'गांधींच्या खुनाबद्दल नव्याने संभ्रम निर्माण करण्याचा कट'

फोटो स्रोत, Central Press/Getty Images
- Author, तुषार गांधी
- Role, लेखक आणि म. गांधी यांचे पणतू
महात्मा गांधी यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा खुनाला आज 70 वर्षं झाली. म. गांधी यांचे पणतू आणि लेखक तुषार गांधी यांनी या पार्श्वभूमीवर मांडलेली एक बाजू.

30 जानेवारी 1948 रोजी बापूंचा खून झाल्यानंतर खोट्या गोष्टींचा बनाव रचून या खुनाचं समर्थन करणारी मोहीम राबवण्यात आली होती. उजव्या विचारसरणीच्या समर्थकांनी शिस्तबद्धपणे या मोहिमेला आजपर्यंत खतपाणी घातलं. आता ही मोहीम थंडावली आहे, कारण बापूंच्या खुनाला कारणीभूत विचारसरणीची मंडळीच आता सत्ताधारी झाली आहेत.
बापूंचं योगदान औपचारिकपणे नाकारता येत नाही म्हणून केवळ ढोंगीपणाने त्यांना आदर दिला जात आहे. बापूंचा मारेकरी नथुराम विनायक गोडसे त्यांचा आदर्श आहे. ते 'पंडित' या टोपणनावाने त्याचं वर्णन करतात. त्याची खुल्या दिलाने प्रशंसा करतात. गांधींविषयी हे लोक जो काही आदर दाखवत आहेत ते ढोंग आहे आणि ते ढोंग का केलं जातंय याची कारणं उघड आहेत.
हिंदू महासभेचे अध्वर्यू विनायक दामोदर सावरकर हे नथुरामचे मार्गदर्शक तसंच मुख्य आधारस्तंभ. सावरकर यांच्यासह नारायण आपटे आणि विष्णू करकरे हे बापूंच्या खून खटल्यातले मुख्य आरोपी होते. मात्र त्यांची नंतर सुटका करण्यात आली. सावरकरांच्या बचाव पक्षाने त्यांना यशस्वीरीत्या संशयाचा फायदा मिळवून दिला. त्यामुळेच खटल्यातून त्यांची सुटका झाली.
गुरूला इथे हे माहिती होतं की, सुनावणीच्या दिवशी नथुरामवर सगळ्यांचं लक्ष असेल आणि अख्खं जग तो काय बोलतो हे ऐकण्यासाठी आतुर असेल. त्यामुळे या गुरू-शिष्यांनी आपल्याकडे असलेल्या वेळेत एक बिनतोड युक्तिवाद तयार केला. अत्यंत भावपूर्ण वक्तव्याच्या जोरावर अर्धसत्यांना तथ्यांचं रूप देता येईल असं वक्तव्य त्यांनी तयार केलं.
बापूंचा खून होण्यामागची प्रेरणा सावरकर होते. खून करण्यासाठी जी योजना आखण्यात आली त्या कटातही सावरकर यांचा सक्रिय सहभाग होता. 60च्या दशकात न्या. कपूर चौकशी आयोगाने या प्रकरणातला सावरकरांचा सहभाग सिद्ध केला होता. बापूंच्या खुनाचा खट शिस्तबद्धपणे रचण्यात आला आणि याबद्दल देशभरातल्या अनेकांना सखोल माहिती होती, या आरोपांची शहानिशा कपूर आयोगाने केली.
'गांधींनी नाखुशीनेच फाळणी स्वीकारली'
नथुरामने काही बापूंविषयी काही खोट्या गोष्टी रचल्या होत्या आणि बापूंच्या खुनाचं समर्थन करण्यासाठी उजव्या विचारसरणीची मंडळी या गोष्टींचा प्रसार, प्रचार करत होते. त्यांनीच नथुरामचं म्हणणं पुढे रेटून लोकप्रिय केलं. अखंड भारताच्या फाळणीसाठी गांधी जबाबदार आहेत असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. म्हणूनच खून करावा लागला असं समर्थन ही मंडळी करत होती.

फोटो स्रोत, Keystone/Getty Images
'गांधी भारताच्या फाळणीकरता जबाबदार होते', 'मुस्लिमांचं लांगुलचालन करण्यात गांधींचा पुढाकार होता.' 'गांधी हिंदूविरोधी होते.' 'ते मुस्लिमांप्रती कनवाळू होते, हिंदूंची अवस्था त्यांना समजत नव्हती'. 'गांधींनी भारत सरकारला पाकिस्तानला 55 कोटी रुपये देण्यास भाग पाडलं. 'त्यांना जगायला दिलं तर ते देशाची अनेक तुकड्यांत विभागणी करतील आणि हे तुकडे पाकिस्तानला देऊन टाकतील.' 'ते हिंदूना स्वत:च्या मातृभूमीपासून वंचित ठेवतील.' या सर्व कथित कारणांसाठी आणि भारतमातेचं रक्षण करण्यासाठी बापूंचा खून केल्याचा नथुरामचा दावा होता.
नथुरामच्या दाव्यातला फोलपणा सिद्ध करण्यासाठी हा लेख कमी पडेल. बापूंनी फक्त फाळणीची योजना नाईलाज म्हणून स्वीकारली होती. समकालीन नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत स्वातंत्र्य हवंय हे लक्षात आल्यावर गांधीजींनी फाळणीविरोधातला पवित्रा सोडून देत या गोष्टीचा स्वीकार केला.
लॉर्ड माऊंटबॅटन यांनी सगळ्यांत आधी सरदार पटेल यांचं फाळणीसंदर्भात मन वळवलं. त्यानंतर त्यांनी पंडित नेहरूंकडे मोर्चा वळवला. नेहरूंची संमती मिळवल्यानंतर त्यांनी गांधींसमोर फाळणीचा प्रस्ताव ठेवला. तुमचे दोन विश्वासू सहकारी फाळणीसाठी अनुकूल असल्याचं माऊंटबॅटन यांनी गांधीजींनी सांगितलं. पर्यायाने तुम्ही पटेल आणि नेहरूंनी मान्य केलेला फाळणीचा निर्णय स्वीकारा, कारण तुम्ही एकटे पडले आहात, असं माऊंटबॅटन यांनी सूचित केलं. अशा परिस्थितीत फाळणीला होकार देण्यावाचून गांधींसमोर पर्यायच उरला नाही.
गांधींनी फाळणी घडवून आणली नाही तर दुखावलेल्या मनस्थितीत त्यांना फाळणीला हो म्हणावं लागलं.
'टिळकांनी मुस्लिमांची बाजू मांडली, गांधींनी नाही'
मुस्लिमांच्या लांगूलचालनात गांधींचा समावेश नव्हता. स्वातंत्र्यलढ्याची सूत्रं हाती घेतल्यावर हिंदू आणि मुस्लीम समाजात एकी नांदणं अत्यावश्यक असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. म्हणूनच त्यांनी खिलाफत चळवळीत मुस्लीम समाजाच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतला.

फोटो स्रोत, Fox photo/Getty Images
मात्र राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्याने मुस्लीम समाजाच्या उन्नतीसाठी पुढाकार घेण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. बापू राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्यापूर्वीच मुस्लिमांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यात आलं होतं. लखनौ करारात ही चूक सुधारण्यात आली. हे सगळं बापूंचा उदय होण्यापूर्वीच घडलं होतं. मुस्लिमांना मुख्य प्रवाहात आणणं हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सामील व्हावं असाही त्यामागचा हेतू होता.
लखनौ कराराच्या वाटाघाटी मुस्लीम नेत्यांशी चर्चा करूनच ठरवण्यात आल्या होत्या. ही चर्चा गांधी यांनी नव्हे तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लोकमान्य टिळक यांनी केली होती. मुस्लीम लांगूलचालनाची प्रथा सुरू केल्याचा आरोप गांधींना उद्देशून केला जातो. याची सुरुवात टिळकांनी केली होती.
55 कोटींचे बळी
बापूंनी पाकिस्तानला 55 कोटींचं घबाड दिलं नाही. फाळणीचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला तेव्हा राज्यांच्या मालकीच्या सर्व संसाधनांची समान वाटणी होईल असं निश्चित करण्यात आलं होतं. भौतिक वस्तू तसंच रोख पैसा या दोन्हींचं समान वितरण होईल असं ठरवण्यात आलं होतं. यासंदर्भात तपशीलवार वाटाघाटी झाल्या आणि त्यानुसारच गोष्टींची वाटणी करण्यात आली.

फोटो स्रोत, Keystone/Getty Images
देशाकडे असलेली संपत्तीचंही वाटप होणं आवश्यक होतं. ब्रिटिशांनी भारत तसंच नव्याने निर्माण झालेल्या पाकिस्तान सरकारला यासंदर्भात योग्य निर्णय घेण्याची सूचना केली.
कराराचं उल्लंघन करण्याचा मुद्दाही चर्चिला गेला. या कराराचा पुनर्विचार करावा अशी शिफारस कॅबिनेटने केली होती. दोन्ही देशातील सर्व तणावाचे मुद्दे निकाली निघत नाहीत तोपर्यंत पाकिस्तानला कोणतीही मदत देण्यात येऊ नये, असे संकेत कॅबिनेटने दिले होते. हे म्हणजे आंतरराष्ट्रीय कराराचा भंग करण्यासारखं होतं. भारतासाठी हा पहिलावहिला करार होता. कराराचं पालन न करणं म्हणजे दिलेला शब्द न पाळण्यासारखं होतं. असा निर्णय कायदेशीरदृष्ट्या शाश्वत ठरला नसता. तसंच नैतिकदृष्ट्या चुकीचा पायंडा पाडण्यासारखं होतं.
12 जानेवारी रोजी प्रार्थनेनंतर बापूंनी भारत सरकारच्या निर्णयाप्रती नाराजी व्यक्त केली होती. पाकिस्तानला 55 कोटी रुपये देण्याचं ठरलेलं असताना भारत सरकारने निर्णय बदलला होता असं गांधींजींनी सांगितलं. फाळणी पाप आहे आणि नागरिकांना दिलेला शब्द न पाळणं म्हणजे या पापात भर घालण्यासारखं आहे, असं गांधीजींनी सांगितलं.

फोटो स्रोत, TOPICAL PRESS AGENCY/GETTY IMAGES
सरकारला प्रचंड आनंद झाला होता. पाकिस्तानला पैसे देऊन भारताविरोधात युद्धाचा आर्थिक पाठिंबा मिळवण्यासाठी स्वत: ला दोषमुक्त करण्यासाठी त्यांना कारण मिळालं होतं.
बापूंच्या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी, दिल्लीस्थित बिर्ला हाऊसमध्ये त्यांनी अचानक भारतातर्फे पाकिस्तानला 55 कोटी रुपये देण्यात येतील असं जाहीर केलं. यामुळे असंतोष आणि रोषाला खतपाणी मिळालं. गांधींनीच पाकिस्तानला 55 कोटी रुपये देऊ केलं असं पसरवण्यात आलं. नथुराम गोडसेचा भाऊ गोपाळ गोडसे यांनी यासंदर्भात 55 कोटींचे बळी असं पुस्तक लिहिलं. नथुरामने न्यायालयात दिलेल्या माहितीच्या आधारे हे पुस्तक लिहिण्यात आलं होतं. होय, बापू 55 कोटींचे बळी होते पण ते याकरता दोषी नव्हते.
गोंधळ आणि संभ्रम
बापूंच्या खूनासंदर्भात अनेक खोट्या गोष्टी शिस्तबद्धपणे पसरवल्यानंतर जहालवाद्यांनी आता खूनासंदर्भात गोंधळ वाढेल अशी रचना केली आहे. देशाचा आधुनिक इतिहास लिहिण्यात ज्यांचं काहीही योगदान नाही अशी मंडळी इतिहासाचं पुनर्लेखन करायला सरसावली आहेत. इतिहासाची मोडतोड करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

फोटो स्रोत, DOUGLAS MILLER/TOPICAL PR/Getty Images
त्यांना आताही तेच करायचं आहे. बापूंच्या शरीराचा वेध चौथ्या गोळीने घेतला असा नवा दावा या मंडळींनी केला आहे. एक अज्ञात बंदूकधारी खरा मारेकरी असल्याचा दावा ते करत आहेत. बापूंचा खून करण्याची कामगिरी ब्रिटिश मारेकऱ्यांवर सोपवण्यात आली होती. असंख्य नवे बनाव मांडण्यात येत आहेत, मात्र कशालाही ठोस आधार नाही.
गांधींच्या खुनाची पुन्हा नव्याने चौकशी करण्यात यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सत्याचा शोध हे त्यामागचं कारण देण्यात येत असलं तरी तसं प्रत्यक्षात याला काहीही आधार नाही. बापूंच्या खूनासंदर्भात संभ्रम निर्माण व्हावा अशी परिस्थिती निर्माण करणं असा यामाचा उद्देश आहे. उजव्या विचारसरणीच्या मंडळींचा हा विश्वासघातकी कट आहे.
या संभ्रमाचा फायदा उठवत बापूंच्या खूनासंदर्भातलं एक काल्पनिक दावा तयार करण्यात आला. हा दावा उजव्या विचारसरणीला पूरक आहे.
भारतात सध्या अनागोंदी आणि गोंधळाचं वातावरण माजलं आहे. देशात अस्थिर परिस्थिती निर्माण व्हावी त्यासाठी राष्ट्रीय कट रचण्यात आला आहे. हा दावा त्याचाच भाग आहे. या गोंधळाचा फायदा उठवून आपल्याला अनुकूल अशी रचना आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
कपूर आयोगाने बापूंच्या खूनाच्या वेळी अशा षडयंत्राचे पुरावे सादर केले होते. गांधींच्या हत्येने देशात खळबळ उडाली. उजव्या विचारसरणीच्या जहालवाद्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सरकारला कठोर पावलं उचलावी लागली. ज्या देशासाठी बापूंनी आयुष्य वेचलं तो देश त्यांच्या मृत्यूपश्चात एकत्र आला.
आज आपल्याला अनागोंदीपासून वाचवण्यासाठी बापूही नाहीत.
(या लेखात व्यक्त झालेले विचार लेखकाचे वैयक्तिक आहेत.)
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








