कॉमनवेल्थ गेम्स : राहुल आवारेनं पत्र्याच्या शेडमध्ये सराव करून पटकावलं सुवर्णपदक

फोटो स्रोत, Getty Images
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"राहुलला फक्त कुस्तीचं वेड आहे. मोबाईलचं व्यसन नाही. कॉमनवेल्थसारख्या मोठ्या स्पर्धेत त्याला पदक मिळतंय. आम्ही भरून पावलो. आमच्या सगळ्या आशाआकांक्षा पूर्ण झाल्या. त्याच्या इतक्या वर्षांच्या मेहनतीचं हे फळ आहे. गावकरी प्रचंड खूश आहेत. त्यांच्यासाठी दिवाळी आताच अवतरली आहे," असं राहुलचे वडील बाबासाहेब आवारे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
गोल्ड कोस्टमध्ये सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये गुरुवारी सुवर्णपदक पटकावणारा कुस्तीपटू राहुल कसा घडला, या आठवणी बाबासाहेबांनी जागवल्या.
ते म्हणतात, "मी स्वत: राज्यपातळीवरचा कुस्तीपटू होतो. माझे बंधू म्हणजे राहुलचे काकाही कुस्तीपटू आहेत. नगर जिल्ह्यातलं जामखेडजवळचं माळेवाडी आमचं मूळ गाव. पण आम्ही पाटोद्याला स्थायिक झालो. घरातल्या कुस्तीच्या वातावरणामुळे राहुल तिसरीत असल्यापासून कुस्ती खेळतोय. मी स्वत:च त्याला घरच्या घरी प्रशिक्षण द्याला सुरुवात केली. जत्रांच्या वेळी फड भरतात. त्यावेळी आम्ही बापलेक एकत्र जायचो. त्यातूनच तो शिकत गेला".

फोटो स्रोत, Gokul Aware
"दूध-तूप, फळफळावळ, बदाम याचा राहुलच्या खुराकात समावेश असे. दहावीनंतर तो पुण्याला हरिश्चंद्र बिराजदारांकडे पुढच्या प्रशिक्षणासाठी गेला. राहुल आज जो काही तो बिराजदार मामांमुळे आहे. त्यांनी कुस्तीचे सगळे बारकावे शिकवले. सरावाचं महत्व त्याच्या मनावर बिंबवलं. त्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे त्याला सांभाळलं. कुस्तीतील चांगल्या कामगिरीमुपाटळेच राहुलला रेल्वेत नोकरी मिळाली आहे. स्पर्धा-सरावाच्या निमित्ताने देशापरदेशात जावं लागतं. दहा वर्षं घरच्या दिवाळीला येऊ शकलेला नाही", अशी खंत बाबासाहेब व्यक्त करतात.
"राहुल माझ्यासाठी आदर्श आहे. त्याला पाहूनच कुस्ती खेळण्याचा निर्णय घेतला. बीड दुष्काळी जिल्हा आहे. आमची 15-20 एकर शेती आहे पण ते सगळं पावसाच्या लहरीवर अवलंबून आहे. काका पवार यांच्या पुण्याच्या तालमीत मी आणि राहुल राहतो, सराव करतो. हेच आमचं घर आहे", असं राहुलचा भाऊ गोकुळ सांगतो.

फोटो स्रोत, LALA NIKALJE
"आमची शाळा 10-4 अशी असायची. मध्ये जेवणाची सुट्टी मिळायची. पाटोद्यापासून 8-10 किलोमीटर अंतरावर आबांनी तालीम तयार केली होती. तालीम म्हणजे अक्षरक्ष: पत्र्याची शेड होती. राहुलने तिथे सराव केला आहे. आता आमच्या घरापासून जवळ तालीम केंद्र आहे. पत्र्याच्या शेडमध्ये खेळलेल्या राहुलने मिळवलेलं यश आमच्यासाठी प्रेरणादायी आहे", असं गोकुळ गहिवरलेल्या आवाजात सांगतो.

फोटो स्रोत, Gokul Aware
रिओ ऑलिम्पिकवेळी राहुलची निवड होऊ शकली नव्हती. त्याबाबत गोकुळ सांगतो, "रिओ ऑलिम्पिकसाठी राहुलची निवड झाली नाही. तेव्हा तो निराश झाला होता. त्यातून तो जिद्दीने बाहेर पडला. कुस्ती हेच त्याचं जगणं आहे. सिनेमा वगैरेची त्याला आवड नाही. गप्पा मारायला आवडतात. वेळ मिळाला की तो शिर्डी, तिरुपती या धार्मिक स्थळांना भेटी देतो", असं गोकुळनं सांगितलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








