'आधी काका, नंतर भाऊ आणि आता बाबांनीही केली आत्महत्या!'

जनार्धन महादेव उईके यांच्या पत्नी आणि मुली

फोटो स्रोत, BBC / Nitesh Raut

फोटो कॅप्शन, जनार्धन महादेव उईके यांच्या पत्नी आणि मुली
    • Author, नितेश राउत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

50 वर्षीय जनार्धन महादेव उईके यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. यवतमाळच्या या शेतकरी कुटुंबातली गेल्या पाच वर्षांत ही तिसरी आत्महत्या आहे.

यापूर्वी त्यांचे भाऊ अशोक महादेव उईके आणि पुतण्या सुदर्शन अशोक उईके यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती.

उईके कुटुंबीय यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातल्या जरूर या गावात राहतं.

या आत्महत्या शेतकऱ्यांची विदारक स्थिती दाखवून देतात.

आत्महत्येचं सत्र

भाऊ अशोक आणि पुतण्या सुदर्शननं केलेल्या आत्महत्येमुळे कुटुंबाची जबाबदारी जनार्धन यांच्या खांद्यावर होती. जनार्धन यांनी यावर्षी कापसाची पेरणी केली होती. पण बोंडअळीमुळे उभं पीक वाया गेलं.

शिवाय त्यांच्या डोक्यावर सायखेड सोसायटीचं ९० हजार रुपये कर्ज होतं. कर्जमाफीच्या यादीत नाव असतानाही कर्जमाफीची रक्कम त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. त्यातूनच अखेर त्यांनी स्वत:ला संपवून घेतलं.

उईके कुटुंबातली पहिली आत्महत्या जनार्धन यांचे बंधू अशोक यांची होती. या कुटुंबाकडे तीन एकर कोरडवाहू शेती आहे. शेतातल्या उत्पन्नात कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नसल्यानं त्यांच्या पत्नी इंदिरा याही मजुरी करायला जायच्या.

पण कर्जाचा डोंगर वाढतच गेल्यानं अखेर अशोक यांनी विष पिऊन आत्महत्या केली होती.

वडिलांच्या मृत्यूनंतर मुलगा सुदर्शनवर कुटुंबाची जबाबदारी पडली. मात्र शेतीने त्यालाही साथ दिली नाही. शेवटी त्यानेही आत्महत्येचा मार्ग पत्करला.

बोंडअळीनं घात केला

आधीच दोन आत्महत्या पाहिलेल्या कुटुंबासाठी जनार्धन हे एकमेव आधार होते. तीन एकर शेतीमधून त्यांनीही कुटुंबाला जगवण्यासाठी संघर्ष केला.

पण सततच्या नापिकीमुळे तेही हताश झाले. एकीकडे कुटुंबाची जबाबदारी तर दुसरीकडे प्रचंड आर्थिक अडचणी, यात ते अकडले.

जनार्धन महादेव उईके

फोटो स्रोत, BBC / Nitesh Raut

फोटो कॅप्शन, जनार्धन महादेव उईके

सुरुवातीला कापसाचं चांगलं पीक आलं. शेतात सात फुटांपर्यंत कापूस बहरला. यावेळी तरी आर्थिक अनिष्ट दूर होईल, अशी आशा त्यांना होती. पण बोंडअळीनं घात केला आणि आलेलं पीक वाया गेलं. भाऊ आणि पुतण्याप्रमाणेच त्यांनीही आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.

जनार्धन यांच्या आत्महत्येमुळे त्यांच संपूर्ण कुटुंब आता उघड्यावर आलं आहे. त्यांची एक मुलगी उज्ज्वला पदवीचं शिक्षण घेत आहे तर दुसरी मुलगी अनिता अकरावीत शिकत आहे.

घरातल्या कर्त्यांच्या आत्महत्येंमुळे या मुलींच्या शिक्षणाची वाट आता अधिक खडतर झाली आहे.

पदवीचं शिक्षण घेणारी उज्ज्वला सांगते, "आमच्याकडे असलेल्या तीन एकर शेतीवरच आमचा उदरनिर्वाह चालू आहे. घर सांभाळून आमच्या शिक्षणालाही ते (वडील) पैसे पुरवायचे. शिक्षणाला त्यांनी कधीच कमी पडू दिलं नाही. आता वडील गेल्यामुळे आमच्या समोर शिक्षणासोबतच आमच्या जगण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे."

जनार्धन यांचे भाऊ मनोहर सांगतात, "यंदा बोंडअळीमुळे कापसाचं नुकसान झालं. कर्जमाफी आम्हाला मिळाली नाही. कापसाची नुकसानभरपाई देणार असं सरकारनं सांगितलं. पण तीसुद्धा मिळाली नाही. सरकारनं आमच्याकडे लक्ष द्यावं. आमच कुटुंब उघड्यावर पडलं आहे. आम्हाला आता तरी सरकारनं मदत करावी."

आत्महत्या कमी का होत नाहीत?

शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी सागितलं, "या कुटुंबापर्यंत वेळीच मदत पोहोचली असती तर त्यांचे प्राण वाचू शकले असते. मुळात कर्जमाफी झाली पण ती वेळेवर मिळत नाही हा दोष आहेच, पण यावर्षी जी सेंद्रीय बोंडअळी आली त्याची नुकसान भरपाई त्यांच्यापर्यंत पोहचली असती तर त्यांना ऑक्सिजन मिळाला असता."

"आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजप सरकार 'हे सगळं काँग्रेसचं पाप', आहे असं म्हणतं. पण भाजप सरकारला 3 वर्षं झालेत आणि केंद्रात जवळपास 4 वर्षं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 60 महिने मागितले होते. आता 40 महिने होत आलेत. पण मूलभूत धोरणांत काहीच बदल झालेला नाही," असं जावंधिया सांगतात.

उईके यांचं घर

फोटो स्रोत, BBC / Nitesh Raut

फोटो कॅप्शन, उईके यांचं घर

शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांबद्दल जावंधिया सांगतात, "नेहमीपेक्षा यावर्षीची परिस्थिती वाईट आहे. पीकही कमी आहे आणि भावही कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधली निराशा वाढत आहे. आणि याच कारणांमुळे आत्महत्या कमी होत नाही आहेत. पण जे शेतकरी आत्महत्या करत नाहीत, ते सुद्धा अत्यंत वाईट अवस्थेत जगत आहेत. हे सरकार केव्हा मान्य करेल?"

भाजप सरकारनं शेतकऱ्यांसंबंधीच्या धोरणांतला संभ्रम दूर करावा, अशी मागणी जावंधिया करतात.

एकाच कुटुंबात तीन आत्महत्या नवीन बाब नाही

शेतकरी नेते चंद्रकांत वानखेडे यांच्या मते, एकाच कुटुंबात तीन आत्महत्या यात काही नवीन नाही. ते सांगतात, "आजपर्यंत अनेक शेतकरी कुटुंबात तीनच्या वर आत्महत्या झाल्या आहेत. मुळात आपल्याकडे आजपर्यंत पुरुष आत्महत्या करतात असा समज होता. पण महिलांच्या आत्महत्येंचीही उदाहरणे आहेत. पण दुर्दैवानं हे गांभीर्यानं घ्यायचंच नाही, असं सरकारनं ठरवलं आहे".

"कोणी कितीही दावे केले तरी जोपर्यंत शेतकरी आत्महत्येची आकडेवारी कमी होणार नाही तोपर्यंत हे सरकारचं अपयश आहे, असंच म्हणावं लागेल. या गंभीर प्रश्नासाठी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. त्यामध्ये शेतकऱ्यांची बाजू ऐकून घ्यायला पाहिजे. मात्र ते होत नाही. त्यामुळे आत्महत्यांच्या आकडेवारीत वाढ होत चालली आहे," असं वानखेडे पुढे सांगतात.

सरकारनं शेतकऱ्यांसंबंधीच्या धोरणांत बदल करावा, अशी मागणी वानखेडेही करतात.

शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांना शेतकऱ्यांच्या स्थितीबद्दल विचारल्यावर ते सांगतात, "थकीत पीक कर्ज सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलं आहे. आता नव्यानं खरीप पीक कर्ज मिळेल. सरकारनं जे पीक कर्ज दिलं त्यामुळे 80% लोकांना नव्यानं पीक कर्ज मिळेल."

कुटुंबातल्या तिसऱ्या आत्महत्येमुळे मुलींच्या शिक्षणाचा मार्ग आता अधिक खडतर झाला आहे

फोटो स्रोत, BBC / Nitesh Raut

फोटो कॅप्शन, कुटुंबातल्या तिसऱ्या आत्महत्येमुळे मुलींच्या शिक्षणाचा मार्ग आता अधिक खडतर झाला आहे

बोंडअळीमुळे झालेल्या नुकसान भरपाईबद्दल तिवारी सांगतात, "बोंडअळीमुळे बाधित शेतकऱ्यांना पूर्ण मदत मिळेल. त्यासाठीचे पंचनामेही सुरू आहेत. शासनाकडे शेतकऱ्यांचे 12 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. जोपर्यंत कृषी विभागाचा पीक कापणी अहवाल येत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना वाट पहावी लागेल."

विदर्भात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या

अमरावती विभागात वर्धा जिल्ह्यासहित 2001पासून आतापर्यंत 14,707 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांपैकी 6574 शेतकऱ्यांच्या आत्महत्या मदतीसाठी पात्र तर 8010 शेतकऱ्यांच्या आत्महत्या अपात्र ठरल्या आहेत. 120 प्रकरणं अजून प्रलंबित आहेत.

2017 सालात एकट्या अमरावती विभागात 1175 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. 2001 पासून अमरावती जिल्ह्यात 3324, अकोला 2089, यवतमाळ 3960, बुलडाणा 2372, वाशीम 1406 तर वर्धा इथं 1553 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)