होळी : गोमूत्रापासून तयार होणारा 'हा' रंग एकेकाळी भारतातून जगभरात निर्यात व्हायचा...

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
नीळ, दुर्मिळ खनिजं, ममीचे अवशेष आणि गोमूत्र. या सगळ्याचा एकमेकांशी काय संबंध आहे?
या सगळ्याचा वापर कोणे एके काळी रंग तयार करण्यासाठी वापरला जायचा. जगातली अनेक नावाजलेली चित्रं अशा विचित्र रंगांनी रंगली आहेत, यावर आज सहज विश्वास बसणार नाही.
त्या काळात आजच्यासारखं हव्या त्या रंगाची हवी ती छटा तयार करणं सोपं नव्हतं, म्हणूनच या चित्रविचित्र गोष्टींचा रंगद्रव्य म्हणून वापर व्हायचा. या रंगद्रव्यांमुळेच सिंथेटिक रंग तयार करण्याचं तंत्रज्ञान नव्हतं त्या काळातही विलक्षण कलाकृती तयार झाल्या.
अजिंठ्यातली चित्रं असोत, मुघल लघुचित्रं असोत किंवा मध्ययुगातली युरोपियन पेंटिंग्ज. त्यातल्या रंगांमागेही मोठा रंगतदार इतिहास आहे.
1. गोमुत्रापासून बनणारा इंडियन यलो
'इंडियन यलो' म्हणजे केशरी छटा असलेलं पिवळं रंगद्रव्य. चित्रांमध्ये चमकदार सोनपिवळ्या छटा रंगवण्यासाठी त्याचा वापर व्हायचा. पंधराव्या शतकात भारतात या रंगद्रव्याचा वापर सुरू झाला आणि तिथून तो लवकरच युरोपातही पोहोचला.
मुघल काळातल्या अनेक लघुचित्रांमध्ये हा रंग आढळून येतो. युरोपातही अनेक चित्रकारांनी भित्तीचित्रं, तैलचित्रं आणि जलरंगात या छटेचा वापर केला.
व्हिन्सेन्ट व्हॅन गॉगच्या 'द स्टारी नाईट' मधला पिवळसर चंद्र आणि वा जोसेफ मॅलॉर्ड विल्यम टर्नरच्या चित्रांमधला सूर्यप्रकाश या इंडियन यलो चीच कृपा आहे.

फोटो स्रोत, Historical Picture Archive/getty
पण हा रंग कसा तयार व्हायचा? दावा केला जातो की ही रंगछटा गोमुत्रापासून तयार केली जायची. पण सर्रास कुठल्याही गाईचं मूत्र त्यासाठी वापरलं जात नसे.
गोमूत्राला पिवळसर रंग यावा म्हणून या गाईंना केवळ आंब्याची पानं खायला घातली जात असे. त्यासाठी त्यांना उपाशीही ठेवलं जायचं, म्हणजे त्या जबरदस्तीनं आंब्याची पानं खातील.
अशा गाईंचं गोमूत्र मग मातीच्या भांड्यांमध्ये जमा केलं जायचं आणि उकळवलं जायचं. त्यानंतर गाळून, वाळवून रंगद्रव्याचे खडे तयार केले जायचे. चित्रकार आपल्या गरजेनुसार ते पॅलेटवर घेऊन त्यात पाणी किंवा तेल मिसळत असत आणि चित्रं रंगवत असत.
हा रंग कसा तयार केलो जातो याविषयीचा एक अहवाल 1883 साली लंडनच्या सोसायटी ऑफ आर्ट्समध्ये सादर करण्यात आला. त्रिलोकीनाथ मुखोपाध्याय यांनी हा अहवाल तयार करताना आजच्या बिहारच्या मुंगेरमध्ये जाऊन संशोधन केलं होतं. त्यांनी गाईंचं शोषण होत असल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं.
1908 साली या रंगावर बंदी घालण्यात आली आणि त्यानंतर आधुनिक रसायानांचा वापर करून पिवळ्या छटा तयार केल्या जाऊ लागल्या.
2. अजिंठ्यातले गेरूचे रंग
प्राचीन काळी भारतीय चित्रकला किती समृद्ध होती, याची झलक अजिंठ्याच्या लोण्यांमधील चित्रांतून येते. या चित्रांमध्ये लाल आणि पिवळ्या रंगांचा वापर मोठ्या प्रमाणात केला आहे.

फोटो स्रोत, Rattham/getty
हा लाल-पिवळा रंग म्हणजे रेड ऑकर आणि यलो ऑकर गेरूपासून तयार केले जात. दिवाळीत रांगोळी काढण्याआधी ज्या गेरूनं जमीन सारवतात, त्या गेरूपासूनच रंग तयार केले जायचे.
गेरू म्हणजे लाल-पिवळ्या रंगाची माती. अशा मातीत लोहाच्या ऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं. लोहाच्या प्रमाणानुसार आणि मातीतल्या अन्य घटकांनुसार हा रंग बदलतो.

फोटो स्रोत, Soltan Frédéric/getty
काही अभ्यासकांच्या मते, गेरू हे माणसानं वापरलेलं पहिलं रंगद्रव्य असावं. कारण जगभरातील गुंफाचित्रांमध्ये गेरूचा वापर झालेला दिसतो. म्हणजे हे रंगद्रव्य जवळपास 1 लाख वर्ष जुनं आहे.

फोटो स्रोत, Pictures from History
अनेक आदिवासी शरीर रंगवण्यासाठी आजही या रंगाचा वापर करतात.
3. लापिस लाझुली, हान पर्पल, नीळ आणि निळ्याची नवलाई
अजिंठ्याच्या चित्रांमध्ये आणखी एक रंग लक्षात राहतो, जो गडद, चमकदार आणि निळ्या समुद्रासारखा काहीसा रहस्यमय वाटतो.
आज अल्ट्रामरीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निळ्या रंगाच्या छटेची गोष्टही विस्मयकारक आहे. कारण त्याचं नातं थेट अफगाणिस्तानशी आहे.

फोटो स्रोत, Pictures from History/getty
अफगाणिस्तानच्या उत्तर भागातील खाणींमध्ये 'लापिस लाझुली' हे खनिज आढळतं. मराठीत राजावर्त आणि हिंदी, अरबीत लाजवर्द नावानं ते ओळखलं जातं.
हडप्पा संस्कृती (सिंधू संस्कृती) काळातही हे खनीज वापरलं जायचं. मेसोपोटेमियातही लाझुली बीड्स सापडले आहेत.
प्राचीन इजिप्शियन लोकांनाही नीळ आणि राजावर्ताच्या निळ्या छटेची भुरळ पडली होती. पण तिकडे हा रंग आणणं परवडत नसे.

फोटो स्रोत, KuntalSaha/getty
त्यामुळेच इजिप्शियन कलाकारांनी सिलिका, लिंबू, तांबं आणि अल्कलीचा वापर करून रासायनिक रंग तयार केला. इजिप्शियन लोकांनी तयार केलेला हा रंग म्हणजे जगातलं पहिलं रासायनिक रंगद्रव्य असल्याचं मानलं जातं.
चीनमध्येही बेरियम, तांबं आणि सिलिकेट रंगद्रव्याचा वापर करून निळा आणि जांभळा रंग तयार केला जायचा. हान ब्लू आणि हान पर्पल नावानं ही रंगद्रव्य ओळखली जातात.
भारतातही त्याआधीपासूनच नीळ वापरली जायची, विशेषतः निळ्या रंगछटेचं कापड तयार करण्यासाठी. पण लापिस लाझुलीची मोहिनी त्यापेक्षाही मोठी आहे.

फोटो स्रोत, Getty Images
निळ्या खनिजाची बारीक पावडर करून त्यात वितळलेलं मेण, तेल, पाईनवृक्षाची राळ अशा गोष्टींचं मिश्रण करून हे रंगद्रव्य तयार केलं जाई.
हे खनिज एकतर दुर्मिळ होतं आणि त्या काळात केवळ अफगाणिस्तानातच त्याची निर्मिती व्हायची. पाश्चिमात्य देशांत तर निळ्या रंगाचा फारसा वापरही होत नसे आणि काही भाषांमध्ये निळ्या रंगासाठी काही शब्दही नव्हता.
पण साधारण हजार वर्षांपूर्वी राजावर्त अरबी व्यापाऱ्यांसोबत युरोपात पोहोचलं आणि त्यानंतर तिथलं चित्रं बदललं. तेव्हा युरोपात हा रंग सोन्यापेक्षाही महाग होता. मोजक्या ठिकाणी त्याचा वापर व्हायचा. येशू, मेरी आणि कधीकधी राजघराण्यातल्या महत्त्वाच्या व्यक्तींचं चित्रण करण्यासाठीच हा रंग वापरला जायचा.
अगदी मायकलअँजेलो, राफाएलसारख्या कलाकारांनाही तो परवडत नसे. व्हर्मीरनं मुक्तपणे आपल्या चित्रात हा रंग वापरला, पण तो कर्जाच्या ओझ्याखाली दबला.
एकोणिसाव्या शतकापासून निळ्या रंगाचं सिंथेटिक रंगद्रव्य वापरलं जाऊ लागलं. पण लापिस लाझुलीची मोहिनी आजही कायम आहे.
4. सिनाबार
सिनाबार म्हणजे मर्क्युरी सल्फाईड. ज्वालामुखीपासून तयार होणारं हे खनिज वापरून प्राचीन काळी भडक लाल रंगाची एक छटा तयार केली जायची. व्हर्मिलियन रेड म्हणून हा रंग ओळखला जातो.

फोटो स्रोत, Gerald Corsi/getty
चीनमध्ये, भारतात आणि माया संस्कृतीतही या द्रव्याचा वापर रंग तयार करण्यासाठी व्हायचा.
5. ममी ब्राऊन
सोळाव्या आणि सतराव्या शतकात इजिप्शियन ब्राऊन नावाचं मातकट तपकिरी रंगाचं एक रंगद्रव्य प्रसिद्ध झालं.

फोटो स्रोत, Christophel Fine Art/getty
कला इतिहासकार व्हिक्टोरिया फिनले यांनी त्याविषयी आपल्या कलर्स - ट्रॅव्हल्स थ्रू द पेंटबॉक्स या पुस्तकात लिहिलं आहे. हा रंग काहीसा पारदर्शक असल्यानं चित्रात मानवी शरीराचे आकार रंगवण्यासाठी किंवा शेडिंगसाठी वापरला जायचा.
तो तयार करण्यासाठी चक्क प्राचीन ममीचे अवशेष वापरले जायचे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








