बापू बिरू वाटेगावकरबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

बापू विटेगावकर

फोटो स्रोत, Sagar Kadav

फोटो कॅप्शन, बापू वाटेगावकर
    • Author, तुषार कुलकर्णी आणि मोहसीन मुल्ला
    • Role, बीबीसी मराठी

"रंगा शिंद्यानं बोरगावात पोरीचं नरडं दाबून मारून टाकलं. पण त्याच्याविरुद्ध कुणी साक्ष देईना. भीत होते त्याला. तेव्हा चार मुली माझ्याकडे आल्या. म्हणाल्या आता आमचं काही खरं नाही. आम्ही देह कृष्णा-कोयनेला अर्पण करणार. तुम्हाला काही होत असलं तर बघा. तेव्हा मी कुऱ्हाड हातात घेतली अन् रंग्याचा कोथळा बाहेर काढला."

डोक्यावर पिवळं मुंडासं, कपाळावर भंडारा, पांढऱ्या दाढी-मिशा आणि खांद्यावर काळी घोंगडी घातलेले बापू बिरू वाटेगावकर त्यांनी केलेल्या पहिल्या खुनाची कथा रंगवून रंगवून सांगायचे. हा व्हीडिओ यूट्यूब आणि फेसबुकवर लोकांनी हजारो वेळा पाहिला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर हे व्हीडिओ पुन्हा पाहिले गेले होते.

कुणी त्यांना आदरयुक्त प्रेमाने 'बापू' म्हणून हाक मारायचं, कुणी 'ढाण्या' म्हणायचं तर कुणी 'रॉबिनहुड'. सुमारे शंभर वर्षांचं आयुष्य जगलेल्या या सांगलीतल्या अट्टल गुन्हेगाराच्या लोक चक्क पाया पडायचे.

तरुण त्यांच्याबरोबर सेल्फी घ्यायचे. गावोगावी त्यांना प्रवचनांसाठी बोलवायचे. बापू बिरू वाटेगावकरांची कथा जितकी रंजक आहे, तितकीच थक्क करणारी आहे.

कुस्तीगीर झाला खुनी

बापू मूळ सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातल्या बोरगावचा. त्याला लहानपणी कुस्तीची आवड होती. अंगाने धष्टपुष्ट होता. कुणी एखाद्या महिलेची छेड काढली किंवा तिला त्रास दिला तर त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाई, असं स्थानिक पत्रकार राजू सनदी सांगतात.

त्यातूनच त्याने हाती शस्त्र घेतलं आणि पहिला खून केला, असा दावा केला जातो. ज्याचा खून केला, त्या रंगा शिंदेच्या भावाने बदला घ्यायचा प्रयत्न केला, तर बापूने त्याचाही जीव घेतला.

नंतर पोलिसांच्या भीतीने बापू फरार झाला. गावात गेला तर पोलीस पकडतील, म्हणून तो सह्याद्रीच्या दाट जंगलात लपून बसला. तो पोलिसांच्या दृष्टीने गुन्हेगार असला तरी लोकांना त्याच्याबद्दल सहानुभूती होती.

"बापू बिरू सुरुवातीपासून त्यांच्या प्रतिमेबद्दल दक्ष होते. त्या काळात उत्तर भारतात जसा डाकूंचा उदय झाला होता, तसाच प्रकार बापू बिरूंचाही आहे. त्यांनी केलेला पहिला खून हा गावातील एका गुंडाचा होता. यातून त्यांची गावात चांगली प्रतिमा निर्माण व्हायला मदत झाली." कोल्हापूरमध्ये अनेक वर्षं पत्रकारिता केलेले अनंत दीक्षित बापूच्या लोकप्रियतेचं कारण सांगतात.

पोलिसांना दिला गुंगारा

जंगलातून फिरताना तो अचानक एखाद्या गावात शिरायचा. जेवण वगैरे उरकायचा. पोलिसांना कळण्याच्या आत तो पुन्हा जंगलात गेलेला असायचा. असा त्याने पोलिसांना जवळपास पंचवीस वर्षं गुंगारा दिला.

गावात गेल्यावर तो तंटे सोडवायचा आणि महिलांना मदत करायचा, असा दावा केला जातो. पाहता पाहता त्याची टोळी तयार झाली. त्या टोळीतच सुखदेव गवळी होता.

सुखदेव गवळी

फोटो स्रोत, Amol gavli

फोटो कॅप्शन, सुखदेव गवळी

"त्यांच्यासोबत आम्ही 15-16 तरुण नेहमी असायचो. वडीलभावाप्रमाणे ते आमची काळजी घ्यायचे. कुणाचं काही दुखलं खुपलं तर त्यांना चैन पडत नसे," असं गवळी सांगतो. बापू निर्व्यसनी होता आणि कुणीही दारू प्यायलेलं त्याला चालत नसे, असं गवळी सांगतो.

शेवटी जेव्हा बापूने शरणागती पत्करली, तेव्हा त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. ती पूर्ण केल्यानंतर तो आपल्या गावी परतला आणि त्याच्या आयुष्याला नवं वळण लागलं.

त्याने भजन-कीर्तन करायला आणि आध्यात्मिक भाषणं द्यायला सुरुवात केली. निर्व्यसनी राहा, गुन्हेगारीचं आयुष्य जगू नका, असं तो तरुणांना सांगू लागला.

तरुणांमध्ये लोकप्रिय बापू.

फोटो स्रोत, Sagar Kadav

फोटो कॅप्शन, तरुणांमध्ये लोकप्रिय बापू.

"शिक्षा भोगून पूर्ण झाल्यावर स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी वाटेगावकरांनी खूप प्रयत्न केले. पण त्याआधीच्या परिस्थितीचा विचार केला तर ते कायद्याच्या दृष्टीने गुन्हेगारच होते," असं माजी पोलीस उपअधीक्षक भीमराव चाचे बीबीसीला सांगतात. बापूला पकडणाऱ्या टीममध्ये चाचे होते.

पोवाडे आणि सिनेमा

सांगली-सातारा भागातील अनेक लोकशाहिरांनी त्याच्यावर पोवाडे आणि कविता रचल्या. जत्रांमध्ये होणाऱ्या तमाशातही त्याच्या कथा सांगितल्या जात.

बापूच्या जीवनावर आधारित रामचंद्र बनसोडे यांनी लिहिलेलं 'कळंबा जेलचा कैदी' हे वगनाट्य त्यावेळी विशेष गाजलं होतं. याबद्दल लोककलाकार मंगला बनसोडे बीबीसीशी बोलताना म्हणतात, "माझे पती रामचंद्र बनसोडे यांनी बापू बिरू वाटेगावकरांची तुरुंगात भेट घेऊन त्यांची पूर्ण कथा ऐकली आणि त्याचं रूपांतर वगनाट्यात केलं."

बापू बिरू वाटेगावकर

फोटो स्रोत, Raju sanadi

फोटो कॅप्शन, बापू बिरू वाटेगावकर

त्या म्हणतात, "आम्ही नेहमीच सत्य घटनांवर आधारित वगनाट्य सादर करत असू. या प्रकाराला ग्रामीण भागात खूप मागणी आहे. त्यातूनच माझ्या पतींना बापू बिरू वाटेगावकर यांच्यावर नाटक लिहावं, अशी कल्पना सुचली. जेव्हा हा वग सादर केला, त्यावेळी प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. आमच्या कार्यक्रमाला ५-६ हजार लोक जमत असत. ते सर्व टाळ्या आणि शिट्यांनी या वगाला दाद द्यायचे."

बापूच्या आयुष्यावर आधारित बापू बिरू वाटेगावकर हा चित्रपट येऊन गेला आहे. या चित्रपटात मिलिंद गुणाजी यांनी बापूची भूमिका साकारली आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)