पाहा व्हीडिओ - सिंदखेड राजा : 'जिजाऊंच्या जन्मस्थळासाठीचे 311 कोटी कुठे गेले?'
- Author, अमेय पाठक
- Role, बीबीसी मराठीसाठी
जिजाऊंची 420वी जयंती सिंदखेड राजामध्ये साजरी होत आहे. त्यानिमित्त आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक मातब्बर नेते सिंदखेड राजामध्ये उपस्थित आहेत. असं असलं तरी, सिंदखेड राजा परिसर मात्र अद्यापही विकासापासून दूर असल्याची स्थानिकांची तक्रार आहे.
'जिजाऊंच्या जन्मस्थळ विकासासाठी देऊ असं आश्वासन दिलेले 311 कोटी कुठे आहेत?' असा सवाल जाधव घराण्याच्या 17व्या पिढीशी संबंधित असलेल्या शिवाजीराजे जाधव यांनी केला आहे.
हा विकासनिधी तातडीनं न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथे जिजाऊंचं बालपण गेलं. लखोजी राजे जाधव यांच्या पोटी 1598 साली जिजाऊंचा जन्म झाला.

फोटो स्रोत, BBC/Rahul Ransubhe
छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी स्वराज्य स्थापन करुन राज्यातील शोषितांना न्याय दिला. मात्र शिवाजी महाराजांमध्ये खऱ्या अर्थाने स्वराज्याची संकल्पना रुजवली ती जिजाऊंनी. जिजाऊ जगभरातील शिवप्रेमींसाठी मोठा प्रेरणास्रोत आहेत.
जिजाऊंचं जन्मगाव मात्र अद्याप विकासाच्या प्रतीक्षेत असल्याचं तिथे गेल्यावर जाणवतं.

फोटो स्रोत, BBC/Ameya Pathak
हा विशाल तटबंदी वाडा आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा इथला. तब्बल चार एकर परिसरांत पसरलेल्या या चिरेबंदी वाड्याला जिजाऊ तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचाही सहवास लाभला आहे.
जाधव घराण्याला पहिल्यांदाच राजा ही पदवी मिळाली ती लखोजी राजे जाधव यांच्या कीर्तीमुळे. त्यांची राजधानी म्हणजे सिंदखेड. त्याकाळी या प्रांताला सिद्धखेड या नावानं संबोधलं जात असे.
जिजाऊंच्या जन्माचं स्वागत हत्तीवरून साखर वाटून
या राजघराण्यात लखोजी राजे आणि म्हाळसाराणी यांच्या पोटी जिजाऊंनी जन्म घेतला. पुढे इथेच त्यांनी युद्धकला, प्रशासन यांचे धडे घेतले.

फोटो स्रोत, BBC/Ameya Pathak
स्थानिक इतिहास संशोधक विनोद ठाकरे सांगतात की, "त्याकाळी राजघराण्यात मुलगी होणं फार आनंदाची गोष्ट नसे, पण जिजाऊंच्या जन्मानंतर लखोजी राजे यांनी संपूर्ण प्रांतात हत्तीवरुन साखर वाटून स्त्री सन्मान आणि पुरोगामी विचारांचा धडा समाजाला घालून दिला होता."
तटबंदी राजवाडा आणि भुयारी मार्ग
जाधवांचा हा राजवाडा संपूर्ण 4 एकरात पसरला होता. भक्कम तटबंदीचा हा वाडा पूर्णतः किल्ल्याप्रमाणे आहे.
या वाड्याला एक मुख्य प्रवेशद्वार असून चहूबाजूंनी विशाल भिंतींचा वेढा आहे. वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारालगत दोन्ही बाजूंनी चिरेबंदी कमानी आणि पुरातन शिल्पं पाहायला मिळतात.
समोरच जिजाऊंचं जन्मस्थान आहे. या वाड्याचं वैशिष्ट्य म्हणजे वाड्यातील सर्व खोल्या या भुयारी आहेत. तर वाड्याच्या तळमजल्यातून अनेक भुयारी मार्ग जाताना दिसतात.
याच भुयारी मार्गातून लखोजी राजे यांच्या तत्कालीन दरबारात जाण्याचा रस्ता आढळतो. तळ मजल्यातच लखोजी राजे जाधव यांचा मुख्य कक्ष, शयनगृह तसंच जिजाऊंची न्हाणी असे भाग आहेत.
वाड्याच्या चहूबाजूंनी चिरेबंदी दगडांचे जिने आहेत. पर्यटक आणि शिवप्रेमी ज्या ठिकाणी नतमस्तक होतात ते जिजाऊंचं जन्म ठिकाण प्राचीन शिल्पांनी नटलं आहे. शिवाजी राजे यांच्यासोबत जिजाऊंची सुंदर शिल्प पाहायला मिळतात. वर्षभर इथे पर्यटकांची वर्दळ असते.
'सिंदखेड राजा परिसराचा विकास होत नाही'
आज या स्थळाची महती आणि इतिहास मोठा असला तरी सिंदखेड राजा परिसराचा विकास होत नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
राज्य पुरातत्व विभागाच्या अंतर्गत असलेल्या जिजाऊवाड्याला पहिल्यांदा 1995 साली सत्तेत आलेल्या युती सरकारच्या काळात 2 कोटींचा निधी मिळाला.

फोटो स्रोत, BBC/Ameya Pathak
या निधीतून वाड्याचं सुशोभीकरण, डागडुजी करण्यात आली तर जिजाऊंचा ब्राँझ धातूचा पुतळाही बसवण्यात आला.
"यानंतर वाड्याचं सुशोभीकरण झालं असलं तरी परिसराचा विकास मात्र अद्यापही खुंटलेलाच आहे," असं मत जाधव घराण्याच्या 17व्या पिढीशी संबंधित असलेल्या शिवाजीराजे जाधव यांनी व्यक्त केले.
याबाबत आघाडी सरकारच्या काळात या स्थळाच्या विकासासाठी तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आराखडा समिती स्थापन केली होती.
या समितीच्या अहवालानुसार 311 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला. नंतर युतीची सत्ता आली पण आराखड्यानुसार ना निधी मिळाला ना विकास झाला, असं शिवाजीराजे जाधव सांगतात.
याबाबत मुख्यमंत्र्यांनी 2015 साली आश्वासन दिलं. मात्र "जिजाऊंच्या जन्मस्थळासाठीचे 311 कोटी कुठे आहेत?" असा सवाल जाधव यांनी केला आहे.

फोटो स्रोत, BBC/Ameya Pathak
सिंदखेड इथे दरवर्षी लाखो पर्यटक, शिवप्रेमी, इतिहासाचे अभ्यासक येतात. एवढंच नाही तर 12 जानेवारी या जिजाऊंच्या जन्मदिनी हजारो लोक इथे जमतात.
त्या सर्वांसाठी यात्री निवासस्थान, स्वच्छतागृहे अशा प्राथमिक सुविधा द्याव्यात ही मागणी शिवाजीराजे जाधव यांच्यासह अनेक पर्यटकांनी केली आहे.
संपूर्ण देशाला स्वराज्याची शिकवण देणाऱ्या, सती परंपरेला मोडीत काढून स्त्रीशक्तीला चेतना देणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ यांचं जन्मस्थळ आजही स्वराज्य आणि स्त्रीशक्तीची प्रचिती देतं. आता या परिसराचा विकास व्हावा हीच इच्छा स्थानिक आणि शिवप्रेमी व्यक्त करत आहेत.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









