बंगाल, बिहारच्या दंगलींमध्ये मुस्लीमच लक्ष्य होते का? जाणून घ्या 9 मुद्दे

बिहार

फोटो स्रोत, SUBODH/BBC

फोटो कॅप्शन, मुस्लिमांविरुद्ध द्वेष पसरवणं एक राजकीय पाऊल आहे, ज्याला सामाजिक पाठिंबा वाढवण्याचा प्रयत्न होतोय.

देशातल्या अनेक शहरांमध्ये दुकानांची तोडफोड करून त्यांना आग लावण्याच्या घटना घडल्या. या घटना जरी देशात वेगवेगळ्या ठिकाणी असल्या तरी त्यांच्यात अनेक गोष्टी समान आहेत.

गेल्या अनेक दिवसांमध्ये बिहार आणि बंगालमध्ये हिंसाचार आणि तणावाच्या जवळजवळ दहा घटना घडल्या. या सगळ्या घटनांमध्ये एक विशिष्ट पॅटर्न दिसून येत आहे. म्हणूनच या घटना स्थानिक कारणांमुळे झाल्या, असं मानणं कठीण आहे.

सगळ्याच ठिकाणी वादंगाची सुरुवात आणि शेवट एकसारखा आहे. हिंसा करणारे आणि हिंसेचे बळी ठरलेले लोक एकसारखे आहेत. सांगायचा अर्थ असा की, हिंसा आणि जाळपोळीच्या या घटना सुनियोजित, सुसंगठित आणि नियंत्रित नव्हत्या, हे पटणारं नाही.

बिहार आणि बंगालच्या ज्या शहरांमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीनंतर हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना घडल्या, अशा शहरांचा बीबीसीचे दोन प्रतिनिधी रजनीश कुमार आणि दिलनवाज पाशा यांनी दौरा केला

या सगळ्या प्रकरणात नऊ अशा गोष्टी आढळून आल्या ज्यामुळे या काही छुटपूट घटना नाही तर त्यामागे एक मोठा कट होता, असं वाटायला पूर्ण वाव आहे.

1. तरुण, झेंडे, बाईक आणि उग्र मोर्चा

बिहारमध्ये जातीय तणाव आणि मुस्लिमांविरुद्ध हिंसेच्या घटना 17 मार्चपासून सुरू झाल्या. 17 मार्चला केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांचा मुलगा अर्जित चौबे यांनी भागलपूरमध्ये हिंदू नववर्षानिमित्त एका शोभायात्रेचं आयोजन केलं होतं.

त्यानंतर रामनवमीपर्यंत औरंगाबाद, समस्तीपूरच्या रोसडा आणि नवादासारख्या शहरात जातीय अस्वस्थता पसरण्यास सुरुवात झाली. या सगळ्या शहरांत रामनवमीच्या मिरवणुकी निघाल्या होत्या. मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणांच्या कपाळांवर भगवी पट्टी होतीच. त्यांच्या मोटरसायकलींवर भगवे झेंडेही होते.

बिहार
फोटो कॅप्शन, बिहार

अपवाद म्हणून रोसडाच्या मिरवणुकीत बाईक नव्हत्या. पण या मिरवणुकीत सहभागी झालेले लोक खूप उग्र होते आणि त्यांच्या हातात भगवे झेंडे होते.

रामनवमीची मिरवणूक या आधी कधीही निघत नव्हती. म्हणून हिंदू नववर्षाची मिरवणूक एक नवा आविष्कारच आहे.

मागच्या वर्षी उत्तर प्रदेशातल्या सहारनपूरमध्ये महाराणा प्रताप यांच्या जयंतीला एक मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर तिथे दलितांना लक्ष्य करण्यात आलं होतं. मेवाडच्या राणा प्रताप यांची जयंती म्हणजे सहारनपूरसाठी नवीन गोष्ट होती.

2. मिरवणुकीचं आयोजक

सर्व शहरांतील मिरवणुकींचं आयोजक समान विचारांचं होते. त्यांची नावं वेगवेगळी होती पण सत्ताधारी भाजपशिवाय RSS आणि बजरंग दलसारख्या संघटनाही अप्रत्यक्षपणे जोडल्या गेल्या होत्या. औरंगाबादमध्ये भाजप आणि बजरंग दलाचे नेते प्रत्यक्ष सहभागी होते.

औरंगाबादच्या मिरवणुकीत भाजपचे खासदार सुशील सिंह, भाजपचे माजी आमदार रामाधार सिंह आणि हिंदू युवा वाहिनीचे नेते अनिल सिंह उपस्थित होते. अनिल सिंह यांना अटक करण्यात आली आहे.

रोसडामध्ये भाजप आणि बजरंग दलाच्या नेत्यांविरुद्ध FIR दाखल झाला आहे. भागलपूरमध्ये तर भाजपचे नेते अश्विनी चौबे यांचा मुलगा सामील होता.

बिहार

यादरम्यान अनेक हिंदू संघटनांचा उदय झाला आणि त्यांनी या मिरवणुकीत हिरीरीने सहभाग नोंदवला. भागलपूरमध्ये 'भगवा क्रांती' आणि औरंगाबादमध्ये 'सवर्ण क्रांती' या संघटनांचा जन्म झाला. जातीय चकमकीनंतर या दोन्ही संघटनांचे नेते भेटायला आणि बोलायला उपलब्ध झाले नाहीत.

याबरोबरच पश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये सुद्धा भाजपचा पाठिंबा होता. आसनसोलमध्ये हिंदूंच्या दुकानांना आणि घरांना आग लावण्यात आली होती. इथेही रामलीलाच्या मिरवणुकीच्या वेळी तणाव होता. तिथून हिंदूंना आपली घरं सोडून जावं लागलं.

3. एका ठराविक मार्गावरून जाण्याचा अट्टहास

सगळ्या शहरांमध्ये मिरवणूक मुस्लीमबहुल भागातून काढण्याचा अट्टहास धरला होता. नवादामध्ये रामनवमीच्या आधी जिल्हा प्रशासनाने शहरातील धार्मिक नेत्यांना बोलावून एक शांती बैठक घेतली. त्या बैठकीत मुस्लीमबहुल भागात 'पाकिस्तान मुर्दाबाद'च्या घोषणा देऊ नका, अशी विनंती करण्यात आली.

त्यावर भाजपच्या नेत्यांनी आक्षेप घेतला.

बिहार

इतकंच नाही तर नवादामध्ये भाजपचे खासदार म्हणाले की 'पाकिस्तान मुर्दाबाद'ची घोषणा भारतात द्यायची नाही तर कुठे द्यायची?

औरंगाबाद, रोसडा, भागलपूर आणि आसनसोलमध्येही असंच झालं. स्थानिक लोकांचं म्हणणं होतं की मिरवणुकीचा मार्ग मुद्दाम मुस्लीमबहुल भागातून काढण्यात आला.

पण आसनसोलच्या हिंसाचारात मुस्लीमबहुल भागात राहणारे हिंदू कुटुंबसुद्धा ओढले गेले आणि त्यामुळे त्यांनाही आपली घरं सोडून गावाबाहेरच्या भागात आश्रय घ्यावा लागला.

4. प्रक्षोभक घोषणा आणि डीजे

ज्या ज्या ठिकाणी मिरवणुका काढल्या तिथे मुस्लिमांना पाकिस्तानी संबोधलं गेलं. घोषणांबरोबर डीजेचा दणदणाट ऐकायला मिळाला. सगळ्या मिरवणुकीत एकच कॅसेट वापरली गेली.

बीबीसी प्रतिनिधी दिलनवाज पाशा यांच्याशी आसनसोलमध्ये बोलताना विश्व हिंदू परिषदेचे नेते राजेश गुप्ता यांनी रामनवमीला गाणं वाजवल्याची कबुली दिली.

ते म्हणाले, "हो आम्ही गाणी वाजवली. ती सगळी पाकिस्तानविरोधी गाणी होती. पण त्यात प्रक्षोभक घोषणा नव्हत्या."

बिहार,
फोटो कॅप्शन, औरंगाबादमध्ये मशिदीचा तुटलेला आरसा

पण रामनवमी आणि पाकिस्तानविरोधी घोषणांचा काय संबंध आहे? त्यावर ते म्हणतात, "आमची देशभक्ती दाखवण्याची एकही संधी सोडण्याची इच्छा नाही. पण पाकिस्तानविरोधी गाणी भारतात नाही तर मग कुठे वाजतील?"

5. क्रिया प्रतिक्रियांच्या सुरस कथा

संघ आणि भाजप नेत्यांनी मुस्लिमांविरुद्ध झालेल्या हल्ल्यांना क्रियेवरची प्रतिक्रिया म्हटलं आहे. बिहार भाजप महामंत्री राजेंद्र सिंह आणि औरंगाबादमध्ये संघाचे नेते सुरेंद्र किशोर सिंह यांनीही हीच प्रतिक्रिया दिली आहे.

औरंगाबाद, रोसडा आणि भागलपूरमधील मिरवणुकीदरम्यान मुस्लिमांनी चपला आणि दगड फेकले, अशी अफवा पसरवली जात होती. चपला किंवा दगड फेकण्यात आले याला क्रिया म्हणून मान्य केलं तरी ते एका विशिष्ट समुदायानेच फेकले, असा कोणताही निष्कर्ष तपासातून निघालेला नाही.

6. मर्यादित हिंसा निवडून जाळपोळ

एखाद्याचा जीव जाईल इतकी हिंसा या शहरांमध्ये झाली नाही, मात्र लोकांच्या उपजीविकेवर हल्ला झाला. औरंगाबादमध्ये मिरवणुकीनंतर 30 दुकानं जाळण्यात आली. त्यात 29 दुकानं मुस्लिमांची होती. त्यामुळे मुस्लिमांच्या दुकानांना जाणूनबुजून लक्ष्य करण्यात आलं, हे स्पष्ट होतं.

दुकानांना लागलेल्या आगीवरून कोणतं दुकान हिंदूंचं आणि कोणतं मुस्लिमांचं आहे, हे आंदोलनकर्त्यांना आधीच माहिती होतं, असं औरंगाबाद जिल्हा प्रशासनाचं असं म्हणणं आहे.

बिहार, पश्चिमी बंगाल, हिंसा, हिंदू, मुसलमान
फोटो कॅप्शन, मिरवणुकीत सामील झालेले भाजपचे खासदार सुशील सिंह

औरंगाबादच्या युवा वाहिनीचे नेते अनिल सिंह यांच्या घरात मुस्लिमांची दुकानं असूनसुद्धा ती सुरक्षित राहिली नाही.

तोडफोडीत बाहेरच्या लोकांचा सहभाग होता, असं औरंगाबादचे जिल्हाधिकारी राहुल रंजन माहिवाल यांनी सांगितलं. रोसडाच्या रहिवाशांच्या मते जमावामध्ये स्थानिक आणि बाहेरच्या लोकांचा समावेश होता.

7. प्रशासनाची भूमिका

काही अपवाद वगळता प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतली होती. औरंगाबादमध्ये 26 मार्चला झालेल्या मिरवणुकीत चप्पल फेकणं, स्मशानात झेंडे गाडणं आणि मुस्लिमांविरुद्ध अपमानजनक घोषणा देण्यासारख्या अनेक घटना समोर आल्या.

इतकं सगळं होऊनसुद्धा दुसऱ्याच दिवशी 27 मार्चला मुस्लीम परिसरात मिरवणूक काढण्यासाठी परवानगी देण्यात आली. याबाबत विचारणा करण्यात आल्यावर प्रशासनाने सांगितलं की आधीच लेखी परवानगी देण्यात आली होती, त्यामुळे काही करता येत नव्हतं.

बिहार

फोटो स्रोत, PTI

नवादामध्ये प्रशासनाने मुस्लीम भागात घोषणा न देण्याचा प्रस्ताव ठेवला तेव्हा भाजपने त्याला नकार दिला. भागलपूर, रोसडा आणि आसनसोलमध्ये प्रशासन जमावासमोर काहीही करू शकलं नाही.

पण प्रशासन सतर्क नसतं तर आणखी वाईट परिस्थिती झाली असती असंही नवादा, भागलपूर आणि रोसडाच्या मुस्लिमांचं म्हणणं आहे. त्याच वेळी प्रशासनाच्या डोळ्यादेखत शहर जळत होतं, असं औरंगाबादच्या पीडितांचं मत आहे.

8. सोशल मीडियावर अफवा

बिहारमध्ये ज्या शहरांमध्ये जातीय द्वेष पसरला तिथे सगळ्यांत आधी इंटरनेट बंद करण्यात आलं. सोशल मीडियावर वेगाने अफवा पसरवण्यात आल्या. औरंगाबादमध्ये चार युवकांची हत्या झाली, अशी अफवा पसरवण्यात आली होती.

हिंसा

फोटो स्रोत, BBC/DILNAWAZ PASHA

त्याचबरोबर रामनवमीला मुस्लिमांनी मिरवणुकीवर हल्ला केला आहे, अशी अफवा पसरवण्यात आली. आसनसोलमध्ये दंगली झाल्याची अफवा पसरवली गेली, त्यामुळे लोक आपली घरं सोडून पळू लागली.

9. मुस्लिमांमध्ये दहशत, हिंदू लोकांमध्ये आनंदाचं वातावरण

या घटनांमुळे मुस्लिमांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. औरंगाबादमध्ये इमरोज नावाच्या माणसाचं चपलांचं दुकान दंगलखोरांनी जाळलं. त्यांनी आखाती देशांत राहून हा व्यवसाय सुरू केला होता.

या देशात कोणताही व्यापार करायचा नाही, असा त्यांनी निर्णय घेतला आहे. आता ते आपल्या कुटुंबीयांबरोबर हाँगकाँगला जाण्याची तयारी करत आहेत. इतर शहरातले मुस्लीमही आता आपला व्यापार बंद करण्याच्या तयारीत आहेत.

त्याच वेळी, हिंसाचारात सामील झालेल्या लोकांना हा आपला विजय आहे, असं वाटत आहे.

बिहार, पश्चिमी बंगाल, हिंसा, हिंदू, मुसलमान
फोटो कॅप्शन, इमरोजचं दुकान

भागलपूरमध्ये शेखर यादव हा युवक म्हणाला की त्यांनी वीट फेकली तर त्याचं उत्तर असंच दिलं जाईल.

दिल्ली विद्यापीठाचे सामाजिक विज्ञान विषयाचे प्राध्यापक सतीश देशपांडे सांगतात की जातीय द्वेष पसरवण्याचे पॅटर्न एकसारखे आहेत कारण त्यांचं उद्दिष्ट एक होतं.

देशपांडे सांगतात, "मुस्लिमांसाठीचा द्वेष एक राजकीय पाऊल आहे, पण त्याला मिळणाऱ्या सामाजिक पाठिंब्याचा आवाका वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुस्लिमांविरुद्ध द्वेषासाठी जास्तीत जास्त पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न होत आहे. एखाद्या सामाजिक घटनेला जेव्हा संरक्षण मिळतं तेव्हा त्या समाजाचे पूर्वग्रहसुद्धा समोर येतात. मुस्लिमांविरुद्ध होणाऱ्या हिंसेच्या घटना आता स्वीकार होताना दिसत आहे. पण त्याच वेळी दलितांविरुद्ध होणारी हिंसेला जी स्वीकार्हता आहे, तिला दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे."

देशपांडे सांगतात, "दंगलीत जेव्हा एखाद्या समूहाचा समावेश असतो तेव्हा ठरलेले मार्ग अवलंबले जातात. भारतात हिंसेला स्थायी रूप देण्याचे प्रयत्न होत आहेत. आता उघड उघड हिंसाचार करण्याची गरज नाही. आता दहशत निर्माण करण्याचे फार मोठे प्रयत्न करण्याची गरजच नसते, काही छोट्यामोठ्या घटना घडवूनच ते केलं जाऊ शकतं. एखाद्या गटाला इतकं वाकवायचं की तो अगदी हतबल होऊन जावा."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)