राम मंदिर: 72 एकर जमीन असूनही फक्त 2.7 एकर जमिनीवरच मंदिर का तयार केले?

फोटो स्रोत, ANI
- Author, अमरेंद्र यरलागट्टा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.
साधू-संत आणि विशेष अतिथी यासाठी अयोध्येत पोहोचले आहेत. राम जन्मभूमी ट्रस्टकडून त्यांच्या व्यवस्थेसाठी तीर्थक्षेत्र पुरम नावाचं एक तात्पुरतं शहरच वसवण्यात आलं आहे.
विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त सचिव कोटेश्वर शर्मा हे यांना तीर्थक्षेत्र पुरमचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.
शर्मा हे तीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून अयोध्येशी संलग्न आहेत.
राम मंदिराच्या कामावर जवळून लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या ते प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या कामातही व्यस्त आहेत.
यादरम्यान कोटेश्वर शर्मा यांनी राम मंदिराचं निर्माण कार्य आणि त्याची वैशिष्ट्ये, राममूर्तीची निवड याबाबत बीबीसी बरोबर चर्चा केली.
प्रश्न : तुम्ही राम मंदिराच्या वास्तूची स्थापत्यरचना आणि वैशिष्ट्यांबद्दल काय सांगाल?
कोटेश्वर शर्मा : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारनं स्थापन केलेल्या यंत्रणेच्या (फाऊंडेशन) माध्यमातून राम मंदिर निर्मितीचं काम पूर्ण करण्यात आलं आहे. या मंदिरच्या निर्मितीच्या कामासाठी आणि व्यवस्थापनासाठी मंदिर ट्रस्ट समिती जबाबदार आहे.
हे मंदिर उत्तर भारतीय शैलीमध्ये तयार करण्यात आलं आहे. सोमनाथ आणि द्वारका येथील मंदिरंही याच शैलीतील आहेत.

अयोध्येच्या मंदिराचं डिझाईन चंद्रकांत सोमपुरा यांनी केलं आहे. त्यांचे वडील आणि आजोबा यांनीही अनेक प्रसिद्ध मंदिरांचं डिझाईन केलं आहे.
या मंदिराचं एक मॉडेल 1991 मध्ये विश्व हिंदू परिषदेच्या सूचनेनुसार तयार करण्यात आलं होतं. त्यानंतर ट्रस्टनं ही जबाबदारी स्वीकारली आणि मूळ मॉडेलमध्ये काही मोजके बदल करत मंदिराची निर्मिती केली.
तसंच सुमारे 2 हजार वर्षांपूर्वी भगवान श्री रामांच्या जन्मस्थळाजवळ जी शरयू नदी वाहत होती. तीच नदी आजही भूमीगत प्रवाही आहे.
या मंदिराचा पाया भूकंरोधक आणि 1000 वर्षांपर्यंत टिकेल अशाप्रकारे तयार करण्यात आला आहे.
कुंभाभिषेक सोहळ्यातील निमंत्रित कोण आहेत आणि त्यांच्यासाठी काय व्यवस्था करण्यात आली आहे?
कोटेश्वर शर्मा : या सोहळ्यात फक्त आमंत्रितांनाच प्रवेश देण्यात आला. मंदिराचं काम पूर्ण झालेलं नाही, त्यामुळं याठिकाणी उपलब्ध असलेल्या जागेनुसार या सोहळ्यात फक्त 8000 पाहुण्यांनाच आमंत्रित करण्यात आलं आहे.
यात 4000 साधूंचा समावेश आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मंदिराच्या निर्मितीत सहभागी असलेले कामगार यांच्याबरोबरच देशभरातील बड्या हस्ती आणि सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आलं आहे.
साधू आणि त्यांच्यासोबत असणाऱ्यांसाठी टेंट सिटीमध्ये तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, CHAMPAT RAI
अयोध्या आणि फैजाबाद परिसरात सेलिब्रिटी आणि इतरांची राहण्याची व्यवस्था हॉटेल, आश्रम आणि गेस्ट हाऊसमध्ये करण्यात आली आहे.
अयोध्येमध्ये येणाऱ्या सामान्य भाविकांसाठीही भोजन तसंच राहण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
19 तारखेपासून सध्याच्या मंदिरातील दर्शन बंद करण्यात आलं होतं. तिथून मूर्ती नव्या मंदिरात स्थलांतरीत करण्याचे विधी सुरू करण्यात आले.
प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतरही फक्त पाहुण्यांनाच दर्शनाची परवानगी असणार आहे.
मंगळवारी 23 जानेवारीला सकाळपासून सामान्य भाविकांना दर्शनाची परवानगी दिली जाईल.
राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडं 72 एकर जमीन असूनही फक्त 2.7 एकरच्या कोपऱ्यात मंदिर का तयार केलं आहे?
कोटेश्वर शर्मा : सगळ्याच जागेवर बांधकाम करण्यात आलेलं नाही. श्री रामांचा जन्म याच 72 एकर परिसरात नैऋत्य दिशेला झाला होता. त्याठिकाणी एक मंदिर तयार होत आहे. त्याचबरोबर याठिकाणी इतर मंदिरं आणि उपमंदिरंही तयार केली जाणार आहेत.
सर्वात आधी मंदिरावर लक्ष केंद्रीत करून त्याचं काम पूर्ण केलं जात आहे.
त्यानंतर उर्वरित जागेवर भाविकांसाठी सोयीसुविधा, अन्नधन मंडप आणि संग्रहालयही तयार केलं जाणार आहे.
प्राण प्रतिष्ठेसाठी 22 जानेवारीचीच निवड का केली?
कोटेश्वर शर्मा : ज्योतिष शास्त्र आणि अगम शास्त्रांनुसारच सर्वश्रेष्ठ मुहूर्ताची निवड केली जाते.
त्यानुसार यातील तज्ज्ञांनी 22 तारखेला 12.22 ते 12.40 दरम्यान सर्वांत चांगला मुहूर्त आहे असं सांगितलं होतं.
रामांच्या बाल स्वरूपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा का करण्यात आली?
कोटेश्वर शर्मा : याठिकाणी प्राचीन काळापासून बाल स्वरुपातील रामांची मूर्ती आहे. अयोध्या हे भगवान रामांचं जन्म स्थळ मानलं जातं त्यामुळं त्याठिकाणी बाल स्वरुपातील मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे.
मंदिराच्या भूमजल्यावर श्रीरामांच्या 5 वर्षीय बालक रूपातील या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे.
या मूर्तीची अंदाजे उंची ही साडेचार फूट आहे.
याठिकाणी श्रीरामांच्या ज्या मूर्तींची आधी पूजा केली जात होती त्या मूर्तीही आहेत.
पहिल्या मजल्यावर राम दरबार आहे. राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, भरत आणि शत्रुघ्न यांची पूजा इथं करता येईल.
सूर्य तिलकचा विचार करून मंदिराचं डिझाईन करण्यात आलं आहे. त्यामुळं राम नवमीच्या दिवशी सूर्यकिरणं थेट बाल स्वरूपातील श्री रामांच्या कपाळावर पडतील.
फाऊंडेशननं राम मंदिर सिमेंट आणि लोखंडाचा वापर न करता तयार केल्याचं सांगितलं आहे, त्याचं कारण काय?
कोटेश्वर शर्मा : सर्व प्राचीन मंदिरं दगडांपासून तयार करण्यात आली आहेत. अगदी 1000, 1200, 1500 वर्षांपूर्वी तयार केलेली मंदिरं आजही मजबूत स्थितीत उभी आहेत.
श्रीरंगम, श्रीशैलम आणि रामप्पा मंदिरही दगडांपासून तयार केलेली आहेत.
लोखंड गंजल्यामुळं खराब होऊ शकतं. त्यामुळं मंदिराच्या निर्मितीत लोखंड आणि सिमेंटचा वापर न करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसारच ते तयार करण्यात आलं. सोमनाथ, द्वारका आणि रामेश्वरम मंदिरंही दगडांपासून तयार केलेली आहेत.

फोटो स्रोत, ANI
मंदिराचं काम पूर्ण होण्याआधीच प्राणप्रतिष्ठा केली जात असल्याची टीका होत आहे, विहिंपतर्फे तुम्ही काय सांगाल?
कोटेश्वर शर्मा : राजेंद्र प्रसाद यांनी 1951 मध्ये सोमनाथ मंदिराचं उद्घाटन केलं होतं. त्यावेळीही काम सुरुच होतं.
सर्वकाही आपल्या देशातील वास्तू आणि मंदिरशास्त्रानुसारच होत आहे. काहीही चुकीच्या पद्धतीनं केलं जात नाहीये. संबंधितांनी याबाबत आधीच प्रतिक्रियाही दिली आहे.
हेही नक्की वाचा
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








