रामसेतू खरंच रामाने बांधला होता, हे रामाच्या काळातलं बांधकाम आहे?

नकाशा

राम-कृष्णांचं, देवाचं अस्तित्त्व असो की रामायण-महाभारताची वस्तुस्थिती...या मुद्द्यांवरून आस्तिक आणि नास्तिक यांच्यात नेहमीच वाद रंगलेले पाहायला मिळतात.

असाच एक वादाचा किंवा चर्चेचा मुद्दा म्हणजे रामसेतू. काहीजण मानतात की, रामसेतूची निर्मिती रामानेच केलीय, तर काही जणांच म्हणणं आहे की हा सेतू समुद्रात नैसर्गिकरित्या तयार झालाय.

हा रामसेतू तामिळनाडूच्या पंबन बेट आणि श्रीलंकेतील मन्नार बेट यांच्यामधील सामुद्रिक रचना आहे.

दक्षिणेत या सेतूला 'रामसेतू' याचं नावाने ओळखलं जातं, तर श्रीलंकेत याला 'अडंगा पालम' किंवा 'अॅडम्स ब्रिज' असंही म्हणतात.

याच विषयावर अक्षय कुमारचा 'रामसेतू' चित्रपट आला होता. या चित्रपटात रामसेतूचं महत्व, त्यामागची कथा आणि जे नरेटिव्ह आहे त्यामुळे रामसेतू कोणी बांधला या मुद्द्याला हवा मिळाली होती.

अक्षय कुमारच्या रामसेतूचं पोस्टर

फोटो स्रोत, Twitter

या चित्रपटाची कथा एका नास्तिक पुरातत्वशास्त्रज्ञाभोवती फिरते. रामसेतू नक्की रामाच्या काळातच बांधलाय का? याचं उत्तर शोधण्यासाठी तो शोधमोहीमेवर निघतो.

या चित्रपटामुळे रामसेतू नेमका बांधला कधी? त्याची निर्मिती कोणी केली? असे बरेच प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. मात्र त्या पाठीमागची हिंदू श्रद्धा काय सांगते आणि संशोधन काय सांगतं हे पाहूया...

रामसेतू 17 लाख वर्ष जुना....

रामायणात रामसेतू बांधल्याचं वर्णन करण्यात आलंय.

रावणाने सीतेचं हरण केलं होतं. सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी रामाला लंकेला जायचं होतं. त्यावेळी रामाच्या वानरसेनेने हा दगडी सेतू बांधला अशी धारणा आहे.

बऱ्याच पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते, हा सेतू 17 लाख वर्षे जुना असावा.

सुमारे 3 किलोमीटर रुंद आणि 30 मैल लांबीचा हा सेतू नक्की बांधला कसा हे मात्र आजवर न उलगडलेलं कोडं आहे.

सेतू कसा बांधला यासंबंधीच्या धारणा बऱ्याच आहेत, मात्र याला कोणता आधार किंवा पुरावा नाही.

रामसेतू नकाशा

दगडी बांधकाम असलेल्या या सेतूची निर्मिती कशी झाली, याचं रहस्य उलगडण्यासाठी बरीच संशोधनंही झाली.

यातल्या काही शास्त्रज्ञांना वाटतं की, जेव्हा प्रवाळ आणि सिलिका दगड गरम होतात तेव्हा त्यांच्यात हवा जाते. आणि मग हे दगड हलके होतात आणि पाण्यावर तरंगू लागतात. अशाच दगडांनी मिळून नैसर्गिकरित्या हा सेतू निर्माण झालाय.

या सेतूच्या आजूबाजूला मोठ्या लाटा येत असतात.

2004 साली जेव्हा त्सुनामी आली तेव्हा या रामसेतूचे काही दगड रामेश्वरम परिसरात सापडल्याचं सांगितलं जातं.

या भागात आजही बरेच तरंगणारे दगड सापडतात. खास हे दगड पाहण्यासाठी लोक रामेश्वरमला जातात.

नासाने या संरचनेवर बरीच वर्षे संशोधन केलं. त्यांनी सॅटेलाईट फोटो काढल्यावर त्यात 30 मैल लांब दगडांचे ढीग दिसले. पण हा सेतू मानवनिर्मित आहे असं नासाने कधीच म्हटलेलं नाही.

अशक्यप्राय अशी मानवनिर्मित संरचना

अमेरिकेतील एका सायन्स चॅनलने 2017 च्या डिसेंबर महिन्यात म्हटलं होतं की, 30 मैल लांबीचा जो सेतू आहे तो मानवनिर्मित आहे. त्यानंतर पुन्हा एकदा 'रामसेतू कोणी बांधला' या वादाला तोंड फुटलं.

पुरातत्व विभागाचे डॉ.अ‍ॅलन लेस्टर सांगतात की, रामसेतू नैसर्गिकरीत्या तयार झालेला नाही. त्यात असलेली वाळू नैसर्गिकरित्याच आलेली आहे. मात्र त्यावर जे दगड टाकलेत ते दुसऱ्या ठिकाणाहून गोळा करून आणलेत.

रामसेतू प्रतीकात्मक फोटो

वाळू जवळपास 4 हजार वर्षे जुनी आणि दगड 7 हजार वर्षे जुने असल्याचं संशोधनातून समोर आलंय असं त्यांनी सांगितलं.

या अमेरिकन सायन्स चॅनलच्या भाषेत सांगायचं तर ही एक प्रकारची अशक्यप्राय अशी मानवनिर्मित संरचना आहे.

पण हे दगड तिथं आणले कोणी? या दगडांमागे एखादं रहस्य लपलंय का? हे खरं तर एक रहस्यचं आहे.

राम सेतू आणि राजकीय वाद

मागच्या काही वर्षांपासून या रामसेतूच्या मुद्द्यावरून राजकीय वाद होत असल्याचंही चित्र आहे.

यूपीए सरकारने 2005 मध्ये, 'सेतू समुद्रम' जहाज कालवा या प्रकल्पाला मान्यता दिली होती.

सेतू समुद्रम
सेतू समुद्रम

मात्र हा रस्ता तयार करण्यासाठी राम सेतू तोडावा लागणार असल्याने हिंदू संघटनांनी त्याला विरोध केला.

सोबतच भारत आणि श्रीलंकेतील पर्यावरणवाद्यांनीही सागरी पर्यावरणाची हानी होईल अशी चिंता व्यक्त करत विरोध केला.

आणि हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला..

या प्रकल्पाविरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.

यावर काँग्रेसने आपल्या याचिकेत म्हटलं होतं की, 'रामायणात नमूद केलेल्या गोष्टींना कोणताही वैज्ञानिक आधार नाहीये.' त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं.

रामसेतू नकाशा

पुरातत्व विभागानेही काँग्रेसने केलेल्या युक्तिवादाची बाजू घेतली. तेव्हापासून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होतं.

नंतर 2018 मध्ये केंद्र सरकारने सांगितलं की, या प्रकल्पासाठी ते रामसेतू तोडणार नाहीत.

दुसरीकडे भाजपचे माजी नेते सुब्रमण्य स्वामी यांनी या सेतूला हेरिटेज वास्तू म्हणून मान्यता देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

सरतेशेवटी धर्म आणि आस्था यांच्यात जो संघर्ष सुरू आहे, त्यात रामसेतू आजही केंद्रस्थानी आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)