलेले) असा शब्दप्रयोग वापरायचे.

1963 साली न्यूयॉर्कच्या म्युझियम ऑफ मॉडर्न आर्टनं विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना गायतोंडेंनी झेन तत्त्वज्ञानाविषयी लिहिलं आहे. ते म्हणतात, झेननं “मला निसर्ग समजण्यासाठी मदत केली. माझी चित्रं इतर काही नाही, तर निसर्गाचं प्रतिबिंब आहेत. मला जे सांगायचं आहे ते कमीत कमी शब्दांत सांगायचं आहे. थेट आणि साधं-सहज सांगण्यावर माझा भर असतो.”

त्यांच्या चित्रांचा वेगळेपणा ओळखणाऱ्या आंतरराष्ट्रीय कलाकारांमध्ये अमेरिकेचे अमूर्त चित्रकार मॉरिस ग्रेव्ज यांचा समावेश आहे.

वासुदेव गायतोंडेंचं 1963 सालचं एक चित्र, बॉनहॅम्स या ऑक्शन हाऊसच्या 2014 साली झालेल्या प्रदर्शनादरम्यानचा फोटो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वासुदेव गायतोंडेंचं 1963 सालचं एक चित्र, बॉनहॅम्स या ऑक्शन हाऊसच्या 2014 साली झालेल्या प्रदर्शनादरम्यानचा फोटो.

ग्रेव्ज 1963 साली भारत भेटीवर आले होते आणि पंतप्रधान पंडित नेहरुंना भेटले. दिल्लीत त्यांना पुपुल जयकर यांनी आग्रह केला की, तुम्ही मुंबईला जा आणि वासुदेव गायतोंडेंची चित्रं पाहा. त्यामुळे ते मुंबईत आले आणि गायतोंडेंना भेटले.

गायतोंडेंची चित्र पाहून ग्रेव्ज एवढे भारावून गेले की, त्यांनी लगेचच न्यूयॉर्कच्या विलार्ड गॅलरीच्या डॅन आणि मिरियम जॉन्सन यांना पत्र लिहिलं.

ते लिहितात, “गायतोंडे, 32, हे मी आजवर पाहिलेल्या सर्वोत्तम चित्रकारांपैकी एक आहेत. त्यांच्याविषयी फार कुणाला माहिती नाही. पण ते अतिशय उत्कृष्ट, भव्य काम करतात. अगदी मार्क रॉथ्कोच्या दर्जाचं. एक ना एक दिवस ते जगविख्यात चित्रकार बनतील.”

“ते अमूर्त चित्रकार आहेत आणि त्यांच्या चित्रात शब्दांत न मांडता येणारं सौंदर्य आणि स्पष्टता आहे. मन आणि प्रकाशाची ही सर्वात सुंदर चित्र आहेत,” असंही ग्रेव्ज लिहितात.

एकांतप्रिय व्यक्तीमत्व

1957 साली जपानच्या टोकियोमधल्या यंग आर्टिस्टस प्रदर्शनात गायतोंडेंना पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. ग्रेव्ज यांच्या पत्रानंतर लवकरच त्यांना अमेरिकेत न्यूयॉर्कला जाण्याची संधी मिळाली.

रॉकफेलर फेलोशिप मिळाल्यानं 1964-65 या काळात त्यांनी न्यूयॉर्कमध्ये काही काळ वास्तव्य केलं. त्या दरम्यान अनेक कलाकारांना ते भेटले.

7 A visitor looks at an untitled painting (L) by Vasudeo S. Gaitonde during a media preview ahead of Christie's first auction in India, in New Delhi on 6 December 2013 GettyImages-453901911

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2013 साली 'ख्रिस्टीज' च्या भारतातील पहिल्या लिलावाआधीच्या प्रदर्शनात मांडलेलं वासुदेव गायतोंडेंचं चित्र

पाश्चिमात्य कलेतल्या तंत्राची आशियातल्या विचारांशी सांगड घालत त्यांची चित्रकला आणखी संपन्न बनली.

ते नुसत्या ब्रशऐवजी रोलरचा वापर करायचे, कॅनव्हासवर रंग पसरू द्यायचे. कधी रंगांचे एकावर एक थर द्यायचे आणि नाईफनं काही भाग काढून टाकायचे. असं बरंच काही, जे कॅनव्हासला जिवंत करायचं.

अमेरिकेतील कला इतिहासकार बेथ सिट्रॉन सांगतात, “अनेकदा गायतोंडेंच्या चित्रांची तुलना पाश्चिमात्य चित्रकारांशी केली जाते. पण गायतोंडे न्यूयॉर्कला जाण्याआधीपासूनच त्यांच्या चित्रांचं रूप तयार होत होतं.”

1971 साली भारत सरकारनं गायतोंडेंना पद्मश्रीनं सन्मानित केलं. त्या सुमारासच म्हणजे 1970 च्या आसपास ते दिल्लीत स्थायिक झाले.

गायतोंडे आधीच एकांतप्रिय होते आणि दिल्लीत गेल्यावर आणखी एकांतात राहू लागले. जवळची काही अगदी मोजकी माणसं सोडली, तर इतरांसाठी ते दारही उघडत नसत.

ग्राफिक्स

त्यांचे शिष्य आणि चित्रकार लक्ष्मण श्रेष्ठ यांनी सांगितलेला एक किस्सा ‘गायतोंडे’ ग्रंथात आहे.

“एम.एफ हुसैन दिल्लीत आले की गायतोंडेंना भेटायला यायचे. पण गायतोंडेंना कुणाची भेट घ्यायची नसेल तर ते दार उघडत नसत. मग अशा वेळी हुसैन त्यांच्या दरवाजावर काहीतरी चित्र रेखाटून जायचे. ‘मी येऊन गेलो होतो,’ हे सांगण्याची हुसैनची ती पद्धत होती. दोघांमध्ये ही अशी मैत्री होती.”

तसं गायतोंडे वर्षाला पाच-सात चित्रं काढायचे. पण 1984 मध्ये त्यांना एका अपघातात गंभीर दुखापती झाल्या. त्यानंतर काही काळ त्यांची चित्र थांबली.

या सुमारासच पंडोल आर्ट गॅलरीच्या दादीबा पंडोल यांनी गायतोंडेंना तुम्ही आजकाल चित्र का काढत नाही? असं विचारलं. त्यावर गायतोंडे म्हणाले होते, “मी अजूनही चित्र काढतो की. मी माझ्या मनात, डोक्यात चित्र काढतो. आजकाल माझ्यात एवढी ताकद राहिली नाही आणि कॅनव्हासवर रंग लावून मला तो वाया घालवायचा नाही.”

2001 साली गायतोंडेंचं निधन झालं, तेव्हा कलाक्षेत्रातील लोक वगळता फारशी कुणी दखलही घेतली नाही. पण काळ मागे सरला तसं त्यांच्या चित्रांचं महत्त्व आणखी स्पष्ट होऊ लागलं आहे.

न्यूयॉर्कच्या म्युझियम ऑफ मॉडर्न आर्टच्या असोसिएट क्युरेटर कॅरा मेन्झ यांच्या मते गायतोंडेंची चित्र म्हणजे "शांतता कशी दिसू शकते याचं प्रतिक आहेत. आणि तरीही त्यात एक चमकदारपणा आहे, जो या शांततेतून, शून्यातून येतो. कॅनव्हासवरच्या भरीव चिन्हांत आणि रंगांमध्ये मिसळतो.”

स्वतः गायतोंडेंसाठी मात्र चित्रकला हे केवळ अनुभवण्याचं आणि व्यक्त व्हायचं माध्यम होतं. ते अनेकदा सांगायचे, “मी रंग सोडतो आणि पाहात राहतो. माझं चित्र हे असं आहे.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)