ग्राउंड रिपोर्ट : सोनईतलं तिहेरी हत्याकांड नेमकं घडलं कसं?

पीडितांचे नातेवाईक

फोटो स्रोत, BBC / Pravin Thakare

फोटो कॅप्शन, पीडितांचे नातेवाईक
    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणातील सर्व दोषींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी पीडितांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातल्या सोनईमध्ये १ जानेवारी २०१३ रोजी संदीप राज थनवार (वय 24), राहुल कंडारे (वय 26) आणि सचिन घारू (वय 23) या मेहतर समाजातील तीन युवकांची निर्घृण हत्या झाली होती.

या प्रकरणी सातपैकी सहा आरोपी दोषी असल्याचा निकाल नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीष आर. आर. वैष्णव यांनी सोमवारी दिला.

प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक नवगिरे आणि संदीप कुऱ्हे अशी या सहा दोषींची नावं आहेत. हे सहाही दोषी मराठा समाजातले आणि ते एकाच कुटुंबातले आहेत.

आता १८ जानेवारीला सहाही दोषींना काय शिक्षा दिली जाते, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

कोर्टाच्या निकालावर पीडितांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केलं आहे, मात्र दोषींना आता फाशी दिली जावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

फाशीची मागणी

"आज सहा जण दोषी ठरले हे कळलं तेव्हा आम्हाला बरं वाटलं. पण आम्ही निकालावर जास्त खूश नाही. कारण सातव्या आरोपीची मुक्तता झाली." अशी प्रतिक्रिया सचिनचे मेहुणे हरिचंद अटवाल यांनी दिली आहे.

"इतक्या निर्घृणपणे तिघांना मारलं होतं, सहाही जणांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी," अशी मागणी राहुलचा भाऊ सागर कंडारे यांनी केली.

सोनईत नेमकं काय घडलं?

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ही 'ऑनर किलिंग'ची घटना असल्याचं म्हटलं आहे.

दरंदले परिवारातील एक मुलगी नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या कॉलेजमध्ये बी.एड.चं शिक्षण घेत होती. तिथंच सचिन घारूसोबत तिचे प्रेमसंबंध जुळले.

सचिन हा या संस्थेतच संदीप थनवार आणि राहुल कंडारे यांच्यासोबत सफाई कामगार म्हणून काम करत होता. तिघंही तिथंच राहातही होते.

पोपट दरंदले, रमेश दरंदले आणि प्रकाश दरंदले यांना आपल्या कुटुंबातील मुलगी आणि सचिनचं हे नातं पसंत नव्हतं.

१ जानेवारी २०१३च्या दिवशी सचिन, संदीप आणि राहुलला सेप्टिक टँकच्या सफाईचं निमित्त करून गणेशवाडी शिवारातील विठ्ठलवाडी इथं दरंदले परिवाराच्या घरी बोलावण्यात आलं.

तिथंच तिघांची हत्या करण्यात आली. संदीपचं शरीर सेप्टिक टँकमध्ये टाकण्यात आलं तर सचिन आणि राहुलचे मृतदेह दरंदलेंच्याच मालकीच्या शेतातील विहिरीत टाकण्यात आले.

सचिनच्या शरीराचे पाच तुकडे करण्यात आले होते. कडबा कापण्याच्या यंत्रानं त्याचे हातपाय तोडून एका कूपनलिकेत टाकण्यात आले.

सकाळी आठ वाजता गेलेले तिघं संध्याकाळनंतरही घरी परतले नाहीत. त्यामुळे शोधाशोध सुरू झाली. संदीपचा सेप्टिक टँकमध्ये पडून मृत्यू झाला असल्याचा बनाव आरोपींनी पोलिसांसमोर आधी केला होता.

तपासात दिरंगाईचा आरोप

या प्रकरणात स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर आणि त्यांनी केलेल्या तपासावर सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं, असं दिव्य मराठीच्या विशेष प्रतिनिधी दीप्ती राऊत यांनी सांगितलं.

दीप्ती यांनी सुरूवातीपासूनच या हत्याकांडाचं वार्तांकन केलं आहे. "हे जातीयवादातून झालेलं हत्याकांड आहे हे मान्य करायला पोलीस तयार नव्हते. त्यांनी आधी संदीपचा आकस्मिक मृत्यू झाल्याचीच नोंद केली होती."

"मात्र त्यानंतर उरलेले दोन मृतदेह मिळाले. पोलिसांनी विळे, लाठ्या, रक्तानं माखलेले कपडे जप्त केले. पाच जानेवारीला दलित अत्याचारविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आणि काही दिवसांतच आरोपींना अटक झाली."

"तरीही पंचनाम्यात फोन रेकॉर्ड्सचा समावेश नव्हता, तसंच मुलीचा जबाब व्यवस्थित घेण्यात आला नव्हता," असं दीप्ती राऊत यांनी नमूद केलं.

'गावात राहणं अशक्य झालं'

"सर्व आरोपी स्थानिक रहिवासी होते, त्यांचे राजकीय लोकांशी संबंध होते. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात आमच्यावर दबाव येत होता. आम्हाला केस मागे घ्या म्हणून धमकीचे फोनही येत होते," असं संदीप थनवारचा भाऊ पंकज थनवारनं बीबीसीला सांगितलं.

वाढत्या दबावामुळंच पीडितांच्या कुटुंबीयांनी घरही सोडलं आणि ते नाशिक, जळगाव जिल्ह्यात स्थलांतरित झाले.

पंकज थनवारच्या पाठपुराव्यानंतर हा खटला नाशिकच्या न्यायालयात वर्ग करण्यात आला. तसंच विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली.

तरीही निकाल येण्यासाठी तब्बल पाच वर्षं जावी लागली. दरम्यान ५३ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या.

सोमवारी कोर्टात काय झालं?

खटल्याचं गांभीर्य बघता नाशिकच्या न्यायालयात सोमवारी होणाऱ्या सुनावणीसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

नाशिक सत्र न्यायालय
फोटो कॅप्शन, नाशिक सत्र न्यायालय

कोर्टरूममध्ये कामकाज सुरू होताच न्यायाधीश वैष्णव यांनी सहा आरोपींना पुढे बोलावून घेतलं.

सचिन आणि आरोपीच्या परिवारातील मुलीचे प्रेमसंबंध होते ही गोष्ट सिद्ध झाल्याचं न्यायाधीशांनी नमूद केलं.

परिस्थितीजन्य पुराव्याआधारे दोषी

'सचिन, संदीप आणि राहुल हे तिघेही अशोक नवगिरे आणि संदीप कुऱ्हे यांच्या सांगण्यावरून घटनास्थळी गेले होते. साक्षीदारांनी तिघांना दरंदले यांच्या घरी पाहिलं होतं. दुपारी 2.57 वाजता संदीपचं त्याच्या भावाशी बोलणं झालं', असं सिद्ध झाल्याचं न्यायाधीशांनी म्हटलं आहे.

मृतदेह सापडले ती विहीर आणि आसपासची शेतं तसंच हत्येसाठी वापरण्यात आलेल्या अवजारं दरंदले कुटुंबाच्या मालकीची असल्याचं सिद्ध झाल्याचंही कोर्टानं नमूद केलं.

परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे सहाही जणांना दोषी ठरवण्यात आल्याचं कोर्टानं जाहीर केलं. तेव्हा दोषींपैकी अशोक नवगिरेनं निकाल मंजूर नसल्याचं सांगत गोंधळ घालायचा प्रयत्न केला. मात्र दोषींना लगेचच बेड्या घालून बाहेर नेण्यात आलं.

नगर जिल्ह्यातला जातीयवाद पुन्हा चर्चेत

सहाही दोषींना काय शिक्षा होणार याचा निर्णय येत्या गुरुवारी घेतला जाईल. मात्र या निकालानं अहमदनगर जिल्हा आणि जातीयवाद पुन्हा चर्चेत आला आहे.

"एक माणूस म्हणून ही पाच वर्षं मला अस्वस्थ करणारी होती. सोनई, जवखेडा, खर्डा, कोपर्डी.. सगळीकडे जात ही मनामनात, लोकांच्या विचारांत आणि व्यवहारांत जास्तीत जास्त प्रखर होत चालली आहे." असं दीप्ती राऊत यांनी नमूद केलं.

"घटनेचा तपास असो वा त्याविषयीची चर्चा ही गुन्हेगारीच्या दृष्टीकोनातून व्हायला हवी, पण दुर्दैवानं आरोपी आणि पीडितांच्या जातीचीच चर्चा जास्त होते आहे", असं त्या म्हणतात.

कायद्याचा वचक नसल्यानं आणि मानसिकतेत सुधारणा होत नसल्यानं अशा घटनांना खतपाणी मिळत असल्याचंही दीप्ती यांना वाटतं.

"आंतरजातीय प्रेमसंबंधातून झालेल्या या हत्याकांडात तपास वेळेत झाला असता, सोनईच्या दोषींना कडक शिक्षा झाली असती, तर पुढच्या काही घटना टळल्या असत्या", असं पंकज थनवारला वाटतं.

पंकज
फोटो कॅप्शन, संदीप थनवारच्या मुलाची जबाबदारी त्याचा भाऊ पंकजनं घेतली आहे.

भारतीय सैन्यदलात नोकरीला असलेल्या पंकजनं आता भाऊ संदीपच्या मुलाची, नीरजची जबाबदारी उचलली आहे.

निरागस नीरजला काकाचा आधार बाकी पीडितांचं काय?

संदीप थनवारची हत्या झाली, तेव्हा नीरज नऊ महिन्यांचा होता. आज कोर्टातल्या सुनावणीनंतर आम्ही पंकजला भेटलो, तेव्हा पाच वर्षांचा नीरजही तिथं आला होता आणि बागडत होता.

पंकजच्या आधारामुळं नीरजच्या चेहऱ्यावरची निरागसता टिकून राहिली आहे. असाच आधार बाकीच्या पीडीतांनाही मिळायला हवा, असं पंकजला वाटतं.

"पीडित कुटुंबासाठी सर्वच समाजानं उभं राहायला हवं, लढताना पाय मागे घेण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये असं वाटतं."

ती मुलगी कोण आहे?

महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या हत्याकांडात केंद्रस्थानी असलेल्या मुलीचं काय झालं? असाही प्रश्न उभा राहिला आहे.

पोपटराव दरंदले यांची मुलगी सीमा आणि आपला मुलगा सचिन यांचं एकमेकांवर प्रेम होते, असं सचिनच्या आई काळूबाई घारेंनी म्हटलं होतं.

सचिन आणि संबंधित मुलीमध्ये प्रेमसंबंध होते त्यातूनच हे हत्याकांड घडलं हा दावा न्यायाधीश वैष्णव यांनीही मान्य केला आहे.

७ जानेवारी रोजी पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबात या मुलीनं कॉलेजात आपली सचिनशी ओळख झाल्याचं आणि अशोक नवगिरे यांनी दोघांना एकत्र पाहिल्याचं मान्य केलं होतं. पण कोर्टासमोर साक्ष देताना तिनं हा जबाब फिरवला.

जबाब का फिरवला?

या मुलीनं कोर्टात दिलेल्या Depositionची प्रत बीबीसी मराठीला मिळाली आहे.

त्यानुसार संबंधित मुलीनं राधाबाई काळे महाविद्यालयातून विज्ञान विषयात (पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री) पदव्युत्तर शिक्षण घेतलं होतं. ही मुलगी सप्टेंबर २०१२ पासून नेवाशाच्या घाडगे महाविद्यालयात बी. एड. चं शिक्षण घेत होती. पण १ जानेवारी २०१३ नंतर तिनं कॉलेजला जाणं बंद केलं. त्याच दिवशी या मुलीच्या घरी सचिनसह संदीप आणि राहुलची हत्या झाली.

२ तारखेला शिक्षकांनी गैरहजेरीविषयी विचारल्यावर आपण कौटुंबिक कारणांमुळं कॉलेजला येऊ शकणार नसल्याचं कळवल्याचंही तिनं मान्य केलं आहे.

१ जानेवारी २०१३ पासून आपण कुठल्या कारणाशिवाय आपला मोबाईल फोन वापरणं बंद केलं होतं असंही या मुलीनं साक्षीदरम्यान म्हटलं होतं. तसंच २ तारखेला संध्याकाळी आपल्या मैत्रिणीशी बोलणं झाल्याचंही तिनं नाकारलं.

१ तारखेला आपल्या घरी डेड बॉडी सापडल्याचं कळल्यावर आश्चर्य वाटलं. मी त्याविषयी कुणाकडे कुठली चौकशी केली नाही, कारण तसं काही कारण नव्हतं.

ती व्यक्ती सचिन घारूसोबत आल्याचं कळल्यानं मी घाबरले, ही पोलिसांची नोंदही चुकीची असल्याचं या मुलीनं साक्ष देताना म्हटलं होतं.

"पोलिसांनी नोंदवलेल्या जबानीत मी न केलेली विधानं कशी आली हे मला सांगता येणार नाही, मी कुटुंबीयांना वाचवण्यासाठी खोटी साक्ष देत नाही", असंही या मुलीनं कोर्टात सांगितल्याची नोंद आहे.

मुलीची बाजू समजून घ्यायचा प्रयत्न का नाही?

दबावाखाली आल्यानंच मुलीनं साक्ष बदलल्याचं केसशी संबंधित वकील आणि जाणकारांचं मत आहे. मात्र या मुलीची बाजू समजून घेण्याचा खरंच प्रयत्न झाला आहे का?

दीप्ती राऊत यांनी याकडे लक्ष वेधून घेतलं आहे. "ही मुलगी पाच वर्षं कुठल्या मानसिक धक्क्यातून जात असेल, हे आपल्याला माहिती नाही. आपल्यामुळं तिघांचे जीव तर गेलेच, आता कुटुंबीयांनाही फाशी होऊ शकते, सहा कुटुंबं उध्वस्त झाली आहेत. यातून सावरून उभं राहायचं असेल तर तिला कुठला आधार, मानसिक समुपदेशन मिळालं असेल असं मला वाटत नाही", असं दीप्ती यांनी म्हटलं.

सध्या ही मुलगी कुठे असते याविषयी आरोपींच्या परिवारानंही गुप्तता बाळगली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)