रामपंचायतनाचं औंध संस्थानातलं एक चित्र ज्याने महाराष्ट्राच्या चित्रकलेला नवी दिशा दिली

फोटो स्रोत, Chitrashala Press
- Author, चिन्मय दामले
- Role, बीबीसी मराठीसाठी
1883 सालच्या नोव्हेंबर महिन्यातली गोष्ट. पुण्याच्या चित्रशाळा छापखान्यात राजा रविवर्मा यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरलं होतं. या प्रदर्शनात पाचसहा चित्रं मांडली होती. ती बघायला लोकांची तोबा गर्दी उडाली होती.
हे प्रदर्शन तसं महत्त्वाचं होतं, कारण ते बघायला पुण्यातले सामान्यजन आले होते. त्यापूर्वी पुण्यात चित्रप्रदर्शनं भरलीच नव्हती, असं नव्हे. पण ती सरकारतर्फे भरवली जात. तिथे सामान्य भारतीयांना प्रवेश नसे. हे प्रदर्शन मात्र तसं नव्हतं.
या प्रदर्शनाबाहेर एका बाजूला चित्रशाळेनं छापलेल्या काही तसबिरींची विक्री सुरू होती. रामपंचायतन, शिवंचायतन, डॉ. विश्राम रामजी घोले, केरूनाना छत्रे यांच्या तसबिरी विक्रीस होत्या. त्यात सर्वाधिक मागणी होती रामपंचायतनाच्या तसबिरीला.
चित्रशाळेनं छापलेल्या रामपंचायतनाच्या तसबिरीला महाराष्ट्रीय चित्रकलेच्या इतिहासात महत्त्वाचं स्थान आहे. या तसबिरीनं आर्थिक अडचणीत सापडलेल्या चित्रशाळेला मदतीचा हात तर दिलाच, पण अशा अनेक तसबिरींच्या निर्मितीची वाट मोकळी करून दिली.
मजेची बाब अशी की, चित्रशाळेशी निगडित रामपंचायतनाचं चित्र एक नसून तीन आहेत.
पहिलं चित्र औंध संस्थानात चितारलं गेलं. दुसरं चित्र या पहिल्या चित्राची नक्कल आहे. तिसरं चित्र दुसर्या चित्राची किंचित सुधारित आवृत्ती आहे. या चित्रांच्या कथा अतिशय रंजक आहेत.
कोणी साकारलं चित्र?
भिवा सुतार हे महाराष्ट्रातले महत्त्वाचे चित्रकार व शिल्पकार होते. ते 1872 साली औंधला गेले आणि श्रीमंत कै. राजर्षि श्रीनिवासराव प्रतिनिधी यांची भेट घेऊन त्यांच्या मुलांच्या काही तसबिरी काढून घ्याव्यात, अशी इच्छा व्यक्त केली.
श्रीमंत श्रीनिवासराव महाराज त्यांना म्हणाले, "आम्हांस मुलांच्या तजबिरी नको आहेत; पण एक रामपंचायतनाचं चित्र काढून द्या."
तोवर महाराजांचं समाधान होईल असं रामपंचायतन त्यांच्या पाहण्यात आलं नव्हतं.
"तुमचं समाधान होईल, अशी तसबीर काढून देतो" असं वचन भिवा सुतारांनी दिलं आणि कॅनव्हसवर तैलरंगांत ४ x ४II फूट आकाराचं चित्र काढण्यास सुरुवात केली.
राजवाड्याच्या पागेच्या माडीवर हे चित्रकाम सुरू होतं.
बंडू तांबट पागेशेजारी राहत. त्यांच्या घरी भिवा सुतार यांना तूपसाखरेचा तीन माणसांचा कच्चा शिधा आणि रोज पाच रुपये असा तनखा मिळू लागला.
रामपंचायतनाचं चित्र काढण्याचं काम सुमारे तीन महिने सुरू होतं. याच काळात कै. श्री. श्रीनिवासराव महाराज यांचंही एक तैलचित्र त्यांनी काढलं.
भिवा सुतार मूळचे सांगली संस्थानातल्या टेंभू गावचे असले तरी त्यांची कर्मभूमी कोल्हापूर होती. कोल्हापूरची आधुनिक कलापरंपरा भिवा सुतार यांच्यापासून सुरू झाली, असं माधवराव बागल यांची ’कोल्हापूरचे कलावंत’ या पुस्तकात लिहिलं आहे.
त्यांचा स्वभाव लहरी होता. कधी दोनतीन दिवस न झोपता त्यांचं काम चाले, तर कधी दिवसचे दिवस ते हाती कुंचला धरत नसत. राहणं रुबाबी आणि राजेशाही. स्वभावानं ताठर. पण तरीही त्यांच्या हातातली कला इतकी अद्भुत होती, की त्यांच्या सगळ्या लहरी सांभाळून राजे, जहागीरदार, आणि युरोपीय साहेब त्यांच्यावर खूश असत.
"काळा सावळा माणूस, बारीक डोळे, भव्य कपाळ, तरतरीत नाक, फार उंच नाहीं फार ठेंगणाही नाहीं, पांढरा अंगरखा, आबाशाही ब्राह्मणी पागोटें घातलेला" असं भिवा सुतारांचं वर्णन श्री. भवानराव श्रीनिवासराव प्रतिनिधी यांनी त्यांच्या आत्मचरित्राच्या पहिल्या खंडात केलं आहे.
भिवा सुतार अतिशय कुशल असे चित्रकार होते. मातीची चित्रं, लाकडाची चित्रं, दगडाची चित्रं करण्यात आणि रंगीत चित्रं काढण्यात ते निष्णात होते. त्यांचा परंपरागत व्यवसाय सुतारकाम असला तरी त्यांना लहानपणापासून चित्रकलेचा नाद होता.
1850 च्या सुमारास मुंबईला जाऊन त्या वेळच्या कोणा युरोपीय चित्रकाराकडे राहून त्यांनी तो पूर्ण केला. पुढे ते कुरुंदवाडकरांच्या पदरी अनेक वर्षं होते. तिथे त्यांनी गणपतीची फार सुरेख चित्रं काढली. तसंच सोन्याचं एक कमळ आणि सिंहही केले होते. शिवाय गणपती, ऋद्धि-सिद्धि, श्रीराम - सीता - लक्ष्मण, मारुती, मुरलीधर अश्या हस्तिदंती मूर्तीही करून दिल्या.
सांगलीच्या बावडेकरांकडे त्यांनी दत्ताची एक सुंदर मूर्ती करून दिली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भिवा सुतारांनी केलेल्या संगमरवरी आणि हस्तिदंती मूर्ती दिसतात. सांगलीचे संस्थानिक असलेल्या श्री. चिंतामणराव पटवर्धनांनी सांगलीत गणपतीची संगमरवरी मूर्ती घडवून घेतली होती.
भिवा सुतारांनी महाराज श्रीनिवासरावांच्या वडिलांचा सुमारे फूटभर उंचीचा लाकडी पुतळा केला होता. मुरलीधर, दोन गोपी, गोपाळ, दोन गाई आणि दोन वासरे असं एक चित्र केलं. गणपती, दत्त आणि गणपती व दोन सारजा अशीही चित्रं केली. शिवाय हस्तिदंती महादेव - पार्वतीची मूर्ती केली. ही सर्व चित्रं, मूर्ती कुठे गायब झाल्या हे कोणालाच माहीत नाही.
कुरुंदवाडच्या संस्थानिकांना भिवा सुतारांनी गणपतीची हस्तिदंती मूर्ती करून दिली होती. मुंबईच्या एस. महादेव या कंपनीनं मूर्तीचे फोटो काढून विकले आणि भरपूर पैसा कमावला.

फोटो स्रोत, Bhandarkar Research Oriental Institute Library
...आणि महाराजांनी चित्र ठेवून घेतलं
औंधला रामपंचायतनाचं चित्र काढतेवेळी भिवा सुतारांचं वय चाळीस - पंचेचाळीस असावं. तिथलं रामपंचायतनाचं काम संपवून परत जाताना त्यांनी एक हजार रुपयांची महाराजांकडे मागणी केली.
शिधा आणि रोजचे पाच रुपये असे तीन महिन्यांचे साडेसातशे रुपये होत होते. महाराजांनी जास्तीची रक्कम देण्याचं नाकारताच ते आपलं चित्र गुंडाळून तिथून जाऊ लागले. शेवटी महाराजांनी त्यांना एक हजार रुपये देऊन ते चित्र ठेवून घेतलं कारण चित्र सुरेख वठलं होतं.
महाराजांचे चिरंजीव श्री. भवानराव श्रीनिवासराव प्रतिनिधी उत्तम चित्रकार होते.
एकदा त्यांना महाराज म्हणाले, "आम्ही नाना प्रकारच्या ठिकाणाहून रामाच्या मूर्ती व तसबिरी आणविल्या, पण मनाचें समाधान झालें नाहीं. पण भिवानें रामपंचायतन काढलें आणि मनाचें समाधान झालें."
स्नानसंध्या आटोपल्यावर महाराज रामपंचायतनाच्या तसबिरीसमोर बसून ध्यान करत असत.
कसं आहे रामपंचायतन?
या चित्रातल्या वस्त्रांची रचना अतिशय शास्त्रशुद्ध आहे. श्रीरामाच्या पीतांबराच्या घड्या जिवंत आहेत. श्रीमारुतीच्या अंगावर असलेले केस खरे वाटतात.
श्री. भवानराव प्रतिनिधी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात या चित्राचं वर्णन केलं आहे - "मारुतीची ती हात जोडून नम्रतेनें उभें राहण्याची ढब, तें शेपूट, ती एकाग्र दृष्टि, माणसाला अगदी तन्मय करून सोडते. रामाच्या द्न्यानमुद्रेचा उताणा हात इतका कोमल आहे कीं, आतां त्यांतून रक्त सांडतें आहे, असें वाटतें. शिवाय चारही भावांमध्यें कुटुंब-सादृश्य आहे, हें स्पष्ट दिसतें. तथापि रामाचा चेहरा निराळा, भरताचा निराळा, आणि लक्ष्मण - शत्रुघ्नांचे चेहरे निराळे असून ते आवळेजावळे भाऊ, म्हणून एकास दडवावा आणि दुसर्यास काढावा, इतकें त्यांमध्ये रूप-सादृश्य आहे. मुकुटावरील काय, हातांतील काय, गळ्यांतील काय, पाचू, हिरे, मोतीं, आतां हातांनी उचलून घ्यावेत, इतके सुंदर काढले आहेत.

फोटो स्रोत, Chitrashala Press
शिवाय रंगाचा ताजवा (colour combination), हातापायाच्या वळणाचा तोल (balance) अतिशय उत्कृष्ट आहे. भिवा मास्टर आर्टिस्ट हेंच खरें. आणि रंगही असे वापरले आहेत कीं, चित्र काढून आज पंच्याहत्तर वर्षे झालीं तरी आज नवे आहेत असें वाटतें."
मूळ चित्राच्या फोटोप्रती बनल्या
भिवा सुतारांच्या या चित्रानं अमाप पैसे आणि लोकप्रियता कमावले. 1874 साली राजाराम रंगोबा नावाचे पुण्याचे एक फोटोग्राफर औंधला महिनाभर येऊन राहिले होते. भारतात फोटोग्राफीची कला येउन त्यावेळी जेमतेम तीन दशकं उलटली होती.
फार कमी भारतीयांचा या कलेशी परिचय होता. या कलेबद्दल लोकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. औंधला येणारे राजाराम रंगोबा हे पहिले फोटोग्राफर होते. त्यामुळे त्यांना पुष्कळ काम मिळालं.
कै. राजर्षि श्रीनिवासराव महाराजांचे, राणी सगुणाबाईंचे आणि सर्व मुलांचे फोटो त्यांनी काढले. फोटो काढण्याची किंमत फार नसावी कारण गावातल्या इतर अनेकांचे फोटो त्यांनी काढले. पण राजाराम रंगोबा औंधला आले होते ते रामपंचायतनाच्या चित्राचा फोटो घेण्यासाठी.
भिवा सुतारांनी रेखाटलेल्या चित्राची कीर्ती त्यांच्या कानी आली होती. हे चित्र आपल्या संग्रही फोटोच्या रूपात असावं, अशी त्यांची इच्छा होती. ती त्यांनी महाराजांच्या कानी घातली. महाराजांनी परवानगी दिली. राजाराम रंगोबांनी 8 x 10 इंच, फूल साईज, कॅबिनेट आणि कार्ड अशा सर्व आकारांत चित्राचे फोटो घेतले. त्या वेळी ड्राय प्लेट्स् मिळत नसत. म्हणून त्यांनी कलोडिअन वेट प्लेट्स्वर निगेटिव्ह्ज् घेतल्या. त्याप्रमाणे पेपरही सेन्सेटाइझ करून त्यावर त्यांनी प्रिन्ट्स् काढल्या.
ते औंधहून पुण्यास आले आणि रामपंचायतनाच्या फोटोच्या प्रती विकायला सुरुवात केली. मूळ चित्रच इतकं सुरेख होतं, की या प्रतींवर लोकांच्या उड्या पडल्या. राजाराम रंगोबांनी हजारो रुपये कमावले. या फोटोंमुळे महाराष्ट्राचा कलेतिहास आणि चित्रशाळा छापखाना यांच्या वाटचालीस गती मिळाली.
विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी 'चित्रशाळे'ची सुरूवात केली
चित्रशाळा छापखान्याचे एक संस्थापक होते महाराष्ट्रीय राष्ट्रवादाचे जनक असलेले विष्णुशास्त्री चिपळूणकर. विष्णुशास्त्र्यांचा जन्म 1850 सालातला. ते 1872 साली बी.ए. झाले आणि 1874 साली त्यांनी सरकारी हायस्कुलात शिक्षकाची नोकरी पत्करली.
लेखनाचा हव्यास त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यातूनच जन्म झाला 'निबंधमाले'चा. निबंधमालेनं मराठी गद्याला वेगळं वळण लावलं. समस्त शिक्षित पांढरपेशा समाज निबंधमालेला डोक्यावर घेता झाला. 1874-1882 या काळात विष्णुशास्त्र्यांनी निबंधमालेचे चौर्याऐंशी अंक एकहाती काढले. जवळजवळ तीन हजार पानांचा हा मजकूर होता. निबंधमालेचा प्रत्येक अंक चाळीसपन्नास पानांचा असे. त्यात निबंध, सुभाषितं, विनोद, उत्कृष्ट उतारे, म्हणी, भाषांतरं इत्यादी असत.
'ज्यांना आपल्या जन्मभूमीचा योग्य अभिमान असून ज्यांस सत्य आवडतें, ते आमचे मित्र; व स्वदेशाची टवाळी करण्यांत ज्यांस भूषण वाटतें व जे असत्यास जाणूनबुजून भजतात किंवा त्याच्या निरसनाविषयीं अनास्था प्रगट करतात, ते आमचे द्वेष्टे' असं 'निबंधमाले'त लिहिणार्या चिपळूणकरांना सर्वाधिक प्रिय होता तो स्वदेश. त्यांच्या ठायी असलेली स्वदेशाभिमानाची भावना अत्यंत तीव्र होती.
स्वसंस्कृतिनिष्ठ आणि प्रखर राष्ट्रवादी विचारांची पेरणी महाराष्ट्रात निबंधमालेच्या लेखांनी केली. मनोरंजन हा या लेखांमागचा उद्देश कधीच नव्हता. प्रबोधन आणि विचारक्रांती घडवणं, लोकांमध्ये स्वदेशाबद्दल, स्वभाषेबद्दल अभिमान जागृत करणं हे त्यांच्या लेखनामागचे उद्देश होते. या लेखनामुळे मोठा महाराष्ट्रीय वर्ग विष्णुशास्त्र्यांच्या सनातनी विचारसरणीकडे आकृष्ट झाला. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, महात्मा ज्योतिबा फुले अश्या सुधारकांवर विष्णुशास्त्र्यांनी प्रच्छन्न टीका केली.
शिक्षण आणि स्वदेशी उद्योग हे त्यांना स्वराज्यप्राप्तीचे मार्ग वाटत होते. त्यासाठी त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलची पुण्यात स्थापना केली. बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी यांच्यासह ’केसरी’ आणि ’मराठा’ ही वर्तमानपत्रं सुरू केली. ती छापण्यासाठी आर्यभूषण छापखाना सुरू केला.
निबंधमाला सुरू केल्यावर चार वर्षांनी, म्हणजे 1878 साली, ’काव्येतिहाससंग्रह’ हे मासिक सुरू झालं. काशिनाथ ना. साने आणि ज. बा. मोडक या दोघांनी मध्ययुगीन बखरी व पत्रं पुन्हा छापण्याची कल्पना विष्णुशास्त्र्यांसमोर मांडली. अहमदनगरचे शंकरराव शाळिग्रामही लवकरच या उपक्रमात सामील झाले.
'काव्येतिहाससंग्रहा’ची जुळवाजुळव सुरू असताना विष्णुशास्त्र्यांची गाठ बाळकृष्णपंत जोश्यांशी पडली. जोशी सरकारी फोटोझिंकोत कामाला होते. ते उत्तम चित्रकार होते. त्यांचा चित्रसंग्रह विष्णुशास्त्र्यांनी पाहिल्यावर ती चित्रं शिळाप्रेसवर छापता येतील आणि काव्येतिहाससंग्रहात समाविष्ट करता येतील, असं त्यांना वाटलं आणि ’चित्रशाळा’ या छापखान्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. नारायण पेठेतल्या डोलकर आळीत विष्णुशास्त्री राहत. सुरुवातीला त्यांच्या घरीच चित्रशाळेचा छापखाना होता.
1878 साली चित्रशाळा छापखाना सुरू झाला. मुंबई इलाख्यातला सुरुवातीच्या शिळाप्रेसांपैकी हा एक. हा छापखाना सुरू झाला तो ’काव्येतिहाससंग्रहा’त चित्रं छापण्यासाठी.
सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांची दोन चित्रं जलरंगात बाळकृष्णपंतांनी काढली होती.

फोटो स्रोत, Chitrashala press
पेशवे दरबारी सर चार्ल्स मॅलेटबरोबर आलेल्या इंग्रज चित्रकारानं काढलेल्या तैलचित्रांवरून ही दोन चित्रं तयार केली गेली होती.
नंतर महात्मा ज्योतिबा फुले यांचे सहकारी असलेल्या आणि सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष असलेल्या डॉ. विश्राम रामजी घोले यांची तसबीर चित्रशाळेत छापली गेली. घोले निष्णात शल्यविशारद होते. विष्णुशास्त्र्यांच्या वडिलांचे, कृष्णशास्त्र्यांचे स्नेही होते. त्यामुळे विष्णुशास्त्र्यांनी ही निवड केली असावी. केरूनाना छत्रे, कृष्णशास्त्री चिपळूणकर यांच्या तसबिरीही याच काळात छापल्या गेल्या.
तोट्यातली चित्रशाळा नफ्यात आली...

फोटो स्रोत, Chitrashala Press
मात्र या तसबिरींची फारशी विक्री झाली नाही. चित्रशाळा तोट्यात सुरू होती. तोटा भरून कसा काढावा या विचारात असताना विष्णुशास्त्र्यांना प्रकाशक व ’जगद्हितेच्छु’ छापखान्याचे मालक रावजी श्रीधर गोंधळेकर एकदा म्हणाले - "आपले लोकांना मनुष्यांचे चित्रांची तादृश गोडी नाहीं. तुम्हीं एकदा देवांची चित्रे काढून पाहा, त्यांच्या खप अतोनात होईल असे मला वाटते". हा सल्ला मानून विष्णुशास्त्र्यांनी योग्य चित्राची शोधाशोध सुरू केली.
त्याच सुमारास बाळकृष्णपंत जोश्यांना राजाराम रंगोबा यांच्याकडील रामपंचायतनाच्या फोटोचा पत्ता लागला. त्यांना तो फोटो अतिशय आवडला. त्यांनी तो विष्णुशास्त्र्यांना दाखवला. या फोटोचा खप उत्तम होईल, असं त्यांना वाटलं. बाळकृष्णपंतांनी त्या फोटोस समोर ठेवून रंगीत रामपंचायतन रेखाटलं. चित्रशाळेनं हे चित्र छापलं आणि इतिहास घडला.
पहिल्याच महिन्यात रामपंचायतनाच्या दोन हजार प्रती विकल्या गेल्या. सांगलीकर नाटक मंडळी त्या काळच्या महत्त्वाच्या नाटककंपन्यांपैकी एक होती. या कंपनीनं चित्रशाळेचं रामपंचायतनाचं चित्र गावोगावी पोहोचवलं. ज्या गावी नाटकाचा प्रयोग असेल, तिथे चित्राची विक्री होई. अनेक ठिकाणी अडीच - तीन रुपयांना हे चित्र विकलं गेलं.

फोटो स्रोत, Chitrashala Press
भिवा सुतारांनी रेखाटलेलं रामपंचायतन बाळकृष्णपंतांच्या रामपंचायतनापेक्षा थोडं वेगळं आहे. रंग, शरीराची ठेवण, हार, दागिने यांत फरक आहे. मात्र दोन्ही चित्रं मनोवेधक आहेत. रामपंचायतनाच्या चित्राला मिळणार्या अफाट प्रतिसादामुळे छापखान्यात फ्रेमींचाही कारखाना सुरू झाला.
चित्रशाळेनं शिवपंचायतन, महिषासूरमर्दिनी, गणेशपंचायतन अशी चित्रंही छापली. या चित्रांच्या लोकप्रियतेमुळे पुढच्या काही वर्षांत चित्रशाळेत शंभराहून जास्त चित्रं तयार केली गेली. दत्तात्रय, कृष्ण, नरसिंग, खंडोबा अशी दैवतं त्यांत होती. राम, कृष्ण, शंकर यांच्या आयुष्यांतले प्रसंग होते. त्यामुळे आधुनिक महाराष्ट्रातली चित्रकला आणि चित्रशाळा छापखाना यांचा प्रवास एकत्रित होऊ शकला.
चित्रशाळेचा लढा सुरू राहिला
विष्णुशास्त्र्यांच्या दृष्टीनं निबंधमाला - केसरी - मराठा ही नियतकालिकं, न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा आणि शिळाप्रेसवर छापलेली चित्रं यांचा लोकजागृती हा उद्देश समान होता. 'निबंधमाले’च्या सहाव्या वर्षाच्या पहिल्या अंकात त्यांनी लिहिलं - "आमच्या वाचकांपैकी कित्येंकास माहीत असेलच की, ’काव्येतिहासा’च्या तिसर्या अंकांत नाना फडणवीसाची लहानशी रंगीत तजबीर घातली होती तो चित्रशाळेचा आरंभ होय. तेव्हांपासून सुधारणा होतां होतां हल्ली रामपंचायतन, शिवपंचायतन येथपर्यंत मजल येऊन ठेपली आहे. या तजबिरीचें काम कोणत्या तर्हेचे झालें आहे हें आह्मीं स्वत: सांगायची आज गरज उरली नाही.
हजारों प्रती उडून दूरदूरच्या गांवांहूनहि त्यांजविषयीं प्रतिदिवशी मागण्या येत आहेत. असो; या उद्योगाच्या संबंधानें आमच्या वाचकांस विशेषेंकरून एवढीच एक गोष्ट कळवायाची आहे की, आमच्या इतिहासप्रसिद्ध पुरुषांच्या मूर्ति चिरकाळ रहाव्या एवढ्याकरितां मुळी हा कारखाना आह्मी काढला, व हल्लीं वरील तजबिरी जेवढ्या पैदा झाल्या तेवढ्यांचा आह्मीं संग्रहहि करून ठेवला आहे; तर आमच्या शोधक मित्रांनी आणखी काहीं शोध लागल्यास आह्मांस वरदी द्यावी. वरील ऐतिहासिक मंडळी अवकाशानुसार हातीं घेण्याचा आमचा इरादा आहे."
वयाच्या बत्तिसाव्या वर्षी विष्णुशास्त्री वारले. त्यांच्या मृत्युनंतर छापखान्याच्या मालकीबाबत गुंतागुंतीच्या अनेक घटना घडल्या आणि दोनेक वर्षांत मालकी वासुकाका जोश्यांकडे आली. वासुकाका चित्रशाळेत येण्यापूर्वी निबंधमालेचे व्यवस्थापक होते. तिथे त्यांनी विष्णुशास्त्र्यांचा विश्वास संपादन केला होता. ते विष्णुशास्त्र्यांचे शिष्य आणि टिळकांचे सहकारी होते. विष्णुशास्त्री हयात असेपर्यंत वासुकाकांचा संबंध चित्रशाळेशी कधी आला नव्हता. पण त्यांनी चित्रशाळेला प्रगतीपथावर नेलं.

फोटो स्रोत, Kirloskar Brothers Limited
त्यांनी विविध विषयांवर चित्रं तयार करवून घेतली. इच्छाराम नावाचे उजवा हात नसलेले एक चित्रकार चित्रशाळेत होते. त्यांच्या शिफारशीवरून नारायणदास नावाचे एक चित्रकार वासुकाकांनी नोकरीस ठेवले.
या दोघांनी व पुढे इतर चित्रकारांनी सरस्वती, लक्ष्मी, विश्वामित्र - मेनका, रंभा, अहिल्या, दमयंती, गुरू नानक, छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप, पृथ्वीराज चौहान, छत्रपती संभाजी महाराज, कोल्हापूरच्या राणीसाहेब ताराबाई, थोरले बाजीराव साहेब, राघोबादादा, जयाजीराव शिंदे, अहिल्याबाई होळकर, चांदबिबी, शाह आलम, हैदर आली, सर सालारजंग, जहांगीर, हरीतात्या फडके, बडोद्याचे सयाजीराव महाराज, महादेव गोविंद रानडे, दयानंद सरस्वती अश्या अनेक तसबिरी रेखाटल्या. महाराष्ट्र आणि उत्तर भारत या प्रदेशांत आवडतील अशी ही चित्रं होती.
भवानी माता छत्रपती शिवरायांना तलवार देत आहे, गजेन्द्रमोक्ष, शकुंतलेचं पत्रलेखन, गंगावतरण, सीताहरण, भरतभेट, हरीहरभेट असे प्रसंगही रेखाटले गेले. या तसबिरी दिवाणखान्यात टांगल्या जात असल्या तरी त्यांचा उद्देश लोकांना धर्म, शौर्य, आणि साहस यांचा विसर पडू न देणं, हाही होता. म्हणूनच जहांगीर, शाह आलम, हैदर अली यांच्याही तसबिरी तयार केल्या गेल्या. चित्रशाळेच्या दृष्टीनं तेही भारतीयच असावेत. ब्रिटिश बाहेरचे.

फोटो स्रोत, Chitrashala Press
या तसबिरींचे रंग, कंपोझिशन अतिशय मोहक आहेत. त्या काळी शिळाप्रेसवर चित्रं छापणं सोपं नव्हतं. फक्त चित्रकार उत्तम असून भागत नसे. शिळेवर ती चित्रं हुबेहूब उठवावी लागत. मूळ चित्रात जितके रंग असत, तितक्या रंगांचे दगड तयार करावे लागत. हे काम करायला दृष्टी, हात चांगले असावे लागत. प्रत्येक रंगाचं रजिस्टर जमवावं लागे. शाई उत्तम प्रतीची लागी. हलक्या शाईनं चित्र मलूल दिसत. मात्र वासुकाकांनी चित्रांचा दर्जा कमी होऊ दिला नाही. चित्रशाळेत स्टीम प्रेस आला. नंतर ऑइल इंजिन आलं. छपाईच्या तंत्रात प्रगती झाल्यावर रामपंचायतनाच्या चित्रातही बदल झाले.
कलकत्ता आणि पुणे इथे छापल्या जाणार्या चित्रांची लोकप्रियता पाहून काही अमेरिकी आणि युरोपीय चित्रकारांनी देवादिकांची, भारतातल्या सृष्टिशोभेची चित्रं भारतात येऊन विकायला सुरुवात केली. मात्र ही चित्रं लोकांनी फारशी स्वीकारली नाहीत.
'नेटिव्ह ओपीनियन’सारख्या वर्तमानपत्रांतून ललितकलाभ्युदयैषी अशी टोपणनावं घेणार्या रसिकांनी 1889 साली स्वदेशी चित्रंच विकत घेण्याचं आवाहन तर केलंच, शिवाय परदेशी चित्रांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी चित्रशाळेच्या मॅनेजरांनी चित्रांच्या ’फॉर्म’ व ’प्रपोर्शन’कडे जरा अधिक काळजीपूर्वक लक्ष देण्याचं सुचवलं.

फोटो स्रोत, Chitrashala Press
पुण्यातल्या बहुतेक सर्व सामाजिक घडामोडींमध्ये वासुकाकांचा सहभाग असे. चहा प्रकार असो, किंवा गर्दभविवाह, पंडिता रमाबाईंविरुद्धचा प्रचार असो किंवा तुळशीबागेतली सभा, वासुकाका या घडामोडींमध्ये गुंतलेले असत. त्यांनी अनेकदा सशस्त्र क्रांतिकार्यांना मदत केली होती.
महाराष्ट्रीय सुधारकांशी आणि जहाल नेत्यांशी त्यांचे उत्तम संबंध होते. शस्त्रांचा कारखाना उघडण्यासाठी ते नेपाळला जाऊन आले होते. रॅंडच्या खुनानंतर ते भूमिगत झाले होते. छत्र्यांच्या सर्कशीबरोबर ते चीन आणि जपान इथे गेले होते. चीनच्या राणीला त्यांनी हत्ती भेट दिला, असं सांगतात.
अमेरिकेत ते लाला हरदयाळांना भेटले. त्यामुळे सरकारी रोष पत्करून चित्रशाळेच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिशांविरुद्धचा आपला लढा सुरू ठेवला. चित्रांचे विषय आणि वासुकाकांचे राजकीय विचार आणि कारवाया यांमुळे चित्रशाळेवर सरकारची गैरमर्जी असे. अनेकदा झडतीचे प्रसंग आले. त्यामुळे सरकारी पाठ्यपुस्तकांच्या छपाईची फारशी कामं मिळाली नाहीत. परिणामी पैसे मिळवायला तसबिरी आणि इतर पुस्तकांवर कायम अवलंबून राहावं लागलं.
चित्रशाळेनं अनेक महत्त्वाची पुस्तकं छापली. कृष्णशास्त्री चिपळूणकरांचं ’अरबी भाषेतील सुरस गोष्टी’, इतिहासाचार्य राजवाड्यांच्या मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांचे आणि कागदपत्रांचे खंड, राजवाड्यांच्या ऐतिहासिक प्रस्तावना, शाळिग्रामांचे लावणी-संग्रह, भिड्यांचा सरस्वती-कोश, नाट्याचार्य खाडिलकरांची नाटकं, लोकमान्य टिळकांचं ’गीतारहस्य’ चित्रशाळेनं छापली.
1910 साली प्रेस ऍक्टचा अंमल सुरू झाल्यावर चित्रशाळेनं पोस्टकार्डांवर चित्रं छापून वसाहतवादाला आपला विरोध सुरू ठेवला. पिंजर्यात ठेवलेले पक्षी, वाघ - सिंह अशी ही चित्रं होती. पारतंत्र्याविरुद्ध लोकमत तयार करण्याचा तो एक मार्ग होता.
टिळकांच्या मृत्यूनंतर वासुकाका गांधींचे अनुयायी बनले. चित्रशाळेला ’कट्टर गांधाळांचा अड्डा’ म्हटलं जाऊ लागलं. चित्रशाळेचा चित्रांद्वारे लढा सुरूच राहिला.
रामपंचायतनाचं कलेतलं योगदान
वासुकाकांच्या मृत्यूनंतर जानेवारी 1944 मध्ये ज्ञानप्रकाशा’नं त्यांचा ’शिलामुद्रणमहर्षि’ असा गौरव करून लिहिलं - "आज मुद्रणव्यवसायात फार प्रगति झाली आहे. शिलामुद्रण व्यवसायाचा महाराष्ट्रातलाच काय, पण पूर्ण भारतातला इतिहास बघितला, तर स्वदेशी चित्रकलेला शिलामुद्रणाचे संस्कार करून मोठ्या प्रमाणावर राष्ट्राभिमानोत्तेजक, ऐतिहासिक, पौराणिक, आणि कलात्मक रंगीत चित्रांचा प्रसार आणि पुरवठा करण्याची आद्य कामगिरी पुण्याचा चित्रशाळेने बजावली.
मराठेशाहीतील आणि पेशवाईतल्या रणधुरंधरांची, राजकारणप्रवीण नामवंत मुत्सद्द्यांची आणि ऐतिहासिक संस्मरणीय प्रसंगांची रंगीत चित्रे प्रथम मुद्रित करून स्वदेशाच्या इतिहासाबद्दल आदर आणि अभिमान यांचे संवर्धन करण्याच्या कामी चित्रशाळेने केलेली देशसेवा संस्करणीय आहे."
या सर्व घडामोडींत रामपंचायतनाची छपाई दरवर्षी होतच होती. ‘किर्लोस्कर’ मासिकानं फेब्रुवारी 1943 मध्ये वासुकाकांवर एक लेख लिहिला, तेव्हा रामपंचायतनाचा विशेष उल्लेख करून एक चढाओढ जाहीर केली. हे चित्र छापून पासष्ट वर्षं उलटली तरी अजूनही लोकप्रिय का, या विषयावर मतं मागवण्यात आली.

फोटो स्रोत, Chitrashala press
या चढाओढीत पहिलं बक्षीस कोल्हापूरच्या दिनकर द. पाटील यांना मिळालं. त्यांनी लिहिलं होतं - "भिवा सुतारांचे रामपंचायतन ही अमर कलाकृती आहे. तरीहि ज्यांनी चित्रशाळेचें बस्तान बसवण्यास हातभार लावला, त्यांत इतर देवतांचीहिं चित्रें आहेर ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यावरून देवाविषयीची आपल्या समाजाची भक्तीच अधिक नजरेस येते. पण केवळ भक्तिभावामुळेच तें चित्र अधिक लोकप्रिय झालेलें नाही.
भक्तीला जवळचा दुसरा भाव प्रीति हा आहे. तिचीहि मुग्धता त्या चित्रांत भरपूर आहे. म्हणजे या दोन्ही भावांचा स्थायीभाव रति - जो मनुष्याच्या ठिकाणीं प्रभावी आहे - त्यामुळेच तें चित्र इतकें लोकप्रियता पावलें आहे."
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस कलकत्ता आणि पुणे ही दोन शहरं छापील तसबिरींच्या निर्मितीची मोठी केंद्रं होती. मात्र कलकत्ता आणि पुणे ही दोन शहरं एकमेकांपेक्षा अनेक बाबतींत वेगळी होती. कलकत्ता हे वसाहतीच्या राजधानीचं शहर होतं. आधुनिक होतं. तिथला एक मोठा वर्ग वसाहतवादी सरकारशी संबंध ठेवून होता.
पुण्यात मात्र पेशवाई बुडाल्याच्या जखमा अद्याप भरल्या नव्हत्या. एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्राच्या प्रबोधनाचं पुणे एक महत्त्वाचं केंद्र होतं. चित्रशाळेनं या प्रबोधनात महत्त्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्रीय चित्रकलेला तिनं पोसलंच, शिवाय चित्रकलेचा ब्रिटिशांविरुद्ध भावना जागृत करण्यासाठी उपयोगही केला. भारतीय लोकांमध्ये चित्रांची, चित्रकलेची आवड निर्माण केली. रामपंचयतनाच्या चित्रांचं या कामातलं योगदान विसरता कामा नये.











