दारा शिकोह : भारत सरकार का शोधतंय या मुघल शहजाद्याची कबर?

दारा शिकोह

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दारा शिकोह
    • Author, शकील अख्तर
    • Role, बीबीसी उर्दू प्रतिनिधी, नवी दिल्ली

भारत सरकार सतराव्या शतकातील मुघल शहजादा दारा शिकोहची कबर शोधतंय. मुघल बादशाह शाहजहानच्या काळातील इतिहासकारांचं लेखन आणि काही कागदपत्रांवरून दारा शिकोहला दिल्लीत हुमायूं मकबऱ्याशेजारीच दफन केलं असावं, असा अंदाज आहे.

दारा शिकोहची कबर शोधण्यासाठी मोदी सरकरने पुरातत्त्व शास्त्रज्ञांची एक समिती स्थापन केली आहे. ही समिती साहित्य, कला आणि वास्तुकला यांच्या आधारे दाराची कबर शोधण्याचा प्रयत्न करतेय.

दारा शिकोह बादशाह शहाजहान यांचे थोरले चिरंजीव होते. मुघल परंपरेनुसार वडिलांनंतर खरंतर तेच उत्तराधिकारी होते.

मात्र, शाहजहान आजारी पडल्यानंतर त्यांचे तिसऱ्या क्रमांकाचे चिरंजीव औरंगजेबने त्यांना सिंहासनावरून पायउतार करत आग्र्यात कैद केलं. त्यानंतर औरंगजेबने स्वतःला बादशाह घोषित केलं आणि सिंहासनाच्या लढाईल थोरला भाऊ दारा शिकोहला हरवून त्यालाही कैद केलं.

हुमायूं

फोटो स्रोत, Getty Images

शाहजहान यांचे शाही इतिहासकार मोहम्मद सालेह कम्बोह लाहोरी 'शाहजहान नामा' या आपल्या पुस्तकात लिहितात, "शहजादा दारा शिकोहला अटक करून दिल्लीला आणण्यात आलं. त्यावेळी त्यांच्या अंगावर मळलेले कपडे होते. इथून त्यांना अत्यंत वाईट पद्धतीने एखाद्या बंडखोराप्रमाणे हत्तीवर बसवून खिजराबादला नेण्यात आलं. काही काळ त्यांना एका छोट्याशा आणि अंधाऱ्या जागी ठेवण्यात आलं. यानंतर काही दिवसातच त्यांच्या मृत्यूचा आदेश काढण्यात आला."

ते लिहितात, "काही जल्लाद त्यांचा खून करण्यासाठी कारागृहात गेले आणि क्षणात त्यांच्या गळ्यावर वार करत त्यांचा खून केला. त्यानंतर त्याच मळक्या आणि रक्ताने माखलेल्या कपड्यांमध्ये त्यांचं पार्थिव हुमायूंच्या मकबऱ्याशेजारी दफन करण्यात आलं."

त्याच काळातले आणखी एक इतिहासकार मोहम्मद काजिम इब्ने मोहम्मद अमीन मुंशी यांनीही आपल्या 'आलमगीर नामा' या पुस्तकात दारा शिकोहच्या कबरीचा उल्लेख केला आहे.

ते लिहितात, "हुमायूंच्या मकबऱ्यात बादशहा अकबरचे चिरंजीव दानियाल आणि मुराद यांचं पार्थिव ज्या घुमटाखाली दफणवण्यात आलं होतं त्याच ठिकाणी दाराचं पार्थिवही दफन करण्यात आलं. पुढे तैमूर वंशाचे शहजादे आणि शहजाद्यांनाही याच ठिकणी दफन करण्यात आलं होतं."

अहमद नबी खान या पाकिस्तानी स्कॉलरने 1969 साली लाहोरमध्ये 'दिवान-ए-दारा दारा शिकोह' या त्यांच्या शोधनिबंधात दाराच्या कबरीचा एक फोटो प्रकाशित केला होता.

त्यांच्या म्हणण्यानुसार वायव्येकडच्या कक्षातील तीन कबरी पुरुषांच्या आहेत. त्यातली दरवाज्याकडे असणारी कबर दारा शिकोहची आहे.

शिरीन मौसवी
फोटो कॅप्शन, शिरीन मौसवी

दारा शिकोहची कबर ओळखणं का आहे कठीण?

हुमायूं यांच्या विशाल मकबऱ्यात हुमायूं व्यतिरिक्त अनेकांच्या कबरी आहेत. यापैकी मकबऱ्याच्या मध्यभागी स्थित कबर हुमायूंची असल्याची खात्रीशीर माहिती आहे.

अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील इतिहासकार प्राध्यापिका शिरीन मौसवी म्हणतात, "हुमायूं यांच्या मकबऱ्यातील कुठल्याच कबरीवर शिलालेख नाही. त्यामुळे कोणती कबर कुणाची याची माहिती मिळू शकत नाही."

दाराच्या कबरीचा शोध घेण्यासाठी सरकारने पुरातत्त्व शास्त्रज्ञांची जी समिती स्थापन केली आहे त्यात पुरातत्त्व विभागाचे माजी प्रमुख डॉ. सय्यद जमाल हसन यांचाही समावेश आहे.

ते म्हणतात, "इथे जवळपास दीडशे कबरी आहेत. त्यांची ओळख अजून पटलेली नाही. त्यासाठीचा हा पहिला प्रयत्न आहे."

ते म्हणतात, "आम्ही हुमायूं यांच्या मकबऱ्याच्या मुख्य घुमटाखालच्या खोलीतल्या कबरींचं निरीक्षण करू. त्या कबरींचे डिझाईन्स तपासू. कुठे काही लिहिलं आहे का, तेही बघू. कला आणि वास्तुकलेच्या दृष्टीकोनातून दाराची कबर शोधण्याचा प्रयत्न करू."

मात्र, हे काम अवघड असल्याचं ते म्हणतात.

हुमायूं

सरकारला कबरीचा शोध घेण्याचं कारण काय?

दारा शिकोह शहाजहान यांचे उत्तराधिकारी होते. साम्राज्यासोबतच तत्त्वज्ञान, सुफी विचारधारा आणि आध्यात्मावरही ज्याची पकड असेल, असा बादशहा होण्याची त्यांची इच्छा होती.

त्यांच्याविषयी जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार ते त्याकाळातील प्रमुख हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिस्ती आणि मुस्लिम सुफी धार्मिक नेत्यांशी चर्चा करत. इस्लामसोबतच हिंदू धर्मातही त्यांना बराच रस होता. ते सर्वच धर्मांना समान वागणूक द्यायचे.

त्यांनी वाराणासीहून धर्मपंडितांना बोलावून त्यांच्या मदतीने 'उपनिषदांचं' फारसी भाषांतर करवून घेतलं.

उपनिषदांचं हे फारसी भाषांतर युरोपपर्यंत पोहोचलं. तिथे लॅटिन भाषेत त्यांचं भाषांतर करण्यात आलं. लॅटिनमध्ये भाषांतरीत झाल्याने भारतीय उपनिषदांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली.

भारतात 'उदार शहजादा' अशी दारा शिकोहची ख्याती आहे. औरंगजेबऐवजी दारा शिकोह मुघल सल्तनतीचे बादशाह झाले असते तर देशाची परिस्थिती आज खूप वेगळी राहिली असती, असं काही इतिहासकार आणि विचारवंतांना वाटतं.

या इतिहासकारांना औरंगजेब 'कठोर, कट्टरपंथी आणि भेदाभाव करणारा मुस्लीम बादशाह' वाटतो.

त्यांच्या मते औरंगजेब हिंदूंचा द्वेष करायचे आणि त्यांनी अनेक मंदिरं उद्ध्वस्त केली. हा समज आजच्या राजकीय परिस्थितीत अधिक बळकट होताना दिसतोय.

बीबीसीने ज्या इतिहासकारांसी बातचीत केली त्यांच्या मते औरंगजेब यांच्या उलट दारा शिकोहवर हिंदू धर्माचा प्रभाव होता आणि ते हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेचा आदर करायचे.

हिंदुत्त्ववादी संघटना असलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपने भारतावर मुस्लिम शासकांनी जवळपास सात शतकं केलेलं साम्राज्य म्हणजे 'हिंदुंच्या गुलामगिरीचा काळ होता', असं म्हटलं आहे.

भारत सरकार का शोधतंय या मुघल शहजाद्याची कबर?

फोटो स्रोत, Oxford

आधुनिक काळात मुस्लिम शासकांच्या काळाचा विशेषतः मुघल शासकांचा आणि तत्कालीन घटनांचा कायमच भारतातील मुस्लिमांविरोधात द्वेष निर्माण करण्यासाठी वापर केला जातो.

आता एक असं नॅरिटिव्ह तयर करण्याचा प्रयत्न सुरू आहे की, आजच्या मुस्लिमांच्या तुलनेत दारा शिकोह भारतीय मातीशी अधिक एकरुप होते.

भारत सरकार दाराच्या कबरीचं काय करणार?

दारा शिकोह एक आदर्श आणि उदार व्यक्तिमत्त्व होतं, असं मोदी सरकारला वाटतं. त्यामुळे दाराला मुस्लिमांचा आदर्श बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी दारा शिकोहच्या कबरीचा शोध लागल्यानंतर धार्मिक सद्भावनेचा एखादा वार्षिक उत्सव किंवा कार्यक्रम आखला जाण्याचीही शक्यता आहे.

सत्ताधारी भाजपचे नेते सैय्यद जफर इस्लाम म्हणतात, "दारा शिकोह असं व्यक्तिमत्त्व होतं ज्यांनी सर्व धर्मांचा अभ्यास केला आणि एक शांतता मोहीम राबवली. सर्व धर्मांना एकत्र घेऊन चालण्यावर त्यांचा विश्वास होता. त्यांना याची किंमतही चुकवावी लागली. आजच्या मुस्लीम समाजातही दारांसारखे विचार आणि आकलनक्षमतेची गरज आहे."

दारा शिकोहला मुस्लिमांसाठी आदर्श म्हणून सादर करण्याचा विचार भारतातील मुस्लिमांना इथले धर्म आणि इथल्या चालीरिती यांच्यात पूर्णपणे मिसळता आलं नाही आणि ते त्यांचा स्वीकारही करू शकलेले नाही, या समजावर आधारित आहे.

मात्र, काही टीकाकार दारा शिकोहला त्यांची उदारता आणि धार्मिक सलोख्याच्या विचारांसाठी केवळ मुस्लिमांचा नव्हे तर संपूर्ण देशाचा रोल मॉडेल का करू नये, असा सवालही विचारतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)