जेव्हा शाहजहानसमोर दारा शिकोहचं मुंडकं कापून आणलं गेलं

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
'या तख़्त या ताबूत' म्हणजे सिंहासन किंवा थडगं, ही फार्सी म्हण मुघल राजघराण्यांच्या संदर्भात वेळोवेळी वापरली जाते.
मुघलकालीन इतिहासाची पानं चाळताना आपल्याला दिसतं की, शाहजहान बादशहाने ख़ुस्रो व शहरयार या स्वतःच्या दोन भावांना मारून टाकण्याचे आदेश दिले होतेच, शिवाय 1628 साली सत्तेवर आल्यानंतर त्याने त्याच्या दोन पुतण्यांचा व चुलतभावांचाही काटा काढला.
शाहजहान बादशहाचेचे वडील जहांगीर यांनी त्यांचा छोटा भाऊ दान्यालाचं जीवन संपवलं होतं.
ही परंपरा शाहजहान बादशहानंतरही सुरू राहिली. त्यांचा मुलगा औरंगजेब याने स्वतःचा मोठा भाऊ दारा शिकोह याचं मुंडकं छाटून भारतातील सिंहासन काबीज केलं.
शाहजहान बादशहाचा सर्वांत लाडका आणि सर्वांत मोठा मुलगा असलेला दारा शिकोह नक्की कसा होता?
'दारा शिकोह, द मॅन हू वूड बी किंग' या अलीकडेच प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे लेखक अविक चंदा यांना मी हाच प्रश्न विचारला.
त्यावर अविक म्हणाले, "दारा शिकोहचं व्यक्तिमत्व बहुआयामी आणि गुंतागुंतीचं होतं. एकीकडे तो अतिशय स्नेहशील, विचारवंत, प्रतिभावान कवी, अभ्यासक, उच्च दर्जाचा धर्मपंडित, सूफी पंथाबाबत व ललित कलांबाबत ज्ञान असलेला शहज़ादा होता, तर दुसऱ्या बाजूला प्रशासन आणि सैनिकी बाबींमध्ये त्याला काहीच रुची नव्हती. तो दुबळ्या स्वभावाचा होता; लोकांबाबतची त्याची समजूतही मर्यादित होती."
शाहजहानने दारा शिकोहला सैनिकी मोहिमांपासून दूर ठेवलं
शाहजहानचं दारावर इतकं प्रेम होतं की, तो आपल्या या मुलाला सैनिकी मोहिमांवर पाठवायला कायमच कचरायचा. दारा सतत आपल्या समोर दरबारात राहील, असा शाहजहानचा प्रयत्न असे.

फोटो स्रोत, Dara Shukoh The Man Who Would Be King
अवीक चंदा म्हणतात, "जेमतेम सोळा वर्षं वय असलेल्या औरंगजेबाला सैनिकी मोहिमांवर पाठवण्यात शाहजहान यांना काहीच अडचण वाटत नसे. औरंगजेब दक्षिणेतील एका मोठ्या सैनिकी मोहिमेचं नेतृत्व करत होता. तसंच मुराद बख़्श याला गुजरातेत पाठवण्यात आलं आणि शाहशुजाला बंगालकडे पाठवण्यात आलं. पण शाहजहान यांनी आपला सर्वांत लाडका मुलगा दारा याला दरबारातच ठेवलं. तो आपल्या नजरेआड होऊ नये, अशी तजवीज शाहजहानने केली होती. याचा परिणाम असा झाला की, दारा शिकोहला युद्धाचाही अनुभव मिळाला नाही आणि राजकीय कारभाराचाही अनुभव मिळाला नाही. शाहजहान दारा शिकोहला स्वतःचा उत्तराधिकारी बनवण्यासाठी एका पायावर तयार होता. किंबहुना त्यासाठी त्याने दरबारामध्ये खास योजनाही आखली होती. दारा शिकोहला त्याने सिंहासनाजवळ बसवलं आणि 'शाह बुलंद इक़बाल' अशी उपाधी दिली. आपल्यानंतर तोच गादीवर बसेल, अशी घोषणा त्याने केली."
शहज़ादा म्हणून दारा शिकोहला शाही तिजोरीतून दोन लाख रूपये दिले गेले. त्याला रोज एक हजार रुपये इतका दैनंदिन भत्ता दिला जात असे.
हत्तींच्या लढतीमध्ये औरंगजेबाने दाखवलेलं शौर्य
28 मे 1633 रोजी एक अतिशय नाट्यमय घटना घडली. तिचा परिणाम पुढे अनेक वर्षांनी दिसून आला.
शाहजहानला हत्तींची लढत बघायचा नाद होता. सुधाकर आणि सुरत-सुंदर यांच्यातील लढत बघायला तो सज्जातून खाली आला होता.
लढतीदरम्यान सुरत-सुंदर हा हत्ती मैदान सोडून पळायला लागला, तेव्हा सुधाकर चिडून त्याच्या पाठीमागे धावायला लागला. हा सगळा गदारोळ बघणारे लोक इतस्ततः धावायला लागले.
हत्तीने औरंगजेबावर हल्ला केला. तेव्हा घोड्यावर स्वार असलेल्या 14 वर्षीय औरंगजेबाने स्वतःच्या घोड्याला पळण्यापासून थोपवलं, आणि हत्ती त्यांच्या जवळ आल्यानंतर भाल्याने त्याच्या माथ्यावर जोरदार वार केला.
दरम्यान काही सैनिक धावत तिथे पोचले आणि त्याने शाहजहानच्या चारही बाजूने कडं केलं. हत्तीला घाबरवण्यासाठी फटाके वाजवण्यात आले, पण हत्तीने सोंडेने औरंगजेबाच्या घोड्याला खाली पाडलं.

फोटो स्रोत, Dara Shukoh The Man Who Would Be King
घोडा कोसळायच्या आधीच औरंगजेबाने त्याच्यावरून खाली उडी मारून हत्तीशी लढण्यासाठी स्वतःची तलवार बाहेर काढली होती. त्याच वेळी शहज़ादा शुज़ाने मागून येऊन हत्तीवर वार केला.
हत्तीने त्याच्या घोड्यावर इतक्या जोरात डोकं आदळलं की शुज़ासुद्धा घोड्यावरून खाली पडला. त्याच वेळी तिथे उपस्थित राजा जसवंत सिंह आणि इतर काही शाही सैनिक आपापल्या घोड्यांवरून घटनास्थळी पोचले. चारही बाजूंनी आरडाओरड सुरू झाल्यावर सुधाकर तिथून पळून गेला. त्यानंतर औरंगजेबाला बादशहासमोर आणण्यात आलं तेव्हा त्याने या मुलाला आलिंगन दिलं.
अवीक चंदा सांगतात त्यानुसार, या घटनेनंतर समारंभपूर्वक औरंगजेबाला 'बहादूर' अशी उपाधी बहाल करण्यात आली. त्याची सुवर्णतुला करून ते सोनं त्यालाच भेट देण्यात आलं. या संपूर्ण घटनाक्रमादरम्यान दारा शिकोह तिथेच उभा होता, पण त्याने हत्ती काबूत आणण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही. कालांतराने हिंदुस्थानची गादी कोण सांभाळणार आहे, याचा हा एक प्रारंभिक संकेतच होता. "दारा थोड्या वेळाने घटनास्थळी पोचला. इच्छा असूनही तत्काळ तिथे पोचणं त्याला शक्य नव्हतं. जाणीवपूर्वक तो मागेच राहिला, त्यामुळे औरंगजेबाला कौतुक कमवायची संधी मिळाली असं म्हणणं गैर होईल," असं इतिहासकार राना सफ़वी म्हणतात.
मुघल इतिहासातील सर्वांत महागडा विवाहसोहळा
नादिरा बानो आणि दारा शिकोह यांच्यातील विवाह मुघल इतिहासातील सर्वांत महागडा विवाहसोहळा असल्याचं म्हटलं जातं.
त्याच वेळी इंग्लंडहून भारतात फिरस्तीसाठी आलेल्या पीटर मँडीने नमूद केल्यानुसार, या विवाहासाठी त्या काळात 32 लाख रुपये खर्च झाले होते, त्यातील 16 लाख रुपये दाराची मोठी बहीण जहाँआरा बेगमने दिले होते.
अवीक चंदा म्हणतात, "बादशाह आणि मोठी बहीण जहाँआरा या दोघांचंही दारावर सर्वाधिक प्रेम होतं. त्या वेळी त्यांची आई मुमताज़ महलचं निधन झालेलं होतं आणि जहाँआरा बेगम बादशाह बेगम झालेली होती. पत्नीच्या निधनानंतर पहिल्यांदाच शाहजहान एखाद्या सार्वजनिक समारंभात सहभागी होणार होता. हे लग्न 1 फेब्रुवारी 1633 रोजी झालं आणि 8 फेब्रुवारीपर्यंत पंगती उठत राहिल्या. याच दरम्यान रात्री इतके फटाके उडवण्यात आले आणि इतकी रोषणाई करण्यात आली की रात्रीच उजाडल्यासारखा भास व्हायला लागला होता. लग्नाच्या दिवशी वधून घातलेल्या जोड्यांचीच किंमत आठ लाख रुपये होती, असंही सांगितलं जातं."
दाराने कंदाहारवर चढाई केली
दारा शिकोहची सार्वजनिक प्रतिमा दुर्बल योद्धा आणि अकार्यक्षम प्रशासक अशी होती. पण तो कधीच युद्धात सहभागी झाला नाही, असं नाही.

फोटो स्रोत, Getty Images
कंदाहार मोहिमेवर तो स्वतःच्या इच्छेने लढायला गेला होता, पण तिथे त्याला पराभवाला सामोरं जावं लागलं.
अवीक चंदा म्हणतात, "औरंगजेब कंदाहारहून अपयशी होऊन परतला, तेव्हा दारा शिकोहने स्वतःहून तिथल्या मोहिमेचं नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली. शाहजहानने त्यावरही सहमती दर्शवली. लाहोरला गेल्यानंतर दाराने 70 हजार लोकांचं एक दल तयार केलं, त्यात 110 मुस्लीम आणि 58 राजपूत सेनापती होते.
या फौजेत 230 हत्ती, 6000 जमीन खोदणारे, 500 भिश्ती आणि मोठ्या संख्येने तांत्रिक, जादूगार नि वेगवेगळ्या प्रकारचे मौलाना व साधू यांचा समावेश होता. दाराने सेनापत्तींचा सल्ला घेण्याऐवजी या तांत्रिकांचा व ज्योतिषींचा सल्ला घेऊन हल्ल्याचा दिवस निश्चित केला. या लोकांवर त्यांनी बराच पैसाही खर्च केला.
दुसरीकडे फार्सी सैनिकांनी बचावाची सक्षम योजना आखलेली होती. त्यामुळे कित्येक दिवस वेढा टाकूनही दाराच्या पदरी अपयशच पडलं, आणि रिकाम्या हातांनी त्याला दिल्लीकडे माघारी यावं लागलं."
औरंगजेबाकडून पराभव
शाहजहान आजारी पडल्यानंतर त्यांच्या पश्चात गादीवर कोण बसणार, यावरून झालेल्या लढाईमध्ये औरंगजेबाने दारा शिकोहचा पराभव केला.
पाकिस्तानातील नाटककार शाहिद नदीम यांच्या म्हणण्यानुसार, औरंगजेबाने दाराला हरवलं तेव्हाच भारत व पाकिस्तान यांच्या फाळणीचं बी रोवलं गेलं. या लढाईमध्ये औरंगजेब एका मोठ्या हत्तीवर स्वार होता. त्याच्या पाठी धनुष्यबाण घेतलेले 15,000 घोडेस्वार होते.
औरंगजेबाच्या उजव्या बाजूला त्याचा मुलगा सुलतान मोहम्मद आणि सावत्रभाऊ मीर बाबा होता. सुलतान मोहम्मदच्या शेजारी नजाबत खाँ यांची तुकडी होती. या व्यतिरिक्त आणखी 15,000 सैनिक मुराद बख्शच्या नेतृत्वाखाली होते. मुरादसुद्धा हत्तीवर बसलेला होता. त्याच्या अगदी पाठीच त्याचा छोटा मुलगा बसलेला होता.

फोटो स्रोत, Getty Images
अवीक चंदा म्हणतात, "सुरुवातीला दोन्ही फौजांमध्ये तुल्यबळ लढाई जुंपली, किंबहुना दारा थोडा वरचढ होता. पण तेवढ्यात औरंगजेबाने स्वतःच्या नेतृत्वक्षमतेची चुणूक दाखवली. त्याने त्याच्या हत्तीचे चारही पाय साखळ्यांनी बांधून घेतले, जेणेकरून हत्ती मागेही जाणार नाही आणि पुढेही जाणार नाही. मग तो ओरडून म्हणाला, 'मरदानी, दिलावराँ-ए-बहादुर! वक्त अस्त!' म्हणजे 'शूरवीरांनो, आपली ताकद दाखवायची हीच वेळ आहे'. हात वर करून त्याने मोठ्या आवाजात 'या खुदा! या खुदा! माझी तुझ्यावर श्रद्धा आहे! हरण्यापेक्षा मेलो तरी बेहत्तर."
हत्तीपासून दूर होणं महागात पडलं...
अवीक चंदा पुढे सांगतात, "तेव्हाच खलीलउल्लाह खाँने दाराला सांगितलं की, 'आपण आता जिंकत आलेले आहेत. पण तुम्ही उंच हत्तीवर का बसलायंत? स्वतःचा जीव धोक्यात का घालताय?
एखादा बाण किंवा गोळी हौद्यातून पलीकडे जाऊन तुम्हाला लागली, तर त्यानंतर काय होईल याची कल्पना तुम्ही करू शकता. ख़ुदासाठी तुम्ही हत्तीवरून खाली उतरा आणि घोड्यावर स्वार होऊन लढा.' दाराने हा सल्ला मान्य केला. हत्तीवर दारा बसलेला हौदा आता रिकामा झाल्याचं बाकीच्या सैनिकांनी पाहिलं, तेव्हा त्यातून अफवांचं पेव फुटलं.
हौदा रिकामा होता आणि दारा कुठे दिसत नव्हता. म्हणजे दाराला शत्रूने पकडलं असेल किंवा लढाईत त्याचा मृत्यू झाला की काय, असं सैनिकांना वाटू लागलं. त्यामुळे सैनिकी एवढे घाबरले की ते माघारी फिरायला लागले, आणि थोड्याच वेळात औरंगजेबाच्या सैनिकांनी दाराच्या फौजेचा धुव्वा उडवला."

फोटो स्रोत, Dara Shukoh The Man Who Would Be King
या लढाईचं अतिशय सूक्ष्म वर्णन इटालियन इतिहासकार निकोलाओ मनुची यांनी 'स्तोरिया दो मोगोर' या त्यांच्या पुस्तकात केलं आहे.
मनुची लिहितात, "दाराच्या फौजेत व्यावसायिक सैनिक नव्हते. त्यातले बरेच लोक न्हावी, खाटीक किंवा सर्वसाधारण मजूर होते. दाराने धुळीच्या लोटांमधून स्वतःचा घोडा पुढे दामटला. आपलं साहस दिसावं यासाठी त्याने नगारे वाजवणं सुरूच ठेवायचा आदेश दिला. शत्रू अजूनही थोडा दूर असल्याचं त्याने पाहिलं. तिकडून काही हल्ला होत नव्हता आणि गोळ्याही मारल्या जात नव्हत्या. म्हणून दारा त्याच्या सैनिकांसह पुढेच जात राहिला.
ते औरंगजेबाच्या सैनिकांच्या टप्प्यात आल्यावर तत्काळ त्यांच्यावर तोफांचा, बंदुकांचा आणि उंटांच्या पाठीवर लावलेल्या फिरत्या बंदुकांचा मारा सुरू झाला. या अचानक सुरू झालेल्या आक्रमक हल्ल्याला तोंड देण्यासाठी दारा व त्यांचे सैनिक तयार नव्हते."
मनुची पुढे लिहितात, "हळूहळू औरंगजेबाच्या सैन्याचे गोळे दाराच्या सैनिकांची मुंडकी नि धड उडवायला लागले, तेव्हा दाराने आपल्याही तोफा पुढे काढायचा आदेश दिला. पण पुढे कूच करण्याच्या नादात आपल्या सैनिकांनी तोफा मागेच ठेवून दिल्याचं त्याला सांगण्यात आलं, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली."
लपतछपत चोरासारखा आग्र्याच्या किल्ल्यात पोचला
या लढाईतील दाराच्या पराभवाचं तपशीलवार वर्णन विख्यात इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी औरंगजेबाच्या चरित्रात केलं आहे.

फोटो स्रोत, Dara Shukoh The Man Who Would Be King
सरकार लिहितात, "घोड्यावरून चार ते पाच मैल धावून झाल्यानंतर दारा शिकोह आराम करण्यासाठी एका झाडाखाली बसला. औरंगजेबाचे सैनिक त्याचा पाठलाग करत नव्हते, पण दारा शिकोह मागे वळून पाहायचा तेव्हा प्रत्येक वेळी त्याला औरंगजेबाच्या सैनिकांच्या ढोलांचा आवाज ऐकू येत होता.
डोक्यावरचं कवच काढून ठेवायचा प्रयत्न त्याने केला, कवचामुळे त्याच्या डोक्याची सालपटं निघत होती. पण तो इतका थकून गेला होता की त्याला स्वतःचे हात डोक्यापर्यंतही घेऊन जाता येत नव्हते."
सरकार पुढे लिहितात, "शेवटी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान दारा काही घोडेस्वारांसह लपतछपत चोरासारखा आग्र्यातील किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोचला. त्यांचे घोडे पूर्णतः थकून गेले होते आणि सैनिकांच्या हातात मशाली नव्हत्या. सगळ्या शहरात स्मशानशांतता पसरलेली होती. मूकपणे दारा घोड्यावरून खाली उतरला आणि आपल्या घरात जाऊन त्याने दार बंद करून घेतलं. दारा शिकोह मुघल बादशाहीची लढाई हरला होता."
मलिक जीवनच्या कपटाने दारा शिकोह पकडला गेला
आग्र्याहून पळून गेल्यानंतर दारा आधी दिल्लीला गेला, तिथून तो पंजाबला आणि मग अफगाणिस्तानात गेला. तिथे मलिक जीवनने कपट करून त्याला पकडलं आणि औरंगजेबाच्या सैन्यातील सरदारांच्या हवाली केलं. मग त्याला दिल्लीला आणण्यात आलं आणि अतिशय मानहानीकारकरित्या दिल्लीच्या रस्त्यांवरून त्याची धिंड काढली गेली.

फोटो स्रोत, Getty Images
अवीक चंदा सांगतात, "रोमन सेनाधिकारी ज्यांचा पराभव करत त्यांना घेऊन येत आणि सर्वांसमोर त्यांची धिंड काढत, तसंच औरंगजेबाने दारा शिकोहला वागवलं. आग्रा व दिल्लीतील जनतेमध्ये दारा शिकोहची लोकप्रियता बरीच मोठी होती. त्यामुळे त्यांच्या समोर दाराला अपमानित करून औरंगजेब दाखवून देऊ पाहत होता की, केवळ लोकांचं प्रेम मिळाल्याने काही कोणी भारताचा बादशाह होण्याचं स्वप्न पाहू नये."
छोट्या हत्तिणीवर बसवून दिल्लीच्या रस्त्यांवरून धिंड काढली
दाराच्या या जाहीर अपमानाचं वर्णन फ्रेंच इतिहासकार फ्राँसुआ बर्नियर यांनी 'ट्रॅव्हल्स इन द मुघल इंडिया' या पुस्तकात केलं आहे.
बर्नियर लिहितात, "दाराला एका छोट्या हत्तिणीच्या पाठीवर, छप्पर नसलेल्या हौद्यामध्ये बसवण्यात आलं. त्याच्या पाठी दुसऱ्या एका हत्तीवर त्याचा 14 वर्षांचा मुलगा सिफीर शिकोह बसलेला होता. त्या पाठी औरंगजेबाचा गुलाम नजरबेग नंगी तलवार घेऊन चालत होता.
दाराने पळून जायचा प्रयत्न केला, किंवा त्याला वाचवण्याचा प्रयत्न कोणी केला, तर तत्काळ त्याचं मुंडकं धडापासून वेगळं करावं, असा आदेश नजरबेगला देण्यात आला होता. जगातील सर्वांत श्रीमंत राजघराण्याचा वारस फाटक्या कपड्यांमध्ये स्वतःच्याच प्रजेसमोर अपमानित होत होता. त्याच्या डोक्यावर बेरंगी पागोटं बांधलेलं होतं आणि त्याच्या गळ्यात कोणताही दागिना नव्हता."

फोटो स्रोत, Dara Shukoh The Man Who Would Be King
बर्नियर पुढे लिहितात, "दाराच्या पायांना साखळ्या बांधलेल्या होत्या, पण त्याचे हात मोकळे होते. ऑगस्टच्या तळपत्या उन्हात या वेषामध्ये त्याला दिल्लीतल्या रस्त्यांवरून फिरवलं जात होतं. इथे कोणे एकेकाळी त्याच्या नावाची तुतारी फुंकली जात होती.
धिंड काढली जात असताना एक क्षणभरही त्याने डोळे वर करून पाहिलं नाही. तुटलेल्या फांदीसारखा तो बसून राहिला. त्याची ही अवस्था बघून दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या लोकांचे डोळे भरून आले."
भिकाऱ्याच्या दिशेने शाल फेकली
दारा शुकोहची अशा तऱ्हेने धिंड काढली जात असताना त्याच्या कानावर एका भिकाऱ्याचा आवाज पडला.

फोटो स्रोत, Dara Shukoh The Man Who Would Be King
अवीक चंदा सांगतात, "भिकारी जोरजोरात ओरडत होता, 'ऐ दारा, एके काळी तू या भूमीचा मालक होतास. तू या रस्त्यावरून जाताना मला काही ना काही देऊन पुढे जायचास. आज तुझ्याकडे मला देण्यासारखं काही नाही.'
हे ऐकल्यावर दाराने आपल्या खांद्यापाशी हात नेला, आणि त्यावर पांघरलेली शाल उचलून त्या भिकाऱ्याच्या दिशेने फेकली. या घटनेच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी ही गोष्ट औरंगजेबाला सांगितली. धिंड संपल्यावर दारा आणि त्याचा मुलगा सिफीर यांना तुरुंगाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलं."
मुंडकं छाटलं
त्यानंतर दुसऱ्या दिवशीच औरंगजेबाने दरबारात निर्णय घेतला की, दारा शिकोहला देहदंड दिला जावा. इस्लामविरोधी वागल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला. औरंगजेबाने 4,000 घोडेस्वारांना दिल्लीबाहेर पिटाळलं आणि दाराला ग्वाल्हेरच्या तुरुंगात पाठवलं जातंय अशी अफवा पसरवली. त्याच संध्याकाळी औरंगजेबाने नजरबेगला बोलावून घेतलं आणि दारा शिकोहचं छाटलेलं मुंडकं पाहण्याची इच्छा बोलून दाखवली.

फोटो स्रोत, Getty Images
अवीक चंदा सांगतात, "नजरबेग आणि त्यांचे साथीदार मकबूला, महरम, मशहूर, फरात आणि फतह बहादूर चाकुसुरे घेऊन खिजराबादमधील महालात गेले. तिथे दारा आणि त्याचा मुलगा रात्रीच्या जेवणासाठी स्वतः डाळ शिजवत होते.
त्यांच्या खाण्यात विष घातलेलं असेल, अशी भीती असल्यामुळे ते स्वतः जेवण तयार करत होते. आपण सिफीरला घेऊन जाण्यासाठी आलो आहोत, अशी घोषणा नजरबेगने केली. सिफीर रडायला लागला आणि दाराने आपल्या मुलाला छातीशी कवटाळून धरलं. नजरबेग नि त्याच्या साथीदारांनी जबरदस्तीने दारापासून मुलाला बाजूला खेचलं आणि दुसऱ्या खोलीत नेलं."
अवीक चंदा पुढे सांगतात, "दाराने आधीच एक छोटा चाकू स्वतःच्या उशीमध्ये लपवून ठेवलेला होता. तो चाकू काढून दारा शिकोहने नजरबेगच्या एका सहकाऱ्यावर पूर्ण ताकदीनिशी प्रहार केला. पण मारेकऱ्यांनी त्याचे दोन्ही हात वरच्यावर धरले आणि त्याला गुढग्यांवर बसायला लावलं, मग त्याचं शीर जमिनीला लावलं आणि नजरबेगने स्वतःच्या तलवारीने त्याचं मुंडकं धडापासून वेगळं केलं."
छाटलेलं मुंडकं औरंगजेबाला सादर
दारा शिकोहचं छाटलेलं मुंडकं औरंगजेबासमोर सादर करण्यात आलं. त्या वेळी तो त्याच्या किल्ल्याच्या बागेत बसला होता. मुंडकं पाहिल्यानंतर औरंगजेबाने आदेश दिला की, मुंडक्याला लागलेलं रक्त साफ करून एका तबकातून ते घेऊन यावं.

फोटो स्रोत, Getty Images
अवीक चंदा सांगतात, "तत्काळ तिथे मशाली आणि कंदील लावण्यात आले. ते मुंडकं आपल्या भावाचंच आहे, याची खातरजमा खुद्द औरंगजेबाला करता यावी, यासाठी प्रकाश पाडण्यात आला. औरंगजेब इथेच थांबला नाही. दुसऱ्या दिवशी, 31 ऑगस्ट 1659 रोजी त्याने आदेश दिला की, मुंडकं छाटून उरलेलं दारा शिकोहचं धड हत्तीवर ठेवावं आणि जिवंतपणी त्याची धिंड काढली त्याच रस्त्यांवरून त्या धडाची धिंड काढावी.
हे दृश्य पाहिल्यावर दिल्लीवासीयांच्या अंगावर काटा आला आणि बायका घरात जाऊन रडायला लागल्या. दाराचं हे मुंडकं छाटलेलं धड 'हुमायूं का मकबरा' परिसरामध्ये दफन करण्यात आलं."
औरंगजेबाने शाहजहानचं मन मोडलं
यानंतर औरंगजेबाने आग्र्यातील किल्ल्यात कैद असलेले त्याचे वडील शाहजहान याच्याकडे एक भेटवस्तू पाठवली.
इटालियन इतिहासकार निकोलाओ मनुची यांनी 'स्टोरिया दो मोगोर' या त्यांच्या पुस्तकात लिहिल्यानुसार, "आलमगीरने त्याचा सहायक ऐतबार खाँ याच्या हस्ते शाहजहानकडे एक पत्र पाठवलं.
त्या पत्राच्या लिफाफ्यावर लिहिलं होतं- 'औरंगजेब, तुमचा मुलगा, तुमच्या सेवेत हे तबक पाठवतो आहे, तुम्ही ही भेट कधीच विसरू शकणार नाही.' पत्र मिळाल्यावर वृद्ध शाहजहाँ म्हणाला, 'खुदा कृपेने माझा मुलगा अजून माझी आठवण काढतोय.' तेवढ्यात झाकलेलं तबक त्याच्या समोर ठेवण्यात आलं.
त्याचं झाकण शाहजहानने बाजूला केलं तेव्हा तो किंचाळला, कारण त्यात त्याचा सर्वांत थोरला मुलगा दारा शिकोहचं छाटलेलं मुंडकं ठेवलं होतं."
क्रौर्याची परिसीमा
मनुची पुढे लिहितात, "हे दृश्य पाहिल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या बायका मोठमोठ्याने शोक करायला लागल्या, ऊर बडवून घेऊ लागल्या आणि दागदागिने उतरवून टाकले. शाहजहानला इतकी जोरदार चक्कर आली की त्याला तिथून दुसरीकडे घेऊन जावं लागलं.

फोटो स्रोत, Dara Shukoh The Man Who Would Be King
दाराचं बाकीचं धड 'हुमायूं का मकबरा' परिसरात दफन करण्यात आलं होतं, पण औरंगजेबाच्या हुकुमानुसार दाराचं शीर ताजमहालाच्या अंगणात गाडण्यात आलं. शाहजहान जेव्हा-जेव्हा त्याच्या बेगमच्या मकबऱ्याकडे बघेल, तेव्हा त्याच्या सर्वांत थोरल्या मुलाचं शीरही तिथेच जमिनीत सडत पडलंय याची जाणीव त्याला होईल, यासाठी औरंगजेबाने हा आदेश दिला होता."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








