अमरावतीत वाघाची दहशत : 'माझ्या नवऱ्याचं डोकं, हात आणि पाय वाघाने खाल्ले'

वाघ

फोटो स्रोत, FOREST DEPARTMENT

फोटो कॅप्शन, 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 5 वाजता वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झालेलं हे दृश्य.
    • Author, नितेश राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी अमरावतीवरून

"डोकं खाल्लं, हात-पायही ठेवले नाहीत त्या वाघाने. बकऱ्यांसाठी शेतात चारा आणायला गेले होते. आणि तेच वाघाचा चारा झाले," वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मोरेश्वर वाळके यांच्या बायकोचं हे वाक्य आहे.

22 ऑक्टोबरला मोरेश्वर वाळके शेतात गेले असताना वाघाचे भक्ष्य बनले. अमरावतीपासून अंदाजे 50 किमी अंतरावर असलेल्या अंजनसिंगी या गावात ही घटना घडली. मंगरूळ दस्तगिर, अंजनसिंगी आणि परिसरातील 22 गावांत सध्या भीतीचं वातावरण आहे. यामुळे वनविभागाने जवळपासच्या गावांतील लोकांना शेतात जाण्यास मनाई केली आहे.

"जनावरं दोन दिवसांपासून उपाशी होती. चाऱ्यासाठी मोठी हिम्मत करून ते शेतात गेले. पण सायंकाळपर्यंत ते घरी आलेच नाहीत. रात्री उशिरा गावकऱ्यांना कळवलं मग शोधाशोध सुरू झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता नाल्याजवळ त्यांची सायकल दिसली. काही वेळानंतर वाघाच्या हल्लात ते गेल्याचं समजलं," असं वाळके यांच्या पत्नी मनूताई सांगतात. घडलेला प्रकार सांगताना त्यांची नजर शुन्यात असते.

मृत मोरेश्वर वाळके यांच्या पत्नी

फोटो स्रोत, NITESH RAUT/BBC

फोटो कॅप्शन, मृत मोरेश्वर वाळके यांच्या पत्नी ... आणि त्यांची मुलगी

शेजारच्या मंगरूळ दस्तगीर गावातही अशीच घटना घडली आहे. 19 ऑक्टोबरला सायंकाळी राजेंद्र निमकर चारा आणायला शेतात गेले होते. सायंकाळ होऊनही ते घरी परतले नाहीत. निमकर यांचं शेत घरापासून दीड किलोमीटर अंतरावर आहे. मात्र बराच वेळ ते घरी आले नाहीत म्हणून निमकर यांचे कुटुंब त्यांना शोधायला शेतात गेले. शेतात त्यांचं डोकं सापडलं. काही अंतरावर फरफटत नेल्याच्या खुणा मातीवर दिसत होत्या. वाघाच्या पायाचे ठसेही दिसत होते. दुसऱ्या दिवशी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्यांचं धड सापडलं.

आता तीन मुलांचा सांभाळ कसा करायचा असा प्रश्न निमकर यांच्या पत्नी शुभांगी यांना पडलाय.

याआधी मंगरूळ दस्तगीर जवळच्या गावात 50 वर्षीय व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

"वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न अपुरे आहेत. शेतीची कामेही खोळंबली आहेत. त्यात शेतमजूरही शेतात जायला घाबरत आहेत. सायंकाळी पाचनंतर गावात संचारबंदीसारखी परिस्थिती असते. शेतमजुरी करणाऱ्यांपुढे जगण्याचाच प्रश्न उभा आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया उपसरपंच संजय भोवलकर यांनी दिली.

शुभांगी निमकर

फोटो स्रोत, NITESH RAUT/BBC

फोटो कॅप्शन, मयत राजेंद्र निमकर यांच्या पत्नी शुभांगी

"शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावं लागत आहे. वाघाला पकडण्यासाठी वनविभागाचे गतीने प्रयत्न होताना दिसत नाहीत," असा त्यांचा आरोप आहे.

"सोयाबीन, कापूस कापनीवर आलाय. तरीही ते शेतात जाता येत नाही. काहीही करून वाघाचा बंदोबस्त करावा, अन्यथा गावकरीच वाघाला संपवतील," अशी प्रतिक्रिया शेतकरी प्रदीप ठाकरे यांनी दिली.

'शाळेजवळ पट्टेरी वाघ आला होता'

वाघाची दहशत गावावर दिसत आहे. वाघ दिसल्याच्या अफवानांही गावात उधाण आलं आहे.

गावलगतच्या मदर तेरेसा शाळेतील शिक्षक, विद्यार्थ्यांनी वाघाचा थरार अनुभवला.

शाळेचे संचालक प्रमोद कुरजेकर थरार सांगतात "सकाळचं सत्र होतं. वाघाचा वावर असल्याने आम्ही सतर्क होतो. वर्गाचे दरवाजे बंद ठेवण्याचे आणि मुलांना बाथरूमला जायचं असेल तर सोबत शिपाई द्यावा, अशा सूचना होत्याच. अचानक माकडांचा कल्लोळ कानी पडला म्हणून मी शाळेच्या छतावर गेलो. पाहिलं तर समोर पट्टेरी वाघ होता. वाघ शाळेकडे येऊ नये म्हणून आम्ही गोंधळ केला. तेव्हा वाघ निघून गेला."

वनविभागाने ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने परिसर पिंजून काढला. पण वाघाचा थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर शाळेला सुटी जाहीर करण्यात आली.

वाघ

फोटो स्रोत, NITESH RAUT/BBC

वनविभागाचे प्रयत्न

मुख्य वनसंरक्षक (CCF) प्रवीण चव्हाण म्हणाले, "वाघाला बेशुद्ध करून पकडण्याची करण्याची परवानगी मिळाली आहे. ही मोहीम वनविभागच राबवत आहे."

वाघाचा वावर सध्या शेतशिवारातील नदी नाला परिसरात आहे. हा वाघ जवळपास अडीच वर्षांचा आहे.

वाघाच्या हालचालींवर नजर ठेवण्याची जबाबदारी सहायक वनसंरक्षक राजेंद्र बोडें यांच्यावर आहे. "दिवसापेक्षा रात्री वाघाची हालचाल जास्त असते. दिवसा थंडाव्याचा आधार घेऊन वाघ बसलेला असतो," असं ते म्हणाले.

"वाघाने शिकार केलेल्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे आणि पिंजरेही लावण्यात आले आहेत. 75 वन कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. वाघाचे पगमार्क दिसलेल्या परिसरात ड्रोनने टेहळणी सुरू आहे," असं ते म्हणाले.

मेळघाट, पोहरा मालखेड सोडला तर मंगरूळ दस्तगीर, अंजनसिंगी हा परिसर जंगल क्षेत्र नाही. इथं 2 लोका वाघाचे बळी ठरले आहेत.

सहायक वनसंरक्षक (ACF) राजेंद्र बोंडे

फोटो स्रोत, NITESH RAUT/BBC

फोटो कॅप्शन, जवळपास 75 वन कर्मचारी वाघाच्या सर्च ऑपरेशनमध्ये सहभागी आहेत. ज्या भागात वाघाचे पगमार्क आढळतात तिथे ड्रोनच्या माध्यमातून शोध घेतला जातो सहायक वनसंरक्षक (ACF) राजेंद्र बोंडे यांनी बीबीसीला सांगितलं.

वाघांचा दूरचा प्रवास

यापूर्वी विदर्भातील यवतमाळ, बोर, ताडोबा वगळता इतर भागात वन्यजीव आणि मानवी संघर्ष कधीच उद्भवला नव्हता. पण गेल्या काही वर्षांत जंगल परिसर सोडून वाघ शेकडो किलोमीटर भ्रमंती करतोय.

सातपुडा फांउडेशनचे अध्यक्ष किशोर रिठे यांनी वाघांच्या भटकंतीवर अधिक माहिती दिली.

बहेलिया टोळीवरील अंकुश, जंगलक्षेत्रातील लोकांचे झालेलं पुनर्वसन आदी कारणांमुळे वाघांच्या प्रजननाच्या क्षेत्रांत वाढ झाली आहे. ताडोबा अंधारी, पेंच, मेळघाट, उमरेड, नवेगाव, नागझिरा, बोर अशी जंगले आणि याशिवाय टिपेश्वर अभयारण्य यवतमाळ जिल्ह्यांमध्येही वाघिणी आणि पिल्लं दिसायला लागली आहेत.

साधारणतः बछडी दोन वर्षांची झाली की आईपासून दूर होतात स्वतःसाठी नवीन जंगलक्षेत्र निश्चित करतात.

विदर्भातील वाघ तेलंगाणा आणि मध्य प्रदेशातील जंगलात गेल्याची उदाहरणंही आहेत, असं रिठे यांनी सांगितलं.

विदर्भातील वाघाच्या स्थलांतराची काही उदाहरणं

  • उमरेड-करांडला अभयारण्यातील प्रसिद्ध 'जय' वाघाचा छावा 'बली'ने सुमारे १५० किलोमीटरहून अधिक एरियल अंतर पार करत मानसिंगदेव अभयारण्य गाठल होतं.
  • कळमेश्वर-कोंढाळीच्या राखीव जंगलातील वाघाने तब्बल १०० ते १२० किलोमीटरचे एरियल अंतर पार करत अमरावतीतील पोहरा-मालखेडच्या राखीव जंगलात स्थलांतर केलं होतं.
  • चंद्रपूरच्या जंगलातल्या वाघिणीनं 500 किलोमीटरचा प्रवास करून बोर अभयारण्यात स्थलांतर केले होते. नरभक्षक ठरवण्यात आलेल्या या वाघिणीला मारण्यात येणार होतं, पण शेतात विजेचा धक्का लागून तिचा मृत्यू झाला.

काय काळजी घ्यावी?

रिठे सांगतात, "गेल्या तीन वर्षांमध्ये मानवी वस्तीच्या आसपास असणाऱ्या जंगलामध्ये माणसांवर वाघ हल्ले करताना दिसून आलं आहे. त्या वाघाला किंवा वाघिणीला, बछड्याला नरभक्षक ही ठरवलं जात."

"विदर्भात जंगलांनी वेढलेली गावं आहेत. अशा जंगलांचे कॉरिडॉर निश्चित नाहीत. वाघ एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातात. मानवी वस्तीच्या आसपास असलेला वाघ आपल्या जवळपास आहे, हे लोकांना माहीत नसतं. त्यामुळे लोक बेसावध असतात. म्हणून विदर्भात भीतीचं वातावरण आहे," असं ते म्हणाले.

"वाघाने गावामध्ये जाऊन एखाद्या माणसाचा बळी घेतला, असं एकही उदाहरण नाही. यवतमाळच्या टी 1 वाघिणीने केलेले हल्ले वनक्षेत्रांमध्ये माणूस गेल्याने झाले आहेत. वाघांच्या हल्ल्यांचं समर्थन होऊ शकत नाही, पण वाघाला ठार केल्याने किंवा पकडल्याने प्रश्न सुटणार नाहीत," असं ते म्हणाले.

वाघाने उभे राहिलेल्या माणासांवर ह्ल्ले केलेले नाहीत, असंही ते सांगतात. खाली बसलेल्या, शौचाला बसलेल्या माणासाला वाघ भक्ष समूजन हल्ला करतो, असं ते म्हणाले.

समजा एखाद्या क्षेत्रातून वाघाला मारलं किंवा त्याला पकडून दुसरीकडं सोडलं तर या वाघाची जागा दुसरा वाघ घेतो, त्यामुळे हा पर्याय होऊ शकत नाही, असं ते म्हणाले. पूर्वी आपल्या जंगलांत वाघ नव्हता, तो आता आला आहे हे लक्षात घेऊन शेतात फिरताना काळजी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

रिठे यांनी यावर खालील उपाय सांगितले आहेत.

  • शेतात जाताना आवाज करत जाणे.
  • कुत्रा सोबत घेणे.
  • एकटे जंगलात न जाणे.

"हा वाघ दोन हल्ल्यांमुळे वादग्रस्त ठरला आहे. पण या हल्ल्यांचा अर्थ हा वाघ नरभक्षक आहे, असं होत नाही. हे हल्ले अपघात होते. प्रयत्न केले तर असे हल्ले थांबवता येतील," असं मत रिठे यांचं आहे.

वाघ

फोटो स्रोत, NITESH RAUT/BBC

जंगलनिहाय अधिवासातील फरक

  • ताडोबा अंधारी प्रकल्पात चितळ आणि सांबाराची संख्या जास्त आहे. तिथं 8 चौरस किलोमीटरमध्ये एक नर दोन मादी राहातात.
  • पेंच मध्ये 15 चौरस किलोमीटर परिसरात एक नर दोन मादी राहातात. मेळघाटात तृणभक्षी प्राण्यांची संख्या कमी आहे. त्या ठिकाणी वाघांचं क्षेत्र मोठं दिसतं.

विदर्भात वाघ एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जाताना जवळपास 230 किलोमीटर इतका प्रवास करतात. या प्रवासात वाघ शेतांतून प्रवास करतो. हा प्रवास थांबत थांबत होतो. योग्य वनक्षेत्र मिळालं की वाघ तिथं जास्त काळ थांबतो. तिथं अशा वाघांचं प्रजननही होतं.

वाघ

फोटो स्रोत, NITESH RAUT/BBC

वन्यजीव संवर्धनातून रोजगार निर्मिती

एकीकडे वाघ हा रोजगार देणारा प्राणी ठरलाय. ताडोबामध्ये मिळणारा महसूल 8 कोटीच्या रुपयांच्या घरात गेलाय. व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून 4 हजार युवकांना रोजगार मिळाला आहे. विविध सरकारी योजनाही राबवल्या जात आहेत.

गुजरातच्या गिर अभयारण्यात सिंह 300 किलोमीटरपर्यंत प्रवास करतात. तिथं लोकांना संरक्षण, तातडीने नुकसान भरपाई, लोकांना मदतीसाठी प्राणिमित्रांची नेमणूक, सिंहाच्या जंगलक्षेत्रातील माणसांचा वावर कमी करणं अशा उपाययोजना केल्या आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)