सिंहिणीने आठ वर्षांच्या साथीदाराला मरेपर्यंत मारलं

सिंह, वन्यजीव, अमेरिका

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, आठ वर्ष एकत्र असलेल्या सिंहिणीने सिंहाचा जीव घेतला

अमेरिकेतील इंडियानापोलीसमधल्या प्राणीसंग्रहालयातील एका सिंहिणीने तिच्या आठ वर्षांच्या साथीदाराला ठार केलं आहे. या साथीदारापासून तिला तीन बछडे झाले आहेत. ही माहिती प्राणीसंग्रहालयातल्या अधिकाऱ्यांनी दिली.

12 वर्षांच्या झुरी नावाच्या सिंहिणीने, 10 वर्षांच्या न्याक या सिंहावर हल्ला केला. प्राणीसंग्रहालयातील कर्मचारी या दोघांची झटापट थांबवू शकले नाहीत. श्वास गुदमरल्यामुळे सिंहाचा मृत्यू झाला.

गेली आठ वर्ष सिंहीण आणि सिंह एकाच पिंजऱ्यात राहत होते. या दोघांना 2015 मध्ये तीन बछडे झाले होते.

नक्की काय प्रकार घडला यासाठी सखोल चौकशी करण्यात येईल, असं प्राणीसंग्रहालयाने फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

न्याक हा उमदा सिंह होता आणि त्याची उणीव नक्कीच जाणवेल असं या फेसबुक पोस्टमध्ये पुढे म्हटलं आहे.

सिंहांसाठीच्या पिंजऱ्यातून मोठ्या प्रमाणावर डरकाळ्यांमुळे काहीतरी वेगळं घडत असल्याची जाणीव आम्हाला झाली.

झुरी सिंहिणीने न्याक सिंहाच्या मानेला पकडलं होतं. या दोघांना बाजूला करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र सिंहिणीने सिंहावरची पकड ढिली होऊ दिली नाही. सिंहाची हालचाल कायमची थांबल्यानंतरच सिंहिणीने त्याच्यावरची पकड सैल केली.

या दोघांदरम्यान याआधी आक्रमक स्वरुपाची भांडणं झालं नसल्याचं प्राणीसंग्रहालयाने म्हटलं आहे.

प्राण्यांचे आपापसातले ऋणानुबंध खूपच दृढ स्वरुपाचे असतात. न्याक सिंहाचं जाणं सगळ्या प्राण्यांना चटका लावणारं आहे, असं इंडियानापोलीस प्राणीसंग्रहालयाचे प्रमुख डेव्हिड हेगन यांनी सांगितलं. आमच्यासाठी न्याक सिंह घरच्यासारखा होता असंही ते म्हणाले.

सिंहाच्या जाण्यानंतर प्राणीसंग्रहालयातील अन्य सिंहांच्या राहण्याच्या व्यवस्थेत कोणताही बदल केला जाणार नसल्याचं प्राणीसंग्रहालयाने स्पष्ट केलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)