हत्ती-घोडे, श्रीमंती आणि सेक्स स्कॅंडल्स फक्त हीच भारतीय संस्थानिकांची ओळख होती का?

फोटो स्रोत, Juggernaut
- Author, मनू पिल्लई
- Role, इतिहास संशोधक, बीबीसी न्यूजसाठी
भारतातले महाराजा किंवा संस्थानिक म्हटलं की डोळ्यांसमोर येतात हत्ती, दरबारात होणारी नृत्य आणि देखणे भव्य राजवाडे. इतिहास संशोधक मनू पिल्लई यांनी या संस्थानिकांच्या आयुष्याचा घेतलेला हा आढावा.
जडजवाहिर, राजमहाल आणि भव्य दरबार या सगळ्याच्या पलिकडे पाहिलं तर भारतातल्या या संस्थानिकांबद्दल एक गोष्ट लक्षात येते. या संस्थानिकांकडे वा महाराजांकडे काही जण तिरस्काराने पाहात किंवा काहींना त्यांच्या आयुष्याबद्दल असूया आणि विचित्र कुतुहल होतं.
स्वातंत्र्यापूर्वीच्या भारतातले तरुण राजकुमार म्हणजे नीतीमत्ता नसणारे, स्वतःच्या सुखाचा विचार करणारे, शरीरसुखातच रस असणारे आणि भरजरी कपडे घालून वावरणारे पुरुष असं चित्र ब्रिटिशांनी उभं केलं होतं.
एखादा महाराजा म्हणजे 'धिप्पाड आणि बलदंड शरीराचा, किळसवाणा दिसणारा आणि नर्तकीप्रमाणे गळ्यात - कानात आभुषणं घातलेला पुरुष' असं वर्णन एका गोऱ्या अधिकाऱ्याने केलं होतं. असं दिसणारा पुरुष हा अधिकार वा सत्ता गाजवणारा नसून बायकी असल्याचं गोऱ्या पुरुष अधिकाऱ्यांना वाटे.
अनेक दशकं हा समज कायम होता. 1947 मध्ये Life मासिकाने केलेल्या एका पाहणीमध्येही याचीच पुनरावृत्ती करण्यात आली.
या मासिकाने एक अभ्यास करून प्रत्येक राजाकडे काय काय असे याची सरासरी काढली होती.
त्यानुसार सर्वसाधारणपणे कोणत्याही महाराजाकडे सरासरी 11 उपाध्या, खास कार्यक्रमांसाठीचे 3 पोशाख, 5.8 पत्नी, 12.6 मुलं, 5 महाल, 9.2 हत्ती आणि किमान 3.4 रॉल्स रॉईस गाड्या असतात, असं या पाहणीतून जाहीर करण्यात आलं.
या पाहणीतली आकडेवारी दिशाभूल करणारी होती आणि एकूणच निष्कर्ष फारसे गंभीरपणे घेण्याजोगे नव्हते. कारण पाहणी करण्यात आलेल्या एकूण 562 संस्थानांपैकी बहुतेक संस्थानं ही अगदी लहान होती आणि त्यांना राजकीय दृष्ट्या फारसं महत्त्वंही नव्हतं.

फोटो स्रोत, Juggernaut
लाखोंवर राज्य करणाऱ्या सुमारे 100 खऱ्याखुऱ्या महाराजांची बरोबरी काही चौरस किलोमीटर्सची मालमत्ता असणाऱ्या जमीनदार आणि अमिरांसोबत करण्यात आल्याने या महाराजांचं समाजातलं स्थान तर घटलंच पण त्यांची प्रतिमाही डागाळली. हे म्हणजे महाराणी एलिझाबेथ यांची तुलना देशातल्या एखाद्या जमिनदाराशी करण्याजोगं होतं.
प्रत्यक्षातली परिस्थिती खरंतर अगदीच वेगळी होती. भारतीय उपखंडाचा जवळपास चाळीस टक्के भाग हा संस्थानांनी व्यापला होता. ही संस्थानं थेटपणे ब्रिटीश अधिपत्याखाली येत नसली तरी विविध करारांमार्फत या संस्थानांचा ब्रिटीश राजशी संबंध होता. आणि या संस्थानांवर राज्य करणारे हे राजे प्रत्यक्षात झगमगाट आणि दिखाव्यापासून अगदीच वेगळे होते.
म्हणजे कोचिनच्या महाराजांना संस्कृत ग्रंथांचा अभ्यास करण्याचा छंद होता. तर गोंदालचे राजे हे शिक्षणाने डॉक्टर होते.
मोठ्या संस्थानांचे राजे हे ब्रिटिशांनी वर्णन केल्याप्रमाण दारू आणि लैंगिक सुखात लोळण घेणारे नव्हते. तर हे राजे त्यांच्या राज्यांचा राजकीयदृष्ट्या गांभीर्याने विचार करणारे होते.

फोटो स्रोत, Juggernaut
अर्थातच काही वेळा या राजांमध्ये विचित्र वागणूकही दिसून येई. म्हणजे एका संस्थानाच्या महाराजांनी स्कॉटिश पथक पाहिलं आणि ताबतोड आपल्या सैनिकांसाठी जाडजूड जाकिटं आणि गुलाबी रंगाच्या घट्ट विजारी असा पोशाख शिवण्याचे आदेश दिले.
तर दुसऱ्या एका राजांचा आपण चौदावे लुई यांचा पंजाबातला पुनर्जन्म असल्याचा समज होता, असं म्हटलं जातं.
पण हा विचित्रपणा ही काही भारतातल्या संस्थानिकांची एकमेव ओळख नव्हती. ब्रिटीश राज्यकर्त्यांमध्येही अशी उदाहरणं होतीच. म्हणजे भारताच्या व्हॉईसरॉयपैकी एक असणारे लॉर्ड कर्झन हे एकदा अंगावर एकही कपडा न घालता पूर्ण नग्नावस्थेत टेनिस खेळले होते.
महाराजा म्हणजे स्वकेंद्री व्यक्ती असं चित्र उभं करण्यात आल्याने भारतातल्या संस्थानांच्या राजांबद्दलच्या अनेक रंजक गोष्टी समोर आल्याच नाहीत. त्या अगदी झाकोळल्या गेल्या. अशा अनेक गोष्टी मला माझ्या नव्या पुस्तकासाठी संशोधन करताना आढळल्या.

फोटो स्रोत, Juggernaut
म्हैसूरच्या राजांकडे हत्ती होतेच पण त्यांच्या कार्यकाळात शहरात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालं.
एका पत्रकाराने केलेल्या पाहणीनुसार बडोद्याच्या महाराजांनी त्यांच्या जनतेमधल्या दर 55 लोकांमागे एकाला शिक्षणासाठी त्याकाळी 5 डॉलर्स मूल्य होईल इतकी शिष्यवृत्ती दिली होती. त्याच काळात ब्रिटीश भारतातल्या 1000 लोकांमागे एकाला इतका निधी देत.
त्रावणकोरला (आताचं केरळ) तर आदर्श राज्य म्हटलं जायचं कारण या राज्यात शाळा, पायाभूत सुविधा अशा अनेक गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्यात आली होती.
यासोबतच अनेक संस्थानांमध्येच पहिल्यांदा भारताच्या संविधानाविषयीच्या चर्चांना पहिल्यांदा सुरुवात झाली होती.
मग असं असताना संस्थानिक म्हटलं ही फक्त बडेजाव, लक्झरी गाड्या आणि सेक्स स्कँडल्सबद्दलच का बोललं जातं?
कारण असा समज उभा होणं हे ब्रिटीश राजच्या सोयीचं होतं. यामुळे ब्रिटीश राजचा हेतू चांगला होता, त्यांनी या संस्थानांचं हित चिंतलं आणि बिघडलेल्या या श्रीमंतांना वळण लावण्याचा प्रयत्न केला असं चित्र उभं राहिलं.
भारतीय राज्यकर्ते चांगल्या प्रकारे शासन करू शकतात किंबहुना परिस्थिती ब्रिटीशांपेक्षा जास्त चांगल्या रीतीने हाताळू शकतात हे मान्य करणं म्हणजे ब्रिटीश साम्राज्याच्या मूळ हेतूलाच सुरुंग लावण्यासारखं होतं.

फोटो स्रोत, juggernaut
संस्थानांबद्दल ब्रिटिशांना किती असुरक्षित वाटत असे, हे देखील यातून फारसं समोर येत नाही. कारण ही संस्थानं कायमच त्यांच्यासमोर नवी आव्हानं उभी करत.
उदाहरणार्थ ब्रिटीशांच्या विरोधात बडोदा संस्थानातून सर्वाधिक मजकूर आणि पत्रिका छापल्या जात. याला 'औषधी वनस्पती' यासारखे निरुपद्रवी वाटणारे मथळे दिलेले असतं. म्हैसूर संस्थानात राजांवर वर्तमानपत्रांनी टीका केल्यास खपवून घेतलं जात नसे, पण ब्रिटिशांवर टीका करण्याची मात्र संपादकांना मुभा होती.
ब्रिटिशांना जास्त कर द्यावा लागू नये म्हणून जयपूर संस्थानचे राजे लक्षावधींचा महसूल त्यांच्या खात्यातून जाहीरच करत नसत. शिवाय अनेक संस्थानिक काँग्रेस पक्षाला स्वातंत्र्यासाठीच्या लढाईमध्ये आर्थिक मदत करत होते. राष्ट्राच्या या लढाईला अगदी 1920च्या दशकापासून अनेक संस्थानिकांचा पाठिंबा असल्याचा संशय लॉर्ड कर्झन यांनाही होता.
आणि या संस्थानिकांपैकी अनेक महाराजांकडे स्वातंत्र्य संग्रामातले हिरो म्हणूनही पाहिलं जात होतं.
मोठ्या संस्थानांच्या यशाचा अगदी महात्मा गांधींसकट इतर मोठ्या राष्ट्रवादी नेत्यांना अभिमान होता. कारण देशातले लोक हे चांगले राज्यकर्ते होऊ शकत नाहीत, हा ब्रिटिशांनी पसरवलेला समज हे संस्थानिक मोडून काढत होतं.
पण 1930 आणि 1940च्या दशकात गोष्टी बदलल्या. अनेक संस्थानांमध्ये शिक्षणाचा प्रसार झालेला होता. त्यामुळे समाजातल्या सगळ्या स्तरांचं प्रतिनिधित्वं असावं अशी मागणी व्हायला लागली. ब्रिटिश भारतातून परतत असताना महाराजांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांची तोवरची प्रतिष्ठा पणाला लागली.
एकूणच इतिहासाने उभ्या केलेल्या चित्रामागे अनेक गोष्टी आहेत.
(मनू पिल्लई हे इतिहास संशोधक असून फॉल्स अलाईज : इंडियाज महाराजाज इन द एज ऑफ रवी वर्मा या पुस्तकाच्या लेखिका आहेत. या लेखातील मतं ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत. )
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








