झाशीः राणी लक्ष्मीबाई झाशीसाठी लढल्या की 'भारता'च्या स्वातंत्र्यासाठी?

फोटो स्रोत, TWITTER
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी
झाशीच्या शंकर किल्ल्यावरचा बुरूज. समोर पेटलेलं शहर. किल्ल्यावरून इंग्रजांवर आणि इंग्रजांकडून किल्ल्यावर चाललेली तोफगोळ्यांची फेकाफेक. अशा स्थितीमध्ये राणी लक्ष्मीबाईंनी आपल्या दत्तक मुलाला रेशीमकाठी धोतराने पाठिला बांधलं आणि पांढऱ्या घोड्यावर स्वार झाल्या.
किल्ल्याखाली उतरून इंग्रजांची फळी फोडत त्या निघाल्या. मध्यरात्री त्यांना निरोप देण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने लोक उभे होते.
झाशीची राणी म्हटलं की गोष्टीत ऐकलेला हा प्रसंग आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतोच. 1857 साली सुरू झालेल्या युद्धातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पण राणी लक्ष्मीबाईंच्या या लढ्याकडे कसं बघावं, यावरून मतंमतांतरं आहेत. त्या झाशीसाठी लढत होत्या की 'भारता'च्या स्वातंत्र्यासाठी, असा प्रश्न आजवर अनेकदा उपस्थित केला गेला आहे.
सावरकरांनी त्या युद्धाला '1857चं स्वातंत्र्यसमर' असं संबोधलं आहे. ब्रिटिश इतिहासकारांनी आणि ब्रिटिश इतिहासाचा प्रभाव असणाऱ्या इतिहास संशोधकांनी याला स्वातंत्र्यासाठी झालेली लढाई म्हणण्यास ठाम नकार दिला आहे.
त्यामुळे 1857-58 या वर्षभरात झालेल्या युद्धाला काही लोक बंड म्हणतात तर काही लोक स्वातंत्र्ययुद्ध. पण झाशीच्या राणीची 1857-58 ची परिस्थिती जाणून घेण्यासाठी थोडं इतिहासात डोकवावं लागेल.
मनकर्णिका महाराणी लक्ष्मीबाई झाल्या
पेशव्यांकडे नोकरीला असणारे मोरोपंत तांबे काशीमध्ये राहात होते. तिथंच त्यांना कन्या झाली. तिचं नाव मनकर्णिका ठेवण्यात आलं.
झाशीचे राजे गंगाधरराव नेवाळकरांबरोबर मनकर्णिकेचा विवाह झाला. त्यानंतर त्या राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
1851 साली त्यांना एक पुत्रही झाला, मात्र तीनच महिन्यात ते बाळ दगावलं. त्यानंतर दोनच वर्षांमध्ये गंगाधररावांची तब्येत बिघडली आणि ते शय्येला खिळले.

फोटो स्रोत, WIKIPEDIA
20 नोव्हेंबर 1853च्या दिवशी गंगाधररावांनी आपल्याच नात्यातला दामोदर नावाचा मुलगा दत्तक घेतला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचं निधन झालं.
एव्हाना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पाय रोवले होते आणि गव्हर्नर जनरल डलहौसी यांनी नागपूर, तंजावर आणि सातारासारखी मराठ्यांची संस्थानं खालसा केली होती.
गंगाधररावांच्या निधनामुळे झाशी खालसा करण्याची आयती संधीच डलहौसींना मिळाली. डलहौसींनी दामोदरचं दत्तकविधान फेटाळून लावलं आणि झाशी खालसा करत असल्याचा जाहीरनामा काढला.
'मेरी झांसी नहीं दूंगी'
13 मार्च 1854 रोजी काढलेला झाशी संस्थान खालसा करण्याचा जाहीरनामा जेव्हा राणी लक्ष्मीबाईंना मिळाला, तेव्हा त्यांनी उद्गार काढले होते 'मेरी झांसी नहीं दूंगी'. या वाक्यामुळेच त्या इतिहासात अजरामर झाल्या.
संस्थान खालसा झाल्यानंतर राणी लक्ष्मीबाईंनी बॅरिस्टर जॉन लँग यांचा सल्ला मागितला. जॉन लँग हे ब्रिटिश पत्रकार आणि वकील होते. लँग यांनी लक्ष्मीबाईंना सबुरीचा सल्ला दिला.
विरोधाची थोडी जरी भावना दिसली तर ईस्ट इंडिया कंपनी झाशीच्या स्वातंत्र्याची भावना दडपून टाकेल, त्यामुळे थोडे सबुरीने निर्णय घेण्याचा सल्ला दिला होता. यामुळेच सुरुवातीच्या काळात लक्ष्मीबाईंनी अर्ज विनंत्यांचं धोरण स्वीकारलेलं दिसतं.
'अंगरेजन सें लडवौ बहुत जरूरी है'
झाशी संस्थान खालसा झाल्यानंतर लक्ष्मीबाईंनी आपले संस्थान टिकवण्याचा परोपरीने प्रयत्न करून पाहिला. अर्ज-विनंत्यांनी मार्ग निघत नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी आसपासच्या संस्थानांना कंपनीविरोधात एकत्रित लढण्यासाठी प्रयत्न करायला सांगितलं.
राणी लक्ष्मीबाईंनी बाणपूर संस्थानचे राजे मर्दानसिंह यांना लिहिलेल्या पत्रात राष्ट्रीयत्वाची भावना स्पष्ट दिसून येते.
त्या पत्रात त्यांनी लिहिलं, 'भारत अपनो देश है... विदोसियों की गुलामी में रहिबो अच्छो नहीं है. उनसे लडवो अच्छो है... हमारी राय है के विदोसियों का सासन भारत पर न भओ चाहे और हमको अपुन कौ बडौ भरौसौ है और हम फौज की तैयारी कर रहें हैं, सो अंगरेजन से लडवौ बहुत जरूरी है...'

फोटो स्रोत, VIVEK TAMBE
इतिहासाचे अभ्यासक यशोधन जोशी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना या पत्राचा विशेष उल्लेख केला.
"बंडाच्या धामधुमीत राणी केवळ आपल्या राज्याचा विचार न करता संपूर्ण भारतावरचेच ब्रिटिशांचं जोखड फेकून देण्याचा विचार करत होत्या," असं जोशी यांचं म्हणणं आहे.
...अन् युद्ध पेटलं!
खालसा झालेलं संस्थान आपल्या दत्तकपुत्राला मिळावं, यासाठी राणी लक्ष्मीबाई ब्रिटिशांविरोधात लढाईत उतरल्या.
त्यावेळी नानासाहेब पेशव्यांनी ब्रिटिशांविरोधात आधीच आघाडी उघडली होती. पेशव्यांना मिळणारं पेन्शन ब्रिटिशांनी बंद केल्यानंतर पेशवे लढाईत उतरले होते.
राणी लक्ष्मीबाई आणि पेशव्यांनी एप्रिल 1857मध्ये आजच्या उत्तर प्रदेशात ब्रिटिश सैन्याविरोधात लढाईला सुरुवात केली.
'झाशीची राणी लक्ष्मीबाई' या ग्रंथाच्या लेखिका प्रतिभा रानडे यांच्या मते: "नानासाहेब आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या मागण्या त्यांच्या दृष्टिकोनातून तो त्यांचा हक्कच होता. इंग्रजांनी तो अन्यायाने हिसकावून घेतलेला होता. आपला हक्क परत मिळवण्यासाठी त्यांनी युद्धात भाग घेतला होता. त्यांच्या दृष्टिकोनातून स्वतःचे राज्य हेच राष्ट्रीयत्व होते. 'राष्ट्रीयता' या शब्दाचा आज जो अर्थ आपल्याला अभिप्रेत आहे, त्याची जाणीव त्याकाळी जागृतच झालेली नव्हती. दिल्लीच्या तख्तावर सत्ताधीश कुणीही असला तरी प्रत्येक राजा-महाराजा, नवाब आपापल्या मुलुखात स्वतंत्रच असे. तेच त्यांचे राष्ट्रीयत्व होते."
रानडे यांच्या मताप्रमाणेच अनेक इतिहास अभ्यासकांनी आजच्या 'राष्ट्र' या संकल्पनेची तत्कालीन परिस्थितीशी तुलना करणं चूक असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

फोटो स्रोत, TWITTER
1857चा उठाव केवळ उत्तर भारतात झाला, असाही समज आहे. मात्र मीरतमध्ये झालेल्या उठावानंतर मुंबई-पुण्यातल्या हालचाली इंग्रजांनी ताबडतोब दडपून टाकल्या.
इतिहाससंशोधक आणि लेखक डॉ. सुरेंद्रनाथ सेन आणि आर. सी. मुजुमदार यांनी आपल्या लेखनामध्ये, "इंग्रजांविरुद्धचे हे युद्ध, इंग्रजांबद्दलची शत्रुत्वाची भावना, सार्वत्रिक नव्हती. दक्षिण हिंदुस्तानात तर काहीच घडलं नाही," असं प्रतिपादन केलं आहे.
त्यामुळे झाशीच्या राणीसह लढणारे संस्थानिक सर्व देशाचे स्वातंत्र्ययुद्ध लढत नव्हते, अशी भूमिका अनेकांनी मांडली. पण झाशीच्या राणीचे सध्याचे वंशज प्रमोद झांसीवाले राणीवर होत असलेल्या आरोपांमागे राजकीय स्वार्थ असल्याचं सांगतात.
त्यांच्या मते "लक्ष्मीबाईंनी जर स्वार्थी विचार केला असता तर त्या संस्थानातच थांबल्या असत्या, जीव धोक्यात घालून त्यांनी किल्ल्यातून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला नसता. राणी लक्ष्मीबाई देशासाठीच लढल्या."
हिंदुस्थान आणि राष्ट्रीयत्व
पण इतिहासाचे अभ्यासक आणि लेखक राम पुनियानी यांचं थोडं वेगळं मत आहे. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणतात, "1857च्या उठावाच्या वेळेस संस्थानिक ब्रिटिशांविरोधात लढत होते. जरी संस्थान वाचवणं हा हेतू असला तरी ब्रिटिशविरोधाची एक सामायिक कल्पना त्यावेळी रुजली हे नाकारता येणार नाही. तसेच एकत्र येऊन लढण्यासही सुरुवात झाली. एकत्र राष्ट्राची संकल्पना जरी नंतर अस्तित्वात आली, तरी राष्ट्रीयत्व भावना तयार होण्यासाठी पार्श्वभूमी तयार झाली. मी त्याला प्रिनॅशनॅलिटी स्टेज असं म्हणेन."
1857च्या बंडाच्या धामधुमीचं वर्णन करणाऱ्या आणि सर्व घटना जवळून पाहाणाऱ्या विष्णुभट गोडसे यांनी 'माझा प्रवास' या पुस्तकात आठवणी लिहिल्या आहेत.
विष्णुभट गोडसे यांच्या वंशज आणि 'ट्रॅवेल्स ऑफ 1857' या पुस्तकाच्या लेखिका सुखमणी रॉय यांच्यामते 'राष्ट्र' ही संकल्पना तुलनेत आधुनिक आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना रॉय म्हणाल्या, "आपला तत्कालीन सर्व प्रांत स्वतंत्र व्हावा, अशी भावना बुंदेलखंड आणि आजूबाजूच्या प्रदेशात नक्की निर्माण झाली होती. तसेच हिंदुस्थान ही संकल्पनाही अस्तित्वात होती. विंध्य पर्वताच्या वरच्या भागाला हिंदुस्थान संबोधले जायचे तसेच मुघलही हिंदुस्थान ही संज्ञा वापरायचेच. झाशीच्या राणीने सर्वांच्या मनामध्ये एकत्र लढण्याची भावना व प्रेरणा निर्माण केली हे निश्चित."
...आणि तळपती तलवार थंडावली
इंग्रजांचा वेढा फोडून झाशीच्या राणीने पेशव्यांकडे काल्पी नावाच्या गावाकडे कूच केलं. झाशी शहराला उद्ध्वस्त केल्यावर इंग्रजांनी आपला मोर्चा काल्पीकडे वळवला. पण तिथंही लक्ष्मीबाई आणि पेशव्यांना पराभव स्वीकारावा लागला.

फोटो स्रोत, PIB.NIC.In
अखेर त्यांच्याकडे ग्वाल्हेरला जाण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. पेशवे आणि लक्ष्मीबाईंनी ग्वाल्हेर ताब्यात घेतलं.
काल्पीपाठोपाठ ब्रिटिश फौजा ग्वाल्हेरच्या दिशेने येऊ लागल्या आणि समोरासमोरचं युद्ध आता अटळ झालं.
17 जून 1858 रोजी इंग्रज स्वारांच्या तलवारीच्या लखलखत्या पात्यामुळं राणीचा मृत्यू झाला. त्या जागी आता स्मारक उभारण्यात आलं आहे.
संदर्भ-
- इन द कोर्ट ऑफ द रानी ऑफ झांसी अँड अदर ट्रॅवेल्स इन इंडिया- जॉन लँग- स्पीकिंग टायगर पब्लिकेशन्स
- माझा प्रवास, 1857च्या बंडाची हकीकत- विष्णूभट गोडसे- प्रतिभा प्रकाशन
- ट्रॅवेल्स ऑफ इंडिया, अ ट्रान्सलेशन ऑफ विष्णूभटजी गोडसेज माझा प्रवास- सुखमणी रॉय- रोहन प्रकाशन
- झांशीची राणी लक्ष्मीबाई- प्रतिभा रानडे- राजहंस प्रकाशन
- मर्दानी झांशीवाली- विठ्ठलराय भट- मनोविकास प्रकाशन
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








