कोल्हापूरचे लोक जेव्हा चित्ते पाळून शिकार करून घेत...

फोटो स्रोत, LEELAVATI JADHAV
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
दक्षिण आफ्रिकेहून 8,405 किलोमीटरचा प्रवास करून 5 नर आणि 3 मादी असे एकूण 8 चित्ते भारतभूमीवर दाखल झाले आहेत. नाम्बियावरून स्पेशल चार्टर्ड कार्गो फ्लाईटनं या चित्त्यांना भारतात आणलं गेलंय. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील भारतीय हवाई दलाच्या तळावर हे फ्लाईट उतरवण्यात आलं.
इथून मध्य प्रदेशातल्याच कुनो नॅशनल पार्कमध्ये पहिल्या 8 चित्त्यांना वसवण्यात येईल. चित्त्यांना शिकार करता येतील अशी काळविटं आणि रानडुक्करं या नॅशनल पार्कमध्ये मोठ्या संख्येने आहेत.
संवर्धनासाठी एक मोठ्या मांसाहारी प्राण्याचं एका खंडातून दुसऱ्या खंडात स्थलांतर करण्यात येण्याची ही पहिली घटना आहे.
2020 च्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने भारतामध्ये पुन्हा एकदा चित्ते आणण्यास परवानगी दिली होती.
अनेक शतकांपासून भारतात आढळणारा चित्ता विसाव्या शतकामध्ये भारतामधून पूर्णपणे नाहीसा झाला.
मुघल काळापासून भारतामध्ये राजे-महाराजांनी चित्ते पाळण्याचा आणि चित्त्यांकडून शिकार करून घेण्याचा छंद जोपासत.
मुघल शासकांप्रमाणेच अनेक संस्थानांमध्ये चित्ते पाळले जात. चित्ते पाळणे आणि नंतर चित्त्याकडून शिकार करून घेणे असा तो क्रम असे. या संस्थानांमध्ये कोल्हापूर, बडोदा, भावनगर यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जाई. बादशहा अकबराकडे अनेक चित्ते असल्याच्या नोंदी आहेत. त्यावेळच्या शिकारीची वर्णनं करणारी भरपूर चित्रं उपलब्ध आहेत. त्यात चित्ते दिसून येतात.
चित्तेवान नावाचा नवा समुदाय
कोल्हापूर संस्थानामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज, त्यांच्यानंतर राजाराम महाराजांनी हा चित्त्याद्वारे शिकार करून घेण्याचा छंद जोपासला होता.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
भावनगरचे राजे भावसिंहजी महाराज शाहू महाराज यांचे सहाध्यायी होते. एकदा भावनगर येथे चित्त्यांकडून केलेली शिकार शाहू महाराजांनी पाहिली आणि असेच चित्ते कोल्हापूरला आणून त्यांच्याकरवी शिकार करण्याचे त्यांनी निश्चित केले. कोल्हापूरला आल्यानंतर त्यांनी आपल्या शिकारखान्यातले लोक आफ्रिकेला पाठवले, असं 'आठवणीतील शिकार' या पुस्तकाचे लेखक आणि इतिहास अभ्यासक यशोधन जोशी सांगतात.
चित्ते पाळण्यासाठी, त्यांना शिकारीचं प्रशिक्षण देण्यासाठी कोल्हापूरमध्ये विशिष्ट समुदायच होता. त्यांना चित्तेवान अशीच ओळख मिळाली होती. संस्थान काळामध्ये इस्माईल चित्तेवान, धोंडी लिंबाजी पाटील असे काही प्रसिद्ध चित्तेवान कोल्हापुरात होते, अशी माहितीही यशोधन जोशी यांनी दिली. 1936 साली कोल्हापूरला भेट देणाऱ्या टॅक्सीडर्मिस्ट Botha Van Ingen यांनी तेव्हा कोल्हापूरमध्ये 35 चित्ते असल्याचं लिहून ठेवलं आहे.

फोटो स्रोत, LEELAVATI JADHAV
इस्माईल चित्तेवान यांचे नातू सलीम जमादार (चित्तेवान) यांनी बीबीसी मराठीशी बोलताना त्यांच्या आजोबांबद्दल माहिती दिली.
ते म्हणाले, "आमचे आजोबा, पणजोबा हे चित्ते सांभाळण्याचे काम करायचे. आम्ही चित्ते पकडून त्यांना पाळण्याचे काम करायचो म्हणून आम्हाला चित्तेपारधी म्हटलं जायचं. छत्रपती शाहू महाराजांनी ही कला पाहिली आणि त्यांनी चित्तेपारधींना राजाश्रय दिला. राजाराम महाराजांनी शिकारीचा मोठा छंद होता. आज कोल्हापुरात बसस्थानकाजवळ जेथे विक्रम हायस्कूल आहे तेथे चित्ता कारखाना (चित्तेखाना) होता."
असे पाळले जायचे चित्ते
एखादा चित्ता पकडल्यानंतर स्वातंत्र्य गमावलेला चित्ता चवताळलेला आणि संतापलेला असे. पिंजऱ्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या चित्त्याला शांत करण्याचं काम चित्तेवानांना करावं लागत असे.

फोटो स्रोत, LEELAVATI JADHAV
चित्त्याच्या कंबरेला दोराचा कंडा बांधला की चित्ता शांत होत असे अशी आठवण कोल्हापूरच्या अशा शिकारींमध्ये सहभागी होणाऱ्या लीलावती जाधव यांनी सांगितली आहे. लीलावती जाधव या कोल्हापूर संस्थानाच्या काळात अशा शिकार मोहिमांमध्ये सहभागी झालेल्या आणि जवळून पाहिलेल्या शेवटच्या व्यक्ती होत्या. त्यांच्या वेळोवेळी घेतलेल्या मुलाखतींमधून मिळालेली माहिती 'आठवणीतील शिकार' या पुस्तकात संकलित करण्यात आली आहे.
लीलावती जाधव 'आठवणीतील शिकार' या पुस्तकात सांगितलेल्या आठवणीत म्हणतात, "चित्त्याला शांत करण्यासाठी त्याला काथ्याच्या बाजेवर निजवून ठेवत आणि दोन माणसं त्याच्या पाठीवरून सतत हात फिरवत राहात. त्याला लाकडी डावातून खाणं देत असत. त्याला 'तांबा देणे' असं म्हणत. तसेच तो थोडा माणसाळला की त्याला लाकडी गजाला बांधून ठेवत त्याला 'ठोकळा देणे' असा शब्दप्रयोग केला जाई."

फोटो स्रोत, LEELAVATI JADHAV
रोजचं खाणं देण्याआधी त्याच्यासमोरून काळी घोंगडी घेतलेली माणसं पळत असत आणि काळा रंग आणि मांसाचा संबंध त्याच्या मनावर ठसवत असत. नंतरच्या काळामध्ये काळवीट पकडण्यासाठी हा प्रकार उपयोगी येई. नंतरच्या काळात घोंगडी घेतलेल्या माणसाचा पाठलाग चित्ता करू लागला की तो शिकारीसाठी तयार झाला असं म्हटलं जाई.
शिकारीचे क्षण
कोल्हापूर संस्थानात शिकार करण्यासाठी घोडागाडीवर चित्ते उभे असत. हरणांच्या कळपाजवळ गेल्यावर चित्ते गाड्यांमधून उड्या मारत आणि शिकारीचा अचूक वेध घेत असत. तोपर्यंत गाडी त्यांच्याजवळ गेलेली असे. चित्तेवान चित्त्याला भक्ष्यापासून दूर करत असे आणि त्याच्या गळ्यात आणि कमरेत पुन्हा एकदा दोरी बांधत असे.
लीलावती जाधव यांनी सांगितलेल्या आठवणींमध्ये स्टार, भवानीशंकर, वीरमती, लक्ष्मी, गणप्या अशी चित्त्यांची नावंही आढळून येतात.

फोटो स्रोत, LEELAVATI JADHAV
कोल्हापूरच्या आसपासच्या माळरानांवर अशी शिकारीची खास ठिकाणं होती. इंग्रज पाहुणे किंवा इतर कोणतेही शाही पाहुणे आले की असा खेळांचे आयोजन केले जाई. शिकार करणाऱ्या प्राण्यांना पाहुणे दुर्बिणीतून पाहात असत. कोल्हापुरातला शेवटचा चित्ता 1960 साली मेल्याचे लीलावती जाधव यांनी आपल्या आठवणीत सांगितले आहे.
चित्ता भारतात आला तर...
चित्ते भारतात आणण्यासाठी साधारणपणे एक दशकभर प्रयत्न सुरु होते. 2010 साली वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि वाइल्लाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया या दोन संस्थांनी भारतामध्ये चित्ते सोडण्यासाठी तीन जागा सुचवल्या होत्या.
त्यात मध्य प्रदेशातील कुनो पालपूर आणि नौरादेही या वन्यजीव अभयारण्याचा आणि राजस्थानमधील शाहगड़चा समावेश होता. राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड इथल्या जागांची पाहाणी या संस्थांनी केली होती.
भक्ष्याची उपलब्धता, स्थानिक समुदाय त्यांची वन्यजीवांप्रती असणारी भावना, रिमोट सेन्सिंगद्वारे घेतलेली माहिती याच्या आधारावर एक अहवाल तयार करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने आता चित्ता भारतात आणायला परवानगी दिली असली तरी चित्त्यासाठी भारतात आता पोषक वातावरण, अधिवास आहे का याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही.

फोटो स्रोत, LEELAVATI JADHAV
चित्ता भारतात आणण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना पर्यावरण अभ्यासक लक्ष्मीकांत देशपांडे म्हणाले, "भारतामध्ये चित्ता पूर्वी होताच. गवताळ कुरणे वाचवण्यासाठी चित्ता पुन्हा भारतात आणला जाऊ शकतो. मात्र त्यासाठी मोठा गवताळ प्रदेश लागतो. त्याला शिकारीसाठी स्पर्धा जास्त असता कामा नये. म्हणूनच त्यासाठी योग्य जागा निवडण्यासाठी अभ्यासाची गरज आहे."
"एखाद-दोन ठिकाणीच चित्ता आणणे आफ्रिकेतील नॅचरल झू प्रमाणे केल्यासारखे ठरेल. प्राणी संवर्धनाचे ते एक चुकीचे उदाहरण म्हणून ठरण्याची भीती आहेच. त्याचे पुनरुत्पादन व्हावे यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे अन्यथा केवळ दिखाऊ कारणांसाठी त्यांना भारतात आणणे योग्य होणार नाही."
चित्ता आणि बिबट्यामधला फरक
बहुतांशवेळा ठिपक्यांमुळे चित्ता आणि बिबट्या यांच्यामध्ये गल्लत होण्याची शक्यता असते. मात्र या दोघांमधला फरक सहज ओळखता येऊ सकतो. सर्वात महत्त्वाची खूण म्हणजे चित्त्याच्या अंगावर भरीव ठिपके असतात तर बिबट्यांच्या अंगावर पोकळ गोलाकार रचना असते. चित्त्याच्या चेहऱ्यावर काळ्या अश्रूरेषा असतात. बिबट्याच्या चेहऱ्यावर अशा रेषा नसतात.

फोटो स्रोत, Getty Images
चित्त्याला मोकळ्या गवताळ प्रदेशात राहायला आवडतं. मात्र बिबटे दाट झाडीच्या प्रदेशात राहातात. चित्त्यापेक्षा बिबटे झाडावर जास्त वेळ घालवतात. नर चित्त्याचे वजन साधारणपणे 54 किलो तर मादीचे 43 किलो इतके असते तर नर बिबट्याचे वजन 60 ते 70 किलो आणि मादी बिबट्याचे 33-40 किलो इतके असते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








