महात्मा गांधींशी नातं असलेल्या 'त्या' 8 महिला

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रमोद कपूर
- Role, बीबीसी हिंदीसाठी
आपण कधी महात्मा गांधींचे फोटो निरखून पाहिले आहेत का? बहुतेक फोटोंमध्ये गांधींच्या भोवती लोकांची गर्दीच दिसून येते. या गर्दीतल्या बहुतांश लोकांना देशातला प्रत्येक नागरिक ओळखतो. हे लोक म्हणजे जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल आणि कस्तूरबा गांधी.
पण, गांधींसोबत असलेल्या या गर्दीतल्या लोकांपैकी काही जण असेही आहेत ज्यांच्याबाबत फार कमी जणांना माहिती आहे.
आम्ही तुम्हाला अशा काही महिलांबाबत माहिती देणार आहोत, ज्या मोहनदास करमचंद गांधींच्या विचारांमुळे त्यांच्या खूप जवळ होत्या.
या महिलांच्या आयुष्यावर गांधींचा खोलवर प्रभाव पडला होता. ज्या मार्गावर गांधींजींनी मार्गक्रमणा करण्यास सुरुवात केली होती, त्याच मार्गावर मार्गक्रमणा करत या महिला आपापल्या आयुष्यात पुढे गेल्या.
1. मेडेलीन स्लेड उर्फ मीराबेन, 1892-1982

मेडेलीन ही ब्रिटीश अॅडमिरल सर एडमंड स्लेड यांची मुलगी होती. एका महत्त्वाच्या ब्रिटीश अधिकाऱ्याची मुलगी असल्यानं त्यांचं आयुष्य एकदम शिस्तीत व्यतीत झालं.
जर्मन पियानिस्ट आणि संगीतकार बीथोवेन यांच्या मेडेलीन या चाहत्या होत्या. त्यातूनच त्यांचा लेखक आणि फ्रान्समधले बुद्धीजीवी रोमेन रोलँड यांच्या संपर्कात आली. रोमेन रोलँड यांनी संगीतकारांवर लिखाण केलंच, शिवाय महात्मा गांधींचं चरित्रही लिहिलं.

फोटो स्रोत, VINOD KUMAR
रोमेन रोलँड यांनी लिहिलेलं गांधींचं चरित्र वाचून मेडेलीन खूप प्रभावित झाल्या. गांधींचा प्रभाव मेडेलीन यांच्यावर इतका पडला की, संपूर्ण आयुष्यभर गांधींनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा निर्णय तिनं घेतला.
गांधींबाबत वाचून प्रभावित झालेल्या मेडेलीन यांनी त्यांना पत्र लिहून आपले अनुभव सांगितले आणि आश्रमात येण्याची इच्छाही व्यक्त केली होती.
त्यासाठी त्यांनी दारू पिणं सोडून दिलं, शेती करण्यास शिकल्या, तसंच शाकाहार घेण्यास सुरुवात केली. गांधींचं वृत्तपत्र, यंग इंडिया वाचणंही सुरू केलं. ऑक्टोबर 1925मध्ये मुंबई मार्गे त्या अहमदाबादला आल्या.
गांधींसोबतच्या पहिल्या भेटीचं वर्णनही मेडेलीननं खास शब्दांत करून ठेवलं आहे.

त्यांचे तेव्हाचे शब्द होते की, "जेव्हा मी तिथे पोहोचले तेव्हा समोर एक अंगकाठीनं बारीक व्यक्ती पांढऱ्या गादीवरून उठून माझ्या दिशेनं आली. मला माहीत होतं की ते बापू आहेत. मला आनंद तर झालाच आणि माझ्यातली श्रद्धाही जागृत झाली. मला समोर एक दिव्य प्रकाशच दिसत होता. मी त्यांच्या पावलासमोर झुकले. बापूंनी मला उठवलं आणि तू माझी मुलगी आहेस असं म्हटलं."
2. निला क्रॅम कुक, 1872-1945

आश्रमात लोक निला यांना निला नागिनी म्हणून ओळखत असत. स्वतःला कृष्णाची गोपिका मानणाऱ्या निला माऊंट अबूमधल्या एका स्वामींसोबत (धार्मिक गुरू) राहत होत्या.
अमेरिकेत जन्मलेल्या निला यांचं म्हैसूरच्या राजकुमारावर प्रेम जडलं होतं. निला यांनी 1932मध्ये गांधींना बंगळुरुहून पत्र पाठवलं होतं. या पत्रात त्यांनी स्पृश्य-अस्पृश्येतेविरोधात सुरू असलेल्या कामाबाबत माहिती दिली होती.
यानंतर दोघांमधील पत्रव्यवहारास सुरुवात झाली. निला यांची 1933च्या फेब्रुवारीमध्ये महात्मा गांधींशी येरवडा जेलमध्ये भेट झाली. गांधींनी त्यांना साबरमती आश्रमात पाठवलं, जिथे काही काळानंतर त्यांची नव्या सदस्यांसोबत चांगली मैत्री झाली.

फोटो स्रोत, GETTY IMAGES, VINOD KUMAR
खुल्या विचारांच्या निला यांना आश्रमाच्या बंद वातावरणात सामावून घेणं सुरुवातील जड गेलं. यातच त्या एकदा आश्रमातून पळून गेल्या. काही काळानंतर त्या वृंदावन इथे सापडल्या.
त्यानंतर काही काळानं त्यांना पुन्हा अमेरिकेत पाठवण्यात आलं. जिथे जाऊन त्यांनी इस्लाम स्वीकारला आणि कुराणचा अनुवाद केला.
3. सरलादेवी चौधरानी, 1872-1945

उच्चशिक्षित आणि स्वभावानं सौम्य असलेल्या सरलादेवी यांना भाषा, संगीत आणि लेखनाची विशेष आवड होती.
सरला या रवींद्रनाथ टागोर यांची भाची होत्या.
लाहोरमध्ये गांधी सरला यांच्या घरीच उतरले होते. या दौऱ्याच्या काळात त्यांचे पती आणि स्वातंत्र्यसैनिक रामभुजदत्त चौधरी जेलमध्ये होते.
दोघंही एकमेकांच्या फार जवळ होते. ही जवळीक इतकी होती की, गांधी सरला यांना अध्यात्मिक पत्नी मानत असत. नंतर यामुळे त्यांचं लग्न मोडता-मोडता वाचलं हे गांधी यांनी हे मान्य केलं.

फोटो स्रोत, GETTY IMAGES, VINOD KAPOOR
गांधी आणि सरला यांनी खादीच्या प्रचारार्थ भारताचा दौरा केला होता. दोघांमधल्या नात्याची माहिती त्यांच्या जवळच्यांनाही होती. अधिकारवाणी गाजवण्याच्या सरला यांच्या स्वभावानं गांधींनी त्यांच्यापासून नंतर अंतर राखण्यास सुरुवात केली.
काही काळानंतर हिमालयातील एकांतवासात असताना सरला यांचा मृत्यू झाला.
4. सरोजिनी नायडू, 1879-1949

सरोजिनी नायडू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या.
गांधींना अटक झाल्यानंतर मिठाच्या सत्याग्रहाची जबाबदारी सरोजिनी यांच्या खांद्यावर होती.
सरोजिनी आणि गांधींची पहिली भेट लंडन इथे झाली होती.
या भेटीबाबत सरोजिनी यांनी स्वतःच आपल्या भावना तेव्हा व्यक्त केल्या होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
"एक कमा उंचीचा माणूस, ज्यांच्या डोक्यावर केसही नव्हते, ते जमिनीवर एका चादरीवर बसून ऑलिव्ह ऑईलमधून काढलेले टॉमेटो खात होते. जगातल्या सगळ्यांत मोठ्या नेत्याला असं बघून मी आनंदाने हसू लागले. तेव्हा त्यांनी डोळे वर करून माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं की, तुम्ही नक्कीच मिसेस नायडू असाल. एवढं श्रद्धा नसलेलं कोण असू शकेल दुसरं? या माझ्यासोबत जेवण घ्या."
याच्या उत्तरादाखल धन्यवाद देत नायडू म्हणाल्या, काय चुकीची पद्धत आहे ही? अशा रितीनं सरोजिनी आणि गांधी यांच्या नात्याला सुरुवात झाली.
5. राजकुमारी अमृत कौर, 1889-1964

शाही परिवाराशी संबंधित असलेल्या राजकुमारी पंजाबच्या कपूरथलाचे राजा सर हरनाम सिंह यांच्या कन्या होत्या. राजकुमारी अमृत कौर यांचं शिक्षण इंग्लंडमध्ये पूर्ण झालं होतं.
राजकुमारी अमृत कौर यांना गांधी यांची सगळ्यांत जवळची सत्याग्रही महिला मानलं जातं. राजकुमारी या देखील सगळ्यांशी सन्मानानं आणि मिळून मिसळून वागत.
1934मध्ये गांधी आणि राजकुमारी यांच्यात पहिली भेट झाल्यानंतर दोघांनी एकमेकांना शेकडो पत्र पाठवली. मिठाचा सत्याग्रह आणि 1942च्या भारत छोडो आंदोलनावेळी त्यांना जेलमध्यही जावं लागलं होतं.

फोटो स्रोत, GETTY IMAGES, VINOD KAPOOR
स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्य मंत्री होण्याचं भाग्यही राजकुमारी अमृत कौर यांना लाभलं होतं. गांधी राजकुमारी अमृत कौर यांना पत्र लिहीताना पत्राची सुरुवात 'मेरी प्यारी पागल और बागी' अशा मथळ्यानं करत असत आणि पत्रात स्वतःला 'तानाशाह' म्हणजे हुकूमशहा म्हणत.
6. डॉ. सुशीला नय्यर, 1914-2001

महादेव देसाई यांच्यानंतर गांधींचे सचिव बनलेले प्यारेलाल पंजाबी परिवारातले होते. सुशीला या प्यारेलाल यांची बहीण होती.
आईच्या विरोधानंतरही हे दोघं बहीण-भाऊ गांधींकडे येण्यासाठी स्वतःला रोखू शकले नाहीत. काही काळानंतर मुलं गांधींकडे गेली म्हणून रडणारी त्यांची आई गांधींची समर्थक झाली.

फोटो स्रोत, VINOD KAPOOR
डॉक्टर झाल्यानंतर सुशीला महात्मा गांधी यांच्या खाजगी डॉक्टर म्हणून काम करू लागल्या. मनू आणि आभा यांच्याशिवाय थकलेले वृद्ध गांधी ज्यांच्या खांद्यावर आपले हात ठेवत, त्यात सुशीलाही होत्या.
भारत छोडो आंदोलनावेळी कस्तूरबा गांधी यांच्यासोबत मुंबईत सुशीला यांनाही अटक झाली होती. पुण्यात कस्तूरबा गांधींच्या शेवटच्या दिवसांत सुशीला त्यांच्यासोबत राहिल्या होत्या.
7. आभा गांधी, 1927-1995

आभा जन्मानं बंगाली होत्या. आभा यांचं लग्न गांधींचे पणतू कनू गांधी यांच्याशी झालं होतं. गांधींच्या सभेत आभा भजन गात असत तर कनू फोटोग्राफी करत.

फोटो स्रोत, VINDO KAPOOR
1940च्या काळातही गांधींची अनेक छायाचित्रं कनू यांनीच काढलेली आहेत. आभा नोआखाली इथं गांधींसोबत राहिल्या होत्या. त्यावेळी देशात ठिकठिकाणी दंगली भडकल्या होत्या आणि गांधी हिंदू-मुस्लिम यांच्यात शांतता स्थापित करण्याच्या प्रयत्नात अडकले होते.
नथुराम गोडसेनं जेव्हा महात्मा गांधींना गोळी घातली तेव्हा आभा तिथं उपस्थित होत्या.
8. मनू गांधी, 1928-1969

अगदी लहान वयातच मनू महात्मा गांधी यांच्याकडे आल्या होत्या. मनू महात्मा गांधींच्या दूरच्या नातेवाईक होत्या. गांधी मनू यांना आपली नात मानत असत. नोआखालीच्या दिवसांत आभासोबत मनुदेखील त्यांच्यासोबत होत्या. ज्या बापूंच्या थकलेल्या शरीराला आधार मिळावा म्हणून स्वतःच्या खांद्यावर त्यांचा हात ठेऊन पुढे चालत असत.

फोटो स्रोत, VINOD KAPOOR, GETTY
गांधींच्या विरोधात ज्यांनी त्यांच्या मार्गात मल-मूत्र टाकून विरोध केला होता, त्या रस्त्याची सफाई गांधींसह आभा आणि मनू यांनीही केली होती.
कस्तूरबा यांच्या शेवटच्या दिवसांत त्यांची सेवा करण्यात मनू अग्रभागी होत्या. महात्मा गांधी यांची शेवटची काही वर्ष कशी होती हे मनू यांची डायरी पाहिली की कळतं.
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








