'मी बाई आहे अन् मी माझी दारू स्वतः विकत घेते'

मद्य

फोटो स्रोत, Puneet Barnala/BBC

    • Author, अनघा पाठक आणि क्रितिका कान्नन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

गेल्या आठवड्यात एक बातमी वाचून मी थक्कच झाले! श्रीलंकेत महिलांना आता दुकानात जाऊन दारू विकत घेण्यावर पुन्हा बंदी घालण्यात आली आहे.

स्त्रियांनी दारू पिणं आताशा तितकं नवं, चमत्कारिक किंवा निषिद्ध राहिलं नसलं, तरी दारूच्या दुकानात स्त्रीने एकटीने जाऊन बाटली विकत घेण्याचे प्रसंग कमीच येतात.

तिला लाज वाटते का? अपराधीपणा वाटतो का? दारू मागितली तर दुकानदार आणि इतर ग्राहक काय म्हणतील, याची भीती वाटते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही स्वतः शोधायची ठरवली.

त्यासाठी आम्ही दोन ठिकाणी जायचं ठरवलं. एक - फक्त महिलांसाठीचं दारूचं दुकान. आणि दोन - पुरुषांमध्ये लोकप्रिय असलेलं दुकान.

आमच्या शोधयात्रेतला पहिला टप्पा होता दिल्लीच्या स्टार सिटी मॉलमधलं 'फक्त महिलांसाठी' असणारं वाईन शॉप. इथे फक्त स्त्रियांना प्रवेश आहे! सोबत स्त्री असेल तरच एखाद्या पुरूषाला या दुकानात प्रवेश मिळतो. इतर पुरुषांनी जनरल (म्हणजे जिथे पुरूषांचं राज्य आहे) अशा दुकानांतून जे हवं ते विकत घ्यावं!

या दुकाना मद्यविक्री करणारी देखील स्त्रीच आहे. पण आम्ही गेलो तेव्हा नेमक्या या बाई सुट्टीवर होत्या, त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. आमचं स्वागत केलं ते प्रमोदकुमार यादव या विक्रेत्याने.

"हे या देशातलं एकमेव 'फक्त महिलांसाठी' असणारं दुकान आहे," प्रमोदकुमारांनी दावा केला.

ते आम्हाला दुकानात छान फिरू देतात. स्त्रियांसाठी असणाऱ्या या दुकानाची रचना छान आहे. कोणालाही आत घुसता येऊ नये, म्हणून मोठे काचेचे दरवाजे आहेत, जे बंद असतात.

मद्य
फोटो कॅप्शन, निवांत बसून गप्पा मारण्यासाठी इथे अशी सोय आहे.

मैत्रिणींसोबत गप्पा मारत बसायला सोफा आहे. आणि इतर दारूच्या दुकानांमध्ये जी गोष्ट तुम्ही करू शकत नाही, ती तुम्ही इथे आरामात करू शकता - वेगवेगळ्या महागड्या मद्याच्या बाटल्या हाताळू शकता!

मॉलमध्ये जाऊन कपडे घेणं आणि इथे येऊन दारू विकत घेणं हे दोन्ही अनुभव सारखेच असतील, अशी काळजी या दुकानात घेतलेली दिसते. त्यामुळे आपल्या पसंतीचं मद्य शोधत फॅशन किंवा बॉयफ्रेंडबद्दल गप्पा मारणाऱ्या भरपूर मुली इथे दिसतात.

"हे दुकान जास्त चांगलं आणि सुरक्षित आहे, विशेषतः गर्दीच्या वेळेस. दुकानात गर्दी असेल तेव्हा पुरुषांसोबत दारू विकत घेण्याचा धोका का पत्कारावा?" इति विक्रेते प्रमोदकुमार.

बायका या 'फक्त महिलांसाठी' असणाऱ्या वातावरणातच सुरक्षित आहेत, असं अनेक जण गृहित धरतात.

"मला मुळातच 'फक्त महिलांसाठी' वाईनशॉप ही संकल्पना पटत नाही," नाव न छापण्याच्या अटीवर आमच्याशी बोललेल्या एक बाई म्हणाल्या. "तिथे जी विक्रेती आहे तिला दारूमधलं फारसं कळत नाही. तिची काही मदत होत नाही. म्हणूनच मी एखाद्या उच्चभ्रू पण सगळ्यांसाठी असणाऱ्या दुकानात जाते. निदान तिथे काम करणाऱ्या लोकांना मद्याविषयी माहिती तरी असते. ते मला मदत करू शकतात."

मद्य
फोटो कॅप्शन, फोटो काढतो म्हटल्यावर प्रमोदकुमार यादवांनी आम्हाला मस्त स्माईल दिलं.

"दुसरं म्हणजे 'फक्त महिलांसाठी' असणारी दुकानं सुरक्षित असतात, हा दावा काही फारसा खरा नाही. तुम्ही आत सुरक्षित असालही, पण बाहेर आल्यानंतर तुम्हाला त्याच विचित्र नजरांचा सामना करावा लागतो. त्या नजरा जणू काही विचारत असतात की - एक बाई असून तुझी दारू विकत घेण्याची किंवा पिण्याची हिंमत झालीच कशी? जोपर्यंत ही पितृसत्ताक विचारसरणी बदलत नाही तोवर काही बदलणार नाही. स्त्रियांसाठी खास दारूची दुकानं काढण्यापेक्षा सामाजिक वातावरण त्यांच्यासाठी कसं अजून सुरक्षित होईल ते पाहा," असंही त्यांना वाटतं.

त्याच 'फक्त महिलांसाठी' असणाऱ्या दुकानात आम्हाला आलम खान भेटले. एका महिला साथीदारसोबत ते त्या दुकानात आले होते. त्यांच्या मते अशी दुकानं असणं चांगलं. "आजकाल बायका दारू प्यायला लागल्या आहेतच. त्यांना तर कुणी थांबवू शकत नाही. मग त्या दारू विकत घेणारच असतील, तर अशी दुकानं बरी म्हणायची."

आम्ही निघायच्या बेतात असताना दोन तरुण मुली आल्या. त्यांची मतं जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी काहीही बोलायला नकार दिला. आपण दारू पितो आणि त्यात काही गैर नाही, असं उघडपणे सांगायला भारतीय स्त्रिया अजूनही कचरतात.

फक्त पुरुषांसाठी

मॉलमधल्या या वाईनशॉपनंतर आम्ही नेहमी गर्दी असणाऱ्या एका दारूच्या दुकानात जायचं ठरवलं. तिथल्या गल्लीबोळांच्या जंजाळात एका अंधारलेल्या बेसमेंटमध्ये हे दुकान होतं.

मद्य

फोटो स्रोत, AnjaRabenstein/Getty Images

हे दुकान खऱ्या अर्थाने फक्त पुरूषांसाठी होतं.

तिथे जाणं हा खऱ्या अर्थाने एक 'अनुभव' होता. आम्ही तयारीनिशी गेलो. मुळात दिल्लीसारख्या राजधानीच्या शहरात दोन महिला पत्रकारांना एका साधाश्या दारूच्या दुकानात जायला 'तयारी' करावी लागते, यातच बरंच काही आलं!

आमच्या काही पुरूष सहकाऱ्यांना आम्ही सोबत घेतलं. त्यांनीही आम्हाला काळजीच्या स्वरात सांगितलं, "आधी आम्ही आत जाऊन अंदाज घेऊ. तिथे सगळं सुरळीत वाटलं, तरच तुम्ही आत यायचं."

आमच्या संपादकांनीही आम्हाला 'काळजी घ्या' असा मेसेज केला. (आम्ही 'मौत का कुँआ'मध्ये जात आहोत, असं वाटू लागलं!)

एवढी सगळी फील्डिंग लावल्यावर आम्ही त्या छोट्या दारूच्या दुकानात काम करणाऱ्या एका माणसाशी बोलू शकलो. त्याचं नाव पप्पू सिंह होतं.

"तुमच्या दुकानात कधी बायका येतात का?" मी विचारलं.

परग्रहावरची माणसं पाहावी, त्या नजरेनं त्यानं आमच्याकडे पाहिलं. "बायका का येतील इथे? ही काय बायकांनी येण्यासारखी जागा आहे का?" त्याने आमच्याकडे विचित्र नजरेने पाहात सांगितलं.

मद्य

फोटो स्रोत, Getty Images

"अहो दारू विकत घ्यायला. आजकाल तर मुलीही दारू पितात ना?"

"हो, पितात तर खरं."

"मग कुठून तरी त्या विकत घेत असतील ना? मग त्या तुमच्या दुकानात येतात का?"

त्याचं उत्तर अजूनही 'नाही' असंच होतं. बरं मग तुमच्या दुकानात बायका येत नाहीत, म्हणजे तुमच्या कोणीही महिला ग्राहक नाहीत असं म्हणायचं आहे का तुम्हाला? तर असंही काही नव्हतं.

"बायका दुकानात येत नाहीत. पण त्या दारू विकत घेत नाहीत, असं थोडीच आहे. सहसा त्या त्यांच्या पुरूष मित्रांना पाठवतात. आणि सोबत कुणी नसेल, तर त्या दुकानात येणाऱ्या पुरूष ग्राहकांना काय हवं ते सांगतात आणि दुकानापासून लांब उभ्या राहतात."

आत्तापर्यंत आमचं संभाषण ऐकत असणारा एक रिक्षावाला बोलायला लागला. "एकदा माझ्या रिक्षात एक काकू बसल्या होत्या. त्यांनी दारूच्या दुकानापाशी गाडी थांबवायला सांगितली. मला म्हणल्या की माझ्यासाठी काही घेऊन आलास तर मी तुला जास्त पैसे देईन. तू पैशाची काळजी करू नकोस."

मद्य

फोटो स्रोत, izusek/Getty Images

म्हणजे एक छोट्या गल्लीबोळात असणऱ्या, प्रथमदर्शनी पुरूषी वाटणाऱ्या दारूच्या दुकानाला पण महिला ग्राहक होत्या. फक्त त्यांना त्या दुकानापर्यंत पोहोचू शकत नव्हत्या.

भारतात दारू पिणाऱ्या महिला किती?

Word Health Organisation (WHO) ने प्रसिद्ध केलेल्या सर्व्हेनुसार भारतात जवळपास पाच टक्के महिला दारू पितात. यांत नेहमी तसंच क्वचित दारू पिणाऱ्या स्त्रियांचा समावेश होतो. दारू पिणाऱ्या 26 टक्के भारतीय पुरुषांच्या तुलनेत हा आकडा कमी असला, तरी दारू पिणाऱ्या महिलांची संख्या कमी नाही.

स्त्रियांनी दारू पिणं भारतात अनेक ठिकाणी निषिद्ध मानलं जातं.

मनुस्मृतीमध्ये तर लिहिलं आहे की दारू हे स्त्रीचा नाश करणाऱ्या सहा कारणांमधलं एक कारण आहे!

आधुनिक भारतात महिलांनी दारू पिण्यावर बंदी नाही. श्रीलंकेप्रमाणे दारू विकत घेण्यावरही बंदी नाही. पण भारतात कायद्याला मान्य असलं, तरी बाईने दारू विकत घेणं समाजाला मान्य नाही, हेच आमच्या लक्षात आलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)