औरंगजेब बादशहा सहिष्णू होता? अमेरिकन इतिहासकाराचा दावा

फोटो स्रोत, Oxford
- Author, मिर्झा एबी बेग
- Role, बीबीसी उर्दू, प्रतिनिधी
अमेरिकन इतिहासकार ऑड्री ट्रश्की म्हणतात की तमाम मुघल बादशहांपैकी औरंगजेबबदद्ल लोकांमध्ये विशेष उत्सुकता आहे, कारण त्याच्याविषयी समाजात अनेक गैरसमज आहेत.
मुघल आणि मराठा इतिहासावर अनेक ग्रंथ लिहिणारे प्रसिद्ध इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांचा औरंगजेबला पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता तर जवाहरलाल नेहरूंचा दृष्टिकोन वेगळा होता.
याशिवाय शहीद नईम यांनीही औरंगजेबच्या धार्मिक वृत्तीवर गरजेपेक्षा जास्त भर दिला. 'औरंगजेब, मॅन अँड मिथ' या पुस्तकाच्या लेखिका ऑड्री ट्रश्की यांनी औरंगजेब सहिष्णू होता असा दावा केला आहे.
ऑड्री ट्रश्की यांनी बीबीसीला सांगितलं की जर सहिष्णुतेच्या चष्म्यातून पाहिलं तर इतिहासातले सगळे प्रशासक असहिष्णू होते.
ऑड्री ट्रश्की सांगतात की औरंगजेबाबद्दल गैरसमज जास्त प्रमाणात आहे. त्या गैरसमजुतींना हवा देणं सध्याच्या मुस्लिमांसाठी नुकसानदायी ठरत आहे.
लेखिकेच्या मते भारतात असहिष्णुता वाढत आहे. त्यांना वाटतं की कदाचित याच कारणामुळे हैदराबादमध्ये त्यांचं व्याख्यान रद्द करण्यात आलं होतं.
मुस्लीम सणांविरुद्ध कडक धोरण
ऑड्री सांगतात की असं असूनसुद्धा औरंगजेब बादशाहाच्या काळातले ब्राह्मण आणि जैन लेखक औरंगजेबची स्तुती करतात. त्यांनी जेव्हा महाभारत आणि रामायण या ग्रंथांचा पारशी भाषेत अनुवाद केला तेव्हा त्यांनी तो औरंगजेबला समर्पित केलं.
ऑड्री यांना आपल्या पुस्तकात लिहिलं आहे की औरंगजेबने जर होळीच्या सणाविरुद्ध कडक भूमिका घेतली असेल तर मोहर्रम आणि ईद या सणाविरुद्ध सुद्धा त्याने कडक धोरणाचा अवलंब केला होता.
त्यांच्या मते, "औरंगजेबने स्वत:ला एक चांगला मुस्लीम म्हणून जगासमोर सादर केलं. पण त्याचा इस्लाम हा कट्टर इस्लाम नव्हता. औरंगजेब बऱ्याच अंशी सुफी होता आणि काही प्रमाणात अंधश्रद्धाळूही होता."
मुघल दरबारांमध्ये ज्योतिषी प्रामुख्याने असायचे आणि औरंगजेबचा दरबार त्याला अपवाद नव्हता. त्याच्या दरबारात तर हिंदू आणि मुस्लीम असे दोन्ही धर्माचे ज्योतिषी होते आणि त्यांच्याशी तो नियमितपणे सल्लामसलत करायचा.

फोटो स्रोत, MIRZA AB BAIG/BBC
ऑड्री यांनी औरंगजेबचे एक शिपाई भीमसेन सक्सेना यांच्या हवाल्याने एक किस्सा सांगितला. एकदा दक्षिण भारतात जिथे औरंगजेबचा कँप भरला होता, तिथे पूर आला. पुरामुळे शाही कँपला नुकसानीचा धोका होता. तेव्हा त्यांनी कुराणांमधील श्लोक लिहून पुराच्या पाण्यात सोडले. त्यामुळे पुराचं पाणी ओसरलं आणि धोका टळला.
इस्लामचे दुसरे संत हजरत उमर यांच्या काळात सुद्धा झालेल्या एका प्रसंगाची पार्श्वभूमी या घटनेमागे आहे. असं म्हणतात की इजिप्तचा भाग जेव्हा इस्लामच्या अधीन झाला तिथे गर्व्हनर अम्र-बिन-अल-आस यांचं शासन चालायचं.
एके दिवशी त्यांना कळलं की एका सुंदर तरुणीचा साजश्रृंगार करून तिचा नाईल नदीच्या काठी बळी दिला तर नाईल नदीचा प्रवाह वर्षभर सुरू राहतो आणि त्यामुळे लोकांना त्याचा लाभ मिळत राहतो.
पण काही काळाने स्थानिक इस्लामी सरकारने या प्रथेवर निर्बंध घातले आणि अचानक नाईल नदी पाणी खरोखर कमी झालं. लोकांना वाटलं की नदीवर प्रकोप झाला आहे. ही बातमी जेव्हा खलिफा उमर फारूकला कळली तेव्हा त्याने नाईल नदीला पत्र लिहिलं - "प्रिय नदी, जर तू आपल्या अधिकारानुसार वाहते, तर तसं करू नको. जर तू अल्लाहचा आदेश मानत असशील तर पुन्हा वहायला सुरुवात कर."
असं म्हटलं जातं की यानंतर नाईल नदीत यापेक्षा अधिक पाणी आलं आणि त्यानंतर ती कधीच वाळली नाही.

फोटो स्रोत, Penguin India
ऑड्री टश्की यांनी या घटनेचा संदर्भ देत सांगितलं की औरंगजेब यांना या प्रसंगाची कल्पना होती आणि म्हणूनच त्यांनी असं केलं असेल.
मात्र नंतर त्या म्हणाल्या की एक आधुनिक इतिहासकार म्हणून माझा त्यावर विश्वास नाही. पण औरंगजेबला त्यांच्यावर विश्वास होता कारण त्यांनी लोकांच्या समोर हे केलं होतं आणि पुरापासून बचाव होऊ शकतो, असं हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता.
सर्वांत धार्मिक बादशाह
ऑड्री ट्रश्की म्हणाल्या की औरंगजेब, हिंदू आणि मुस्लीम दोन प्रकारच्या ज्योतिषांकडे सल्लामसलत करायचा आणि सल्ल्यावर अंमलबजावणी करायचा. त्यांच्या मते इतर मुघल बादशाहांच्या तुलनेत औरंगजेब सगळ्यात जास्त धार्मिक बादशाह होता.
त्याला संपूर्ण कुराण तोंडपाठ होतं आणि तो नमाज आणि पूजापाठ याबाबत ते अतिशय काटेकोर होते. त्याला कला, विशेषत: संगीताबद्दल घृणा होती. मात्र या विधानाशी फारकत घेणारेही औरंगजेबचे काही किस्से आहेत.

फोटो स्रोत, Penguin India
Did Aurangzeb ban Music? या लेखात इतिहासकार कॅथरीन ब्राऊन यांनी असा दावा केला आहे की औरंगजेब एकदा आपल्या मावशीला भेटायला बऱ्हाणपूरला गेला होता. तेव्हा तिथे हीराबाई जैनाबादीच्या प्रेमात पडले. हीराबाई गायिका आणि नर्तिका होती.
ऑड्री सांगतात की औरंगजेब जितका कट्टर म्हणून दाखवला जातो, तितका तो नव्हता. त्याच्या अनेक हिंदू राण्या होत्या. मुघल राजांच्या हिंदू बायकासुद्धा होत्या.
त्या म्हणाल्या, "शेवटच्या काळात औरंगजेब आपला सगळ्यांत लहान मुलगा कामबख्शची आई उदयपुरीबरोबर राहत होता. तीसुद्धा गायिका होती. ती मृत्युशय्येवर असताना कामबख्शला एक पत्र लिहिलं. त्यात त्यांनी उल्लेख केला होता की त्याची आई उदयपुरी माझ्याबरोबर आजारपणाच्या काळात बरोबर होती आणि मृत्यूपर्यंत ती बरोबरच राहील."
असं म्हणतात की औरंगजेब यांच्या मृत्यूनंतर काही महिन्यांतच सन 1707च्या उन्हाळ्यातच उदयपुरीचाही मृत्यू झाला होता.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








