ब्रिटनमध्ये कृष्ण मंदिरासाठी घर आणि जमीन दान करणारा इंग्रज

हर्टफोर्डशायरमधील भक्तिवेदांत मधील जॉर्ज हॅरिसनचे छायाचित्र

फोटो स्रोत, gurudas

फोटो कॅप्शन, हर्टफोर्डशायरमधील भक्तिवेदांत मधील जॉर्ज हॅरिसनचे छायाचित्र
    • Author, लुईस पॅरी आणि दीपक पटेल
    • Role, बीबीसी न्यूज
    • Reporting from, हर्टफोर्डशायर

यूकेमध्ये ‘हरे कृष्ण मोहिमे’ला आधार मिळावा यासाठी 1973 साली प्रसिद्ध बँड 'बीटल्स'चे सदस्य जॉर्ज हॅरिसन यांनी एक बंगला भेट म्हणून दिला.

हर्टफोर्डशायरमधील भक्तिवेदांतधाम म्हणून ओळखला जाणारा हा बंगला आता ब्रिटनमधील सर्वांत प्रसिद्ध हिंदू मंदिरांपैकी एक आहे.

या बंगल्याच्या प्रमुख सदस्यांनी त्यांच्या स्थापनेमागची कहाणी, तिथली पूजा बंद झाल्यानंतरचा संघर्ष आणि त्याचा वारसा याची माहिती सांगितली. या बंगल्यातील मंदिराच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी या गोष्टी सांगितल्या आहेत.

डिसेंबर 1968 मध्ये, अॅपल रेकॉर्ड्स पार्टीमध्ये जॉर्ज हॅरिसन यांची श्यामसुंदरदास यांच्याशी भेट हा काही योगायोग नव्हता. या भेटीचं आयुष्यभराच्या मैत्रीत रूपांतर होईल, याची त्यांना कल्पनाही नव्हती.

श्यामसुंदरदास एक मिशन घेऊन इंग्लंडला आले होते. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांच्या इच्छेनुसार 'हरे कृष्ण मोहीम' सुरू करण्याची ही मोहीम होती.

श्यामसुंदरदास यांनी मोठं ध्येय ठेवण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून ते बीटल्स रेकॉर्ड लेबलच्या पार्टीला गेले.

"आम्ही सप्टेंबर 1968 मध्ये इथं आलो होतो आणि ख्रिसमसच्या वेळी जॉर्ज हॅरिसनला भेटलो होतो," ते आठवून सांगतात. आम्ही बीटल्ससोबत हरे कृष्णाचा जप करू लागलो, असंही ते सांगतात.

श्यामसुंदरदास आता 81 वर्षांचे असून ते अमेरिकेत राहतात.

ते सांगतात, “1969 च्या सुरुवातीला आम्ही जॉन लेननच्या टिटनहर्स्ट इस्टेटमध्ये राहायला गेलो. दरम्यान लंडनमध्ये आम्ही आमचं मंदिर तयार केलं. तिथं आम्ही रेकॉर्डिंग करायला लागलो. एका गोष्टीमुळे दुसरी गोष्ट झाली आणि मग आम्ही बीटल्स असोसिएशनसह इथं प्रसिद्ध झालो आणि हरे कृष्ण चळवळ देशात वेगानं पसरली.”

ते पुढे सांगतात, 1970 मध्ये 'माय स्वीट लॉर्ड' अल्बम रिलीज झाल्यानंतर लंडनमधील 'इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शसनेस (इस्कॉन)' केंद्रात तरुणांची मोठी गर्दी होऊ लागली.

बंगला भेट म्हणून मिळाला

ते सांगतात, "ही एक 5 मजली इमारत होती आणि इथं पुरेशी जागा आहे असं आम्हाला वाटलं. पण आमच्या अल्बम व्यतिरिक्त, आम्ही त्या काळात समाजातील सर्व स्तरांमध्ये जाऊन करत असलेल्या उपक्रमांमुळे ब्रिटीश तरुण-तरुणी मोठ्या संख्येने येऊ लागले आणि भक्त बनू लागले. त्यामुळे ती छोटी इमारत माणसांनी भरून गेली होती. लोक हॉलमध्ये आणि पायऱ्यांवर झोपू लागले."

श्यामसुंदर दास सांगतात की, 1972 मध्ये ते आणि भक्तिवेदांत स्वामी हॅरिसनच्या ऑक्सफर्डशायर बंगल्यावर गेले.

लंडनचं मंदिर भक्तांनी भरलंय, हे ऐकून हॅरिसननं उत्तर दिलं की, “मला तुमच्यासाठी एक मठ विकत घ्यायचा आहे. एक असं घर जसं आता माझ्याकडे आहे.

श्यामसुंदरदास आणि जॉर्ज हॅरिसन आजीवन मित्र राहिले

फोटो स्रोत, gurudas

फोटो कॅप्शन, श्यामसुंदरदास आणि जॉर्ज हॅरिसन आजीवन मित्र राहिले

एका वर्षानंतर त्यांनी हर्टफोर्डशायरच्या ग्रामीण भागातील एक बंगला भेट दिला.

त्याला भक्तिवेदांतधाम हे नवीन नाव देण्यात आलं. भक्तिवेदांत हा एक प्राचीन संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ सर्व आध्यात्मिक ज्ञानाचं सार किंवा निष्कर्ष असा होतो.

श्यामसुंदरदास याला एक मोठं पाऊल म्हणतात. सध्या 50 तरुण-तरुणी या भक्तिवेदांत धाममध्ये काम करत आहेत, त्याची काळजी घेत आहेत.

ते पुढे सांगतात, “आम्ही इथं एक लहान बीज पेरलं होतं आणि आता 50 वर्षांनंतर त्यांचं मोठ्या वृक्षात रुपांतर झालंय, असं मला वाटतं.”

असं असलं तरी, हर्टफोर्डशायरमध्ये पसरत असलेली ‘हरे कृष्ण चळवळ’ सर्वांना मान्य नव्हती.

जेव्हा मंदिर बंद ठेवावं लागलं

1975 मध्ये मंदिराचे अध्यक्ष बनलेले अखंडीदास म्हणतात, "जेव्हा हरे कृष्णाचे भक्त 1973 मध्ये इथं आले, तेव्हापासून काही लोकांच्या तक्रारी निश्चित होत्या.

"लिचमोर हीथमधील मुख्य जागेत कृष्ण मंदिर बनल्यास स्थानिक भागातील लोकांना ते आवडणार नाही याची तुम्ही कल्पना करू शकता."

पूर्व आफ्रिकेतून बाहेर काढण्यात आलेल्या मूळ भारतीयांच्या ओघानंतर भक्तिवेदांत बंगल्याची लोकप्रियता वाढली. 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला हे लोक उत्तर लंडनमध्ये राहू लागले.

हिंदू संत कृपामयदास हे इथं आलेल्या पहिल्या जणांपैकी होते. ते म्हणतात की, हरे कृष्णधाममध्ये आल्यानंतर अनेकांना खूप शांत वाटलं.

इस्कॉनचे संस्थापक भक्तिवेदांत स्वामी आणि पॅटी बॉयड यांच्यासोबत जॉर्ज हॅरिसन

फोटो स्रोत, bhaktivedant manor

फोटो कॅप्शन, इस्कॉनचे संस्थापक भक्तिवेदांत स्वामी आणि पॅटी बॉयड यांच्यासोबत जॉर्ज हॅरिसन

ते सांगतात, "या सर्व लोकांना समजलं की त्यांच्याकडे पूजा करण्यासाठी एक स्थान आहे आणि ते त्यांच्या स्वतःच्या देशात काही पावलांच्या अंतरावर आहे."

पण 1990 च्या दशकात परिस्थिती गंभीर बनली. मंदिरातून येणाऱ्या आवाजाच्या तक्रारींनंतर 1994 मध्ये मंदिर सार्वजनिक पूजेसाठी बंद करण्यात आलं होतं.

मंदिर बंद करण्याबाबत अखंडीदास सांगतात, "ब्रिटनमध्ये आणि परदेशात मोठं निदर्शन झालं आणि मंदिराच्या समर्थनार्थ मध्य लंडनमध्ये झालेल्या आंदोलनात 30,000 लोकांनी हजेरी लावली होती."

1994 मध्ये, भक्तिवेदांत मंदिर उघडण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी निदर्शने केली.
फोटो कॅप्शन, 1994 मध्ये, भक्तिवेदांत मंदिर उघडण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी निदर्शने केली.

हार्टमार बरो कौन्सिलविरुद्ध दीर्घ कायदेशीर लढाईनंतर भक्तिवेदांत धाम 1996 मध्ये पूजेसाठी उघडण्यात आलं.

"मला या मोहिमेचा अभिमान आहे," असं अखंडीदास यांनी बीबीसीला सांगितलं.

कोरोना काळातही धाम खुले राहिले

ते सांगतात, "आमच्या समुदायानं आपली वेदना व्यक्त केली आणि अहिंसेच्या मार्गानं निषेध नोंदवला.”

ते पुढे म्हणतात, “त्यानंतर धाम आणि समाज दोन्ही मजबूत झाले. गेल्या वर्षी जन्माष्टमी उत्सवात 45 हजार लोक सहभागी झाले होते."

मंदिराच्या व्यवस्थापकीय संचालक नीला माधवदास यांच्या म्हणण्यानुसार, इथं दरवर्षी 22 हजार शाळकरी मुले येतात.

वर्षभर हिंदू सण साजरे करण्याबरोबरच, भक्तिवेदांत धाम एक संसाधन केंद्र तसेच सेंद्रिय शेती फार्म आणि गौसेवा केंद्र म्हणूनही काम करते.

जन्माष्टमी उत्सवाचा फोटो

फोटो स्रोत, Bhaktivedanta Manor

फोटो कॅप्शन, जन्माष्टमी उत्सवाचा फोटो

निला माधवदास सांगतात की, कोरोना साथीच्या काळात परिषदेनं त्यांना इथं एक कोव्हिड चाचणी केंद्र बनवून ते लोकांसाठी खुले ठेवण्याचा सल्ला दिला होता.

“एक काळ असा होता जेव्हा फक्त आमचे मंदिर उघडे असायचे. चर्च, सभास्थाने बंद होती. हिंदू मंदिरं तसंच मशिदी सगळं काही बंद होतं.

"म्हणून आम्ही सर्व प्रकारच्या लोकांचे स्वागत करत होतो आणि त्यावेळी लोक तणावग्रस्त होते म्हणून ते अधिक महत्वाचं होतं," त्या सांगतात.

नवीन गोकुळ फार्म

फोटो स्रोत, Bhaktivedanta Manor

फोटो कॅप्शन, नवीन गोकुळ फार्म

मंदिराचे अध्यक्ष विशाखादेवीदास म्हणतात की, त्यांना लोकांना पारंपरिक आणि निरोगी जीवनाचं दर्शन घडवायचं आहे.

ते पुढे म्हणतात, “आजच्या जगात आपण जे जीवन पाहतो हे याच्या अगदी उलट आहे. आजचं जीवन केवळ उपभोगावर केंद्रित आहे. पण इथं आम्ही शिकलोय की, जर आपण आपलं जीवन गायींची सेवा, दुग्धोत्पादन आणि फळं-फुलं यांच्यावर आधारित ठेवलं, तर आरोग्य आणि जीवन दोन्ही निरोगी ठेवता येईल.”

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)