कास्टिंग काउच : श्री रेड्डी - 'लोकांपर्यंत आवाज पोहोचवायला मला सर्वांसमोर कपडे काढून बसावं लागलं!'

फोटो स्रोत, SRI REDDY FACEBOOK
- Author, पद्मा मीनाक्षी
- Role, बीबीसी तेलुगू
"मला अगदी सर्वांसमोर कपडे काढून बसावं लागलं. पण मला असं का करावं लागलं, याबदद्ल कोणीच लक्ष देत नाहीये. मी एकटी लढतेय," हे शब्द आहेत तेलुगू अभिनेत्री श्री रेड्डी मल्लिडी यांचे.
गेल्या आठवड्यात हैद्राबादच्या फिल्म नगरमध्ये मुव्ही आर्टिस्ट्स असोसिएशनसमोर त्यांनी कथित लैंगिक शोषणाविरोधात अर्धनग्न होऊन आंदोलन केलं.
श्री रेड्डी म्हणतात की आपला आवाज जनता आणि सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्याकडे याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता.
"चित्रपटसृष्टीतले काही लोक तसंही मला नग्न फोटो आणि व्हीडिओ पाठवायला सांगतात. मग मी सार्वजनिकरीत्याच कपडे काढून का बसू नये?" असा उद्विग्न प्रश्न त्या विचारतात.
सवंग प्रसिद्धीसाठी?
श्री रेड्डी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका प्रादेशिक चॅनलमध्ये वृत्त निवेदक म्हणून केली होती. पाच वर्षांपूर्वी त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांनी काही तेलुगू चित्रपटांमध्ये छोट्यामोठ्या भूमिका केल्या आहेत, पण या आंदोलनानंतर त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या.
लैंगिक अत्याचार झाल्याचा कोणताही पुरावा त्यांनी दिलेला नाही तसंच त्यांनी पोलिसात तक्रारसुद्धा केलेली नाही. त्यामुळे फक्त प्रसिद्धीसाठी त्या हे सगळं करत आहेत का, असाही प्रश्न विचारला जात आहे. सवंग प्रसिद्धीसाठी प्रसारमाध्यमांनी त्यांना हे पाऊल उचलण्यासाठी उद्युक्त केलं का?
या दोन्ही प्रश्नांचं ते नकारार्थी उत्तर देतात.

फोटो स्रोत, SRI Reddy Facebook
तेलुगू चित्रपटसृष्टीला टॉलिवूड म्हणतात. बॉलिवूड आणि तामिळ चित्रपटसृष्टीनंतर टॉलिवूड ही भारतातली सगळ्यांत मोठी चित्रपटसृष्टी आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या (CBFC) एका अहवालानुसार 2015-2016 मध्ये हैद्राबादेत निर्मित 269 चित्रपटांना प्रमाणपत्र देण्यात आलं.
कास्टिंग काउचची प्रकरणं होतात, पण ती कायम दाबली जातात. या क्षेत्रातले लोकसुद्धा त्याविषयी फारसं बोलताना दिसत नाहीत.
माधवी लता या तेलुगू अभिनेत्रीनं 2017 साली बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं, "जेव्हा एखाद्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला एखादी भूमिका दिली जाते तेव्हा विचारलं जातं की त्या बदल्यात काय मिळेल?"

फोटो स्रोत, SRESHTHA
उदयोन्मुख गीतकार श्रेष्ठा यांनीही काही धक्कादायक खुलासे केले. त्यांनी सांगितलं की फक्त पुरुषच नाही तर कधीकधी स्त्रियांकडूनसुद्धा अशा प्रकारचा धोका असतो. "एकदा एका चित्रपट निर्मात्याच्या बायकोने मला त्यांच्या पतीची लैंगिक इच्छा पूर्ण करणार का, अशी विचारणा केली होती."
स्त्रियांची अब्रू वेशीला?
हॉलिवुडसुद्धा हार्वी वाईनस्टीन या चित्रपट निर्मात्यावर झालेल्या आरोपांमुळे हादरलं. न्यूयॉर्क टाइम्समध्ये आलेल्या एका लेखामुळे हे सगळं प्रकरण गेल्या वर्षी उजेडात आलं. त्यानंतर यात अनेक घडामोडी झाल्या, अनेक मोठ्या अभिनेत्रींनी त्यांच्यावर आरोप केले.
वाईनस्टीन यांनी या आरोपांचा इन्कार केला असला तरी हॉलिवुडनं त्यांना दूर सारलं. आता वाईनस्टीन दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहेत.

फोटो स्रोत, Sivaji raja Facebook
सध्या श्री रेड्डी यांच्यावर मुव्ही आर्टिस्ट असोसिएशनने बंदी घातली आहे. त्यांच्या वर्तणुकीच्या कारणावरून श्रीरेड्डी यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे, असं संस्थेचे अध्यक्ष सिवाजी राजा यांनी बीबीसीला सांगितलं.
"त्या पोलिसांत तक्रार का करत नाहीत? फक्त प्रसिद्धीसाठी त्या अशा प्रकारचे पुरावा न देता आरोप का करत आहे," असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
तेलुगू चित्रपट निर्माते दग्गुबती सुरेश बाबू म्हणतात की श्री रेड्डी यांनी आपला आवाज उठवण्याचा जो मार्ग निवडला आहे त्यामुळे सगळ्या भारतीय स्त्रियांची अब्रू वेशीला टांगली गेली आहे.
मुव्ही आर्टिस्ट असोसिएशनचं सदस्यत्व पुन्हा मिळावं, अशी मागणी श्री रेड्डी यांनी केली आहे. त्याव्यतिरिक्त सरकारनं काही फिल्म स्टुडिओंवर कारवाई करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.
या फिल्म स्टुडिओंमध्येच लैंगिक अत्याचाराचे प्रकार घडतात आणि अशाच एका स्टुडिओमध्येच माझ्यावरही बलात्कार झालाय, असा आरोप श्री रेड्डींनी केला आहे.
संमिश्र प्रतिक्रिया
श्री रेड्डींच्या या प्रकरणावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
"चित्रपटसृष्टीत लैंगिक अत्याचार होतात हे उघड सत्य आहे. ज्या पद्धतीनं श्री रेड्डी यांनी या समस्येला वाचा फोडली, त्यामुळे आम्हाला त्यांना पाठिंबा द्यावासा वाटत नाही," असं माहिला चेतना या स्वयंसेवी संघटनेच्या सचिव कट्टी पद्मा म्हणाल्या. ही संस्था स्त्रियांच्या हक्कासाठी काम करते.
पण काही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर त्यांना पाठिंबा दर्शविला.
वैजयंती वसंत मोगली या ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या आहेत. त्यांनी श्री रेड्डी यांना पाठबळ देणाऱ्या एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय, "चित्रपटसृष्टीतल्या लैंगिक छळाच्या प्रकरणाबद्दल इतक्या धैर्यानं बोलून त्यांनी एक इतिहास घडवला आहे. हॉलिवुडच्या #metoo चळवळीमुळे भारताच्या चित्रपटसृष्टीतली परिस्थिती समोर येणं गरजेचं होतं. या छळाबद्दल आणि हिंसाचाराबद्दल ठाम पावलं उचलली जातील, अशी आशा आहे. हे सगळीकडेच होतं, असं म्हणणं म्हणजे पळवाट काढण्यासारखं आहे. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ होणार नाही, याबद्दल सविस्तर चर्चा व्हायला हवी."
चित्रपटसृष्टीत होणाऱ्या छळाबद्दल बोलण्यासाठी उचललेल्या या पावलामुळे चर्चेला उधाण आलंय, हे मात्र नक्की.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)










