पॉर्न फिल्ममुळे वाढतोय घरगुती हिंसाचार

फोटो स्रोत, Puneet Barnala
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
मराठवाड्यात राहणारी रत्ना (नाव बदललं आहे) जेव्हा लग्न करून तिच्या नवऱ्याच्या घरी आली तेव्हा तिच्या डोळ्यात सुखी संसाराची बरीच स्वप्नं होती. हिंदी सिनेमाच्या हिरो-हिरोईन सारखं आपलंही आयुष्य रोमँटिक गोष्टींनी भरलेलं असेल असंच तिला वाटत होतं.
लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले. तिचा नवरा बी.टेक झालेला होता, तिची हौस पूर्ण करत होता, फक्त रात्री तिच्याजवळ आला की आडदांडपणा करायचा.
मोबाइलवर भलते सलते व्हीडिओ बघायचा. रत्नालाही जबरदस्ती दाखवायचा आणि व्हीडिओमधे जे दाखवलं आहे ते सगळं रत्नाने आपल्याला करू द्यायलाच हवं अशी मागणी करायचा.
सुरुवातीला रत्नाने हे सहन केलं, नवऱ्याचा आडदांडपणा हळूहळू कमी होईल अशी तिची अपेक्षा होती. पण तसं न होता त्याचा रानटीपणा वाढतच गेला. तो रात्रभर मोबाईलवर वेगवेगळे पॉर्न व्हीडिओ लावून ठेवायचा आणि तिच्यासोबत जबरदस्ती करायचा. सकाळपर्यंत रत्नाच्या सर्वांगावर जखमा असत.
तो उत्तेजक गोळ्याही घेई आणि जर रत्नाने हे सगळं करायला नकार दिला किंवा त्याच्या मते ती त्याला खुश ठेवण्यात कमी पडली तर तिला मारहाण ठरलेलीच!
घरामधे दोघंच राहात असल्याने तिला सोडवायलाही कोणी नसायचं. एके दिवशी पॉर्न व्हीडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याने रत्नाचे पाय वरती पंख्याला दोरीने बांधून ठेवले आणि तशा अवस्थेत तिच्याशी गुरासारखा सेक्स केला.
शेवटी हे सगळं सहनशक्तीच्या पलीकडे गेल्याने रत्नाने नवऱ्यापासून घटस्फोट घेतला. तिच्या सुखी संसाराचं स्वप्न भंगलं होतं. रत्ना सध्या तिच्या माहेरी राहते.

फोटो स्रोत, Getty Images
टाटा ट्रस्ट आणि राज्य सरकार यांच्या सहयोगाने स्थापन झालेल्या महिला व बाल सहाय्यता समितीच्या नांदेड जिल्हयातील समाजसेविका राधा गवरे सांगतात, "घरगुती हिंसाचाराच्या ज्या घटना घडतात त्यात पॉर्न पाहून तशा प्रकारच्या सेक्सची मागणी बायकोकडे करणं, तिने नकार दिल्यास तिला मारहाण करणं किंवा तिच्यावर जबरदस्ती करणं अशा घटनाच आजकाल जास्त समोर येत आहेत,"
त्या असंही सांगतात की, "यात सुशिक्षित- अशिक्षित, शहरी-ग्रामीण असला काही भेद नाही. सगळीकडे सारखीच परिस्थिती आहे. दारू किंवा इतर नशा आणि पॉर्न यामुळे बऱ्याच स्त्रियांना छळाला तोंड द्यावं लागत आहे."
स्वस्त इंटरनेटमुळे वाढते अत्याचार
व्हीडोली या व्हीडिओ ट्रॅकिंग साईटचे सहसंस्थापक सुब्रत कार यांच्या मते, स्वस्त स्मार्टफोन आणि जवळपास फुकट इंटरनेट यामुळे भारतात पॉर्न पाहण्याचं प्रमाण जवळपास दुपटीने वाढलं आहे. "आम्ही नुकताच एक सर्व्हे केला आणि त्यावेळी ही गोष्ट आमच्या लक्षात आली", सुब्रत सांगतात.

"आजकाल दर दुसऱ्या माणसाकडे स्मार्टफोन आहे. इंटरनेट सहज उपलब्ध आहे आणि पर्यायाने पॉर्नही सहज बघायला मिळतं. साहाजिकच याचा परिणाम विवाहसंबंधांवर होत आहे," महिला व बाल सहाय्यता समितीच्या मराठवाडा समन्वयक ज्योती सपकाळ सांगतात.
राधा गवरे सांगतात, "नुसत्या लैंगिक समाधानासाठी पॉर्नमधले प्रकार करून पाहण्यापेक्षा आपलं पौरुषत्व सिद्ध करण्यासाठी, तसंच कधी कधी बायकोला ताब्यात ठेवायला हवं या भावनेतूनही पुरुष असले प्रकार करतात."
"कित्येक पुरुषांच्या मनात 'माझी बायको आहे ना, मग मी तिचं वाट्टेल ते करीन' अशी भावना असते," असंही राधा गवरे सांगतात.
गवरे यांनी त्यांच्या संस्थेकडे मदतीसाठी आलेल्या एका स्त्रीची कहाणीही बीबीसी मराठीला सांगितली.
चंदाचा (नाव बदललं आहे) नवरा कायम पॉर्न व्हीडिओ पाहायचा आणि चंदासोबत तशा प्रकारच्या सेक्सची मागणी करायचा. सुरुवातीला चंदाने नवऱ्याचं म्हणणं ऐकलं आणि तिने पॉर्न व्हीडिओ पाहून नवऱ्याला खुश ठेवण्याचा प्रयत्न केला.
पण नंतर तिच्या नवऱ्याने पॉर्नसारखा सेक्स तिच्यासोबत करतानाचे व्हीडिओ बनवायला सुरुवात केली. हे व्हीडिओ बनवून त्याने त्याच्या मित्रासोबत शेअर केले.
"हे सगळं त्याने पॉर्नमध्ये पाहिलं होतं. तो रोजंदारीवर काम करणारा माणूस होता. पण या आर्थिक परिस्थितीतही त्याच्याकडे असे व्हीडिओ पाहण्यासाठी लागणारा फोन आणि इंटरनेट होतं. एवढंच नाही तर असा व्हीडिओ बनवून तो शेअर करणं हेही त्याला जमत होतं," गवरे पुढे सांगतात.
बऱ्याचदा महिला खूप सहन करतात पण कोणाकडे काही सांगत नाहीत. अगदीच टोकाची वेळ आली तरच या गोष्टींची वाच्यता करतात. बऱ्याचदा त्या 'माझा नवरा दरवाजाने न येता खिडकीने येतो' अशा प्रकारच्या सांकेतिक भाषेत बोलतात," अशी माहिती ज्योती सपकाळ यांनी दिली
भावनिक गुंतवणूक शून्य
स्वतःच्या बायकोला 'सेक्स देणारं मशिन' यापलिकडे कोणतीही किंमत देण्यास हे पुरुष तयार नसतात. बायकांना अपेक्षित असलेलं प्रेम, भावनिक गुंतवणूक आणि आधार त्यांना त्यांच्या नवऱ्यांकडून मिळत नाही त्यामुळे त्या कोलमडून पडतात.

फोटो स्रोत, Puneet Barnala
सातारा जिल्ह्यातील वाईचे जनरल प्रॅक्टिशनर डॉ. शंतनू अभ्यंकर सांगतात, "तुम्ही सर्कशीच्या कसरती घरी कराल तर कसं चालेल? बायका अॅनल सेक्स आणि ओरल सेक्स करण्यासाठी तयार नसतात."
"त्यांच्या मनाविरूद्ध नवऱ्याने त्यांच्यावर जबरदस्ती केली तर नवऱ्याच्या हट्टापुढे त्या मान तुकवतात पण त्यांना जी भावनिक गुंतवणूक हवी असते ती त्यांना कधीच मिळत नाही," डॉ. शंतनू अभ्यंकर म्हणाले.
"सेक्सच्या वेळी नवरा-बायको समान पातळीवर हवे. दोघांनाही त्यातून आनंद मिळायला हवा. दुर्दैवाने हा विचारच आपल्याकडे नाही. असं काही घडतं तेव्हा मानसिकदृष्टया बाई बऱ्याचदा शॉकमध्ये गेलेली असते."
अशा स्त्रियांचं काउन्सेलिंग करणं फार महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा मी त्यांच्या नवऱ्यांनाही काही गोष्टी वाचायला देतो किंवा काही क्लिप्स आहेत त्या पाहायला देतो," अभ्यंकर पुढे सांगतात.
तज्ज्ञांची मदत घ्या
हैदराबाद येथील सेक्सॉलॉजिस्ट डॉ. शर्मिला मुजूमदार यांच्या मते असा प्रसंग गुदरल्यास ताबडतोब तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी.
आपल्या आनंदासाठी पॉर्न पाहाणं आणि बऱ्याच पॉर्नफिल्ममधे दाखवतात तसं अघोरी कृत्य करणं यात बराच फरक आहे. अनैसर्गिक, अघोरी आणि विकृत गोष्टींचं कधीही समर्थन होऊ शकत नाही.
पॉर्नमधे दाखवण्यात येणाऱ्या बऱ्याच गोष्टी या पॅराफिलीया म्हणजेचं अनैसर्गिक लैंगिकता या प्रकारात मोडतात, असं मत त्या मांडतात.

फोटो स्रोत, Puneet Barnala
"मी असं सांगेन की, अशा प्रसंगी सेक्सॉलॉजिस्टकडे जा, कारण त्यांच्याकडे पॅराफिलीयासाठी ट्रिटमेंट उपलब्ध असते. त्यावर औषध आहेत आणि योग्य मार्गदर्शन घेतलं तर जोडपी नैसर्गिकरित्या सेक्सचा आनंद घेऊ शकतात", असा सल्ला डॉ. शर्मिला मुजूमदार देतात.
पण जर परिस्थिती हाताबाहेर गेली असेल तर शारीरिक किंवा मानसिक अत्याचार सहन करण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला अशाप्रकारच्या गोष्टी करण्यास भाग पाडलं जात असेल तर लगेचच त्याची तक्रार करायला हवी, असंही डॉ. शर्मिला म्हणतात.
"पॉर्न पाहाण्यात काही गैर नाही. कित्येक जोडप्यांना पॉर्न पाहून आपल्या नीरस वैवाहिक आयुष्यात गंमत आणता येते," असंही मत त्या नोंदवतात.
पण आपल्या देशात सेक्सविषयी मोकळेपणानं बोलणं अजूनही वर्ज्य आहे, तिथे नवरा बायकोने एकत्र बसून आपल्या लैंगिक आशा-अपेक्षांविषयी एकमेकांना खुलेपणानं सांगणं हे एखाद्या परीकथेसारखंच आहे.
या समानतेच्या जगात बायकांना लैंगिक गोष्टींमध्येही समान हक्क मिळायला हवेत. त्याची पहिली पायरी म्हणजे आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराविरूद्ध, मग भले तो नवऱ्याकडून होणारा का असेना, व्यक्त व्हायला हवं असं मत तज्ज्ञ व्यक्त करतात.
"स्त्रिया बोलल्याच नाहीत तर कसं कळणार की, त्यांच्या बाबतीत काय घडतं आहे? त्यांनी पुढे येऊन या सगळ्या गोष्टी बोलायला हव्यात. आधी नवऱ्याशी आणि मग गरज पडलीच तर इतरांशी," राधा गवरे समस्येच्या मुळाशी जाताना हे नोंदवतात.
हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








