अयोध्येत प्राणप्रतिष्ठा होत असताना तिथल्या मुसलमानांना काय वाटतंय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, नितीन श्रीवास्तव
- Role, बीबीसी प्रतिनिधी, अयोध्या
अयोध्येत निर्माण अवस्थेत असलेल्या राम मंदिरात 22 जानेवारी 2024 रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार असून, त्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होणार आहेत.
मंदिराच्या बांधकामावर देखरेख ठेवणाऱ्या राम मंदिर समितीने या भव्य सोहळ्यात सहभागी होण्यासाठी 7,000 साधू-संतांसह 4,000 लोकांना आमंत्रित केलंय.
70 एकरातील राम मंदिर परिसराच्या मागच्या बाजूस असलेल्या कटरा या परिसरातील एका छोट्याशा घरात चार जणांचं कुटुंब दिवसरात्र मेहनत करतंय. कारण प्राणप्रतिष्ठेची तारीख जवळ आलेय.
या घरात अनेक पिढ्यांपासून मिठाईचे बॉक्स बनवले जातात. तिथून ते मिठाईच्या दुकानात पाठवले जातील, जिथे त्यातून प्रसाद विकत घेतला आणि देवाला चढवला जाईल.
बॉक्स बनवणारी फूलजहान अवघ्या 9 वर्षांची होती, जेव्हा 7 डिसेंबर 1992 रोजी संतप्त जमावाने तिच्या घरावर हल्ला केलेला आणि तिचे वडील फतेह मोहम्मद यांची हत्या केली होती.
तो दिवस आठवला की फूलजहान आजही भावूक होते.
एकत्र नांदणाऱ्या संस्कृतींमधील अंतर कसं वाढलं
ती म्हणाली, “मंदिरासाठी मिठाईचे डबे बनवणारे आमचे वडील सर्वसामान्य लोकांपैकीच एक होते. बाहेरच्या लोकांनी त्यांना मारुन टाकल्यानंतर आम्हाला खूप अडचणींचा सामना करावा लागला.
“सध्या आम्ही अयोध्येत निश्चिंत असून आम्हाला कोणतीही अडचण नाही. आता जर एवढा मोठा पल्ला पार केलाय तर भविष्यात जे काही होईल ते तेव्हाचं तेव्हा पाहता येईल. अयोध्येत कधी काही होणार नाही ना, याची भीती असेलच, पण सध्या सर्वकाही आलबेल आहे.”
फुलजहानच्या घरापासून अवघ्या 50 मीटर अंतरावर हफीज-उर-रहमान राहतात. 31 वर्षांपूर्वी झालेल्या दंगलीत एका हिंदू कुटुंबात आश्रय घेऊन त्यांनी आपला जीव वाचवला होता.

फोटो स्रोत, Getty Images
दंगलीत आपला काका आणि मोठा भाऊ गमावलेल्या हफीज-उर-रहमानच्या म्हणण्यानुसार, "त्या घटनेनंतर इथे शांतता नांदतेय, परंतु जेव्हा केव्हा अयोध्येत एखाद्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि लाखोंच्या संख्येने लोकं येतात, तेव्हा आम्हाला भीती वाटते. यावेळीही आम्ही थोडेसे घाबरलेलो आहोत, पण सर्वकाही शांततेच्या वातावरणात पार पडेल अशी आशा आहे.”
16 व्या शतकात बांधलेली आणि अनेक दशकांपासून वादग्रस्त राहिलेली बाबरी मशीद 1992 मध्ये पाडण्यात आली.
यानंतर अयोध्येसह देशातील अनेक भागात उसळलेल्या दंगलीत सुमारे 2000 लोकांचा मृत्यू झालेला.
कायदेशीर लढाई
त्यानंतर हिंदू पक्ष आणि मुस्लिम पक्ष यांच्यात सर्वप्रथम अलाहाबाद उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात एक प्रदीर्घ कायदेशीर लढाई लढली गेली.
बाबरी मशीद ज्या जागेवर बांधलेली ती खरंतर राम जन्मभूमी असून मंदिर पाडून ती बांधण्यात आली आहे, असं हिंदू संघटनांचं मत आहे.

सरतेशेवटी, सर्वोच्च न्यायालयाने (पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने) आपल्या 2019 च्या ऐतिहासिक निकालात, “बाबरी मशीद बेकायदेशीरपणे पाडण्यात आली” असं सांगून, अयोध्येच्या वादग्रस्त जमिनीवर मंदिर बांधण्यात यावं, यावर शिक्कामोर्तब केलं.
न्यायालयाच्या आदेशानुसार अयोध्येपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या धनीपूर येथे नवीन मशिदीसाठी जागाही निश्चित करण्यात आली आहे.
वस्तुस्थिती अशीही आहे की राममंदिर परिसराच्या आजूबाजूला सुमारे डझनभर मशिदी, मदरसे आणि थडगी आहेत, जिथे अनेक शतकांपासून पूजा आणि अजान एकाचवेळी होत आलेय.
त्यापैकी तहरीबाजार जोगीची मशीद मुख्य आहे आणि खानखाहे मुझफ्फरिया, मस्जिद दोराही कुआँ, मस्जिद काझियाना, मस्जिद बदर पंजीटोला, मस्जिद मदार शाह आणि मस्जिद इमामबारा या काही इतर मशिदी आहेत.
अयोध्येतील मुसलमान
सुमारे 30 लाख लोकसंख्या असलेल्या अयोध्या जिल्ह्यात पाच लाख मुस्लिम राहतात, त्यापैकी सुमारे पाच हजार लोक नवीन राम मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात राहणारे आहेत.
प्राणप्रतिष्ठेनंतर दर महिन्याला राम मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या 25 ते 30 लाख असू शकते, असा अंदाज आहे.
जुन्या आठवणी लक्षात घेता अल्पसंख्यांक समाजातील काही लोकांच्या मनात अस्वस्थतासुद्धा आहे.
अयोध्येला लागून असलेल्या फैजाबाद शहरात मोहम्मद खालिक खान यांचं स्टेशनरीचं दुकान असून त्यांच्या अनेक पिढ्या याच शहरात वास्तव्यास होत्या.

ते म्हणाले, “आठ-दहा दिवसांपूर्वीच अयोध्येतून टाटशाह मशिदीत काही लोक आले होते, त्यांचं म्हणणं होतं की इथे आता लोकांची गर्दी होणार आहे त्यामुळे आम्ही घर सोडून जात आहोत. मात्र इथल्या उलेमांनी त्यांना समजावून सांगितलं की, तुम्ही घर सोडून जाऊ नका, आम्ही अधिकाऱ्यांसोबत बोलत आहोत. त्यानंतर काही पोलिसांनीही त्यांना थांबवलं आणि तुम्ही अयोध्या सोडून जाऊ नका आम्ही तुमचे रक्षण करू, असं आश्वासन दिलं.
“आगामी प्राणप्रतिष्ठेपूर्वी अयोध्येतील काही मुसलमान कुटुंब काही दिवसांसाठी बाहेरगावी जात आहेत.” अशा बातम्या येतायत.
स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारने या कार्यक्रमासाठी आणि त्यानंतरच्याही सुरक्षेची तयारी केली असून कुणालाही घाबरण्याची गरज नाही, असं म्हटलंय.
भाजप खासदाराचं आश्वासन
अयोध्येतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे खासदार लल्लू सिंह यांनी बीबीसीला सांगितलं की, “सर्वांचं संरक्षण केलं जाईल आणि अल्पसंख्यांक समुदायातील कोणत्याही व्यक्तीला काळजी करण्याची किंवा घाबरण्याची आवश्यकता नाही."
ते म्हणाले, “अयोध्येतील इतर नागरिकांप्रमाणेच ते इथे राहतात आणि आम्ही परस्पर बंधुभाव जपतो. आपले पंतप्रधान जी काही विकासकामं करत आहेत, ती सर्वांसाठी उपयुक्त असणार आहेत. त्याचा अमुक धर्माला जास्त लाभ झाला आणि तमुक धर्माला कमी लाभ झाला, असं कुणी म्हणता कामा नये. आमच्या संघटनेने आम्हाला कधीही कोणापासून अंतर राखण्यास शिकवलं नाही, कारण प्रत्येकजण भारताचा नागरिक आहे.”

काही आठवड्यांपूर्वी आम्ही राम मंदिरापासून फक्त 100 मीटर अंतरावर बांधलेल्या एका मोठ्या मदरशात गेलो होतो, तिथे आमचं हाजी हाफिज सय्यद एखलाक यांच्याशी बोलणं झालं.
तेव्हा ते म्हणाले होते, “या परिसराच्या आजूबाजूला अल्पसंख्याक समाजातील लोकांच्या अनेक जमिनी आहेत आणि काही लोकं या संभ्रमात आहेत की त्यांना कधीपर्यंत इथे राहण्याची मुदत आहे.”
गुरुवारी आम्ही त्यांना पुन्हा भेटायला गेलो असता त्यांनी आमच्याशी बोलण्यास नकार दिला आणि गेटवरूनच आम्हाला बाहेर काढत त्यांच्या एका कर्मचाऱ्याने आम्हाला सांगितलं की, ‘हाजी साहेब मीडियाशी बोलणार नाहीत’.
गंगा-जमुना तहजीब
याचवेळी, अयोध्येतील सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष मोहम्मद आझम कादरी यांच्यासोबत आमची भेट झाली, त्यांचं असं मत आहे की, “अयोध्येतील अल्पसंख्याकांना वाटतं की त्यांचं मत विचारात घेतलं जात नाहीय.”
ते म्हणाले, “माझ्याही धार्मिक स्थळांचं नूतनीकरण झालं असतं, तर आम्हालाही आनंदच झाला असता आणि पंतप्रधान सर्व समाजाचे आहेत, कुण्या एकाचे नाहीत या दृष्टीकोनातून गंगा-जमुनी तहजीब म्हणजेच दोन्ही संस्कृतीच्या संगमाकडे पाहिलं गेलं असतं.”
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
“आता कोणत्याही प्रकारे हिंदू-मुसलमान यांच्यात भांडणं लावण्याचा किंवा त्यांच्या आधारावर कोणतंही राजकारण करण्याचा प्रयत्न होता कामा नये, म्हणूनच इथल्या समुदायाला कोणत्याही राजकारणात पडायचं नाहीए आणि त्यांना कोणत्याही प्रकारे राजकारणाचा भाग बनायचं नाहीए. ज्या गोष्टी जिथे आहेत त्या तिथे सुरक्षित राहाव्यात, हीच इथल्या लोकांची इच्छा आहे.”
प्राणप्रतिष्ठेनंतर राम मंदिर तयार होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो.
चोवीस तास बांधकाम सुरू असून भाविकांची गर्दीही वाढतेय.
चौक इमामवाडा जवळ राहणारे हामिद जाफर मीसम हे अयोध्येच्या शिया वक्फ समितीचे अध्यक्ष आहेत आणि ते म्हणतात, “सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला असून आता त्यावर कोणत्याही प्रकारचा वाद नाहीय. धनीपूरमध्ये मशीदही बांधली जात आहे आणि मंदिरही बांधलं जातंय, यावर मुस्लिमांचा कोणताही आक्षेप नाही.
“परंतु 22 जानेवारीच्या निमित्ताने काही माध्यमांनी येथील मुसलमानांना 22 जानेवारीला काय करणार असा प्रश्न विचारणं योग्य नाही. अरे भाऊ, 22 तारखेलाही ते तेच करतील जे ते 21 तारखेला करत होते.”
हेही वाचलंत का?
बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.








