प्राण्यांची हाडं गोळा करणाऱ्यांवर दहशतीचं सावट?

उत्तर प्रदेशात मृत प्राण्यांचे सांगाडे गोळा करण्याचं काम पिढ्यानपिढ्या करत असलेले लोक, सध्या दहशतीच्या छायेत आहेत. कारण आहे - 2017मध्येसरकारनं पशूंच्या कत्तलींच्या विरोधात उचलेली कठोर पावलं... सांगत आहेत छायाचित्रकार अंकित श्रीनिवास. त्यांनी हाडं गोळा करणाऱ्यांपैकी काहींशी संवाद साधला आणि मांडलं हे चित्रवृत्त.
"आम्ही हाडं घेऊन जातो तेव्हा लोकांना आम्ही कत्तलखान्याचे कर्मचारी वाटतो," असं 55वर्षीय ब्रिजवासी लाल म्हणतात.
ती हाडं विकून लाल आणि त्यांच्यासारखे हजारो दलित गुजराण करतात.
गेल्या काही वर्षांत त्यांच्यापैकी अनेकांवर गोहत्या केल्याच्या संशयावरुन हल्ले झाले आहेत. लाल यांनाही काही वेळा धमकावण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
उत्तर प्रदेशात मार्च 2017मध्ये भाजपचं सरकार सत्तेत आलं. त्यानंतर, स्थानिक प्रशासनानं कत्तलखान्यांवर कारवाईची बडगा उचलला. देशातल्या 18 राज्यांमध्ये गुरांचे कत्तलखाने बंद करण्यात आले आहेत. या कारवाईला भाजप सत्तेत आल्यावर वेग आला.
उत्तर प्रदेशात गुरांची हाडं गोळा करणाऱ्यांची नेमकी संख्या किती आहे याची नोंद नाही. परंतु, त्याचं प्रमाण अलाहाबाद, कानपूर, गोंडा या भागात अधिक आहे. कारण याच भागात ही हाडं खरेदी करुन त्याची पावडर बनवण्याचे कारखाने आहेत. पुढे त्याचा वापर रसायनांवर प्रक्रिया करण्यासाठी केला जातो.
"किलोमागे 3 ते 5 रुपये असा भाव या हाडांना मिळतो. हे काही फार सन्मानजनक काम नाही, पण किमान त्यातून कुटुंबांचं पोट तरी भरतं," अशी माहिती लाल यांनी दिली.

"आता मात्र या व्यवसायाची भीती वाटते. कारण गेल्या काही वर्षांत गोहत्येच्या संशयावरुन 12हून जास्त लोकांची हत्या झाली आहे. त्यातले बहुतांश मुस्लीम आहेत, त्यांना केवळ अफवांवरुन लक्ष्य करण्यात आलं", असं लाल म्हणतात.
"आम्हाला खूप काळजीपूर्वक काम करावं लागतं. पहाटे अंधार असताना काम सुरू होतं आणि सकाळी 10च्या आधी काम संपवावं लागतं," असं लाल यांनी सांगितलं.
हे काम करणं हा कलंक मानला जात असल्यानं हा व्यवसाय आणखी कठीण होतो.

"आम्ही जातीनं दलित आहोत, त्यामुळे तसाही आम्हाला कुठला सन्मान मिळत नाहीच. त्यातून हा व्यवसाय करत असल्यानं तर आम्ही अस्पृश्य झालो आहोत. आम्ही समोरून येताना दिसलो की, लोक रस्ता बदलतात," अशी खंत लाल यांनी व्यक्त केली.
भेदभावाच्या विरोधात कायदा असला तरी देशातल्या 20 कोटी दलितांचं होत असलेलं शोषण हेही एक वास्तवच आहे.
"कुजलेल्या कातड्याची दुर्गंधी कशी असते हे तुम्हाला कळणार नाही. लोकांना वाटतं ते आमच्या सवयीचं झालं आहे. पण ते तसं नसतं. आमच्याकडे दुसरा काही पर्यायच नसतो," असं आणखी एक हाडांचे व्यावसायिक सुग्रीव म्हणाले. त्यांनी त्यांचं आडनाव सांगण्यास नकार दिला. ते पुढे म्हणाले, "हे काम करण्यास खूप शारीरिक आणि मानसिक श्रम लागतात."

"मेलेली जनावरं शोधण्यासाठी आम्ही दररोज किमान 45 किमींची पायपीट करतो. गोठ्यातलं जनावर मेल्यास आम्हाला बोलावलं जातं. त्यावेळी आम्हाला पाणीही विचारत नाहीत," असा अनुभव सुग्रीव यांनी सांगितला.
"हा अन्याय आहे. आमचं काम महत्त्वाचं आहे. आम्ही लोकांच्या घरांतून, शेतांमधून मेलेली जनावरं उचलतो. पण त्याबद्दल आम्हाला कधीही सन्मानाची वागणूक मिळत नाही," अशी खंत सुग्रीव यांना वाटते.
त्यांच्या मुलांनीही हाडं गोळा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र भविष्यात त्यांना दुसरं काही काम मिळेल, अशी सुग्रीव यांना अपेक्षा आहे.

"ते थोडं कठीण वाटतं, कारण शिक्षणाचा अभाव! आम्हाला दुसरं काही काम कोणी देणार नाही. पण मी काहीतरी नक्की शोधीन", असा विश्वास त्यांना आहे.
बैसाखू, हेदेखील दररोज प्राण्यांच्या हाडांचे ढीग गोळा करतात. तेही आडनाव सांगत नाहीत.
ते म्हणतात, "तुम्हाला इथे उभं राहणं कठीण होतंय ना... पण आम्ही कित्येक दशकांपासून हे सहन करत आहोत. आणि का तर दुसरा इलाज नाही म्हणून. मला दुसरी नोकरी हवी आहे, पण देणार कोण?"
गोरक्षकांकडून मुस्लीम आणि दलित यांच्यावर होत असलेल्या हल्यांची बैसाखू यांनाही चिंता वाटते आहे.

"आम्ही प्राण्यांना मारत नाही," ते म्हणतात. "मेलेल्या जनावरांची हाडं आम्ही उचलतो. पण काही लोकांना ते दिसत नाही, कळत नाही. त्यातून मारहाण होते."
"मी किती तरी जखमी आणि आजारी गायी पाहिल्या आहेत. लोकांनी आम्हाला त्रास देण्यापेक्षा अशा गायींची काळजी घ्यायला हवी," असं बैसाखू म्हणाले.
जनावरांचे सांगाडे शोधत असताना काही वेळा ते जखमीही होतात. पण त्यांच्याकडे रुग्णालयात जाण्याएवढेही पैसे नसतात.
"कधी 50 किलो तर कधी पाचच किलो हाडं मिळतात. कधीकधी काहीही मिळत नाही. या व्यवसायात कशाचीच खात्री नाही," असं बैसाखू म्हणतात.

बरेचदा त्यांना उधारी करुन, पैसे उसने घेऊन पाच जणांच्या कुटुंबाचं पोट भरावं लागतं.
काही दिवसांपूर्वी त्यांना काही लोकांनी अडवलंही होतं. त्यामुळे हा व्यवसाय करणं आणखी कठीण झाल्याचं ते सांगतात.
"मी सायकलवरून एक सांगाडा घेऊन येत होतो. मला अडवण्यात आलं. त्यांचं म्हणणं होतं की मी गाय मारली आहे. ते माझं काही ऐकायला तयार नव्हते. त्यांनी मला शिवीगाळ केला. तो प्रसंग आठवला तरी माझ्या अंगावर काटा येतो," असं बैसाखू म्हणाले.
(अंकित श्रीनिवास हे अलाहाबादस्थित छायाचित्रकार आहेत. लेखातील विचार लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत.)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








