'एक अवनी ठार झाली पण असे अनेक वाघ आहेत त्यांचं काय?'

वाघीण
    • Author, नितेश राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी यवतमाळहून

नरभक्षक वाघीण T1 म्हणजेच अवनीला शुक्रवारी रात्री ठार करण्यात आलं. या वाघिणीने 13 लोकांचा बळी घेतल्याचा गावकऱ्यांचा दावा आहे. तिच्या मृत्यूनंतर परिसरातील नागरिकांनी जल्लोष केला तर खरं पण अवनीच्या 10 महिन्यांच्या दोन बछड्याचं काय होणार हा मोठा प्रश्न आहे.

T1चा साथीदार T2 वाघही याच परिसरात आहे. अवनीने आजवर पाच लोकांचा बळी घेतल्याची नोंद वनविभागाच्या दप्तरी करण्यात आली होती.

T2ने आतापर्यंत माणसाला मारण्याचा पुरावा वनविभागाकडे नाही. परंतु शेतकऱ्यांनी शेतात जाताना आवश्यक ती काळजी घ्यावी, अशी सूचना वनविभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे भीतीचं वातावरण अजूनही कायम आहे.

यवतमाळमधल्या बोराटी गावामध्ये 1 मे 2016 मध्ये सोनाबाई वामन घोसले या वृद्धेला वाघिणीने ठार केले. त्यानंतर पाच लोकांचा बळी या वाघिणीने घेतला. अवनी ठार झाल्याने सोनाबाईंची मुलगी अलका पवार आनंदात आहे.

पण त्यांच्या मते, एकाच वाघाला ठार करून फायदा नाही. परिसरात आणखी बरेच वाघ आहेत, त्यांचाही बंदोबस्त करणे गरजेचे आहे. भीती अजून कायम आहे. आईला ठार करणारी हीच वाघीण कशावरून? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

अलका पवार
फोटो कॅप्शन, एकाच वाघाला ठार करून फायदा नाही. परिसरात आणखी बरेच वाघ आहे त्यांचाही बंदोबस्त करणं गरजेचे आहे. भीती अजून कायम आहे, असं अलका पवार यांचं म्हणणं आहे.

शेतामध्ये पीक असल्यामुळे यवतमाळचे नीळकंठ खैरबोराटे इतर चार-पाच जणांसोबत शेतात जायचे. त्या रात्रीही ते शेतातच होते. वाघ ठार केल्याची माहिती त्यांना सकाळी कळली. ठार झाल्यांनंतर वाघिणीला त्यांनी पाहिले नाही.

यापूर्वीही त्यांना शेतात, शिवारात कधीच वाघ दिसला नाही. ती वाघीण मेल्याचा त्यांना आनंद किंवा दुःख नाही. वाघीण मारायला नाहक खर्च करण्यापेक्षा आमच्या शेतीला तारांचं कुंपण द्या, अशी विनंती त्यांनी वन विभागाकडे केली होती.

तारांचं कुंपण असल्यानंतर वाघिणीला ठार मारण्याची गरज पडली नसती, असं त्यांचं म्हणणं आहे. पण वाघीण ठार झाल्यानं आता भीतीचं वातावरण टळलंय असं त्यांना वाटतं.

T1 ठार झाल्याची बातमी पसरताच गावकऱ्यांनी जल्लोष केला. गावकऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवले आणि फटाके फोडले.

गावकरी अरविंद वाढोनकर सांगतात, "गेल्या अनेक वर्षांपासून जगणे कठीण झाले होते. वाघाच्या दहशतीने सुखानं झोप लागत नव्हती. एकदा शेतात गेलं की परत जिवंत येण्याची शाश्वती नव्हती. आता आम्ही बिनधास्त शेतात जाऊ शकतो."

नीळकंठ खैरबोराटे
फोटो कॅप्शन, नीळकंठ खैरबोराटे यांनी वाघीण मारायला नाहक खर्च करण्यापेक्षा आमच्या शेतीला तारांचं कुंपण द्या, अशी विनंती वन विभागाकडे केली होती.

अर्थ ब्रिगेडचे डॉ. P. V. सुब्रमण्यम म्हणतात की, "न्यायालयाचे स्पष्ट आदेश होते की आधी या वाघिणीला पकडण्यासाठी प्रयत्न व्हावेत. पण तसं झालेलं नाही. हे न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन आहे. सरकारमधील जबाबदार लोकांचंच याला पाठबळ असेल तर जंगलांना काही भवितव्य नाही.

"खासगी शिकाऱ्याने वाघिणीला ठार मारले आहे. वन विभागानेच या शिकाऱ्याला आमंत्रित केलं होतं," असा आरोप त्यांनी यावेळी केला.

या प्रकरणी न्यायालयात जायचं की आंदोलन करायचं यावर आमचे विचार सुरू आहेत, असंही ते पुढे म्हणाले.

"ही राज्य सरकारच्या पाठिंब्याने झालेली शिकार आहे. या वाघिणीला पकडण्याचे फार कमी प्रयत्न झाले, हा प्रकार अत्यंत दुःखद आहे," असं अर्थ ब्रिगेडच्या सरिता सुब्रमण्यम यांनी सांगितलं.

वन विभाग गेल्या दोन वर्षांपासून या वाघिणीच्या शोधात होता. पण तिचा थांगपत्ता लागत नव्हता. यावर्षी 29 जानेवारीला तिला ठार करण्याचे आदेशही देण्यात आले होते. पण त्या आदेशाला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं. त्यामुळे पहिल्या आदेशाला स्थगिती मिळाली.

अवनीला ठार करण्याच्या आदेशाला दोनदा स्थगिती देण्यात आली होती. पण दोन महिन्यापुर्वी सुप्रीम कोर्टाने ही स्थगिती उठवली आणि या वाघिणीला ठार करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली.

मृत अवनी
फोटो कॅप्शन, अवनीला शुक्रवारी रात्री ठार करण्यात आलं

आधी वाघिणीला पकडण्याचे प्रयत्न व्हावेत आणि जर ते शक्य झालं नाही तर तिला ठार करावे असा आदेश कोर्टाने दिला. या मोहिमेची मुख्यतः दोन उदिष्टे होती. एक म्हणजे वाघिणीला पकडणं आणि दुसरं लोकांचं तिच्यापासून संरक्षण करणं.

लोकांना वाचवण्यासाठी वेगळं पथक आणि वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वेगळं पथक अशी दोन पथक तैनात करण्यात आली.

दररोज सकाळी पाच वाजेपासून ही टीम फिल्ड वर सक्रिय व्हायची. पहाटेपासूनच वन कर्मचारी 100 ट्रॅप कॅमेऱ्यांची पाहणी करून वाघिणीच्या फोटोंची खात्री करायचे. जिथे वाघिणीचा वावर आहे असं फोटोमध्ये दिसायचं त्या दिशेने पथक शोधमोहिमेला निघायचं.

ज्यावेळी वाघिणीचा माग ट्रॅप कॅमेऱ्यांनी घेतलेल्या फोटोत लागायचा नाही तेव्हा आठ जणांची एक ट्रॅकिंग टीम, ज्यामध्ये पोलिसांचे शूटर, स्थानिक गावकरी आणि वन विभागाची पाच ते सहा माणसं अशांचा समावेश होता, जंगलात वाघिणीच्या शोधार्थ निघायची.

पथक
फोटो कॅप्शन, लोकांना वाचवण्यासाठी वेगळं पथक आणि वाघिणीला पकडण्यासाठी तिला जेरबंद करण्यासाठी वेगळं पथक तैनात करण्यात आले होते.

ही टीम गस्त घालत असलेल्या भागात वाघिणीचा वावर आहे असे पुरावे मिळताच ते बेस कॅम्पच्या सपोर्ट टीमला कळवायचे. वाघिणीचा ठावठिकाणा लागल्यानंतर बेस कॅम्पचे पथक ताबडतोब सज्ज होऊन तयारीनिशी जंगलात दाखल व्हायचे.

वाघिणीला शोधण्याची ही मोहीम जवळपास 2 महिने चालली होती. ज्या परिसरातल्या ट्रॅप कॅमेऱ्यात वाघीण दिसायची त्या परिसरात काळजीपूर्वक ही मोहीम राबवली जायची.

मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए के मिश्रा यांनी वाघिणीला ठार करण्यासाठी राबवलेल्या मोहिमेची तपशीलात जाऊन माहिती दिली.

"शुक्रवार असल्याने राळेगावात बाजार होता. बाजार असल्यामुळे या भागात संध्याकाळी 7 ते रात्री 1 पर्यंत लोकांची गर्दी असते. त्यामुळे आमच्या विभागातील कर्मचाऱ्यांना याच परिसरात वाघीण असल्याचे संदेश येत होते.

"आमचं पथक तिथे गेल्यानंतर त्यांनाही वाघिणीला दिसली. पण ती फार लांब असल्याने ही तीच वाघीण आहे की नाही हे ठरवणं अवघड होतं. रात्री 11 च्या दरम्यान वाघ स्पष्ट दिसायला लागली. तेव्हा हीच T1 आहे याची आम्हाला खात्री पटली.

"टीमचे सदस्य शेख यांनी ताबडतोब डार्ट गनचा (गुंगी आणणाऱ्या औषधाची बंदूक) मारा केला. योग्य जागी डार्ट लागलासुद्धा. मात्र प्रत्युत्तर म्हणून वाघीण आमच्या पथकावर चाल करून आली. पथकाच्या सात ते आठ मीटर इतक्या अंतरावर ती पोहचली. त्यामुळे स्वःरक्षणासाठी शार्प शूटर अजगरने तिच्यावर गोळी चालवली. ज्यात वाघिणीचा मृत्यू झाला," मिश्रा पुढे सांगतात.

वाघिणीला जेरबंद करण्यासाठी परफ्यूमचा वापर?

खासगी पथकाने वाघिणीला पकडण्यासाठी वापरलेल्या युक्त्यांबाबत मिश्रा म्हणतात "सामान्यपणे ट्रॅप कॅमेरा आणि शोध मोहीमेच्या माध्यमातूनच वन विभागाचं ऑपरेशन चालायचं. बाकी खासगी पथकं जे करतील ती त्यांची जबाबदारी.

"वाघिणीला आकर्षित करण्यासाठी कुठली युक्ती वापरावी हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. काही युक्त्या त्यांनी जरूर वापरल्या असतील. मग त्यात कुत्रे असतील किंवा 'कॅलविन क्ले' परफ्यूम स्प्रे असेल तो त्यांचा प्रश्न आहे. तशा काही सूचना आमच्यामार्फत त्यांना देण्यात आलेल्या नव्हत्या," ते पुढे सांगतात.

वाघिणीच्या पिल्लांच्या मृत्यू होण्याचा धोका

वन विभागाचे ऑपरेशन अद्याप संपलेलं नाही. जवळपास 10 महिन्यांची T1 वाघिणीची पिल्लं जंगलात आहे. त्यांना शिकार करता येत नाही. त्यामुळे त्यांचा भूकबळीने मृत्यू होऊ शकतो अशी भीती वन्यजीवप्रेमींना आहे. सुप्रीम कोर्टानेही आपल्या आदेशात आधी बछड्यांना पकडा करा आणि मग वाघिणीला जेरबंद करा असे आदेश दिले होते.

"वाघिणीला ठार केले पण पिल्लांचे काय? ऐन उमद्या वयात येणारी पिल्लं. जेमतेम 11 महिन्याचं त्यांचं वय. आईने बाळकडू पाजून शिकारीत तरबेज होण्याचं, शिकण्याचं वय, मात्र यातच त्यांचं मातृछ्त्र हरपले, त्यांना निसर्ग सद्बुद्धी देवो.अतिशय उद्विग्न करणारा हा क्षण आहे," वन्यजीव अभ्यासक यादव तरटे म्हणतात.

प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए के मिश्रा
फोटो कॅप्शन, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए के मिश्रा

वन्यजीव विभागाला या परिस्थितीची जाणीव आहे, असं मिश्रा यांनी सांगितलं. "पिल्लं लहान असल्यामुळे त्यांना पकडणं सहज शक्य आहे. त्यासाठी फार मेहनत करावी लागणार नाही. वाघिणीला पकडण्याची जशी मोहीम चालू होती तशीच मोहीम यापुढेही या दोन पिल्लाना पकडण्यासाठी सुरू राहील."

प्राणिमित्रांच्या प्रश्नांची उत्तरं

वाघिणीला ठार करण्यासाठी दोन वर्षांपेक्षा जास्त वेळ का लागला? आणि जेरबंद का होऊ शकली नाही? यासारखे अनेक प्रश्न प्राणीमित्र विचारत आहेत.

"आपल्या प्रश्नांची उत्तर जाणून घ्यायची असतील तर प्राणी मित्रांनी जंगलात येऊन पाहावं. इथली भौगोलिक परिस्थिती महाराष्ट्रातल्या इतर भागांपेक्षा वेगळी आहे. आम्ही दरवर्षी चारपाच रेस्क्यू ऑपरेशन्स तसंच वाघांना जेरबंद करण्याच्या मोहिमा राबवतो. इतर भागात म्हणजेच ब्रह्मपुरी, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये अशा प्रकारच्या मोहिमा राबवणं सहज शक्य आहे पण या ठिकाणी मात्र ते शक्य झालं नाही.

"वनविभागाने शेतकऱ्याचा रोष पत्कारून त्यांच्यासोबत जंगलातल्या अनेक अडचणींना सामोरं जात रात्रंदिवस काम केलं, म्हणूनच हे काम फत्ते झाले. याचा अर्थ असा नाही की आम्हाला वाघिणीला ठार करायचे होतं पण एक वाघ जेव्हा 13 लोकांचा जीव घेतो तेव्हा आम्हाला असे निर्णय घ्यावे लागतात.

"शेतामध्ये पीक कापणीवर आलंय. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना रात्रीही शेतात जावं लागतं. अशात जर आणखी दोन लोकांचा बळी गेला असता तर नुकसान कोणाचं झालं असतं? तेव्हा प्राणिमित्रच म्हणाले असते की वन विभागाला वाघीण पकडण्यात यश येत नाही," मिश्रा सांगतात.

अवनी
फोटो कॅप्शन, अवनीवर अत्यंसंस्कार करण्यात आले.

धोका अजून टळलेला नाही

T1चा साथीदार T2 वाघही याच परिसरात आहे. अवनीने आजवर पाच लोकांचा बळी घेतल्याची नोंद वनविभागाच्या दप्तरी करण्यात आली होती मात्र T2ने आतापर्यंत माणसाला मारण्याचा पुरावा वनविभागाकडे नाही.

पण शेतकऱ्यांनी शेतात जाताना आवश्यक ती काळजी घ्यावी, अशी सूचना वनविभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे भीतीचं वातावरण अजूनही कायम आहे.

"T2 नावाचा दुसरा वाघ त्याच परिसरात आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित राहण्याची आवश्यकता आहेच. जंगली वाघ हा लाजाळू असतो आणि माणसावर हल्ला करत नाही. T2 फार काही प्रमाणात नागरिकांना दिसला पण T1 नागरिकांना सहज दिसायची आणि आक्रमक पण असायची," मिश्रा सांगतात.

'एकीकडे व्याघ्र प्रकल्पावर कोट्यावधींचा खर्च तर दुसरीकडे त्यांची हत्या'

वनविभागच्या स्पष्टीकरणाच्या विरोधी मत देताना तरटे म्हणतात, "वाघ मारणे हा काही पर्याय असू शकत नाही. T1 चा बंदोबस्त केला तरी आणखी T1 तयार होतील. आणि मग प्रत्येक वेळी त्यांना इतक्या राजेरोसपणे ठार केलं तर आपला राष्ट्रीय प्राणी वाघ नामशेष होईल."

याविषयी पुढे बोलताना ते सांगतात, "एकीकडे व्याघ्र प्रकल्प माध्यमातून कोट्यावधी रूपये खर्च करायचे तर दुसरीकडे हत्येची मागणी करायची, आणि परत वाघ पाहण्याचा हट्टही करायचा. वाघांच्या बाबतीत अशी दुटप्पी भुमिका घेणं योग्य नाही. म्हणूनच मानव आणि वन्यजीव यांच्या सहजीवनाच्या नात्याची वीण पुन्हा नव्याने विणायची आज गरज निर्माण झाली आहे. या दृष्टीने वन विभाग, वन्यजीवप्रेमी व सामान्य नागरिकांनी पावले टाकली पाहिजेत.

फलक

शेतकरी न्यायहक्क आंदोलन समिती, देवानंद पवार यांच्यामते, "T1 अवनी नामक वाघिणीचा मृत्यू परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांसाठी दिलासादायक आहे. शार्पशुटर शाफत अली खान यांच्या टीमचे प्रयत्न देखील वाखाणण्याजोगे आहेत. पण वाघिणीला न मारता बेशुद्ध करण्याचा प्रयत्न व्हायला हवा होता

"मुळात या विषयात शासन व प्रशासन वेळीच गंभीर झाले असते तर एवढे जीव गेले नसते. एका अर्थाने 13 लोकांचे जीव वाघिणीमुळे नाही तर शासनाच्या नाकर्तेपणामुळे गेले आहेत. वाघिणीला मारण्याच्या मोहिमेत तब्बल 6 कोटी रुपये खर्च करण्यात आले. आता जे उपाय केले ते आधीच केले असते तर वाघीण, शेतकरी आणि शेतमजुरांचा जीव वाचला असता," ते पुढे म्हणतात.

अजूनही ग्रामस्थ पूर्णपणे सुरक्षित नाहीत. यवतमाळ जिल्ह्यात वन्यप्राण्यांचे हल्ले नित्याचेच आहेत. "शासन यावर उपाययोजना कधी करणार? याबाबत शासनाने योग्य धोरण आखून प्रयत्न करणे आवश्यक आहे," पवार सांगतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)