स्वामी विवेकानंद 'धर्मवेड हा मानवी मनाचा रोग' असं का म्हणाले होते?

- Author, डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर
- Role, बीबीसी मराठीसाठी
स्वामी विवेकानंद यांचा आज (12 जानेवारी) जन्मदिन. त्यानिमित्त 'समाजवादी' विवेकानंदांची ओळख करून देणारा हा लेख. गोहत्या बंदी, स्त्री-पुरुष समानता, आरक्षण याविषयी विवेकानंदांनी केलेली भेदक मांडणी उलगडली आहे डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी. तो आज पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

समाजवादी माणूस झापडबंद नसतो. भोवतालच्या सम्स्यांना तो निर्भयपणे आणि मोकळ्या मनानं भिडतो. गोहत्या बंदी, स्त्री-पुरुष समानता, आरक्षण, हिंदू मुस्लीम प्रश्न यांची विवेकानंदांनी भेदक मांडणी केली आहे.
विवेकानंद हे परिवर्तनाच्या चळवळीतले अग्रदूत असलेले समाजवादी आहेत. सर्वधर्म परिषदेनंतर केवळ एक वर्षानं आपला सर्वांत जवळचा शिष्य अळसिंगा पेरूमल यांना पत्र पाठवून त्यांनी कळवलं, "मी साधू नाही, मी संत नाही. मी गरीब आहे. मला गरीबांच्याबद्दल प्रेम वाटतं आणि दारिद्र्य, अज्ञान यांच्या गाळात रुतून राहिलेल्या वीस कोटी भारतीयांच्या मुक्तीचा मार्ग मी शोधतो आहे."
हे काम कठीण आहे याची त्यांना जाणीव आहे.
20 जून 1894 रोजी हरीदास बिहारीलाल देसाई यांना पत्र पाठवून त्यांनी कळविलं, "हे माझे अभागी भाऊ खेड्यात झोपडीत राहतात आणि हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन या तीनही राजवटीत ते भयानकपणे चिरडले गेले आहेत. त्यामुळे आपण माणूस आहोत, हेच ते विसरून गेलेत. त्यांना त्यांच्या मनुष्यत्वाची जाणीव करून देण्यापासून आपणाला सुरवात करावी लागेल."
नुसतं स्वातंत्र्य मिळवून काही फायदा नाही, याची त्यांना दाहक जाणीव आहे.
17 नोव्हेंबर 1894 रोजी आपल्या शिष्यांना पाठविलेल्या पत्रात ते म्हणाले, "इंग्रजांनी आपल्याला राज्य दिलं आणि ते निघून गेले तर ज्यांच्या हातात राज्य येईल, ते इतरांना गुलामासारखे वापरतील."
आणि म्हणून स्वातंत्र्याची नवी रचना शोधताना त्यांनी 1 नोव्हेंबर 1896 च्या पत्रात मेरी हेल यांना सांगितलं, "मी समाजवादी आहे."
समाजवादी माणूस झापडबंद नसतो. भोवतालच्या समस्यांना तो निर्भयपणे आणि मोकळ्या मनाने भिडतो. गोहत्या बंदी, स्त्री-पुरुष समानता, आरक्षण, हिंदू मुसलमान प्रश्न यांची विवेकानंदांनी भेदक मांडणी केली आहे आणि त्याचवेळी या देशाच्या नवनिर्माणाचा एक वेगळा मार्ग ते शोधताहेत.
हे सारंच दर्शन विलक्षण आहे.

गोहत्येविषयी विवेकानंदांचे विचार
गोहत्या बंदीची धग आज भारतभर सर्वत्र जाणवते आहे.
प्रखर हिंदूत्ववादी विनायक दामोदर सावरकर म्हणाले होते, "गाय हा एक उपयुक्त पशू आहे. ती माता नव्हे, देवता तर नव्हेच नव्हे. एक समर्थ राष्ट्र उभं करायचं असेल, तर भाकड गाय अवश्य कापा."
पण आज अनेकजण हे सोयीस्करपणे विसरून गेलेत.
मात्र विवेकानंदांनी या प्रश्नाची सजग मांडणी केली आहे. विवेकानंद ग्रंथावलीच्या तिसर्या खंडात पृष्ठ सातवर विवेकानंदांच्या एका शिष्यानं दिलेला अनुभव असा आहे - विवेकानंदांना भेटायला काही गोरक्षक आले. विवेकानंदांनी त्यांना गायींना विसरून त्यांनी जमवलेले सर्व पैसे मध्यप्रदेशात आज माणसं भूकेनं तडफडून मरताहेत, तिकडे पाठवायला सांगितलं.
ती सनातनी मंडळी म्हणाली, "स्वामी, आमचे धर्मग्रंथ सांगतात, ती माणसं मरताहेत, कारण त्यांनी गेल्या जन्मात पाप केलं होतं."
विवेकानंद त्यांना म्हणाले, "मग कसायाच्या हातात जाणार्या गायीबद्दलही तिनं गेल्या जन्मात पाप केलं होतं, असं समजून गप्प का बसत नाही?'
ती सनातनी मंडळी म्हणाली, 'स्वामी, गाय ही आमची आई आहे आणि आई कितीही वाईट असली, तरी तिचं रक्षण करावयास हवं.'
विवेकानंद त्यांना उपहासाने म्हणाले, 'आता निघा. आज मला तुमचे आईवडील समजले. हेच आईवडील बरोबर घेऊन हिंडणार्या या देशाचं मला नवनिर्माण करायचंय, याची दाहक जाणीव झाली.'
याबाबत विवेकानंदांनी मालमदुरा येथे केलेल्या भाषणात जे सांगितलं, ते विवेकानंद ग्रंथावलीच्या पाचव्या खंडात पृष्ठ 77 वर येते. विवेकानंद म्हणाले, 'या देशात एक काळ असा होता, की गोमांस भक्षण केल्याशिवाय ब्राम्हण हा ब्राह्मण होऊ शकत नव्हता. वेदांत तर असं सांगितलं आहे, 'राजा किंवा मार मोठा संन्यासी घरी आला तर, गाय बैलांच्या मांसाचं रूचकर भोजन त्यांना द्यावं.'
स्त्री मुक्तीचा प्रश्न
स्त्री प्रश्नाबाबत विवेकानंदांनी अशीच भेदक मतं मांडलीत. संमतीवयाच्या कायद्याची चर्चा सुरू असताना 1895 मध्ये आपला मित्र राखाल (म्हणजे नंतरचे बम्हानंद) यांना पत्र पाठवून त्यांनी सांगितले, "ही बालविवाहाची प्रथा महाभयंकर आहे. ही धर्माज्ञा आहे असं सांगतात. अरे मुलगी वयात येण्यापूर्वी तिला आई बनवायला निघालेल्या समाजाला कसला आलाय धर्म? आपल्या धर्मातल्या वाईट गोष्टी आपण नाकारल्या पाहिजेत."
त्याच वेळी शशी (म्हणजे नंतरचे रामकृष्णानंद) यांना पत्रं पाठवून त्यांनी सांगितलं, "लहान मुलीचं प्रौढ माणसाशी लग्न ठरवणार्या माणसाचा मी खून करू शकेन."
आणि दुसर्या एका पत्रात त्यांना सांगितलं, "स्त्री पुरुष हे एकाच पक्ष्याचे दोन पंख आहेत. ते समतोल नसतील, तर घर, परिवार, समाज, राष्ट्र खर्या अर्थानं उभंच राहू शकणार नाही."
स्त्रीमुक्तीचा प्रश्न त्यांच्या कायम मनात आहे.
अमेरिकेत पोहोचल्यावर आपल्या मित्रांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं, "अमेरिका समृद्ध आहे, संपन्न आहे, श्रीमंत आहे. कारण अमेरिकेतल्या स्त्रिया मुक्त आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या जीवनाच्या सर्व क्षेत्रात उभ्या आहेत. त्या साक्षात जगदंबा आहेत. मृत्युपूर्वी अशा हजार स्त्रिया मी भारतात निर्माण करू शकलो, तर मी सुखानं मरेन."
आणि या आयुष्यात हे शक्य नाही, असं लक्षात आल्यावर त्यांनी भगिनी निवेदितांना लिहिलं, "समाजातल्या स्त्रियांचे प्रश्न हे खरे प्रश्न आहेत. पण स्त्रियांमध्ये जाऊन ते प्रश्न समजावून घेऊन त्याची उत्तरं शोधत त्यांची कार्यवाही करण्याचं काम फक्त स्त्रीच करू शकेल. पण अशा स्त्रिया आज भारतात निर्माण करण्यात मी अयशस्वी ठरलो आहे. त्यामुळे आज मी त्यासाठी अमेरिकेतून स्त्रिया उसन्या घेतो. तू व ख्रिस्तीन यांनी भारतात येऊन हे कार्य करा."
रजस्वलेनं (पाळी आलेल्या महिलेने) मंदिरात जावं, की जाऊ नये याची भंपक चर्चा करत आजही समाज उभा आहे.
मात्र 23 ऑगस्ट 1896 रोजी परदेशातून शशीला पत्र पाठवून विवेकानंद सांगताहेत, "दक्षिणेश्वराच्या मंदिरात शरीर विक्रय करणाऱ्या स्त्रियांना प्रवेश दिला जात नाही, असं ऐकतो. हे पूर्णपणे चुकीचं आहे. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्री ही आपली सर्वात अधिक पददलित बहीण आहे. तिचं शारीरिक, मानसिक, आर्थिक शोषण होत आहे. मंदिराची सर्वाधिक गरज तिला आहे. दक्षिणेश्वराचं मंदिर शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांसाठी उघडं पाहिजे."

आरक्षणाचे समर्थक विवेकानंद
विवेकानंदांनी आरक्षणाबाबत आपली भेदक आणि आजही दाहक वाटतील अशी मतं नोंदवली आहेत. कुंभकोणमला ब्राह्मण तरुणांच्या सभेत भाषण करताना ते म्हणाले, "ब्रह्मवृंदहो, तुमच्या आणि माझ्या जातीची मृत्यूघंटा वाजवायला मी इथे उभा आहे. आपण जर सुखानं मेलो नाही, तर आपण कुजू. तसे होऊ नये, म्हणून आपण सांगितलं पाहिजे, 'आम्ही उच्चवर्णीय आहोत. अर्थार्जनाची एकही नोकरी आम्ही करणार नाही. त्या आम्ही दलितांसाठी मोकळ्या ठेवतो आहे'."
मात्र विवेकानंद केवळ शंभर टक्के आरक्षण मागून थांबत नाहीत. ते म्हणतात, "आपण त्यांना अनेक शतके शिक्षण दिलेलं नाही. त्यामुळे आपल्याला एक शिक्षक लागत असेल, तर त्यांना सात शिक्षक लागतील. त्यांच्यासाठी सातपट अधिक चांगल्या शिक्षणाची आपणाला सोय करावी लागेल."
आणि या विषयावर राखालला पत्र पाठवून त्यांनी सांगितले, "काहीजण म्हणतात, निसर्गातच समता नाही, तर ती आणण्याचा प्रयत्न तुम्ही का करता?' त्यांना आपण सांगितलं पाहिजे, 'निसर्गात समता नसेल, तर ती निर्माण करायला निसर्गानं आम्हाला जन्माला घातलं आहे. आता मला वाटतं की, दलितांसाठी सातपट नव्हे, तर दहापट अधिक चांगल्या शिक्षणाची सोय आपणाला करावी लागेल!"
मात्र हे सांगणारे विवेकानंद ब्राह्मण ब्राह्मणेत्तर वाद खेळत नाहीत.
'आपले महाप्रतापी पूर्वज तामीळ' या लेखात ते म्हणतात, "आज मद्रास प्रांतात ब्राह्मण द्वेषाची जी लाट आली आहे, ती थांबली पाहिजे. जीवनाच्या सर्व क्षेत्रात नेतृत्व देत आज ब्राह्मण तरुण उभे आहेत. याचे कारण ते ब्राह्मण आहेत. हे नव्हे तर, त्यांना अनेक शतके शिक्षण मिळाले हे आहे. आपण ब्राह्मण- ब्राह्मणेतर वाद खेळत नाही. आपणाला ब्राह्मणांना दलित आणि दलितांना ब्राह्मण बनवावयाचे नाही, आपण जातीअंताची लढाई लढतोय."
'हिंदू-मुस्लीम समन्वय हवा'
या देशाचा अभ्युदय करावयाचा असेल, तर "हिंदू-मुसलमान सहकार्य नव्हे, तर समन्वय हवा," हे विवेकानंदांनी सांगितलं. मोकळ्या मनानं प्रश्नांना भिडलात तर ते सहजशक्य आहे हे दाखवून दिलं. विवेकानंदांची ही मांडणी व्यापक आहे. विवेकानंदांनी सांगितलं, "या देशातील धर्मांतरं ख्रिश्चन आणि मुसलमान यांनी केलेल्या अत्याचारामुळे नव्हेत तर उच्चवर्णीयांनी केलेल्या अत्याचारामुळे झालीत. ते आपले अभागी भाऊ आहेत."
20 सप्टेंबर 1892 रोजी खेत्री निवासी शंकरलाल शर्मा यांना पत्र पाठवून त्यांनी सांगितलं, "त्रावणकोर कोचीन प्रांतात पुरोहितांचा अत्याचार भारतात सर्वाधिक आहे. त्यातून मुक्त होण्यासाठी येथील एकतृतियांश लोकसंख्या ख्रिश्चन बनली आहे."
नोव्हेंबर 1894 मध्ये हरीदास बिहारीलाल देसाई यांना पत्र पाठवून त्यांनी सांगितलं, "बंगाल प्रांतात मोठ्या प्रमाणात हिंदू-मुसलमान झाले. याचं कारण त्यांना हिंदू जमीनदार आणि पुरोहित यांच्या अत्याचारापासून सुटका हवी होती. ही धर्मांतरं मुसलमानांनी तलवारीच्या जोरावर केली, असं म्हणणं हे महामुर्खपणाचंच आहे."
मात्र त्याच वेळी धर्मांतर करून या आपल्या अभागी भावांची स्थिती सुधारलेली नाही, याची त्यांना खंत आहे. 29 मार्च 1894 रोजी अमेरिकेतून केरळचे धर्मगुरु रेव्हरंड आर. ह्यूम यांना पत्र पाठवून त्यांनी कळवलं, "तू हिंदूंना कॅथॉलिक केलेलं नाहीस, ते आपापल्या जातीत कॅथॉलिक झाले आहेत!"
या देशात धर्मांमध्ये समन्वयाची प्रक्रिया सुरू झाली आहे. याची विवेकानंद आठवण करून देतात.
10 जून 1898 रोजी सर्फराज मोहम्मद हुसेन यांना पत्र पाठवून त्यांनी कळवलं, "आमच्या अद्वैत वेदान्तातील सिद्धांत कितीही सूक्ष्म आणि सुंदर असलं, तरी समतेचा संदेश सर्वप्रथम व्यवहारात आणला, तो इस्लामनंच," आणि हे सांगत असताना हे आदान-प्रदान दोन्ही बाजूंनी सुरू आहे हे त्यांनी लक्षात आणून दिलं.
बोस्टन येथे 'ट्वेंटिथ सेन्चुरी हॉल' मध्ये मुलाखत देताना ते म्हणाले, "वेदांतातील उदारमतवादाचा भारतातील इस्लामवर परिणाम झाला आहे. तो सहिष्णू बनला आहे. इतर देशातील इस्लामपेक्षा तो वेगळा आहे."
मुसलमानांची राजवट वाईट नव्हती, याची विवेकानंद आठवण करून देतात.
'भारताचा ऐतिहासिक क्रमविकास' या लेखात ते म्हणतात, 'मोगलांच्या दरबारात जे बौद्धिक वैभव होतं, त्याचा अंशमात्रसुद्धा आपल्याला पुणे आणि लाहोरच्या म्हणजे मराठ्यांच्या आणि शिखांच्या दरबारात आढळत नाही. 'भारताचा भावी काळ' या भाषणात ते सांगतात, 'कोणतीही राजवट पूर्णपणे चांगली किंवा पूर्णपणे वाईट नसते. मुसलमान राजवटीचा फायदा हा, की त्यामुळे गरिबांची व दलितांची स्थिती सुधारली आणि विशेषाधिकार कमी झाले.'
हिंदू-मुसलमान ऐक्य, समन्वय यांनी विवेकानंद आजन्म झपाटलेले आहेत.
आयुष्यातील शेवटच्या दिवसात अंगात ताप असताना सुद्धा विवेकानंद अंबाला इथं गेले. तेथे आर्यसमाजी व मुसलमान यांच्यात निर्माण झालेली तेढ संपवली.
त्यानंतर अंबाला येथे हिंदू-मुसलमान मुलांना एकत्र शिक्षण देणार्या शाळेला भेट दिली.
'धर्मवेड हा मानवी मनाचा रोग'
समाजवादी विवेकानंद धर्माची गरज आणि धर्माच्या मर्यादा मानतात. विवेकानंदांचे भाऊ महेंद्रनाथ यांनी 'स्वामी विवेकानंद' या पुस्तकात लिहिलं, 'विवेकानंद त्यांना म्हणाले- धर्मवेड हा मानवी मनाला होणारा भयावह रोग आहे. मी सेंट पॉलप्रमाणे धर्माचे वेड पांघरलेला एक विचारवंत आहे.'
सर्वात महत्त्वाचं म्हणजे 10 जून 1898च्या पत्रात त्यांनी स्पष्टपणं सांगितलं, 'जिथे वेद नाही, कुराण नाही आणि बायबलही नाही, अशा ठिकाणी आपणाला मानवजातीला घेऊन जायचं आणि हे काम आपणाला वेद, कुराण आणि बायबल यांचा आधार घेऊनच करावं लागेल.' सर्वधर्मसद्भाव सांगत आणि शोधत समाजवादी विवेकानंद वाटचाल करत होते.

विवेकानंदाची तीन पत्रे
स्वामी विवेकानंद हे कृतीशूर विचारवंत आहेत. तळागाळातील माणसांच्या मुक्तीचा मार्ग ते शोधत आहेत.
सर्वधर्म परिषदेतील भाषणानंतर केवळ दीड महिन्यात 28 डिसेंबर 1893 रोजी हरीपद मित्र यांना पत्र पाठवून त्यांनी कळवलं, 'केवळ कुतुहूल म्हणून किंवा नाव मिळवायला मी इथं आलेलो नाही. तर माझ्या मनात माझ्या देशाच्या नवनिर्माणाची जी रचना आहे. त्या रचनेला मदत करतील, अशा रचना वा माणसे मला मिळताहेत का? हे मला पहायचं आहे.'
आपल्या मनातील ही रचना त्यानंतर विवेकानंदांनी तीन पत्रांतून सांगितलं आहे. पहिलं पत्र 19 मार्च 1894 ला शशीला लिहिलं आहे, दुसरं 20 जून 1894 रोजी हरिदास बिहारीलाल यांना लिहिलं आहे आणि तिसरं पत्र 23 जून 1894 ला म्हैसूरच्या महाराजांना लिहिलेलं आहे.
तीनही पत्रं सविस्तर आहेत आणि एकच गोष्ट सांगत आहेत.
विवेकानंद लिहितात, "आपली खेडी भुकेकंगाल आणि अर्धनग्न आहेत. आपण सार्या जगातील संपत्ती लुटून आणून एका खेड्यात ओतली, तरी एका वर्षात ते खेडे पुन्हा भुकेकंगाल बनेल. आपल्याला या खेड्यातील लोकांना शिक्षण दिले पाहिजे."
"विज्ञान शिकविले पाहिजे. त्यांना आपल्या पायावर उभं केलं पाहिजे. आपण तेथे शाळा काढून काही उपयोग नाही. शेतकरी शेतात राबताहेत, मुले गुरे हाकताहेत आणि स्त्रिया घर कामात वाकलेल्या आहेत. तेथील शाळेत कोणीच जाणार नाहीत."
"मला प्रत्येक खेड्यात दोन संन्यासी ठेवायचेत. ते संध्याकाळच्यावेळी पारावर जमलेल्या लोकांना धर्मग्रंथ समजावून देतील. पण त्यांच्याबरोबर पृथ्वीचा गोल असेल. भूगोलाच्या मदतीनं ते इतिहास समजावून देतील. त्यांच्याकडे लोहचुंबक व रसायने असतील. प्रकाशचित्रे असतील. ते त्यांना विज्ञान समजावून देतील."
"आपल्याला हा देश असा तळागाळातून उभा करावा लागेल. या कामासाठी मला भारतात दहा हजार तरुण सहजपणे मिळतील. पण या कार्यासाठी लागणारा पैसा भारतातील कोणताही श्रीमंत माणूस देणार नाही. मी अमेरिकेत आलो आहे, भाषणं देईन आणि या कामासाठी लागणारा पैसा गोळा करीन."
या रचनेत विवेकानंदांचा फार मोठा भ्रमनिरास झाला. फार पैसे मिळाले नाहीत. भाषणे ठेवणार्या माणसांनी फसवलं. या करंट्या कंटाळवाण्या भाषणांचा मला कंटाळा आला आहे, असं सांगत त्यांनी पत्रं लिहिली.
दुसर्यावेळी परदेशात गेले, त्यावेळी परत जाण्याचे तिकीटतरी भाषणांच्या पैशातून मिळेल का? हा विचार मनात राहिला.
विवेकानंदांचे सर्वांत क्लेशदायक पत्र 17 जून 1900चं आहे. त्यात त्यांनी म्हटलयं, "भाषण हे आज केवळ माझ्या उपजिवीकेचे साधन उरलंय!"
'माझी हाडे चमत्कार करतील!'
या महामानवाला फार मर्यादित व्यावहारीक यश मिळाले. अनेक कारणं आहेत, फक्त 39 वर्षांचं आयुष्य, अथक एकाकी धडपड. अनेक व्याधींनी पोखरलेलं शरीर आणि विवेकांनंदांचे विचार अजिबात न समजणारा किंवा त्यांची खिल्ली उडवणारा समाज.
महामहोपाध्याय गोपाळशास्त्री कर्हाडकर यांनी त्र्यंबकशास्त्री वैद्याना सांगितले, 'हा माणूस शुद्र आहे. समुद्रप्रवास करून आलाय. याला संन्यास घेण्याचा अधिकार नाही.' 1898 मध्ये कालीमंदिराच्या विश्वस्तांनी विवेकानंदांना सांगितलं, 'त्यांचे पाश्चात्य मित्र मंदिरात आल्यास मंदिराच्या पावित्र्याचा भंग होईल. त्यामुळे या वर्षी श्री रामकृष्णांचा जन्मदिवस त्यांना तेथे साजरा करता येणार नाही!'
मात्र आपल्याला फार मर्यादित यश का मिळालं, याचं विवेकानंदांनी सांगितलेलं कारण वेगळं आहे.
विवेकानंद म्हणाले, "या आयुष्यात मी एक गोष्ट शिकलो. एकच माणूस एकाच आयुष्यात दार्शनिक म्हणजे विचारवंत, नेता, संघटक, कार्यकर्ता, खजिनदार या सर्व गोष्टी करू शकणार नाही. मी फक्त हिमालयात बसून ही मांडणी करावयास हवी होती... पण काही हरकत नाही, माझी हाडंसुद्धा चमत्कार करून दाखवतील."
माणसाबरोबर नाहीशी न होता मागे उरणारी हाडं म्हणजे माणसानं मांडलेले विचार.
आपल्या आजच्या आणि उद्याच्याही प्रश्नांची मांडणी करत आणि त्यांची उत्तरं सांगत विवेकानंदांचे विचार आपल्या बरोबर आहेत.
गरज आहे आपण ते मोकळ्या मनानं वाचण्याची, समजावून घेण्याची.
(ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि लेखक डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनीस्वामी विवेकानंद कर्तुत्वावर आणि योगदानावर 'शोध स्वामी विवेकानंदांचा' हे पुस्तक लिहिलं आहे.)
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








