मासिक पाळीदरम्यान नदी ओलांडण्यावर निर्बंध

फोटो स्रोत, Science Photo Library
घानामध्ये मासिक पाळीदरम्यान स्त्रियांना नदी ओलांडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ऑफिन नदीवरच्या एका पुलाशी काही धार्मिक बाबी निगडीत असल्यानं असं करण्यात आल्याचं सांगण्यात येतं.
पूल ओलांडायचा नसेल तर शाळेत जायचं कसं, असा प्रश्न इथल्या विद्यार्थिनींना पडला आहे. या नियमामुळे मुलांच्या हक्कांवर काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
या निर्णयामुळे मध्य क्षेत्रातल्या अप्पर डेन्कायरा जिल्ह्यातल्या पूर्वेकडच्या भागातल्या विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या काळात शाळेत जाता येणार नाही.
आफ्रिकेत आधीच मुलींना मासिक पाळीच्या काळात शाळेत पाठवण्यावरून संघर्ष सुरू आहे. आता हा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.
युनिस्को संस्थेच्या मते, या भागातील दहापैकी एक मुलगी मासिक पाळीमुळे शाळेत जात नाही. जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार, घानातल्या 1 कोटी 5 लाख महिला स्वच्छतेसाठी आवश्यक असलेल्या सुविधांपासून वंचित आहेत.
'देवांकडून आपण उत्तरं मागायला हवी'
युनिसेफच्या मेन्स्ट्रुअल हायजिन अॅम्बेसेडर शमीमा मुस्लिम अलहसन यांनी बीबीसीला सांगितलं, "ऑफिन नदीवरील पुलाशी संबंधित जारी केलेले आदेश शिक्षणाच्या अधिकारांचं उल्लंघन करतात."
"असं वाटतं की, देव खरोखर खूपच ताकदवान आहे. नाही?" शमीमा विचारतात. "बऱ्याच वेळा मी विचार करते की, महिलांना अनेक गोष्टी करण्यापासून रोखण्याऱ्या देवांकडून आपण उत्तरं मागायला हवी. आपण त्यांना दिलेल्या जबरदस्त शक्तीचा बघा त्यांनी कसा उपयोग केला आहे."

फोटो स्रोत, Getty Images
घानातील मध्य क्षेत्राच्या मंत्री क्वामेना डंकन यांनी यासंबंधी स्थानिक मंत्र्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचे संकेत दिले आहेत.
ऑफिन नदी अशांती आणि मध्य क्षेत्र यांमध्ये सीमा म्हणून काम करते.
बऱ्याच संस्कृतींमध्ये आजसुद्धा महिलांच्या मासिक पाळीशी संबंधित अनेक गैरसमज आहेत. मादागास्करमध्ये महिलांना मासिक पाळीच्या काळात अंघोळ करण्यास मनाई केली जाते. तसंच नेपाळमधील अनेक भागांत आजही महिलांना मासिक पाळीच्या काळात वेगळ्या झोपड्यांमध्ये राहण्याची जबरदस्ती केली जाते.
भारतीय कुटुंबांमध्येही मासिक पाळीशी संबंधित अनेक रूढी आहेत आणि या काळात महिलांचा वावर निषिद्ध मानला जातो.
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








