माझ्या जिमनॅस्टिक्स डॉक्टरनेच माझं शोषण केलं! : ऑलिम्पिकविजेती सिमोन बाईल्सचा गौप्यस्फोट

फोटो स्रोत, Getty Images
ऑलिम्पिक पदक विजेती जिम्नॅस्ट सिमोन बाईल्सने अमेरिकेच्या जिम्नॅस्टिक्स संघाचे माजी डॉक्टर लॅरी नॅसर यांनी आपल्यासोबत लैंगिक गैरवर्तणूक केल्याचे आरोप केले आहेत.
2016च्या रियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या दीपा करमाकरला व्हॉल्ट प्रकारात हरवून सुवर्णपदक जिंकणारी खेळाडू म्हणजे सिमोन बाईल्स. एका भावनिक प्रसिद्धीपत्रकात बाईल्सने "मी नॅसरला माझा आनंद आणि प्रेम चोरू देणार नाही," असं म्हणाली.
लहान मुलांच्या लैंगिक छळवणुकीचे फोटो ठेवल्याप्रकरणी आणि कसरतपटूंची छळवणूक केल्याप्रकरणी नॅसरला 60 वर्षांची कैद झाली."मी या भयानक अनुभवापुरती मर्यादित नाही, मी यापेक्षा खूप काही आहे," असं 20 वर्षीय बाईल्स म्हणाली.
अमेरिकेच्या तीन माजी ऑलिम्पियन्सनी नॅसरवर उपचाराच्या नावाखाली लैंगिक छळ केल्याचे आरोप केले आहेत. बाईल्सबरोबर 2016च्या रियो ऑलिम्पिकमध्ये सांघिक सुवर्णपदक जिंकलेल्या गॅबी डग्लसनेही नॅसरवर आरोप केले आहेत.
महिला जिम्नॅस्टबरोबर लैंगिक गैरवर्तणूक केल्याचं मान्य केलेल्या दोन खटल्यांमध्ये नॅसरला या महिन्यात शिक्षा सुनावली जाईल. 54-वर्षीय नॅसरला डिसेंबरमध्ये त्याच्या काँप्युटरवर लहान मुलांच्या लैंगिक छळवणुकीचे फोटो सापडल्यानंतर त्याला कैदेची शिक्षा सुनावली गेली होती.
बीबीसीने विचारणा केली असता बाईल्सच्या विधानावर प्रतिक्रिया देण्यास नॅसरच्या वकिलांनी नकार दिला.

फोटो स्रोत, AFP
एका प्रसिद्धीपत्रकात USA Gymnastics ने म्हटलं "लॅरी नॅसर यानं सिमोन बाईल्स किंवा इतर कोणत्याही खेळाडूबरोबर केलेल्या वर्तणुकीबद्दल आम्ही खेद आणि संताप व्यक्त करतो."
'माझी कहाणी इथेच थांबणार नाही'
ट्विटरवरून एका पोस्टच्या माध्यमातून बाईल्सने नॅसरवर आरोप केले आहेत. रियो ऑलिम्पिक गेम्समध्ये बाईल्सने चार सुवर्ण आणि एक कांस्यपदक मिळवलं होतं.
"नॅसरने छळवणूक केलेल्या अनेक खेळाडूंपैकी मी ही एक होते," असं बाईल्सने #MeToo हॅशटॅग वापरून लिहिलेल्या आपल्या पोस्टमध्ये लिहिलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
"तुमच्यातले बहुतेक लोक मला एक आनंदी, उत्साही आणि हसती-खेळती मुलगी म्हणून ओळखतात. पण अलीकडे मला खचल्यासारखं वाटतंय. मी त्या आवाजाला जितकं दाबायचा प्रयत्न करते तितका तो मोठा होत जातो. पण मी आता माझी कहाणी सांगायला घाबरणार नाही."
बाईल्सने पुढे लिहिलं आहे, "हे अनुभव पुन्हा जगणं खूप कठीण आहे. 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याच्या माझ्या ध्येयासाठी मी काम करत असताना ज्या ठिकाणी माझा यापूर्वी छळ झाला होता, तिथेच मला प्रशिक्षणासाठी परत जावं लागेल, या विचाराने माझं थरकाप उडतो."
"मी अनोखी आहे, हुशार, उत्साही आणि ध्येयप्राप्तीसाठी झपाटलेली आहे. मी स्वतःला वचन दिलं आहे की माझी कहाणी यापेक्षा खूप श्रेष्ठ असेल. मी तुम्हाला वचन देते की मी कधीही प्रयत्न सोडणार नाही."

फोटो स्रोत, Getty Images
लॅरी नॅसर 1980 पासून ते 2015 सालापर्यंत USA Gymnastics शी जोडला गेला होता. 2015 साली त्याला नोकरीवरून काढून टाकलं गेलं. त्याच्याविरुद्ध 130 महिलांनी अत्याचाराचे आरोप केले आहेत.
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या अॅली रॅजमन आणि मॅक्कायला मरोनी यांनीही नॅसरवर लैंगिक अत्याचारांचे आरोप केले आहेत.
हे जरूर वाचा
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








