‘20 लोकांनी माझ्यावर रात्रभर गँगरेप केला केला आणि मला रस्त्यावर मरायला फेकून दिलं’

- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
"हिजराहचा अर्थ होतो प्रवास. तो प्रवास जो महंमद पैगंबरांनी मक्केपासून मदिनेपर्यंत केला. तो प्रवास जो तुम्हाला जुनं अस्तित्व टाकून नव्याकडे नेतो. त्यावरून शब्द आला हिजडा. मग आम्ही इतरांपेक्षा कमी कसे?" असा सवाल धनंजय करतात.
"जो नर-नारी असा भेद मागे टाकून पुढे निघून गेला आहे तो अंतरात्मा श्रेष्ठ. मुन्शी प्रेमचंद यांनी त्यांच्या गोदान या पुस्तकात हे वाक्य लिहिलं आहे. मी स्वतःला तेच समजते. मी ना पुरुष आहे ना स्त्री आणि याचा मला अभिमान आहे. माझं नाव धनंजय चौहान मंगलमुखी," धनंजय पुढे सांगतात.
शांत संततधारेसारखं धनंजय बोलत असतात. पुरुषी असणारा पण घोटवून बायकी केलेला आवाज, फिक्या रंगाची साडी आणि गळ्यात प्रत्येक तृतीयपंथीयाला आवश्यक असणारी चेन.
गायनात, नृत्यात उत्तम गती, सामाजिक प्रश्नांची उत्तम जाण, वेदांचा अभ्यास, आदि शंकराचार्य ते मुन्शी प्रेमचंद यांच्या साहित्याचा अभ्यास. वादात आपलं म्हणणं तर्कशुद्ध असावं म्हणून इतिहासाचा, खास करून तृतीयपंथीयांच्या इतिहासाचा अभ्यास. बोलण्यात आक्रमकता नाही पण अभ्यासाने येणारा ठामपणा. धनंजयना भेटलं की, आपल्या ज्ञानाविषयीचे, अभ्यासाविषयीचे आपलेच गैरसमज गळून पडतात.
कॅनडाच्या पंतप्रधानांसोबत डिनर
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो 2018 साली भारत दौऱ्यावर येऊन गेले. त्या दौऱ्याचं फलित काहीही असो पण धनंजयना मात्र हा दौरा खूप काही देऊन गेला.गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांनी जो तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी लढा उभारला आहे त्यात अजून एक मैलाचा दगड पार केला.कामाचं कौतुक म्हणून त्यांना जस्टिन ट्रुडोंनी डिनरसाठी आमंत्रित केलं. दिल्लीत पार पडलेला हा सोहळा धनंजयना बरंच काही देऊन गेला.गेल्या काही वर्षापासून धनंजय चंदिगड शहरात तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी काम करतात. त्यांचं काम बघून त्यांना गेल्या वर्षी कॅनडाच्या वकिलातीने काही देणगी दिली आणि ट्रुडोंबरोबर निमंत्रितांसाठी असणाऱ्या डिनरला बोलावलं.

फोटो स्रोत, Facebook/ Dhananjay Chauhan Mangalmukhi
"आता कुठे मी जे काम करतेय ते लोकांच्या नजरेत यायला लागलं आहे. पण त्यासाठी मला खूप काही सहन करावं लागलं, खूप काही गमवावं लागलं. मला लोकांनी तुच्छतेने वागवलं आहे. खरकट्यासारखं उकिरड्यावर फेकून दिलं आहे, हिणवलं आहे," धनंजय त्यांच्या भूतकाळाबद्दल सांगतात.
"मी लोकांचा मार खाल्ला आहे. कितीवेळा माझं लैंगिक शोषण झालं याची गणतीच नाहीये. माझं अपहरण करून वीस लोकांनी माझ्यावर रात्रभर गँगरेप केला केला आणि मला रस्त्यावर मरायला फेकून दिलं. पोटापाण्यासाठी मी माझं शरीर विकलं आहे. नाचगाणं केलं आहे. पण मी माझ्या लक्षापासून स्वतःला विचलित होऊ दिलं नाही," धनंजय पुढे सांगतात.
धनंजय आज त्यांची स्वयंसेवी संस्था चालवतात. तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी त्यांनी ही संस्था स्थापन केली आहे. पंजाब विद्यापीठात तृतीयपंथीयांसाठी वेगळे टॉयलेट मिळावेत यासाठी त्यांनी यशस्वी लढा दिला.
आज त्यांच्या प्रयत्नांमुळे पाच तृतीयपंथी पंजाब विद्यापीठात वेगवेगळं शिक्षण घेत आहेत. स्वतः धनंजय 'मानवी हक्क' या विषयात MA करत आहेत. शिक्षणाचं वेड धनंजयना स्वस्थ बसू देत नाही.
'मला अजून शिकायचंय'
"मी लहानपणापासूनच अभ्यासात हुषार होते. पण जसं समाजाच्या आणि माझ्याही लक्षात आलं की मी मुलगा नाही तसा माझा संघर्ष सुरू झाला. समाजाशी, घरच्यांशी आणि स्वतःशीही. मी आतल्या आत घुसमटत होते," त्या दिवसांच्या संघर्षाचे व्रण अजूनही धनंजय यांच्या मनावर आहेत.
"एक मुलगी असूनही माझ्यावर मुलासारखं राहाण्याची सक्ती केली जात होती. माझे घरचे मला मुक्तपणे वावरू देत नव्हते. त्यांना भीती होती की, माझं मुलींसारखं वागणं-बोलणं पाहून मला तृतीयपंथीय लोक घेऊन जातील."
या सततच्या घुसमटीला कंटाळून धनंजय यांनी आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. "पण मला घरच्यांपैकी कोणीतरी वाचवलं. तेव्हा मी नववीत होते. शाळेतही माझं लैंगिक शोषण होत होतं. घरच्यांकडून मानहानीला सामोरं जावं लागत होतं," धनंजय सांगतात.

फोटो स्रोत, Facebook/ Dhananjay Chauhan Mangalmukhi
"कळत नव्हतं की मी कोण आहे. माझी मनस्थिती अत्यंत बिघडली होती. अशात मी दहावीची परीक्षा दिली. मी जेमतेम काठावर पास झाले. मला खरंतर भरपूर मार्क मिळवून मोठ्ठं करियर करायचं होतं. पण आपल्या समाजाच्या ते पचनी पडणार नव्हतं."
धनंजय यांनी पुढे BA ला प्रवेश घेतला. पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेतला. "मला MA करायचं होतं. पण त्या कॉलेजमध्ये माझं इतकं लैंगिक शोषण झालं की, मी हार मानून सोडून शिक्षण अर्ध्यातच सोडलं," धनंजय सांगतात.
धनंजयचा स्वतःशी आणि समाजाशी असणारा संघर्ष अजूनही थांबला नव्हता. अजूनही ते घरात राहत होते. समाजात पुरुष म्हणून वावरत होते. स्वतःची ओळख लपवत होते. "पण लपवणार तरी किती ना? भले मी पुरुषाचे कपडे घातले होते पण होते तर मी स्त्रीच ! माझं वागणं, बोलणं वावर स्त्रीसारखाच होता. लोक माझं लैंगिक शोषण करत होते. मला मारहाण करत होते आणि यातलं काहीच नाही तर छक्का छक्का म्हणून मला अपमानित करत होते. माझ्या शोषणाची कधी कोणी दखल घेतली नाही. आजही पोलिस तृतीयपंथीयांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची साधी दखलसुद्धा घेत नाहीत," तृतीयपंथीयांच्या जीवनाबद्दल धनंजय सांगतात.
आज त्या दिवसांकडे बघताना धनंजय तटस्थ आहेत. त्यांना आज कोणी काही बोललं तरी फरक पडत नाही. "मला कोणी टोचून बोललं तरी मी त्यांना दुवाच देते. शेवटी मी तृतीपंथीय आहे, दुवा देणं माझं काम आहे," असं धनंजय म्हणतात.
धनंजय यांच्याकडे आज चार पदव्या आहेत. त्यांनी रशियन आणि फ्रेंच भाषांमध्ये पदविका घेतली आहेत. तर पंजाब विद्यापीठात 'व्होकल म्युझिक' या विषयात त्यांनी विशारद केलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी 'समाजसेवा' या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि सध्या ते 'मानवी हक्क या विषयात MA करत आहेत.
पँट-शर्ट ते साडी हा प्रवास
आपल्या घरात तृतीयपंथी मूल जन्माला आलं आहे हे लक्षात येताच बदनामीच्या भीतीपायी घरचे त्या मुलाला तृतीयपंथी समाजाच्या स्वाधीन करतात. शिक्षणाचा अभाव, प्रेम करणारं कोणी जवळ नाही अशा परिस्थितीत या मुलांचं बालपण होरपळतं. बहुतांश जण आपल्या नशीबाला दोष देत, पशूंपेक्षा वाईट जीवन जगत राहतात.

"कोणत्याही आईबापाला वाटत नाही की आपल्या मुलाला वाऱ्यावर सोडावं. ते कसंही असलं तरी. पण समाजातले चार लोक काय म्हणतील हे दडपण त्यांना असं करायला भाग पाडतं. या दडपणाने अनेकांचं आयुष्य बरबाद केलं आहे," धनंजय गंभीर होऊन सांगतात.
ते पुढे सांगतात, "मी तरुण होईपर्यंत माझ्याच घरात राहिले. कारण सरळ होतं. मला शिकायचं होतं, नोकरी करून पैसे कमवायचे होते आणि आईवडिलांसोबत राहायचं होतं. मला तृतीयपंथीयांसारखं लग्नात जाऊन नाचगाणी करायची नव्हती, भीक मागायची नव्हती. शरीरविक्रय करायचा नव्हता. कोणत्याही भारतीय मुलामुलींसारखी माझी स्वप्नं होती."
तृतीयपंथी असण्यानं घरच्यांनाच त्रास?
यावर धनंजय सांगतात, "माझ्या भाऊ-बहिणींच्या लग्नात, त्यांच्या सुखी आयुष्यात माझं तृतीयपंथी असणं बिब्बा घालायला लागलं तेव्हा मी घर सोडण्याचा निर्णय घेतला. ती एका अर्थाने माझीही मुक्तता होती. अखेर माझीही घुसमट थांबणार होती. मी संपूर्ण स्त्रीसारखं आयुष्य जगू शकणार होते. पॅँट शर्ट टाकून साडी नेसू शकणार होते."
"मी माझे गुरू काजल मंगलमुखी यांची दीक्षा घेतली. पहिल्यांदा सार्वजनिकरित्या साडी नेसली, श्रुंगार केला. स्वतःचं अस्तित्व शोधलं आणि मी धनंजय चौहान मंगलमुखी झाले."
नाव बदललं नाही कारण...
"मी खूप उशीरा तृतीयपंथीयांच्या डेऱ्यात सामील झाले. तोवर माझं नाव माझ्यासाठी माझी ओळख बनलं होतं. प्रदीर्घ काळ मी कोण आहे हे लोकांपासून लपवत फिरले. मला अजून काहीही लपवायचं नव्हतं," धनंजय सांगतात.
लढा तृतीयपंथीय समाजाशीही
धनंजय यांचा संघर्ष फक्त पोलीस, प्रशासन, समाज यांच्याशी नाहीये, तर तृतीयपंथीयांशीही आहे. वर्षानुवर्षं जोखडात अडकलेला हा समाजही बदलाचे वारे स्वीकारण्यास तयार नाही आहे. "जसा समाज तृतीयपंथीना आपलं आयुष्य मनाप्रमाणे जगू देत नाही, तसं तृतीयपंथीय डेरेही त्यांच्या सदस्यांना शिकायला, नोकरी करायला मनाई करतात," असं धनंजय यांचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, Facebook/ Dhananjay Chauhan Mangalmukhi
"डेऱ्याची आज्ञा मानली नाही तर तुम्हाला मारून टाकू अशी धमकी देतात. माझ्यासोबत शिकणारे इतर तृतीयपंथी उत्तराखंडच्या एका डेऱ्यातून पळून आले आहेत. त्यांना अजूनही भीती वाटते."
"ऐकून खोटं वाटेल पण असे अनेक तृतीयपंथी आहेत ज्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. मी त्यांना विनंती केली की हे नाचगाणं बंद करा. एखादी फॅक्टरी उघडा जेणेकरून इतर तृतीयपंथीयांना रोजगार मिळेल. पण पालथ्या घड्यावर पाणी. अनेक डेऱ्यांमधे तृतीयपंथी शिक्षणाचं नावही काढू शकत नाही. डेऱ्याच्या लोकांना वाटतं की तृतीयपंथी शिकले, नोकऱ्या करू लागले, तर लग्नात नाचगाण्याने जो पैसा मिळतो तो मिळणं बंद होईल. पण तृतीयपंथीयांना सन्मानाने पैसा कमवता यावा यासाठी माझा लढा आहे," धनंजय पुढे सांगतात.
घरच्यांचं पाठबळ
धनंजय यांचं काम, त्यांना मिळणारा मान-सन्मान बघून आता घरच्यांना त्यांचा अभिमान वाटायला लागला आहे.

फोटो स्रोत, Facebook/ Dhananjay Chauhan Mangalmukhi
"परवा आमचे शेजारी माझ्या वडिलांना म्हणाले, तुझा 'मुलगा' तर मोठा माणूस झाला. थेट कॅनडाच्या पंतप्रधानांना भेटला. ही तीच माणसं आहेत ज्यांनी माझ्या वडिलांना 'छक्के को जन्म देनेवाला' म्हणून आयुष्यभर अपमानित केलं. त्या दिवशी माझे वडील घरी येऊन रडले. आनंदाश्रू होते ते," धनंजय यांचाही आवाज भरून येतो.
"माझी आई मला नेहमीच पाठिंबा देते. आमचं कायम फोनवर बोलणंही होत. इतकंच काय, ती माझ्या साड्याही नेसते. तिला माझ्या सुती साड्या फार आवडतात. त्या नेसल्या की मी एखाद्या IAS अधिकाऱ्यासारखी दिसते असं ती म्हणते," धनंजय हसतात.
लिंगनिवडीचा अधिकार
एक असा समाज बनवावा जिथे आपलं लिंग आपण स्वतः ठरवू शकू असं धनंजयचं स्वप्न आहे. "मुलं जन्माला आल्यानंतर त्यांच्या लिंगाचा रकाना मोकळा सोडावा. आणि ते मूल मोठं झाल्यावर त्याने ठरवावं आपण स्त्री की पुरूष. समाज आपल्यावर लादतो आपलं लिंग. आणि त्यातून येतात बंधनं."
"मग समाज ठरवतो, पुरूषाने असं वागावं आणि स्त्रीने तसं. मला नको आहे ही पद्धत. आपण ठरवावं आपण कोण आहोत आणि कसं वागायचं ते. असा समाज घडत नाही तोवर मी लढत राहाणार," धनंजय निर्धारानं सांगतात.
आपल्याच सहकाऱ्याने लिहिलेल्या एका कवितेच्या दोन ओळी ऐकवून ते भेट आवरती घेतात,
खुद्दारी वजह थी की, जमाने को कभी हजम नही हुए हम,
पर खुद की नजर में, यकीं मानो कभी कम नही हुए हम!
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








